आल्टमन, सिडनी व्हिक्टर : ( ७ मे१९३९).
कॅनेडियन-अमेरिकन रेणवीय जीवशास्त्रज्ञ. त्यांना रिबोन्यूक्लिइक अम्लाच्या (RNA; आरएनए) उत्प्रेरक गुणधर्माच्या शोधाबद्दल १९८९ सालातील रसायनशास्त्र विषयाचे नोबेल पारितोषिक टॉमस रॉबर्ट केच (Thomas R. Cech) यांच्यासोबत विभागून देण्यात आले.
आल्टमन यांचा जन्म कॅनडातील माँट्रिऑल (Montreal) शहरात झाला. कुटुंबात आर्थिक चणचण असली तरी, माता पित्यांनी त्यांच्या शिक्षणात खंड पडू दिला नाही. आल्टमन यांनी मॅसॅचूसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमधून भौतिकशास्त्रातील पदवी शिक्षणाबरोबर (१९६०) रेणवीय जीवशास्त्रातील एक छोटा अभ्यासक्रम पूर्ण केला.त्या अभ्यासक्रमातून त्यांना डीएनएची (DNA; डीऑक्सिरिबोन्यूक्लिइक अम्ल) संरचना आणि रेणवीय अनुवंशशास्त्राबद्दल (Molecular Genetics) कुतूहल निर्माण झाले. त्यानंतर त्यांनी अमेरिकेतील कोलोरॅडो युनिव्हर्सिटीमध्ये जीवभौतिकी या अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतला. तेथे त्यांनी ॲक्रिडीन (Acridine) या रासायनिक संयुगाचे बॅक्टेरियोफेज प्रतिकृतीकरणावर (Bacteriophase Replication) होणाऱ्या परिणामावर विशेष अभ्यास केला (बॅक्टेरियोफेज म्हणजे असे विषाणू जे जीवाणूंना लक्ष्य करतात; जीवाणूभक्षी). त्यानंतर त्यांनी जीवभौतिकी या विषयाची पीएच.डी पदवी मिळवली (१९६७). त्यानंतर त्यांना हार्वर्ड युनिव्हर्सिटीची फेलोशिप मिळाली. तेथे त्यांनी अमेरिकन रेणवीय जीवशास्त्रज्ञ मॅथ्यू स्टॅन्ली मेसेलसन (Matthew Stanley Meselson) यांच्या मार्गदर्शनाखाली जीवाणूभक्षी यावर संशोधन केले. त्यानंतर इंग्लंडमधील केंब्रिज येथे मेडिकल रिसर्च काउन्सिल लॅबोरेटरीच्या रेणवीय जीवशास्त्र या विभागात संशोधक म्हणून ते रुजू झाले (१९६९). तेथे त्यांनी ब्रिटीश जीवभौतिकीविज्ञ फ्रॅन्सिस क्रीक (Francis Crick) आणि साउथ आफ्रिकन जीवशास्त्रज्ञ सिडनी ब्रेनर (Sydney Brenner) यांसोबत काम केले. हे काम पुढे त्यांना नोबेल पारितोषिक मिळण्यास महत्त्वपूर्ण ठरले. त्यानंतर ते येल युनिव्हर्सिटीत जीवशास्त्र विभागात रुजू झाले (१९७१). तेथेच ते प्राध्यापक (१९८०) आणि जीवशास्त्र विभागाचे अध्यक्ष (१९८३-८५) झालेत. पुढे ते पदवीपूर्व येल महाविद्यालयाचे अधिष्ठाताही झालेत (१९८५-८९).
आल्टमन यांच्या संशोधनामुळे आरएनएबद्दल उपलब्ध असलेल्या मर्यादित माहितीत मोलाची भर पडली. पेशीकेंद्रकात असणाऱ्या डीएनएकडून आलेल्या माहितीचा आरएनए हा फक्त निष्क्रीय वाहक आहे, असे त्यांना वाटायचे. पण आरएनएमध्ये विकराचे कार्य (Enzymatic Reaction) करण्याची क्षमता आहे-असे सिद्ध झाल्याने पृथ्वीवर पहिल्या सजीवाची निर्मिती कशी झाली, ह्याबद्दल नव्याने संशोधन सुरू झाले. फ्रॅन्सिस क्रिक यांनी मांडलेल्या डीएनए, आरएनए आणि प्रथिन अशा जीवशास्त्रातील मूलभूत गृहितकास (Central Dogma of Biology) धक्का बसला. पेशींतील रासायनिक क्रिया सुरू करणे आणि या क्रिया जास्त वेगाने घडवून आणणे हे विकरांचे काम असते. विकर हे अशा रासायनिक क्रियामध्ये भाग घेतात, पण नष्ट होत नाहीत. विकर रासायनिक क्रियेतला कच्चा माल (raw material) नसून उत्प्रेरकाचे (Catalyst) कार्य करतात. रासायनिक दृष्ट्या विकर म्हणजे फक्त प्रथिने असतात असा समज अनेक वर्षे रूढ होता. आल्टमननी प्रथिनांच्या रेणूसंघटनासारखे विकराचे काम आरएनए करते हे दाखवून दिले.
आल्टमन आणि थॉमस केच ह्यांच्या शोधामुळे अशीही एक संकल्पना पुढे आली की, जीवसृष्टी निर्माण होण्यामध्ये आरएनए फार महत्त्वाचे होते. कारण आरएनए हे डीएनए बनवण्यासाठी, तसेच प्रथिने बनवण्यासाठी उपयोगी पडत होते.
आल्टमन यांनी रिबोन्यूक्लिएझ-पी (ribonuclease-P; RNase P) ह्या एका खास रिबोन्यूक्लिइक प्रथिनाचा अभ्यास केला. हा रेणू रायबोझाइम (ribosome) आहे. म्हणजे तो आरएनए आणि विकरही आहे. तो टी-आरएनएचे (t RNA) प्राथमिक अवस्थेतील रेणू त्यांच्या आतील भागात विशिष्ट जागी कातरतो. त्यामुळे त्यांचे रूपांतर टी-आरएनएच्या कार्यक्षम रेणूत करतो. आल्टमननी इ. कोलाय (Escherichia coli; E. coli) ह्या जीवाणूतील रिबोन्यूक्लिएझ-पीच्या रेणूवर काम केले. परंतु ज्यांच्यामध्ये टी-आरएनए संश्लेषण होते, अशा सर्व पेशीअंगकांमध्ये (Cellorganelles), पेशींमध्ये आणि सजीवांमध्ये रिबोन्यूक्लिएझ-पी असतात.
रिबोन्यूक्लिएझ-पीच्या एका रेणूत दोन घटकांपैकी एक आरएनएचा आणि दुसरा प्रथिन रेणू असतो. आदिकेंद्रकी पेशीतील (उदा., जीवाणू) रिबोन्यूक्लिएझ-पीच्या एका रेणूत एकच प्रथिन रेणू असतो. दृष्य केंद्रकी (Eukaryotes) जीवांच्या पेशीमध्ये (उदा., वनस्पती, प्राणी, माणसे ह्यात) रिबोन्यूक्लिएझ-पी च्या एका रेणूत एकापेक्षा जास्त प्रथिन रेणू असतात.
आल्टमन यांच्या आधीच्या काळापर्यंत सर्व विकर रचना प्रथिनांनी बनलेली होती असे ठाऊक होते. साहजिकच रिबोन्यूक्लिएझ-पीच्या रेणूतील प्रथिनाचा रेणू विकराचे काम करतो आणि प्राथमिक अवस्थेतील टी- आरएनए रेणूचे रूपांतर टी-आरएनएच्या कार्यक्षम रेणूत करतो, असे अनुमान आल्टमननी काढले. पण नंतर असे लक्षात आले की, रिबोन्यूक्लिएझ-पीच्या रेणूतील आरएनए घटक एकटाच टी-आरएनए रेणूच्या परिपक्वनासाठी पुरेसा असतो.
आल्टमनना रिबोन्यूक्लिएझ-पी, टी-आरएनए रेणूखेरीज इतर अनेक प्रकारच्या आरएनए रेणूबरोबर रासायनिक क्रिया होते हे लक्षात आले. त्यांच्या आणि इतर अनेक संशोधकांच्या प्रयत्नांनी आरएनएचे विश्व सतत विस्तारत आहे.
प्रथिन संश्लेषणामधील आरएनएचे कार्य दाखवून देण्यात आल्टमन ह्यांचा मोठा वाटा होता. नोबेल पुरस्काराशिवाय रशियातील लोमानीसॉव्ह गोल्ड मेडल (२०१६) त्यांना देण्यात आलेले आहे.
संदर्भ :
- https://www.nobelprize.org/nobel_prizes/chemistry/laureates/1989/altman-facts.html
- http://www.science.ca/scientists/scientistprofile.php?pID=3
- https://www.ncbi.nlm.nih.gov/pmc/articles/PMC3498233/
- https://www.encyclopedia.com/people/medicine/biochemistry-biographies/sidney-altman
- https://www.nobelprize.org/nobel_prizes/chemistry/laureates/1989/cech-interview-transcript.html
समीक्षक – मोहन मद्वाण्णा