भट्टाचार्य, के. सी. : (१२ मे १८७५ ‒ ११ डिसेंबर १९४९). आंतरराष्ट्रीय कीर्तीचे आधुनिक भारतीय तत्त्वचिंतक. त्यांचा जन्म पश्चिम बंगालमधील हुगळी येथील सेरामपूर या गावी झाला. त्यांचे आजोबा उमाकांत तर्कालंकार हे संस्कृतचे प्रकांड पंडित व त्यांचे वडील केदारनाथ कलकत्त्या (कोलकात्या)त नोकरी करीत होते. अनेक कौटुंबिक जबाबदाऱ्यांमुळे मुलांच्या शिक्षणावर फारसा खर्च न करता त्यांनी मुलांना जवळच्या शाळेत घातले. तरीही कृष्णचंद्र ह्या त्यांच्या आठव्या अपत्याने महाविद्यालयीन शिक्षण उत्तम प्रकारे पूर्ण केले. प्रेसिडेन्सी महाविद्यालयातून इंग्रजी, संस्कृत व तत्त्वज्ञान या विषयांत त्यांनी बी.ए. (ट्रिपल ऑनर्स) केले. इंग्रजीत ते सर्वप्रथम आले. एम.ए.ला तत्त्वज्ञान हा विषय घेऊन पुन्हा भट्टाचार्य सर्वप्रथम आले. १८९८ मध्ये त्यांच्या अध्यापकीय कारकिर्दीस प्रारंभ झाला. बंगालच्या सहा सरकारी महाविद्यालयांतून त्यांनी १९३० पर्यंत अध्यापनाचे कार्य केले. १९३० मध्ये हुगळी कॉलेजच्या प्राचार्यपदावरून ते सेवानिवृत्त झाले. त्यानंतर १९३३‒३५ दरम्यान अमळनेरच्या तत्त्वज्ञान मंदिराचे ते संचालक झाले व १९३५‒३७ ह्या कालखंडात पुन्हा कलकत्त्यास जाऊन तेथील विद्यापीठात पंचम जॉर्ज तत्त्वज्ञानाचे प्राध्यापक म्हणून ‘मेंटल व मॉरल फिलॉसफी’ शिकवू लागले. या पदावरून निवृत्त झाल्यानंतर त्यांनी सेरामपूर येथील आपल्या राहत्या घरी तत्त्वज्ञानविषयक लिखाण करीत व जिज्ञासूंशी तत्त्वचर्चा करीत आपले उर्वरित आयुष्य घालविले.

अत्यंत सुबोध व्याख्याने देण्याची ख्याती असणाऱ्या भट्टाचार्यांचे लेखन समजण्यास कठीण आहे. मुळात त्यांचे लेखन प्राय: स्वत:पुरते असल्याने नोंदस्वरूपी आहे. प्रत्येक परिच्छेदाला त्यांनी क्रमांक दिला आहे. इतर कोणत्याही तत्त्वज्ञाला उद्धृत न करता त्यांनी आपले मूलगामी विचार सूत्रात्मक रीतीने मांडले आहेत, ते केवळ विवेचनाच्या नेमकेपणासाठी प्रसिद्ध आहेत. ते स्वत: प्रसिद्धिपराङ्मुख होते.

तत्त्वज्ञानाची अनन्यसाधारण संकल्पना बाळगून अध्यापन केलेल्या भट्टाचार्यांचे समग्र लेखन त्यांचे सुपुत्र गोपीनाथ भट्टाचार्य यांनी स्टडीज इन फिलॉसफी (द्विखंडांत्मक) नामक ग्रंथात संग्रहित केले आहे. पहिल्या खंडात भट्टाचार्यप्रणीत जैन, सांख्य, योग, अद्वैत वेदान्त या दर्शनांचे विधायक विवरण व आजवर प्रकाशात न आलेल्या मुद्द्यांचे विवेचन आहे; तर दुसऱ्या खंडात भट्टाचार्यांचे मूलभूत चिंतन नमूद केलेले आहे.

‘तत्त्वज्ञान’ म्हणजे काय, असा प्रश्न उपस्थित केला, तर मिळणारे एक उत्तर म्हणजे ‘विज्ञानाच्या निष्कर्षांचे संकलन’, असे म्हटले जाते. ही संकल्पना भट्टाचार्यांना औद्धत्यपूर्ण व असमंजस वाटते. मुळात विज्ञान नि तत्त्वज्ञान यांचे स्वरूप आणि कार्यक्षेत्र भिन्न आहेत. त्यामुळे विज्ञानाची गृहीतके स्पष्ट करण्याचे कार्य तत्त्वज्ञान करते, असे मानणेही त्यांना पटत नाही. उत्क्रांतिवादी तत्त्वज्ञानाला ते कल्पनाविलास मानतात. एकंदरीत, कोणत्या प्रकारचे तत्त्वज्ञान त्यांना मान्य नाही, हे सुरुवातीला स्पष्ट करून पुढे ते आपली तत्त्वज्ञानाची संकल्पना स्पष्ट करतात.

विज्ञान वास्तवाचा अभ्यास करते, तर तत्त्वज्ञान जे स्वयंसिद्ध आहे, ते उलगडून दाखवते. वास्तव आपण इंद्रियांनी अनुभवतो, त्यासंबंधीच्या विधानांचा अर्थ शब्दश: घ्यावयाचा असतो. त्याउलट, तत्त्वज्ञानात ऐंद्रियानुभवाचेच नव्हे, तर इंद्रियांसह देहाचे, प्रतिमांचे, विचारांचे, विचारांच्या भानाचे निषेधन किंवा निरास करून आत्मतत्त्वाचा शोध घेत पुढे जावयाचे असते. भोवतालचे रोकडे वास्तव विज्ञान अभ्यासते, तर तत्त्वज्ञानातील अभ्यासविषय वास्तविक नसतात, अर्थात प्रत्यक्षगम्य नसतात. ते अस्तित्वात नसतात. त्यांना Existence नसते, तर Subsistence असते. ती वस्तुतत्त्वे असतात. उदा., ‘द्रव्य’. हिरव्यागार पानांनी बहरलेला वृक्ष नजरेस दिसतो, वाऱ्यामुळे त्याच्या पानांची सळसळ ऐकू येते. वृक्षाचा वास, चव, स्पर्श सहजशक्य असतो. म्हणून तो विज्ञानचा विषय असतो; पण रूप, रंग, गंध, स्पर्श आदी गुणांना आधारभूत असणारे द्रव्य तत्त्वज्ञान अभ्यासते. द्रव्यासारख्या अन्य वस्तुतत्त्वांचा वेध घेतला जातो, तेव्हा तशा प्रकारच्या तत्त्वज्ञानाला वस्तुनिष्ठ किंवा वस्तूचे, विषयाचे तत्त्वज्ञान म्हटले जाते.

यानंतर येते ते आत्मनिष्ठ तत्त्वज्ञान किंवा विषयीभावाचे तत्त्वज्ञान. त्यानंतर विषयापासून, वस्तूपासून मुक्त होत होत आत्मभान येत जाते. प्रतिमा, विचार व अखेरीस आत्मभानापासूनही मुक्त झालेला मी ‘सौंदर्याची रसप्रतीती’ जाणतो. ह्याला भट्टाचार्य ‘आत्मनिरीक्षण’ म्हणतात. त्यांच्या मते, आत्मनिरीक्षणात निखळ आत्मतत्त्वाचा प्रत्यय कधीच येत नाही. कधी आत्मतत्त्वाबरोबरच त्याचे मूर्त रूप जाणवते, तर कधी आपल्याप्रमाणे इतरांमधील आत्मतत्त्वाची जाणीव होते. तर कधी मानवातीत (Over-Personal) असणारे आत्मतत्त्व जाणवते. कधी भेदातील अभेद जाणवतो. हा अभेद मूर्त रूप धारण करतो. जाणिवेचा हा धार्मिक आविष्कार होय.

तत्त्वज्ञानात प्रतीकांचा वापर होतो. प्रतीकांमध्ये वैविध्य असल्याने तत्त्वज्ञानातही वैविध्य येते. पूजा-अर्चा, नामसंकीर्तन, प्रार्थना इत्यादी धार्मिक कार्ये करताना जरी आपण आत्मतत्त्वाला विसरण्याचा प्रयत्न केला किंवा ‘स्व’ ची आहुती दिली, तरी स्वयंप्रत्यय म्हणजे आत्मतत्त्व हे उरतेच. त्याला भट्टाचार्य सत्-तत्त्व (Reality) म्हणतात. परमसत्याची (Truth) जाणीव होते, ती मात्र द्वंद्वातीत स्तरावर. ह्या स्तरावर केवळ प्रतीकात्म रीतीने केवलतत्त्व (Absolute) आकळते, ते परमसत्य म्हणून किंवा स्वातंत्र्य (Freedom) किंवा मूल्य (Value) म्हणून. केवलतत्त्व स्वयंसिद्ध असते. ते भावरुपाने, अभावाने किंवा अनिर्धारित स्वरूपात जाणवते. म्हणजे अद्वैतींना भावरूपाने, बौद्धांना अभावाने, तर हेगेलवाद्यांना अनिर्धारित स्वरूपात आकळते.

मुळात तत्त्वज्ञान विषयलक्ष्यी, विषयीलक्ष्यी व अतीतलक्ष्यी असते, हा भट्टाचार्यांचा सर्वंकष विचार तत्त्वज्ञानाची समृद्ध परंपरा नेमकेपणाने मांडतो. त्यांनी केलेले केवलतत्त्वाचे विवेचनही वैशिष्ट्यपूर्ण आहे.

केवलतत्त्व सत्य म्हणून किंवा स्वातंत्र्य म्हणून किंवा मूल्य म्हणून आकळते, त्याविषयीची उच्चारणे (उदा., ‘सत्यमेव जयते’ किंवा ‘सत्य हाच परमेश्वर’) माहितीप्रद दिसली, तरी वास्तविक ती माहितीत कोणतीही भर टाकत नाहीत. “अबब! किती सुदंर आहे हे दृश्य” हे उच्चारण माहितीप्रद असल्यासारखे वाटते व ते “हे दृश्य खूप सुंदर आहे” ह्या विधानासारखे दिसते. वास्तविक अशा प्रकारच्या विधानांमधून केवळ ‘वक्त्याला हे दृश्य खूप सुंदर वाटते’, एवढाच बोध दिला जातो. म्हणजे वक्त्याला हे ‘दृश्य सुंदर वाटते’, ह्या भावात्मक आशयाला वस्तुरूप देऊन सार्वत्रिक मान्यता मिळविण्याचा प्रयत्न केला जातो. ‘फक्त मलाच हे दृश्य सुंदर वाटते’ असे नसून ‘मुळात दृश्यच सुंदर आहे’; तुम्हां-आम्हां सर्वांपर्यंत ते सौंदर्य पोहोचवून त्याला वस्तुनिष्ठता देण्याचा प्रयत्न केला जातो व सौंदर्य सर्वमान्य व्हावे, यासाठीचा हा प्रयत्न असतो. हा खटाटोप करण्यामागे एक कारण आहे. ते म्हणजे मूल्य हे पदार्थाच्या आश्रयाने राहते, अशी आपली सर्वसाधारण समजूत असते. भट्टाचार्यांना हा ‘बुद्धिमान्यांचा पूर्वग्रह’ वाटतो. मूल्यांची सार्वभौम सत्ता जाणणे त्यांना महत्त्वाचे वाटते. मूल्यांचे अस्तित्व निरपेक्ष असते, स्वतंत्र, स्वायत्त असते, हा त्यांच्या मूल्यसंकल्पनेचा गाभा आहे.

तत्त्वज्ञानातील सर्व विधाने अशी पुनरुक्तिरूप असतात. जे केवलतत्त्व स्वयंसिद्ध आहे, त्याचाच स्वयंसिद्ध उलगडा केला जातो. तत्त्वज्ञानात वाच्यता अपरिहार्य आहे. बोलल्याखेरील, व्यक्त केल्याखेरीज तत्त्वज्ञान कळत नाही, हे भट्टाचार्यांनी अधोरेखित केले आहे. तत्त्वज्ञान ह्या बाबतीत कल्पितांप्रमाणे (Fictions) असते, असे त्यांचे म्हणणे आहे. कल्पिते सांगितल्याखेरीज कळत नाहीत. त्याचप्रमाणे तत्त्वज्ञान हे व्यक्त केल्याखेरीज दुसऱ्यापर्यंत पोहोचत नाही. म्हणून तत्त्वज्ञान म्हणजे ‘बोलण्याचा आजार’ (Disease of Speech) असेही ते आपल्या निदर्शनास आणतात. तत्त्वज्ञानातील सर्व वाक्ये दिखाऊ निर्धारणे (Apparent judgements) असतात, हे त्यांचे म्हणणे एयरादी तार्किक प्रत्यक्षार्थवाद्यांच्या भावनिकवादाजवळ जाणारे आहे.

भट्टाचार्यांच्या रूपात विद्यार्थ्यांना ‘तत्त्वज्ञ’ कसा कार्यरत असतो, ते प्रत्यक्ष पाहता आले. शिकवताना, विषय उलगडून दाखवताना भट्टाचार्यांचे तत्त्वज्ञान साकारले जात असे. आहे ते पुढे न ठेवता त्याविषयीचे मौलिक चिंतन गांभीर्याने ते सांगत, तेव्हा त्यांचे तत्त्वज्ञान आपोआप साकारले जाई. त्यामुळे विद्यार्थ्यांची आकलनक्षमता निश्चितपणे वृद्धिंगत होई. तत्त्वज्ञानाचे अध्यापन हा त्यांचा प्राण होता. परंपरेची आधुनिकतेशी सांगड घालत तत्त्वज्ञानाकडे बघायची नवीन दृष्टी भट्टाचार्यांनी दिली, हे लक्षणीय आहे. १९०१ मध्ये कलकत्ता विश्वविद्यालयाने प्रकाशित केलेल्या त्यांच्या ‘स्टडीज इन वेदान्तीझम’ या प्रबंधातील अद्वैतविचार कांट, हेगेल, स्पेन्सर यांच्या तत्त्वज्ञानाची म्हणजेच तत्कालीन तत्त्वविचारांची दखल घेतो व समन्वय साधतो. ‘स्वराज इन आयडिआज’ या सुप्रसिद्ध लेखाचे सार म्हणजे सहसा न जाणवणारे सूक्ष्म वर्चस्व, हुकूमत, अधिकारशाही राजकीय नसून कल्पनांची असते. मग परकीयांच्या अनिष्ट कल्पनाही कल्याणकारी वाटू लागतात. हे सांस्कृतिक दास्य होय. ते मुरल्याने भाकड वैचारिक संकर होतो. ते जाणवून त्यातून बाहेर पडणे, हा ‘पुनर्जन्म’ असतो. इतरांच्या आदर्शांप्रती पुरेसा आदरभाव राखावा; त्यांच्याशी तुलना वा स्पर्धा न करता त्यांच्यातील चांगले आत्मसात करावे; पण त्याच वेळी आपल्या भूतकाळात पाय रोवून, वर्तमानाची दखल घेऊन भविष्यवेधी शिक्षणपद्धती अंगीकारावी. भारतीय तत्त्वज्ञानाच्या परिप्रेक्ष्यातून पाश्चात्त्य तत्त्वज्ञानाकडे पाहणे अपेक्षित आहे. निजखूण पटविणारे आदर्श भूमीत रुजलेले असतात; त्यांना इतिहास असतो. आता (म्हणजे १९३० मध्ये) काळाने आपल्या आदर्शांशी जुळवून घेणे गरजेचे आहे. आपल्या आदर्शांची पूजा आपल्या रीतीने बांधावी; इतरांचे आदर्श खुल्या मनाने पाहावेत; आपल्यात रुजवावेत पण आपल्या आदर्शांशी इमान राखणे महत्त्वाचे. हा ‘स्वराज इन आयडियाज’चा गाभा आहे.

संदर्भ :

  • Bhattacharya, Gopinath, Ed. Studies in Philosophy, Calcutta, 1956.
  • Maitra, S. K.; Malkani, G. R.; Murti, T. R. V.; Bhattacharya, Kalidas, Krishna Chandra Bhattacharya Memorial Volume, Amalner, 1958.
  • Malkani, G. R. Some Aspects of K. C. Bhattachryas Concept of Philosophy, The Philosophical Quarterly, Jully 1950.
  • Sen, Sanatkumar, Thinking of Speaking in the Philosophy of K. C. Bhattacharya, Vols. VIII,  No. 3, 1981.
  • मुळे, शर्मिला, के. सी. भट्टाचार्यांची तत्त्वज्ञानाची संकल्पना, परामर्श त्रैमासिक, पुणे, नोव्हेंबर १९९१.
  • वीरकर, शर्मिला, विषयीभाव : भट्टाचार्य व शंकराचार्य, परामर्श त्रैमासिक, पुणे, फेब्रुवारी १९९३.

समीक्षक – एस. जी. निगळ

प्रतिक्रिया व्यक्त करा