चीनमधील मांचू राजवटीचे उच्चाटन व प्रजासत्ताकाची स्थापना यासाठी राष्ट्रवाद्यांनी घडवून आणलेली क्रांती. चीनच्या राजकीय, आर्थिक, वैचारिक आणि सामाजिक क्षेत्रांवर प्रभाव टाकणारी ही क्रांती १९११ मध्ये घडून आली. या क्रांतीमुळे १६४४ सालापासून सत्तेवर असलेल्या मांचू राजसत्तेचा शेवट होऊन प्रजासत्ताकाची स्थापना झाली. या क्रांतीला दुहेरी दहाची क्रांती, प्रजासत्ताक क्रांती, वूचांग क्रांती असेही म्हटले जाते. १९४९ च्या साम्यवादी क्रांतीकडे जाणारे पहिले पाऊल म्हणूनही या क्रांतीकडे पाहिले जाते.
कारणमीमांसा :
सतराव्या शतकापासून चीनची सत्ता सांभाळणार्या मांचू राजवटीचा नाकर्तेपणा हे या क्रांतीचे प्रमुख कारण होते. पाश्चात्त्य साम्राज्यवादापासून चीनचे रक्षण करण्यात आलेले अपयश, चीनचा जपानबरोबरील युद्धात झालेला मानहानीकारक पराभव (१९०५), पाश्चात्त्य सुधारणांपासून चीनला अलिप्त ठेवण्याची भूमिका, मांचू शासनातील भ्रष्टाचार यांमुळे मांचू सत्तेविरोधात चळवळ सुरू झाली.
साम्राज्यवादी यूरोपीयन राष्ट्रांनी, त्याचबरोबर अमेरिका, जपान या राष्ट्रांनी चीनच्या विविध भागांत आपली प्रभावक्षेत्रे निर्माण केली. जास्तीत जास्त आर्थिक फायदा मिळविणे हाच त्यामागचा मुख्य हेतू होता. भारताप्रमाणे चीन जरी पूर्ण पारतंत्र्यात गेला नसला, तरी अप्रत्यक्ष रीत्या चीनची अवस्था तीच झाली. मांचू सत्ता या परकीय सत्तांवर नियंत्रण ठेवू शकली नाही. व्यापाराच्या निमित्ताने पाश्चात्त्यांनी अलिप्ततावादी चीनमध्ये प्रवेश केला. त्यांची व्यापारी केंद्रे चीनमध्ये विविध ठिकाणी स्थापन झाली. याचबरोबर पाश्चात्त्य विचारांनीही चीनमध्ये प्रवेश केला. लोकशाही, समाजवाद, प्रजासत्ताक राज्य इ. वेगळ्या विचारांची ओळख चिनी तरुणांना झाली. अनेक चिनी तरुण पाश्चात्त्य शिक्षण घेऊ लागले आणि आधुनिक युगाकडे चीनची वाटचाल होऊ लागली. यामुळेच परकीय सत्तांबरोबरच मांचू सत्तेविरुद्ध चीनमध्ये विविध राजकीय चळवळींचा जोर वाढला.
रोजगाराच्या शोधात, नोकरीधंद्याच्या निमित्ताने लाखो चिनी तरुणांनी इतर देशांमध्ये नाइलाजाने स्थलांतर केले. त्यांच्या मनात मांचू सत्तेविषयी राग होता. मांचूंच्या नाकर्तेपणामुळे आपल्यावर ही वेळ आली, ही भावना त्यांच्या मनात होती. इतर देशांतील राजकीय परिस्थिती ते जवळून अनुभवत होते. मांचू सत्ता उलथवल्याशिवाय चीनमधील परिस्थितीत बदल होणार नाही, याची जाणीव या लोकांना झाली. या काळात अनेक परकीय देशांनी स्थलांतराविरुद्ध कायदे केल्यामुळे त्यांना चीनमध्ये परतावे लागले. वाढत्या लोकसंख्येमुळे चीनमधील अंतर्गत प्रश्न वाढतच गेले. विशेषतः अर्थव्यवस्था ढासळली. बहुसंख्य चिनी जनतेस पोटभर अन्नही मिळेना. त्यातच युद्धाच्या खंडणीपोटी पाश्चात्त्यांना मोठी रक्कम द्यावी लागत होती. त्यांच्याकडून कोणत्याही प्रकारचा कर मिळत नव्हता. मांचूंनी खर्चाचा ताळमेळ बसविण्यासाठी शेतीवर कराचे प्रमाण वाढवले. यामुळे शेतकर्यांची परिस्थिती दयनीय बनली. अनेकांनी आपल्या जमिनी विकल्या. ते दुसर्यांच्या शेतावर शेतमजूर म्हणून काम करू लागले. बेकारी, लूटमार वाढत चालली. चीनमध्ये अराजकाची परिस्थिती निर्माण झाली.
मांचू घराणे हे मूळचे चीनमधील नव्हे, तर तत्कालीन चीनपासून वेगळा भूप्रदेश असलेल्या मँचुरियातील होते. तरीही त्यांनी राजसत्तेवर चांगली पकड बसवली होती. चिनी जनतेनेही त्यांचा स्वीकार केला होता. मात्र एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धात या सत्तेबद्दलचा राग वाढत चालला. मांचू राजवट नष्ट करून चीनमध्ये शांततेचे साम्राज्य स्थापन करण्यासाठी झालेल्या ताइपिंग बंडानंतर (१८४८–१८६५) प्रशासनात चिनी लोक अधिक संख्येने काम करू लागले. या लोकांनी मांचू सत्तेच्या भ्रष्टाचाराविरुद्ध सामान्य जनतेत जागृती घडवून आणली. मांचूविरोधाची भावना अधिक प्रखर करण्याचे कार्य वृत्तपत्रांनी केले. विशेषतः क्रांतिकारी संघटनांकडून चालविल्या जाणार्या वृत्तपत्रांनी यासाठी पुढाकार घेतला. पाश्चात्त्यांनी जलद व्यापारासाठी तयार केलेला रेल्वेमार्ग आणि रस्त्यांमुळे चिनी जनता पूर्वीपेक्षा अधिक जवळ आली आणि क्रांतीचा विचार अधिक वेगाने पसरला.
प्रखर राष्ट्रवादी विचारांचे क्रांतिकारक नेते सन-यत्-सेन (१८६६–१९२५) यांनी चिनी तरुणांना क्रांतीसाठी खर्या अर्थाने प्रेरित केले. शालेय जीवनातच क्रांतीच्या विचारांनी भारलेल्या सेननी वैद्यकीय शिक्षण घेतले, परंतु ते या व्यवसायात जास्त काळ रमले नाहीत. प्रथमपासूनच ते मांचू राजकर्त्यांविरुद्ध होते. चीनमधील राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रांत आमूलाग्र बदल झाला पाहिजे, असे त्यांना वाटत होते. त्यांनी काही शैक्षणिक संघटना स्थापन केल्या होत्या. त्याचे रूपांतर पुढे क्रांतिकारी संघटनांत झाले. सुरुवातीला अमेरिकन प्रजासत्ताक संकल्पनेचा त्यांच्यावर मोठा प्रभाव होता. नंतर रशियन साम्यवादाकडे ते आकर्षित झाले. त्यांनी चीनचे पुनरुज्जीवन करणारी त्सिंग चुंग-ह्यूई ही संस्था स्थापन केली (१८९४). हीच संस्था पुढे क्रांतिकारकांचे प्रमुख केंद्र ठरली. मुख्यत्वे सामान्य कामगार, कारागीर, कारकून व शेतकरी हे या संस्थेचे सभासद होते.
पाश्चात्त्यांच्या वाढत्या प्रभावास प्रतिबंध घालण्यासाठी व त्यांना नामशेष करण्यासाठी तसेच त्यांना सहकार्य करणाऱ्या मांचू राजवटीविरुद्ध बॉक्सर बंड उद्भवले (१८९८-१९००). या बंडात राज्यपालक सम्राज्ञी त्स स्यी हीने पाश्चात्त्यांना तसेच देशातील जनतेलाही सांभाळले. बंड शमल्यानंतर त्स स्यीने चिनी लष्करात व शिक्षणपद्धतीत काही सुधारणा केल्या. पुढे १४ व १५ नोव्हेंबर १९०८ रोजी अनुक्रमे नामधारी सम्राट ग्वांग स्यू व राज्यपालक त्स स्यी दोघे निधन पावले. नवा सम्राट फू यि हा अल्पवयी असल्याने त्याचा पिता छुन ह्याने राज्यपालक म्हणून जबाबदारी घेतली. यावेळीच प्रजासत्ताक क्रांती घडून आली.
चीनमध्ये रेल्वेमार्गबांधणीचे विविध प्रकल्प सुरू होते. ही कामे आपल्याला मिळावीत, अशी चिनी कंत्राटदारांची इच्छा होती. त्यासाठी त्यांनी एकत्र येऊन फाइनॅन्स कॉर्पोरेशनची स्थापना केली. मात्र मांचू सत्ताधीशांनी चेंग–चुकींग या रेल्वेमार्गाचे काम परकीय कंपनीला दिले. यामुळे संतापाची लाट उसळली. सेचवान प्रांतात मांचू सरकार विरोधात निदर्शने होऊ लागली. काही ठिकाणी निदर्शकांवर गोळीबार करण्यात आला. या परिस्थितीत मांचू सरकारने रेल्वेच्या राष्ट्रीयीकरणाचा निर्णय घेतला. याला प्रांतिक राज्यसरकारांनी कडाडून विरोध केला; कारण राज्यसरकारांनी रेल्वेबांधणीमध्ये पैसा गुंतवला होता, तो बुडणार होता शिवाय चिनी भांडवलदार –व्यापारीवर्गाने गुंतवलेला पैसा धोक्यात आल्याने वातावरण तणावपूर्ण झाले. १९११च्या सप्टेंबर महिन्यात सेचवान प्रांतातील विद्यार्थ्यांनी तेथील व्हाइसरॉयच्या राजवाड्यावर हल्ला केला. केंद्राला ही परिस्थिती हाताळता आली नाही आणि चीनची क्रांतीच्या दिशेने वाटचाल सुरू झाली.
क्रांतिकाळातील घटना :
१० ऑक्टोबर १९११ रोजी हान्को शहरात झालेल्या स्फोटाने क्रांतीला सुरुवात झाली. स्फोटाच्या शासकीय चौकशीत गुप्तपणे कार्यरत असणार्या क्रांतिकारी संघटनांविषयी पोलिसांना माहिती मिळाली. पोलिसांनी अनेक कार्यकर्त्यांना पकडले. ही मोहीम तीव्र होऊ लागली, तेव्हा वूचांग प्रांतातील क्रांतिकारकांनी उठाव करत तेथील सत्ता आपल्या ताब्यात घेतली. चीनच्या दक्षिणेकडील प्रांतात उठावाचे वारे पसरले. उत्तर भागातील प्रांत शांत होते. शांघाय, हानयांग इ. प्रांत क्रांतिकारकांच्या ताब्यात आले. क्रांतिकारकांनी नानकिंग येथे लोकशाही शासनाचे राष्ट्रीय मंडळ स्थापन केले. याचे अध्यक्षपद सन-यत्-सेन यांच्याकडे दिले गेले. विशेष म्हणजे सेन यावेळी परदेशात क्रांतिकारकांना संघटित करत होते. १९११ मध्ये ते चीनमध्ये परतल्यानंतर अध्यक्ष म्हणून त्यांचा शपथविधी झाला.
मांचू सत्तेकडून उठाव दडपून टाकण्याचे प्रयत्न सुरू होते. बिघडत चाललेली परिस्थिती पाहता त्यांनी राष्ट्रीय सभेचे अधिवेशन बोलावले. या वेळी राष्ट्रीय सभेने युआन-शृ-खाय् या पूर्वीच्या सेनानीस पंतप्रधान म्हणून नियुक्त केले. त्याची उत्तर चीनमधील सैन्यावर पकड होती. क्रांती दडपण्याचे कार्य त्याला करावयाचे होते. सर्व अधिकार त्याच्याकडे सोपविण्यात आले. युआनचे सैन्य आणि प्रजासत्ताकांचे सैन्य यांच्यात चकमकी वाढू लागल्या. युआन अत्यंत महत्त्वाकांक्षी होता आणि लोकशाहीचा कट्टर विरोधक होता. त्याला सर्व सत्ता स्वतःच्या हातात हवी होती. प्रजासत्ताकवाद्यांचा वाढता जोर पाहून युआनने तडजोडीचे धोरण स्वीकारले आणि प्रजासत्ताकवाद्यांशी बोलणी सुरू केली. सन-यत्-सेन यांनाही हेच हवे होते. मांचू घराण्याला सत्ता सोडायला लावणे हा या वाटाघाटींचा प्रमुख भाग होता. दुसरीकडे चीनमधील प्रांतिक सत्ता या अस्थिरतेचा फायदा घेत स्वतंत्र होण्यासाठी प्रयत्न करू लागल्या. तिबेटने चीनचे सार्वभौमत्व झुगारले. रशियाने मंगोलिया आणि सिंक्यांग प्रांतावर वर्चस्व मिळविण्याचा प्रयत्न सुरू केला. याचवेळी जपानचाही हस्तक्षेप वाढू लागला. हे पाहून युआन व सेन तडजोडीस तयार झाले. मांचू राजवटीचा अंत घडवून आणून प्रजासत्ताकाच्या स्थापनेस मंजूरी देण्यात आली. नेहमी मांचू राजवटीची बाजू घेणार्या पाश्चात्त्य सत्ता या वेळी तटस्थ राहिल्या.
युआनने चिनी सम्राटास राजत्याग करण्यास राजी केले. १२ फेब्रुवारी १९१२ रोजी एका हुकमाद्वारे मांचूंनी राजत्याग करत असल्याचे जाहीर केले. अशा रीतीने मांचू सत्तेचा शेवट झाला. क्रांतिकारकांचे स्वप्न पूर्ण झाले. सेननी प्रजासत्ताकाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. १४ फेब्रुवारी १९१२ रोजी युआनकडे सत्तासूत्रे सोपविण्यात आली. युआनच्या महत्त्वाकांक्षी धोरणांमुळे अपेक्षित प्रजासत्ताक अस्तित्वात येऊ शकले नाही; तरी राजेशाहीच्या जोखडाखाली असलेल्या चीनला या क्रांतीने बाहेर काढले. मांचू राजवटीचे उच्चाटन हे क्रांतिकारकांचे उद्दिष्ट या क्रांतीनेच साध्य झाले. तसेच स्वातंत्र्य, समता, समाजवाद आणि लोकशाही या नव्या तत्त्वांची ओळख चिनी समाजाला झाली.
संदर्भ :
- Adams, Ruth, Ed. Contemporary China, New York, 1966.
- Clubb, O. E. Twentieth Century China, New York, 1964.
- Shrivastava, A. N.; Majumdar, R. K. History of China, Delhi, 1975.
- देव, प्रभाकर, आधुनिक चीनचा इतिहास, नागपूर, १९९०.
- वैद्य, सुमन, आधुनिक जग, नागपूर, १९८८.
समीक्षक : अरुण भोसले