माकारिएन्को, आन्तोन सिमायॉनॉव्हिच  : (१३ मार्च १८८८–१ एप्रिल १९३९). रशियन शिक्षणतज्ज्ञ. त्यांचा जन्म युक्रेनमधील बिलोपिलीआ येथे एका रेल्वेकामगाराच्या कुटुंबात झाला. त्यांचे प्राथमिक शिक्षण आणि शिक्षक प्रशिक्षण झाल्यानंतर त्यांची रेल्वेच्या प्राथमिक शाळेत शिक्षक म्हणून नेमणूक झाली. रशिया–जपान युद्ध (Russia – Japan War)नंतर १९०४-०५ मध्ये झालेल्या क्रांतीमध्ये भाग घेऊन ते साम्यवादी बनले. त्यांच्या भावी आयुष्यात मॅक्झिम गॉर्कीचे लेखन त्यांना प्रेरक व मार्गदर्शक ठरले. माकारिएन्को हे १९११ मध्ये डॉलिन्सकाया येथील शाळेत लष्करी शिक्षण व १९१४ मध्ये पोल्टाव्हा येथील सैनिक संस्थेची प्रवेश परीक्षा उत्तीर्ण होऊन त्यांनी लष्करी सेवा पतकरली. ते १९१७ मध्ये दृष्टिदोषामुळे लष्करी सेवेतून मुक्त झाले. पुढे त्यांनी १९१९ मध्ये प्राथमिक शिक्षक, १९२० मध्ये पोल्टाव्हा येथील बोर्स्टल शाळाप्रमुख, १९२४ ते १९३६ या काळात खार्‌कॉव्ह येथील बालगुन्हेगारीच्या निवासी शाळेचा प्रमुख, कीव्ह येथील मध्यवर्ती कचेरीत बालगुन्हेगारांचा शिक्षणतज्ज्ञ अशा विविध पदांवर काम केले. त्यांचे लेखनही दरम्यान प्रकाशित होत राहिले व त्यांच्या शैक्षणिक तत्त्वज्ञानास निश्चितता येऊ लागली.

माकारिएन्को हे १९३७ मध्ये मॉस्को येथे स्थायिक झाले. जोझेफ स्टालिन (Joseph Stalin) पक्षप्रमुख झाल्यानंतर माकारिएन्को यांच्या शैक्षणिक तत्त्वज्ञानास रशियात महत्त्व प्राप्त झाले. सरकारने त्यांना १९३९ मध्ये थोर शिक्षणतज्ज्ञ म्हणून पुरस्कार दिला. त्यांचे लेखन सात खंडांत प्रसिद्ध होऊन अठरा भाषांमध्ये त्यांचे भाषांतर झाले. माकारिएन्को हे रशियन वाङ्‌मयाचा भोक्ता होते. जुन्या अभिजात रशियन वाङ्‌मयाचा ते पुरस्कर्ते होते. न्यिकलाय लेनिन (Nikolai Lenin) आणि स्टालिन यांना ते गुरुस्थानी मानत असे.

मानवाच्या चारित्र्याची आणि व्यक्तिमत्त्वाची परिपूर्णता हे शिक्षणाचे उद्दिष्ट असावे, असे माकारिएन्को यांचे मत होते. टॉलस्टॉय यांनी त्यापूर्वी मुक्त शिक्षणाची कल्पना विशद केली होती. त्या दृष्टीने माकारिएन्को यांचे विचार टॉलस्टॉयच्या शिक्षणविषयक विचारांशी पूर्णपणे विरोधी होते. शिस्त हा शिक्षणक्रियेचा परिपाक असावा. शिक्षा हा शिस्तीचाच एक भाग मानण्यात यावा. अचूकपणे दिलेली शिक्षा ही केवळ कायदेशीरच नव्हे, तर आवश्यक मानण्यात यावी, असे माकारिएन्को यांचे मत होते.

लष्करीकरण ही सर्वांत चांगली परंपरा असून अशा परंपरा निर्माण करणे व त्यांचे जतन करणे हे शिक्षणाचे काम आहे, असेही माकारिएन्को यांचे मत होते. कार्ल मार्क्स (Carl Marx) आणि फ्रिडीख एंगेल्स (Friedrich Engels) यांनी शिक्षणामध्ये लष्करीकरणाचा पुरस्कार केला असल्याने माकारिएन्को यांनीसुद्धा त्याबद्दल आग्रह धरला. त्यांनी सामूहिक शिक्षणपद्धतीमध्ये लष्करी शब्द आणि लष्करी शिस्त यांचा पुरस्कार केला. लष्करी शिक्षणातील सौंदर्य, शिस्त आणि अचूकपणा या गोष्टी जीवनाला मदत करतात, असे त्यांना वाटत असे.

सामूहिक जीवन हा उपयुक्त कामाचा पाया आहे, शिक्षणामध्ये सामाजिक दृष्ट्या उपयुक्त उत्पादक काम असावे, असे माकारिएन्को यांचे मत होते. तसेच मुलांनी एकत्र काम करावे आणि आपण समाजाकरिता काम करतो, याबद्दल त्यांना जाणीव असावी. हे काम शाळेपासून दूर करण्यात यावे. तसेच शाळकरी मुलांना कारखाने आणि शेती यांसारख्या बाहेरील क्षेत्रातील उत्पादक कामांत सहभागी करून घेण्यात यावे, असेही मत माकारिएन्को यांचे होते.

माकारिएन्को यांचे शिक्षणविषयक विचार रशियन शासनाने १९५८ मध्ये मान्य केले. युक्रेनमधील त्यामचा एकेकाळचा सहकारी न्यिक्यित ख्रुश्चॉव्ह (Nikita Khrushchev) हा रशियाचा पंतप्रधान झाल्यानंतर १९५९ साली रशियातील शैक्षणिक कायद्यांमध्ये माकारिएन्को यांच्या विचारांचा अंतर्भाव झाला.

माकारिएन्को यांचे ग्रंथ पुढीलप्रमाणे : अ बुक फॉर पॅरेंट्स (१९००), दि रोड टू लाईफ (१९३५), फ्लॅग ऑन दि बॅटलमेंट्स (१९३८), लर्निंग टू लिव, प्रॉब्लेम्स ऑफ सोव्हिएट स्कूल एज्युकेशन, एफडी – 1, मार्श 30 – गो गॉड इत्यादी.

माकारिएन्को यांचे हृदयविकाराचा झटका येऊन मॉस्को येथे निधन झाले.

संदर्भ :

  • Matthews, Mervyn, Education in the Soviet Union, London, 1932.

समीक्षक – संतोष गेडाम

प्रतिक्रिया व्यक्त करा