आंतरराष्ट्रीय मानवतावादी कायदा हा आंतरराष्ट्रीय कायद्याचा भाग असून तो मानवतावादी कारणांसाठी युद्धाचे परिणाम सीमित करण्याचे काम करतो. शिवाय अशा लोकांना संरक्षण देतो, जे युद्धात थेटपणे सहभागी होत नाहीत. त्याचप्रमाणे आंतरराष्ट्रीय मानवतावादी कायदा हा युद्धसाधने व युद्धपद्धती नियंत्रित करतो. हा कायदा युद्धाचा कायदा म्हणूनही ओळखला जातो.
आंतरराष्ट्रीय मानवतावादी कायदा केवळ युद्धाच्या वेळीच लागू होतो. हा पुढील दोन प्रकारच्या युद्धांना लागू होतो : १) दोन किंवा अधिक राष्ट्रांमध्ये होणारी युद्धे (आंतरराष्ट्रीय संघर्ष). २) असे संघर्ष जे राष्ट्र आणि अराजकीय सशस्त्र संघटनांमध्ये होतात किंवा दोन किंवा अधिक अराजकीय सशस्त्र संघटनांमध्ये होतात (गैर आंतरराष्ट्रीय संघर्ष). शिवाय या कायद्याचे दोन प्रमुख भाग आहेत. हेगचा कायदा आणि जिनीव्हाचा कायदा. यांतील हेगचा कायदा हा युद्धाच्या वेळी लागू होणाऱ्या अधिकार व कर्तव्यांविषयी असून, तो युद्धसाधने व युद्धपद्धती नियंत्रित करतो. त्याचप्रमाणे जिनीव्हाचा कायदा हा युद्धात भाग न घेणारे सैनिक, नागरिकव युद्धकैदी यांना संरक्षित करतो.
आंतरराष्ट्रीय मानवतावादी कायदा युद्धाच्या वेळी लागू होत असला तरीही हा कायदा राष्ट्रे केव्हा बळाचा वापर करू शकतात किंवा केव्हा युद्ध पुकारू शकतात, हे नियंत्रित करत नाही. एखाद्या राष्ट्राने दुसर्या राष्ट्रावर कायदेशीर रीत्या बळाचा वापर केला असला तरीही या गोष्टीचा आंतरराष्ट्रीय मानवतावादी कायदा लागू होण्याशी संबध नसतो. आंतरराष्ट्रीय मानवतावादी हा कायदा युद्ध किंवा सशस्त्र संघर्षामध्ये गुंतलेल्या सर्व गटांना समानपणे लागू होतो.
आंरी द्यूनां (Henry Dunant)(१८२८—१९१०) या स्विस उद्योगपतींना आधुनिक आंतरराष्ट्रीय मानवतावादी कायद्याचे जनक मानले जाते. १८५९ साली झालेल्या इटलीमधील सॉलफेरीनोच्या युद्धातील रक्तपात व जखमी सैनिकांची स्थिती पाहून ते व्यथित झाले. जिनीव्हाला परतल्यावर द्यूनां यांनी या लढाईच्या दुष्परिणामांविषयीचे आपले अनुभव १८६२ साली Souvenir de Solferino (सॉलफेरीनोच्या आठवणी) या ग्रंथाद्वारे प्रसिद्ध केले. या ग्रंथात पुढील प्रश्न विचारून त्यांनी रेडक्रॉस संघटनेचे सूतोवाच केले होते. “नागरिकत्वाचा विचार न करता युद्धातील जखमी लोकांना मदत देतील अशा स्वयंसेवकांच्या कायमच्या संस्था सर्व सुसंस्कृत देशांत स्थापन करता येणार नाहीत का?” दोन्ही बाजूकडील अशा जखमी व आजारी सैनिकांना मदत करण्यासाठी या संस्थांनी सदैव सज्ज राहावे, असेही त्यांनी सुचविले होते. त्यांनी आपल्या या कल्पनेचा यूरोपात प्रसारही केला. या कल्पनेला व्यापक प्रमाणात सक्रिय प्रतिसादही मिळाला. यातूनच त्यांनी १८६४ मध्ये आंतरराष्ट्रीय रेडक्रॉस संघटनेची स्थापना केली. तेव्हापासून ही संघटना प्रामुख्याने युद्धाचे परिणाम सीमित करण्याचे व आंतरराष्ट्रीय मानवतावादी कायद्याचा प्रसार करण्याचे काम करत आहे. या संघटनेचे मुख्यालय जिनीव्हा (स्वित्झर्लंड) येथे आहे.
द्यूनां यांच्याकडे जरी आंतरराष्ट्रीय मानवतावादी कायद्याचे जनक म्हणून पाहिले जात असले, तरी आंतरराष्ट्रीय मानवतावादी कायद्याचा इतिहास हा प्राचीन काळापासून सुरू होतो. जगातील बहुतेक सर्व संस्कृतींमध्ये युद्धाच्या वेळी पाळण्याच्या काही नियमांचा समावेश असल्याचे दिसून येते. उदा.,प्राचीन भारतीय संस्कृतीमध्ये युद्धाला धर्मयुद्ध म्हणून संबोधले जात असे. अशा धर्मयुद्धामध्ये त्या काळी लागू असलेल्या युद्धविषयक नियमांचे पालन करणे अपेक्षित असे.
आधुनिक आंतरराष्ट्रीय मानवतावादी कायद्यामध्ये काही मूलभूत तत्त्वांचा समावेश होतो. जसे की, युद्धात गुंतलेल्या गटांनी नेहमीच नागरिक आणि सैनिक यांमध्ये भेद केला पाहिजे. केवळ सैनिक आणि सैनिकी लक्ष्ये (उदा., सैनिकीतळ, खंदक इ.) यांनाच लक्ष्य केले जाऊ शकते. तसेच युद्धात गुंतलेल्या गटांचा युद्धपद्धती व युद्धसाधने वापरण्याचा अधिकार हा अमर्यादित नसतो. त्याचप्रमाणे जे लोक युद्धामध्ये थेटपणे सहभागी होत नाहीत अशा लोकांना कोणत्याही प्रकारची इजा पोहोचवली जाऊ नये. त्याचप्रमाणे युद्धकैदी व पकडल्या गेलेल्या नागरिकांना वागवताना काही मूलभूत मानवतावादी तत्त्वांचा वापर केला पाहिजे.
आधुनिक आंतरराष्ट्रीय मानवतावादी कायदा हा प्रामुख्याने १९४९ साली झालेल्या चार जिनीव्हा करारांमध्येव त्या करारांना लागू असलेल्या तीन संधींमध्ये अंतर्भूत आहे. यातील पहिला करार हा जमीनीवरील युद्धातील जखमी व आजारी सैनिकांना लागू होतो. दूसरा करार हा समुद्रातील जखमी व आजारी सैनिकांना लागू होतो. तिसरा करार हा युद्धकैद्यांना देण्यात येणार्या वागणुकीबद्दल असून चौथा करार हा युद्धकाळात नागरिकांना संरक्षण देण्याबाबत आहे. १९७७ साली जिनीव्हा करारांना लागू करण्यात आलेल्या दोन संधींमधील पहिली संधी ही आंतरराष्ट्रीय संघर्षांना लागू होते, तर दुसरी संधी ही गैर आंतरराष्ट्रीय संघर्षांना लागू होते. २००५ साली मान्य करण्यात आलेली तिसरी संधी ही मानवतावादी कारणांसाठी वापरण्यात येणार्या विशिष्ट चिन्हाबद्दल आहे.
संदर्भ :
- Melzer, Nils, International Humanitarian Law : A Comprehensive Introduction, Geneva, 2016.
- Shaw, Malcolm. N. International Law, Cambridge, 2017.
समीक्षक : स्वाती कुलकर्णी