बलुतं :  प्रसिद्ध दलित साहित्यिक दया पवार यांचे आत्मकथन. १९७८ साली प्रकाशित झाले आहे. दया पवार म्हणजेच दगडू मारुती पवार (१९३५ – १९९६). त्यांचा जन्म धामणगाव (ता.अकोले, जि.अहमदनगर) येथे झाला. त्यांचे कोंडवाडा (१९७४), पाणी कुठंवर आलं ग बाई…आणि धम्मपद हे कवितासंग्रह, विटाळ हा कथासंग्रह आणि चावडी व पासंग हे वृत्तपत्रीय लेखसंग्रह इत्यादी लेखन प्रसिद्ध आहे.

बलुतं  हे मराठी भाषेतील पहिले प्रकाशित दलित आत्मकथन होय. दगडू मारुती पवार यांच्या चाळीस वर्षाच्या जीवनप्रवासाची आत्मकहाणी या आत्मकथनात मांडली आहे. समाजव्यवस्थेने तुडवलेल्या, दुःखाग्नीने  पोळलेल्या दगडूची ही कहाणी आहे. हजारो वर्षे जो समाज उपेक्षित – वंचित राहिला, अज्ञान, दैन्य आणि दास्य यांच्या गर्तेत खितपत राहिला अशा महार जातीत दगडूचा जन्म झाला. दगडूचे बालपण खेड्यात आणि शहरात अशा दोन्ही ठिकाणी गेलेले आहे. धामणगावचा महारवाडा, तेथील चावडी, चावडीसमोरचे पटांगण, तिथले खेळ, भांडणतंटे हे सर्व त्यांच्या बालपणीच्या भावविश्वात रूतून बसलेले आहे. गावकीची कामे करणे, बड्या अंमलदारांच्या घोड्यापुढे धावणे, त्यांच्या जनावरांची देखभाल करणे, दवंडी देणे, मयताचा सांगावा पोहोचविणे, मेलेली जनावरे ओढणे, लाकडे फोडणे, गावची जत्रा वाजविणे अशी कामे महार जातीतील लोकांना करावी लागत आणि या कामाच्या मोबदल्यामध्ये त्यांना जे धान्य, वैरण मिळत असे त्या मोबदल्याला बलुतं असे म्हणत. उच्चवर्णीयांकडून दलितांना मिळणारी उपेक्षेची वागणूक, अज्ञान – अंधश्रद्धा, खेडे आणि शहरातील दलित व स्त्रियांचे दुःखभोग या आत्मकथनात मध्ये आलेले आहे.

या आत्मकथनातील समाजजीवनाला विविधरंग आहेत.नोकरीच्या निमित्ताने मुंबईला कामाठीपुऱ्यात दया पवार यांचे वास्तव्य होते. या कामाठीपुऱ्यातील दलितांचे भयावह जगणे लेखकाने मांडले आहे. इथे सट्टा, बेटिंग आणि दारूच्या भट्ट्या लावणे सामान्य समजले जाते. जुगाराचे अड्डे आणि सेक्सची चर्चा तर कामाठीपुऱ्यात उघड चालत असे. दगडूही या समाजाचाच एक भाग होता. डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी सुरू केलेल्या समाजपरिवर्तनाचे हाकारे त्याच्या मनापर्यंत जातात. परंतु परिस्थितीने खचलेल्या दगडूची सतत घुसमट होताना दिसते. दलितांना आत्मविश्वास, आत्मावलंबन आणि आत्म-सन्मानाचा प्रकाश देणाऱ्या डॉ. आंबेडकरांच्या विचारकार्याचा परिणाम दया पवार यांच्यावर झाल्याचे या आत्मकथनातून मधून स्पष्ट जाणवते.

माणसाला चिकटलेल्या जातीची आणि शोषणाचीही व्यथा या आत्मकथनातून दया पवार यांनी मांडली आहे. दया ह्या व्यक्तीत्वाचे आत्मकथन प्रकट होत असताना येथे दगडूच्या अपमानित समाजाचेही आत्मकथन येते. दगडूच्या कुटुंबातील आणि सहवासातील व्यक्तींची रेखाचित्रे अत्यंत प्रत्ययकारी व जिवंत वाटावी अशी रेखाटलेली आहेत. सतत कष्ट उपसणारी आई, व्यसनीदादा (वडील), आजी, वडाळ्याच्या झोपडपट्टीतील बहीण, कडुनिंबाचा रस पिणारी काकू, कलावंत सदाशिव, अफवा उठवणारा उमा आज्या, सट्टा बेटींग खेळणारा चंदर, हिस्टेरिया झालेली सीता, मार्ग चुकलेली सई, नवऱ्याने सोडून दिलेली बानू, सुंदर हंसा, गऊ वडारिण, नक्षत्रासारखी रेणू, वेश्या झालेली जमना मावशी, भ्रमनिरास झालेला रोकडे, सलमा अशा कितीतरी व्यक्तिरेखा या आत्मकथनात येतात. त्यामुळे व्यक्तिदर्शन आणि समाजदर्शन अशा दोन्ही अंगाने या आत्मकथनाला मूल्य प्राप्त झालेले आहे.

बलुतं  हे वास्तव जीवनाचा कलात्मपूर्ण प्रत्यय आणून देणारे आत्मकथन असून त्यामुळे मराठी वाङ्मयात एक नवी मोलाची भर पडलेली आहे. मित्राशी हितगुज करावे अशा पद्धतीने या आत्मकथनाची लेखन रचना आणि निवेदनशैली आहे. त्यासाठी दया पवार यांनी साधी, सोपी, ओघवती व अनलंकृत भाषा वापरली आहे. कधीकधी ही भाषा काव्यात्म वळणही घेते.

दलित साहित्यकृती म्हणून बलुतं  श्रेष्ठ आहेच पण एक ललितसाहित्यकृती म्हणून हे आत्मकथन सरस ठरते.या आत्मकथनाने मराठी दलित साहित्याची पाऊलवाट निर्माण केली असे म्हटले जाते. दया पवार यांना त्यांच्या साहित्यसेवेबद्दल पद्मश्री पुरस्काराने सन्मानित केले असून या आत्मकथनाला महाराष्ट्र सरकारचा उत्कृष्ट वांङ्मयासाठीचा पुरस्कार मिळालेला आहे. या आत्मकथनाची अनेक भारतीय भाषांमध्ये आणि इंग्रजी, फ्रेंच आणि जर्मन भाषेत भाषांतरे झाली आहेत.

संदर्भ : १. पगारे म. सु., दलित साहित्याचा इतिहास, प्रशांत पब्लिकेशन्स्, जळगाव, २००५. २. मुलाटे वासुदेव, दलितांची आत्मकथने : संकल्पना व स्वरूप, स्वरूप प्रकाशन, औरंगाबाद, १९९९. ३. मेश्राम योगेन्द्र, दलित साहित्य उद्गम आणि विकास, श्री मंगेश प्रकाशन, नागपूर, १९९८.