चित्रपट हे माध्यम निर्माण झाल्यावर मूकपटांच्या काळापासूनच इतर माध्यमांतील कलाकृती चित्रपटमाध्यमात आणण्याचे प्रयत्न सुरू झाले. चित्रपटमाध्यमाची निर्मिती हुबेहूब नोंद करणाऱ्या यंत्रामुळे झाली. एखादी घटना कॅमेरा लावून टिपून ठेवता येते आणि ध्वनी मुद्रित करता येतो. अनुक्रमाने या दृक्श्राव्य प्रतिमा जोडून दाखविल्यास त्यांतून अर्थबोध होतो आणि कथन साधता येते, याची जाणीव श्राव्य प्रतिमांच्या निर्मितीचे आणि जोडणीचे तंत्र विकसित होण्यापूर्वीच झाली होती. पण शब्दभाषेच्या तुलनेत अमूर्त संकल्पना थेट संवेदना देणाऱ्या दृक्श्राव्य प्रतिमांतून व्यक्त करणे शक्य होत नव्हते. त्यासाठी तोतो अर्थबोध घडविणारी संरचना आणि शब्दभाषा अशी योजना निर्माण करणारी नवीन तंत्रे निर्माण झाली. त्यांतील संवादाची उणीव भरून काढण्यासाठी मूकपटामध्ये  शब्द लिहिलेल्या पाट्या वापरत. चित्रपटमाध्यमाचा विकास बोलपटापर्यंत पोहोचल्यावर माध्यमांतर, त्याचे स्वरूप आणि अटी असे मुद्दे चित्रपटविषयक विचारक्षेत्रात दाखल झाले.

प्रत्येक कलामाध्यमाचे प्रतिमा निर्माण करण्याचे द्रव्य वेगळे असते. माध्यमांतर होताना हा पहिला  मुद्दा येतो. शब्दातील प्रतिमा दृक्श्राव्य प्रतिमांच्या साहाय्याने निर्माण करताना द्रव्यातील बदलाचे परिणाम प्रतिमानिर्मितीत दाखल होतात. एखाद्या कादंबरीचा चित्रपट होताना शब्दाचे रूपांतर दृक्श्राव्य प्रतिमांमध्ये होते, तर कादंबरीचे नाटक होताना प्रयोगाच्या वेळी शब्द आंगिक आणि वाचिक अभिनयाचे रूप घेत असतात, तर काही शब्द रंगसूचनेच्या स्वरूपात येतात (अन्य रचनात्मक बदलही होत असतात). मूळ कलाकृतीचे जे रूप प्रतीत होते, त्याचे भावार्थ नव्या माध्यमाच्या द्रव्याच्या साहाय्याने अभिव्यक्त करावयाचे आव्हान नव्या माध्यमातील कलाकार घेत असतो. दुसरा मुद्दा असा की, मूळ कलाकृती आणि माध्यमांतर करून निर्माण झालेली कलाकृती या दोन वेगळ्या काळांतील रचना असू शकतात. यामुळे बदललेल्या संदर्भात काही तपशील वेगळे अर्थ धारण करतात. तिसरा मुद्दा असा की, दोन वेगळ्या व्यक्ती म्हणून कलावंतांच्या धारणा, वृत्ती, शैली यांत फरक असू शकतो. शिवाय कलावंताला केवळ नक्कल करायची नसते. म्हणजे माध्यमांतर होताना द्रव्य बदलते, संदर्भचौकट बदलते आणि त्यात्या कलावंताच्या ‘दर्शनाला’ अनुसरून अभिव्यक्तीचा हेतू किंवा प्रयोजनही बदलते. अर्थातच, माध्यमांतर होताना ‘अस्सलबरहुकूम नक्कल’ असे घडत नाही.

या प्रक्रियेत मूळ कलावंताने त्याच्या माध्यमातून जे अभिव्यक्त केलेले असते,  त्याचे मूळ त्याच्या व्यक्तिगत जाणिवांच्या अनुभवसंचयात असते. हे अनुभव अव्यक्त शब्दरूपात नसतात. असा अव्यक्त आणि भावात्म संचय प्रत्येक व्यक्तीच्या जीवनात तयार होत असतो. एखाद्या कलाकृतीला सामोरे जाताना त्या माध्यमातील वैशिष्ट्यांचे संवेदन आस्वादकाला प्राप्त होते, तेव्हा आस्वादकाच्या अमूर्त-अशब्द-भावसंचयाला आवाहन असते. नव्या माध्यमात ते रूप आणताना नव्या माध्यमाच्या अभिव्यक्तीच्या रीती आणि संगती वापराव्या लागतात. यामुळे एखाद्या कादंबरीतले एखादे पानभर विस्तारलेले अतिशय प्रभावी वर्णन चित्रपटात एका दृश्यामध्ये सामावले जाऊ शकते किंवा शब्दांचे ‘सांगणे’ दृक्श्राव्य होताना काही अनुल्लेखित तपशील ते काम करतील.

माध्यमांतराच्या यशापयशाची चर्चा होत असते. कारण मूळ कलाकृतीला ‘न्याय’ मिळाला की नाही, याकडे साहजिकच लक्ष वेधले जाते. अशा चर्चांमध्ये मूळ अभिव्यक्तीच्या रचना आणि त्यांतून अभिव्यक्त होणारा भावार्थ यांच्या आधाराने पाहिल्यास, नव्या माध्यमाच्या शक्यता आणि पहिल्या माध्यमातील हाताशी असलेली अभिव्यक्ती यांचे संबंध लक्षात येतात. रचना आणि कथनक्रम यांतील बदल किंवा नाती आणि प्रेरणा यांतील बदल कशा प्रकारे मूळ आशयाचा परिपोष करतात किंवा नव्या काळातील नवे दर्शन घडवतात, हेही चर्चेत येते.

चित्रपटक्षेत्रात नाटकांवरून किंवा साहित्यकृतींवरून अनेक चित्रपट निघत असतात. त्या संदर्भात ‘मूळ’ साहित्यकृतीशी चित्रपटाची तुलना करून मूल्यमापन केलेले आढळते. सर्वसाधारणपणे ही निर्मिती प्रेक्षकांच्या आवडीचा विचार करून केली जाते. उदा., विख्यात इंग्रज नाटककार विल्यम शेक्सपियर यांची नाटके आणि त्यांवरून झालेले अनेक चित्रपट. येथे मुख्यतः भाषा आणि सांस्कृतिक संदर्भ बदलून चित्रपटनिर्मिती झालेली आढळते. भारतीय चित्रपटसृष्टीतील उदाहरण म्हणजे प्रख्यात बंगाली कादंबरीकार शरच्चंद्र चट्टोपाध्याय यांच्या देवदास (१९१७) या कादंबरीची तीन कालखंडांत विविध भाषांत झालेली सिने-आवृत्ती आणि देव डी. (२००९) हा चित्रपट. पहिल्या तीन कालखंडांत कथावस्तू फारशी न बदलता कादंबरीतील स्थलकाल आणि प्रसंग यांची निर्मिती कॅमेरा वापरून चित्रपटनिर्मितिगृह किंवा विवक्षित जागी तयार केली आणि संकलन करून कथा सांगितली आहे. त्यांतील स्थलकाल आणि प्रसंगचित्रण कादंबरीत वर्णन केल्याप्रमाणे दिसेल, असे उभे केले आहे. देव डी. या चित्रपटामध्ये मात्र कादंबरीतील समस्यांचे समकालीन संदर्भ आणि रूप उचलून वेगळीच मांडणी केली आहे. अशा प्रकारचे स्वातंत्र्य कलाकार घेत असतात.

समीक्षक – अनिल झणकर

प्रतिक्रिया व्यक्त करा