काट्यावरची पोटं : उत्तम बंडू तुपे यांचे आत्मकथन. १९८१ मध्ये प्रकाशित. सातारा जिल्ह्यातील खटाव तालुक्यातील येणकुळ हे तुपे यांचे मूळ गाव मात्र त्यांचा जन्म बेलवंडीत झाला. बालपण अहमदनगर जिल्ह्यात गेले. त्यांचे कुटुंब केकताडाच्या वाखापासून दोर व  मोटांसाठी नाडा बनवून देण्याचा व्यवसाय करीत होते. घरी अठराविश्व दारिद्र्य, त्यामुळे शाळेला जाण्याच्या वयात त्यांना पोटासाठी परंपरागत कामे करावी लागली. वयाच्या पाचव्या वर्षापासून त्यांना काबाडकष्ट करावे लागले. गरिबी आणि उपासमारीमुळे केवळ चौथीपर्यंत त्यांना शिक्षण घेता आले. सततच्या दुष्काळाला कंटाळून त्यांनी पुणे गाठले. ते मोठ्या बहिणीच्या आश्रयाला राहिले. पडेल ते कष्ट उपसले. या घरकामाबरोबर माळीकाम, वॉचमन, मजूर, हमाल, शिपाई अशी विविध प्रकारची कामे त्यांनी केली. आईने दिलेली संस्काराची शिदोरी त्यांना आयुष्यभर उपयोगी पडली. पुढे त्यांना वामनराव देशपांडे भेटले. अण्णाभाऊ साठे यांचे साहित्य त्यांच्या वाचनात आले. या प्रभावातून त्यांच्यामध्ये लेखनाची बीजे अंकुरली. आत्मानुभव मांडण्याची ऊर्मी जागी झाली. अल्पशिक्षित असूनही उत्तम बंडू तुपे यांनी विपुल लेखन केले आहे. जसा आठवेल तसा आयुष्याचा पट तुपे यांनी काट्यावरची पोटं  या आत्मकथनात मांडला आहे. अस्पृश्यता व दारिद्र्य याविरुद्ध संघर्ष करणाऱ्या मातंग जमातीच्या लोकांचा हा आलेख आहे. पोटाची खळगी भरण्यासाठी अस्पृश्यांना किती भयंकर दिव्यातून जावे लागते, याचे दर्शन येथे घडते. कष्टाबरोबरच नात्यागोत्यांच्या आणि रक्ताच्या माणसांनी  दाखविलेल्या दुराव्यातून आणि छळवादातून जे ताण निर्माण झाले, या ताणतणावांचे प्रतिबिंब काट्यावरची पोटं मध्ये पडलेले आहे.

बंडू तुपे धार्मिक विधीसाठी सोडलेल्या जिवंत कोंबडा पकडतात. आईचा विरोध असूनही उदखान बाबाच्या ठाण्यावरचा नारळ, मलिदा खातात. दारिद्र्याने पिचलेल्या दादा गावातून भाकरीचे तुकडे मागून आणायचा. प्रसंगी चोरी करायचा. गरिबीइतकेच अस्पृश्यतेविषयीचे तीव्र अनुभव तुपे यांनी या आत्मकथनात मध्ये मांडलेले आहेत. शिक्षणापासून वंचित राहिलेला मांग समाज भूतपिशाच्च आणि देवधर्मविषयक अंधश्रद्धा बाळगून आहे. भूत पळविण्यासाठी तुला रामाची धुई हा मंत्र म्हटला जातो. उदखानबाबाची कंदुरी केली जाते. पालीच्या खंडोबाच्या जत्रेत जीव धोक्यात घालून काठीचा मान राखला जातो. ग्रामीण भागातील मातंग समाजात प्रचलित असणाऱ्या अनिष्ट प्रथा, परंपरांचे दर्शन तुपे यांनी या आत्मकथनात घडविले आहे. वासना – विचारांनी पछाडलेल्या व्यक्तिरेखाही प्रस्तुत आत्मकथनात भेटतात.

या आत्मकथनात सातारा जिल्ह्यातील खटाव परिसरात बोलल्या जाणाऱ्या ग्रामीण भाषेचे दर्शन घडते. मातंग समाजातील शब्द, म्हणी, वाक्यप्रचार काही ठिकाणी आले आहेत. आई विषयी लिहितांना तुप्यांची भाषा काव्यमय रूप धारण करते. अण्णाभाऊ साठे यांच्या लेखनाचा प्रभाव तुपे यांच्या भाषाशैलीवर स्पष्ट जाणवतो. त्यामुळे बऱ्याच ठिकाणी नाट्यमय प्रसंग व शैलीदार वर्णने आली आहेत. एकूण काट्यावर अवलंबून असणारी पोटं कशी वेदनामय जीवन जगतात, हे वास्तव चित्र प्रस्तुत आत्मकथनात रेखाटले आहे.

संदर्भ : मुलाटे वासुदेव, दलितांची आत्मकथने : संकल्पना व स्वरूप, स्वरूप प्रकाशन, औरंगाबाद, १९९९