किडलँड, फिन ई. : (१ डिसेंबर १९४३). नॉर्वेजियन अर्थशास्त्रज्ञ व अर्थशास्त्र या विषयाच्या नोबेल पुरस्काराचा सहमानकरी. किडलँड यांना देशाच्या आर्थिक धोरणातील सातत्य व व्यापारचक्र यांमागील दबावांची कारणमीमांसा या गतिशील स्थूल अर्थशास्त्र विषयामधील संशोधनासाठी अमेरिकन अर्थशास्त्रज्ञ व त्यांचे प्राध्यापक व मार्गदर्शक एडवर्ड सी. प्रिसकॉट (Edward C. Prescott) यांच्याबरोबरीने २००४ मध्ये अर्थशास्त्र विषयाचा नोबेल स्मृती पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.

किडलँड यांचा जन्म नॉर्वेमधील स्टाव्हांगर जवळच्या अलगार्द या शहरात झाला. शालेय शिक्षणानंतर सैद्धांतिक अर्थशास्त्र या विषयाची गोडी निर्माण झाल्याने त्यांनी १९६८ मध्ये नॉर्वेजियन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समधून अर्थशास्त्र या विषयातील बी. एससी. पदवी प्राप्त केली. त्यानंतर अमेरिकेतील कार्नेगी मेलॉन विद्यापीठात विकेंद्रित स्थूल अर्थशास्त्रीय नियोजन या विषयावर प्रबंध लिहून १९७३ मध्ये पीएच. डी. पदवी त्यांनी प्राप्त केली. डॉक्टरेटनंतर ते आपल्या मूळ नॉर्वेजियन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये साहाय्यक प्राध्यापक म्हणून रुजू झाले. १९७८ मध्ये त्यांची पुन्हा अमेरिकेतील कार्नेगी मेलॉन विद्यापीठात सहयोगी प्राध्यापकपदी नियुक्ती झाली. तेव्हापासून २००४ पर्यंत ते तेथेच अध्यापन व संशोधनकार्य करीत होते. २००४ मध्ये त्यांनी कॅलिफोर्निया विद्यापीठ, सांता बार्बारा येथील अर्थशास्त्र विभागात प्राध्यापकपद स्वीकारले. दरम्यानच्या काळात त्यांनी डलास, क्लीव्हलँड व सेंट लुईस या फेडरल रिझर्व्ह बँकांचे सल्लागार व सहयोगी संशोधक म्हणून काम केले. त्यांनी २००५ मध्ये लॅबोरेटरी फॉर ॲग्रिगेट इकॉनॉमिक्स ॲण्ड फायनान्स (L. A. E. F.) या संस्थेची स्थापना केली.

किडलँड यांनी प्रिसकॉट यांच्या सहकार्याने तसेच स्वतंत्रपणे आपले संशोधनकार्य पुढे नेले. शासनाच्या वित्तीय व चलनविषयक धोरणावर प्रभाव टाकणारे तसेच इंग्लंड, स्वीडन व न्यूझीलंडमधील मध्यवर्ती बँकांना अधिक स्वतंत्रपणे कार्य करता यावे यासाठीचे दिशादर्शक संशोधन त्यांनी केले. कालसातत्य (Time Consistency) ही संकल्पना  गूढ वाटली, तरी देशाच्या आर्थिक धोरण निश्चितीमध्ये ती अती महत्त्वाची आहे. १९७७ मध्ये प्रिसकॉट यांच्या सहकार्याने प्रसिद्ध केलेल्या नाविन्यपूर्ण शोधनिबंधात जे शासनकर्ते आपल्या नागरिकाप्रती अती जागरुक असतात, त्यांना कालसातत्याची समस्या नेहमी भेडसावत असते. आर्थिक धोरणात सातत्य नसल्यास शासनाच्या विश्वासार्हतेवरही प्रश्नचिन्ह निर्माण होते. किडलँड यांनी अर्थमिती (Econometric) पद्धती विकसित करून विविध प्रकारच्या आर्थिक धोरणांना कालसातत्य प्रणाली कशी लागू पडते, हे सोदाहरण विशद केले. शासनकर्त्यांना चलनवाढ रोखण्यात बरेचदा अपयश का येते, याची मीमांसाही सदर प्रणालीच्या आधारे त्यांनी केली. चलनवाढीच्या संदर्भात देशाच्या मध्यवर्ती बँकांच्या धोरणातील सातत्य व अर्थव्यवस्थेतील अनपेक्षित घटनेबाबतची रणनीती यांचे महत्त्व त्यांनी अधोरेखित केले. न्यूझीलंड, स्वीडन व इंग्लंडच्या मध्यवर्ती बँकांनी त्यानुसार आपल्या धोरणात सुधारणा घडवून आणल्याने चलनवाढीत बऱ्यापैकी घट होऊ शकली. त्यांनी एकाधिकार तसेच करविषयक धोरणांच्या संदर्भात कालसातत्याचे धोरण उपयुक्त असल्याचे दाखवून दिले. भांडवलनिर्मिती व संचयातील वृद्धीसाठी करधोरणातील कालसातत्य फलदायी ठरते.

किडलँड यांचे स्वतंत्रपणे तसेच इतरांच्या सहकार्याने लिहिलेले पुढील ग्रंथ प्रसिद्ध आहेत. रूल्स रादर दॅन डिस्क्रिशन : दि इन्कन्सिस्टन्सी ऑफ ऑप्टिमल प्लॅन्स (१९७७), टाईम टू बिल्ड ॲन अग्रिगेट फ्लक्च्युएशन्स (१९८२), इन्फेलशन परसिस्टन्स ॲण्ड फ्लेक्सिबल प्रायसेस (२०००), अर्जेंटिनाज लास्ट डिकेड (२००२), मॉनेटरी पॉलिसी टॅक्सेस ॲण्ड बिझनेस सायकल्स (२००४). यांशिवाय किडलँड यांचे चाळीसच्यावर शोधनिबंधही प्रसिद्ध झाले आहेत.

किडलँड यांना नोबेल स्मृती पुरस्काराबरोबरच त्याच्या अर्थशास्त्रातील संशोधनकार्यातील भरीव योगदानासाठी पुढील सन्मान लाभले. नॉर्वेजियन अकॅडमी ऑफ सायन्स ॲण्ड लेटर्सचे सदस्यत्व, कार्नेगी मेलॉन विद्यापीठाचे अलेक्झांडर अँडरसन अवॉर्ड (१९७३), हूव्हर इन्स्टिट्यूटचे जॉन स्टॉफर नॅशनल फेलोशिप (१९८२-८३), इकॉनॉमेट्रिक सोसायटी फेलोशिप (१९९२ पासून) इत्यादी.

समीक्षक – संतोष दास्ताने

प्रतिक्रिया व्यक्त करा