हॉल, चार्ल्स फ्रान्सिस (Hall, Charles Francis) : (१८२१ – ८ नोव्हेंबर १८७१). अमेरिकन समन्वेषक. त्यांचा जन्म अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांतील व्हर्मॉंट राज्यात झाला. ते लहान असतानाच त्यांच्या कुटुंबियांनी न्यू हँपशर राज्यातील रॉचेस्टर येथे स्थलांतर केले. तेथेच त्यांचे बालपण गेले आणि त्यांना औपचारिक प्राथमिक शिक्षण मिळाले. १८४०च्या दशकात विवाहबद्ध झाल्यानंतर ते ओहायओ राज्यातील सिनसिनॅटी येथे १८४९ मध्ये वास्तव्यास गेले. तेथे त्यांनी लोहारकाम, कोरीवकाम, पत्रकारिता इत्यादी कामे केली. १८५०च्या दशकाअखेरीस तेथे ते दोन वृत्तपत्रेही चालवीत होते. कोणतेही शास्त्रीय प्रशिक्षण घेतले नसले, तरी त्यांनी भूगोल आणि इतिहास या विषयांचे बरेच वाचन केले होते. त्यातूनच त्यांचे आर्क्टिक प्रदेशाविषयीचे आकर्षण बरेच वाढले. ब्रिटिश समन्वेषक सर जॉन फ्रँक्लिन हे ‘नॉर्थवेस्ट पॅसेज’च्या शोधासाठी दोन गलबतांसह आर्क्टिक प्रदेशात गेले होते. फ्रँक्लिनच्या या सफरीचे पुढे काय झाले, हे कोणालाच समजले नव्हते. फ्रँक्लिन यांच्या या फसलेल्या सफरीचे काही पुरावे मिळविण्यासाठीचा शोध घेण्यात हॉल यांना विशेष रस होता. या सफरीतील काही लोक अजूनही तेथे एस्किमोंसोबत राहत असावेत, असा त्यांचा कयास होता. त्यासाठीच १८६० मध्ये देवमासे पकडणाऱ्या एका बोटीतून हॉल एकटेच कॅनडातील बॅफिन बेटाच्या दक्षिण टोकाशी असलेल्या फ्रोबिशर उपसागरात आले. दोन वर्षे बॅफिन बेटावर एस्किमोंसोबत राहून त्या प्रदेशात ते बरेच फिरले. तेथेच जो आणि ॲन या दोन स्थानिकांशी त्यांची विशेष मैत्री झाली. हॉल यांना पुढील प्रवासाच्या वेळी त्या दोघांचा बराच उपयोग झाला. या प्रवासात त्यांना फ्रँक्लिन यांच्या सफरीबद्दलची काहीच माहिती मिळू शकली नाही; परंतु इंग्रज मार्गनिर्देशक सर मार्टिन फ्रोबिशर यांच्या १५७८ मधील सफरीचे अनेक अवशेष त्यांना दिसून आले. १८६२ मध्ये जो आणि ॲन यांच्यासह ते घरी परतले. येथील वास्तव्यात त्यांनी आपल्या सफरीचा ‘आर्क्टिक रिसर्चेस अँड लाइफ अमंग द एस्क्यूमॉक्स’ हा वृत्तांत लिहून १८६४ मध्ये प्रसिद्ध केला.
हॉल यांनी फ्रँक्लिन यांच्या सफरीतील लोकांचा शोध घेण्याच्या उद्देशाने पुन्हा १८६४ ते १८६९ या काळात आर्क्टिक प्रदेशाची दुसरी सफर काढली. त्या प्रदेशात आल्यानंतर त्यांनी हडसन उपसागराच्या उत्तर टोकाशी असलेल्या रीपल्स उपसागरापासून सुरुवात करून पाच वर्षांच्या कालावधीत ४,८३० किमी.चा प्रवास केला. त्यासाठी त्यांनी स्लेज गाडीचा उपयोग केला. या प्रवासात त्यांना एस्किमोंकडून फ्रँक्लिन यांच्या सफरीविषयी बरीच माहिती मिळाली. त्यांना फ्रँक्लिन यांच्या सफरीतील अनेकांचे देहावशेष बूथिआ द्वीपकल्पावर आणि किंग विल्यम बेटावर आढळून आले.
संयुक्त संस्थानांच्या शासनपुरस्कृत सफरीचे नेतृत्व करून उत्तर ध्रुवावर पोहोचणे हे हॉल यांचे अखेरचे साहस होय. त्यासाठी ते २९ जून १८७१ रोजी न्यूयॉर्क शहरापासून पोलरीज या नाविक आगबोटीने निघाले. त्या बोटीवरूनच या सफरीला पोलरीज सफर म्हणून ओळखले जाते. या बोटीचे कप्तानपद बडिंग्टन यांच्याकडे होते. वातावरणाच्या अनुकूलतेमुळे ग्रीनलंडपर्यंतचा त्यांचा प्रवास वेगाने झाला. वायव्य ग्रीनलंड आणि ईशान्य कॅनडा यांना वेगळे करणाऱ्या केनेडी आणि रॉबसन चॅनेल (सामुद्रधुनी) मधून ८२° ११’ उत्तर अक्षांशापर्यंत ते पोहोचले. बोटीने सर्वाधिक उत्तरेकडे जाणारे तेच पहिले समन्वेषक असावेत. बोटीने जेवढे जास्तीत जास्त उत्तरेकडे जाता येईल, तेवढे ते गेले; परंतु त्यानंतर वारा आणि हिमाच्या प्रतिकूलतेमुळे ते दक्षिणेकडे वळले व ग्रीनलंडजवळ ८१° ३७’ उत्तर अक्षांशावरील उथळ उपसागरावर त्यांनी पोलरीज बोट नांगरली. त्यानंतर जमिनीवरून स्लेज गाडीतून ते ८३° उ. अक्षांशापर्यंत पोहोचले. तेथून परतताना ग्रीनलंडच्या किनाऱ्यावरील थँक गॉड हार्बर येथे आजारपणामुळे त्यांचा मृत्यू झाला असावा किंवा कदाचित त्यांना मारले असावे, अशाही शक्यता वर्तविल्या जातात. त्यांच्या मृत्यूचे गूढ शोधण्याचा प्रयत्न १९६८ मध्येही झाला; परंतु मृत्यूचे नेमके कारण निश्चित करता आले नाही. ध्रुवीय प्रदेशाचे त्यांना खूप आकर्षण होते. ‘येथील वादळे, वारे, हिमनद्या, हिमनग, पर्यावरण इत्यादींवर मी अतिशय धाडसाने प्रेम करतो’, असे त्यांच्या संवादातून अनेकदा स्पष्ट झालेले दिसते.
समीक्षक : संतोष ग्या. गेडाम