ग्रेंजर, क्लाइव्ह डब्ल्यू. जे. (Granger, Clive William John) : (४ सप्टेंबर १९३४ – २७ मे २००९). ब्रिटिश अर्थशास्त्रज्ञ, गणिती व अर्थशास्त्राच्या नोबेल पुरस्काराचा सहमानकरी. ज्यामुळे वित्तीय व साकलिक अर्थशास्त्राच्या आकडेवारीचे पृथक्करण करण्याच्या पद्धतीत मूलगामी बदल घडविणाऱ्या कालश्रेणीच्या विश्लेषण प्रणालीबद्दल ग्रेंजर यांना २००३ मध्ये अर्थतज्ज्ञ रॉबर्ट एफ. एंजेल (Robert F. Engle) यांच्या बरोबरीने अर्थशास्त्र विषयातील नोबेल स्मृती पुरस्कार प्राप्त झाला.

ग्रेंजर यांचा जन्म ब्रिटनमधील स्वान्झी (Wales) शहरात झाला. दुसऱ्या महायुद्धादरम्यान ते आपल्या आईसोबत केंब्रिजला वास्तव्यासाठी गेले. तेथेच त्यांचे प्राथमिक शिक्षण झाले. माध्यमिक स्तरावरील शिक्षण घेत असताना युद्धाच्या वेळी त्यांचे कुटुंब नॉटिंगहॅम शहरात वास्तव्यासाठी गेले. त्यांनी १९५५ मध्ये नॉटिंगहॅम विद्यापीठातून बी. ए. ही पदवी संपादन केली. तेथे असताना त्यांना गणितात विशेष रुची निर्माण झाली. तेथूनच त्यांनी सांख्यिकी विषयांतर्गत कालश्रेणी विश्लेषण पद्धतींचा विशेष अभ्यास करून १९५९ मध्ये पीएच. डी. पदवी प्राप्त केली.

ग्रेंजर यांची १९५६ मध्ये वयाच्या केवळ एकविसाव्या वर्षी नॉटिंगहॅम विद्यापीठात कनिष्ठ अधिव्याख्याता या पदावर नियुक्ती झाली. पुढे १९५९-६० मध्ये ते अमेरिकेतील प्रिन्स्टन विद्यापीठातील अर्थमिती संशोधन प्रकल्पात सहभागी होण्यासाठी गेले. एका वर्षानंतर पुन्हा त्यांची नॉटिंगहॅम विद्यापीठात गणित व सांख्यिकी या विषयांचा पूर्ण वेळ प्राध्यापक म्हणून नियुक्ती झाली. बराच काळ तेथे नोकरी केल्यानंतर १९७४ मध्ये अमेरिकेतील कॅलिफोर्निया विद्यापीठ, सॅन डिएगोमध्ये ते प्राध्यापक झाले. त्यांच्या प्रदीर्घ सेवेनंतर २००३ मध्ये औपचारिकरित्या ते निवृत्त झाल्यावर त्यांना सन्माननीय प्राध्यापकपद देण्यात आले.

ग्रेंजर यांनी १९७० व १९८० या दोन दशकांदरम्यान आपल्या संशोधनकार्यात विनिमय व चलनवाढ दर यांसारख्या परिवर्तनीय चल (Non-Stationary) घटकामधील परस्पर संबंधाची मांडणी करणाऱ्या विश्लेषणपद्धती विकसित केल्या. त्यांची यासंदर्भातील ‘ग्रेंजर कॅज्युॲलिटीʼ (Granger Casuality) या नावाने ओळखली जाणारी परिवर्तनीय कालश्रेणी विश्लेषणाची प्रतिकृती १९६९ मध्ये इकॉनॉमेट्रिक जर्नलमध्ये प्रसिद्ध झाली. तत्पूर्वी १९६६ मध्ये ‘कालश्रेणीचा आर्थिक अन्वयार्थ व आकारʼ हा त्यांचा संशोधनपर लेखही त्याच जर्नलमध्ये प्रसिद्ध झाला. या दोन्ही लेखांमुळे ग्रेंजर यांचा या क्षेत्रातील आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रभाव वाढला. संशोधनकार्यातील पीएच. डी.चे विद्यार्थी व अर्थतज्ज्ञ पॉल न्यूबोल्ड यांचे त्यांना दीर्घकाळ व उपयुक्त असे सहकार्य लाभले. १९७४ मध्ये एकत्रित लिहिलेल्या इकॉनॉमेट्रिक जर्नलमधील लेखात आर्थिक कालश्रेणी व सांख्यिकी संबंध यांवर त्यांनी प्रकाश टाकला आहे. कॅलिफोर्निया विद्यापीठ, सॅन डिएगोमधील सहकारी ईगल यांच्या सहकार्याने त्यांनी पुढे आपले संशोधनकार्य चालू ठेवले. या दोघांनी (उभयतांनी) चल-कालश्रेणीतील कार्यकारणभाव व दीर्घकालीन संबंध स्पष्ट करण्यासाठी सह-एकात्मीकरण (Co-Integration) अशी संज्ञा प्रथमच वापरली. दोन किंवा अधिक कालश्रेणींचा स्वतंत्रपणे विचार केल्यास त्या चल स्वरूपाच्या जाणवतात; परंतु बऱ्याचदा त्यांचे उगमस्थान समान असते. सह-एकत्रीकरण संबंध ही त्यांची नवीन संकल्पना परिवर्तनीय घटकांचा अभ्यास अर्थमिती पद्धती विकसित करण्यासाठी उपयुक्त होईल, हे त्यांचे संशोधनकार्यच नोबेल पुरस्कार मिळण्यास कारणीभूत ठरले. २००६ मध्ये त्यांनी नॉटिंगहॅम विद्यापीठात ग्रेंजर सेंटर फॉर टाइम-सिरिज इकॉनॉमेट्रिक या नावाने संशोधनविभाग सुरू केला. तत्कालीन अर्थतज्ञांना ग्रेंजर यांच्या कालश्रेणी विश्लेषणप्रणालीबाबत साशंकता वाटत होती; तथापि त्यांच्या यासंदर्भातील संशोधनकार्यामुळे कालश्रेणी विश्लेषणपद्धतींचा नव्याने विचार करण्याची गरज अधोरेखित होऊन त्यास मान्यता द्यावी लागली.

ग्रेंजर यांनी स्वतंत्रपणे तसेच सहलेखक म्हणून पुढील ग्रंथ लिहिले : स्पेक्ट्रल अनॅलिसिस ऑफ इकॉनॉमिक टाइम सिरिज (१९६४ – सहलेखक), दि टिपिकल स्पेक्ट्रल शेप ऑफ ॲन इकॉनॉमिक व्हेरिएबल (१९६६), इन्व्हेस्टिगेटिंग कॉझल रिलेशन्स बाय इकॉनॉमेट्रिक मॉडेल्स ॲण्ड क्रॉस स्पेक्ट्रल मेथड्स (१९६९), कॉम्बिनेशन ऑफ फोरकास्ट्स (१९६९), प्रेडिक्टॅबिलिटी ऑफ स्टॉक मार्केट प्रायसेस (१९७० – सहलेखक), फोरकास्टिंग इकॉनॉमिक टाइम सिरिज (१९७७ – सहलेखक), ॲन इंट्राडक्शन टू लाँग मेमरी टाइम सिरिज मॉडेल्स ॲण्ड फ्रॅक्शनल डिफरन्सिंग (१९८०), को-इंटिग्रेशन ॲण्ड एरर करेक्शन  : रिप्रेझेंटेशन, एस्टिमेशन ॲण्ड टेस्टिंग (१९८७). तसेच त्यांचे अनेक शोधनिबंध प्रकाशित झाले.

ग्रेंजर यांना नोबेल पुरस्काराबरोबरच त्यांच्या अर्थशास्त्रातील संशोधन कार्यासाठी इकॉनॉमेट्रिक सोसायटी – अधिछात्र (१९७२ पासून), दि ब्रिटिश अकॅडमी अधिछात्र (२००२), वेल्श हिरो (२००४), नाइट बॅचलर ब्रिटिश सन्मान (२००५) इत्यादी सन्मान लाभले. त्यांचे अनेक विद्यार्थी पीएच. डी. प्राप्त आहेत.

ग्रेंजर यांचे सॅन डिएगो (California) येथे निधन झाले.

समीक्षक – संतोष दास्ताने

प्रतिक्रिया व्यक्त करा