वाघमारे, योगीराज : (१ ऑक्टोबर १९४३). योगीराज देवराव वाघमारे. ज्येष्ठ दलित कथाकार, कादंबरीकार, नाटककार, बालसाहित्यकार म्हणून सर्वपरिचित. जन्म येरमाळा, ता. कळंब, जि. उस्मानाबाद येथे झाला. त्यांनी प्राथमिक शिक्षण जन्मगावी अत्यंत हलाखीत घेतले. १९६२ रोजी औरंगाबाद येथील मिलिंद महाविद्यालयात त्यांनी प्रवेश घेतला. तेथे बोर्डिंगमध्ये राहून शिष्यवृत्तीच्या आधारे पदवीचे शिक्षण घेतले. त्यानंतर शासकीय अध्यापक महाविद्यालय, अंबेजोगाई येथून १९६९ मध्ये बी.एड केल्यानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद येथून १९७२ मध्ये त्यांनी मराठी विषयात बहि:स्थ विभागातून पदव्युतर शिक्षण पूर्ण केले. १९६५ मध्ये त्यांची माध्यमिक शिक्षक म्हणून नेमणूक झाली. दरम्यान १९८३ मध्ये ते महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण झाले. २००१ मध्ये जिल्हा प्राथमिक शिक्षणाधिकारी या पदावरून ते निवृत्त झाले.

योगीराज वाघमारे यांनी कथा, कादंबरी, कविता, एकांकिका, बालसाहित्य या प्रकारात लेखन केले. कथा हा त्यातील केंद्रवर्ती भाग आहे. मिलिंद महाविद्यालयात विद्यार्थी असताना त्यांनी कथा लेखनास सुरुवात केली. उद्रेक  ही त्यांची पहिली कथा १९७० मध्ये अस्मितादर्श या त्रैमासिकातून प्रकाशित झाली. मिलिंद महाविद्यालयाच्या महाविद्यालयीन नियतकालिकामध्ये त्यांच्या काही कथा प्रकाशित झाल्या. १९७८ मध्ये उद्रेक  या नावानेच त्यांचा पहिला कथासंग्रह प्रकाशित झाला.

योगीराज वाघमारे यांची साहित्यसंपदा : कथासंग्रह –  उद्रेक (१९७८), बेगड (१९८०), गुडदाणी (१९८३), होरपळ (२००८), बहिष्कार (२००८) नियत (२०१९) ;  कादंबरी –  सभापती (१९९०), शिक्षणनामा (२०००), धुराळा (२००५), पडझड (२००५), भीमयुग (२००९), आधार (२०१२), आक्रंदन (२०१२ ), शाळेचे दिवस (२०१३ ), रातआंधळे (२०१३ ), गहिवर (२०१९) ; एकांकिका – मृतात्मे (१९७४),अगा जे घडलेची नाही (१९७४), बारव (२०००), मध्यस्थ (२०१०) ; बालकुमार साहित्यआंब्याचे झाड (१९९१), शूरवीरांचे माहेर (१९९८), आभाळमाया (२०००), हमीद आणि इतर कथा (२०००), पिंपळपान (२००३), श्रामणेर (२००९), रमाई (२०१५), तुकाराम आणि त्याचे मित्र्‌ (२०१६), घुसमट (२०१६), ज्योतीसावित्री (२०१९) संपादित ग्रंथधम्म्‌क्रांती (२००८), बाबासाहेबांचे शिलेदार (२०१३),सोलापुरी कथा (२०१६) ; याचबरोबर त्यांनी काही कविताही लिहिल्या आहेत.

त्यांच्या उद्रेक  या कथासंग्रहातील कथा आंबेडकरी विचारदर्शन घडविणाऱ्या आहेत. दलित समाजातील विविध जीवनानुभवांची मांडणी करतानाच समाजपरिवर्तनाच्या दिशेने जाणारे, माणुसकीची जपणूक करणारे, बालमन, तरुणमन, स्त्रीमन, आबालवृध्द्‌मनाचे प्रत्ययकारी चित्रण यातील कथांमधून आलेले आहे. उद्रेकनंतर त्यांचा बेगड  हा कथासंग्रह वाचकप्रिय झाला. त्यामध्ये दलित समाजातील वृत्ती-प्रवृत्तींचे परखड चित्रण आलेले आहे. विशेषत: सुशिक्षित दलित तरुणांमध्ये निर्माण झालेला तुटलेपणा वाघमारे यातून अधोरेखित करतात. गुडदाणी  या कथासंग्रहास राजा ढाले यांची प्रस्तावना आहे. त्यामध्ये ढाले यांनी या कथा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी निर्माण केलेल्या समाजक्रांतीतून उदयास आलेल्या नव्या बंडखोर पिढीचे चित्रण करतात असे म्हटलेले आहे. होरपळ  या संग्रहातील कथा आंबेडकरी चळवळीतील दलित कार्यकर्त्यांच्या शोकात्मक वेदना मांडतात. बहिष्कार  आणि नियत  या कथासंग्र्‌हात समाजातील अन्याय-अत्याचाराचे प्रभावी चित्रण येते. त्याबरोबरच बौध्द जीवनप्रणालीची मांडणीही ते करतात. वाघमारे यांच्या कथा आंबेडकरी विचारांनी परिपृष्ठ झालेली अस्मिता, स्वाभिमान, स्वावलंबन आणि स्व्‌-उध्दारातून निर्माण झालेल्या स्थित्यंतराची विविधांगी स्पंदने चित्रित करतात. त्यामुळेच त्यांना मानवमुक्तीचा विचार मांडणारा सम्य्‌क कथालेखक म्हणून ओळखले जाते.

वाघमारे यांच्या कथेबरोबर त्यांचे कादंबरीलेखनही लक्षणीय आहे. सभापती  ही राजकीय कादंबरी आहे. दलित समाजाला आरक्षणाच्या माध्यमातून राजकीय प्रतिनिधित्व मिळाले. मात्र प्रस्थापित उच्चवर्गीय राजकारणी त्यांचा केवळ वापर करून घेतात याचे चित्रण या  कादंबरीत आहे. शिक्षणानामा  ही त्यांची शैक्षणिक क्षेत्रातील अनिष्ठ वृत्तींचा वेध घेणारी महत्त्वाची कादंबरी असून शिपायापासून शिक्षक, अधिकारी, राजकारणी यांच्या पर्यंतच्या माणसांचा दुटप्पीपणा येथे प्रभावीपणे आविष्कृत झालेला आहे. धुराळा  या कादंबरीतून ग्रामीण जीवनामध्ये दलित स्त्रीयांवर होणाऱ्या अन्यायाचे अस्वस्थ चित्रण आहे. ग्रामीण जीवनात कष्टकरी दलित समुहांची वेदना वाघमारे यांनी या कादंबरीत प्र्‌भावीपणे मांडलेली आहे. पडझड  या आत्म्‌निवेदनात्मक कादंबरीतून ग्रामीण परिसरातील समाजजीवन, चालीरिती, दलित-दलितेतर माणसांचे विविधांगी चित्रणे आले आहे. भीमयुग  ही त्यांची महाडच्या चवदार तळयावरील समता संगरावराच्या पार्श्व्‌भूमीवर आधारित कादंबरी आहे. त्यात भीमयुग  व क्षितीज  अशा दोन लघुकांदबऱ्या एकत्रित आहेत. आधार  या कादंबरीत गोपू या पात्राच्या माध्यमातून त्यांनी मराठवाड्यातील ग्रामीण जीवनदर्शन घडविलेले आहे. आक्रंदन  या कादंबरीतून शहरीकरण, जंगलतोडीमुळे बेघर पशूपक्षांचे चित्रण केले आहे. शाळेचे दिवस  ही त्यांची आत्मचरित्रात्मक कादंबरी आहे. एकूणच वाघमारे यांच्या सर्व कादंबऱ्या दलितांचे विविधांगी समाजदर्शन घडवितात. सामाजिक प्रश्नांच्या मांडणीमुळे या कादंबऱ्यांना सामाजिक मूल्य प्राप्त झालेले आहे.

योगीराज वाघमारे यांनी त्यांच्या चारही एकांकिकातून त्यांनी दलित चळवळीतल्या वेगवेगळ्या टप्यांचे चित्र्‌ण केलेले आहे. आंबेडकरोत्तर काळात चळवळीत पडलेली फुटीमुळे दलित स्त्रीवरील अन्यायाविरुध्द कोणीही आवाज उठवत नाही याचे चित्र्‌ण मृतात्मे  या एकांकीकेमध्ये येते. नामांतराच्या लढयात अनेक दलित तरुणांनी बलिदान दिले ; मात्र नामविस्तार झाल्यानंतर नामातंर विरोधी लोकांचेच सत्कार झाले. ही शोकांतिका अगा जे घडलेची नाही मध्ये येते. बारव  ही प्रतिकात्मक एकांकिका असून त्यातून स्त्रीयावरील अन्यायाचे चित्रण ते करतात. तर सामाजिक स्तरीकरणातील द्वंद्व मध्यस्तमध्ये आलेले आहे. वाघमारे यांच्या एकांकिका आशयसंपन्न व प्रयोगशील आहेत. योगीराज वाघमारे यांच्या साहित्यातील महत्त्वाचा भाग म्हणजे बालकुमार साहित्य होय. या साहित्यातून त्यांनी संस्कारक्ष्‌म व  प्र्‌बोधनात्मक विचार मांडलेले आहेत. यामध्ये बौध्द संस्कारांची मांडणी आलेली आहे.

योगीराज वाघमारे यांचे समग्र साहित्य आंबेडकरी विचारांनी परिपृष्ठ झालेले आहे. त्यात दलितांचे अस्मितादर्शन घडते. समाजातील स्थितीगतीचा आलेख त्यात येतो. ते दलितांचा मनातील उद्रेक जसा मांडतात. त्याचप्रमाणे दलितांमधील बेगडी प्रवृत्तीही अधोरेखीत करतात. मात्र त्यामागे गुडदाणीसारखा सामाजिक परिवर्तनाचा सम्यक विचार आहे. दलित समाजाचा दलित्वाकडून बुध्द्त्वाकडे झालेला प्रवास वाघमारे यांच्या सर्व्‌ लेखनातून उजागर होतो. म्ह्‌णूनच ते सम्यक लेखक ठरतात.

योगीराज वाघमारे यांच्या या वाङ्मयीन कार्यकर्तृत्वाबद्दल त्यांना अनेक मान-सन्मान मिळालेले आहेत. दलित लिटरेटर ॲन्थॉलॉजीमध्ये त्यांची कथाकार म्हणून नोंद घेतलेली आहे. टाईम्स् ऑफ इंडिया ने दलित लिटलेटर ही पुरवणी काढलेली होती. त्यामध्ये त्यांच्या ‘बेगड’ या कथेचा इंग्र्‌जी अनुवाद प्रसिध्द् झालेला आहे. तसेच सहयाद्री वाहिनीवरील कथा सरिता  या मालिकेत ‘बेगड’ कथेचे सादरीकरण करण्यात आलेले आहे. त्यांच्या लेखनाचा समावेश विविध विद्यापीठांच्या अभ्यासक्रमात करण्यात आलेला आहे इतर  भाषांमध्ये त्यांच्या कथांचा अनुवादही करण्यात आला आहे. उद्रेक या कथासंग्रहास महाराष्ट्र् शासनाचा उत्कृष्ठ वाङ्मय निर्मिती पुरस्कार मिळालेला आहे (१९८०). राज्य शिक्षक पुरस्कार (१९९५ ),अस्मितादर्श् पुरस्कार, दीनबंधू साहित्य् पुरस्कार, समाजभूषण पुरस्कार, शंकरराव मोहिते पाटील जीवनगौरव पुरस्कार, मनोरमा जीवनगौरव पुरस्कार इ. पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आलेले आहे. १९९९मध्ये मूर्तीजापूर येथे झालेल्या अस्मितादर्श साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते. राज्य मराठी विकास संस्था, महाराष्ट्र् शासन यांच्या दलित ग्रामीण साहित्य शब्द्कोश समितीवर ते सदस्य तसेच बौध्द साहित्य परिषद, सोलापूर, महाराष्ट्र्‌ साहित्य परिषद, शाखा सोलापूरचे ते अध्यक्ष राहिलेले आहेत.

संदर्भ :

  • तुपेरे, सारीपुत्र (संपा), सम्यक लेखक योगीराज वाघमारे, एक्स्प्रेस पब्लिशिंग हाऊस, कोल्हापूर, २०१२.