चँग-कै-शेक : (३० ऑक्टोबर १८८७ – ५ एप्रिल १९७५). एक ज्येष्ठ चिनी क्रांतिकारक व तैवानचा माजी अध्यक्ष. आधुनिक चीनचा शिल्पकार म्हणूनही त्यास ओळखतात. चीको (जजिआंग) येथील शेतकरी कुटुंबात जन्म. लहानपणीच त्याचे वडील वारले. प्रथमपासून लष्करी शिक्षणाची त्याची इच्छा होती, या दृष्टीने केलेल्या अनेक प्रयत्नानंतर अखेर बाउडिंग लष्करी अकादमीत आणि टोकिओत त्याने लष्करी प्रशिक्षण पूर्ण केले (१९१९). जपानमध्ये असताना तो सन-यत्‌-सेनच्या चळवळीत सामील झाला. १९११ मधील चिनी क्रांतीनंतर सन-यत्‌-सेन हंगामी चिनी सरकारचे अध्यक्ष झाले. १९१३ मध्ये चँग व चेन ची मेई या दोन क्रांतिकारकांनी पुन्हा एक क्रांती करण्याचा अयशस्वी यत्न केला. त्यामुळे दोघेही जपानमध्ये आश्रयास गेले. १९१६ मध्ये ते परतले. १९१९ मध्ये चँगला जनरल हा हुद्दा मिळाला. १९२४ साली क्वोमिंतांगमध्ये कम्युनिस्ट व राष्ट्रवादी यांची युती झाली. चँगला रशियाला धाडण्यात आले. तेथून परत आल्यावर त्याने मिलीटरी अकादमी ऑफ व्हांपोआ ही संस्था स्थापन केली. आधुनिक चिनी लष्कर उभारण्याची ती मुहूर्तमेढच होती.

सन-यत्‌-सेनच्या मृत्यूनंतर (१९२५) चँग क्रांतीकारी पक्षाचा प्रमुख झाला. त्याने प्रथम उत्तर व दक्षिण चीनचे एकीकरण घडवून आणले आणि क्वोमिंतांगमील आपल्या विरोधकांना चिरडण्याचा प्रयत्न केला. परिणामतः त्यालाच पक्ष सोडून जपानमध्ये जाणे भाग पडले. त्याच सुमारास त्याने मे-लिंग सुंग (सन-यत्‌-सेनची मेहुणी) या युवतीशी दुसरा विवाह केला (१९२७). तो मेथाडिस्ट पंथाचा अनुयायी झाला व अखेरपर्यंत त्या पंथाशी एकनिष्ठ राहिला. १९२८ मध्ये त्याची राष्ट्रीय सरकारचा अध्यक्ष म्हणून नेमणूक झाली. दुसऱ्या महायुद्धापूर्वी १९३७ मध्ये त्याने कम्युनिस्टांशी समझोता घडवून आणला; पण कम्युनिस्टांचा विरोध वाढतच होता. यामुळे त्याने राजधानी हलविली. अमेरिकेने या वेळेपासून चीनला मदत सुरू केली. १९४३ च्या कैरो परिषदेत त्याची चर्चिल व रूझवेल्ट यांच्याशी भेट झाली व या दोघांनी चीनला मदत देण्याचे ठरविले. परंतु १९४६ साली चीनमध्ये यादवी युद्धास सुरुवात होऊन अमेरिकेची मध्यस्थीही अयशस्वी झाली. चँगने कम्युनिस्टांबरोबरचा शस्त्रसंधी गुंडाळून अखेर आपल्या दहा लाख अनुयायांसह तैवान बेटावर १९४९ मध्ये आश्रय घेतला. राष्ट्रीय चीन म्हणून त्यास अमेरिकेने मान्यता व संरक्षण दिले; एवढेच नव्हे, तर संयुक्त राष्ट्रांत सभासदत्व व रोधाधिकारही मिळवून दिला. तथापि चँगची लाल चीनवर अधिसत्ता गाजविण्याची जबरदस्त इच्छा आणि आकांक्षा होती, ती मात्र अखेरपर्यंत फलद्रूप झाली नाही.

१९७१ मध्ये अध्यक्ष निक्सन यांनी लाल चीनला भेट दिली. तसेच संयुक्त राष्ट्रात लाल चीनला सभासदत्व आणि रोधाधिकार मिळाला. तैवानचे हे हक्क काढून घेण्यात आले. त्यामुळे चँगच्या आकांक्षा विरून गेल्या. या वेळेपासून त्याची प्रकृती बिघडली. या घटनेनंतर त्याने आपली बहुतांश अधिकारसूत्रे आपल्या पहिल्या पत्नीपासून झालेल्या ६३ वर्षांच्या चँग-चिंग-कुओ या मुलाकडे सुपुर्द केली.

चँगने आपले क्रांतीसंबंधीचे विचार व्याख्यानरूपाने तसेच ग्रंथाद्वारे व्यक्त केले आहेत. त्याची दोन पुस्तके या दृष्टींनी उल्लेखनीय आहेत. ती म्हणजे चायनाज डेस्टिनी (१९४७) आणि सोव्हिएट रशिया इन चायना : अ समिंग अप-ॲट सेव्हंटी  (इं. १९५७) ही होत. चॅंग लष्करी बाण्याचा होता आणि त्याने लोकशाही राज्याची भाषा वापरली असली, तरी तो वृत्तीने हुकूमशाहच राहिला.

संदर्भ :

  • Bliven, Bruce, The World Changers, London, 1966.
  • Payne, Robert, Chiang Kai-Shek, London, 1969.