पेरो, नीकॉला (Perrot, Nicolas) : (१६४४ – १३ ऑगस्ट १७१७). फ्रेंच फर व्यापारी, उत्तर अमेरिकन वसाहतींचा अधिकारी आणि समन्वेषक. पेरो यांचा जन्म फ्रान्सच्या बर्गंडी प्रदेशातील दर्सी येथे झाला असावा. तरुणपणातच त्यांनी जेझुइट मिशनाऱ्यांबरोबर कॅनडातील न्यू फ्रान्स वसाहतीच्या ठिकाणी स्थलांतर केले. त्यामुळे तेथे त्यांना इंडियन भाषा आणि स्थानिक संकृती शिकणे सहज शक्य झाले. पंचमहासरोवरांच्या विशेषत: पश्चिम भागात त्यांचे कामकाज चालू होते. वयाच्या एकोणिसाव्या वर्षी ते फर व्यवसायामध्ये शिरले. इ. स. १६६८ मध्ये ग्रीन बे सभोवतालच्या प्रदेशातील अल्गाँक्वियन या जमातीबरोबर व्यवहार करणारे पेरो हे पहिले फ्रेंच व्यापारी होते. इ. स. १६७० मध्ये गव्हर्नर फ्राँटनॅक यांनी मिसिसिपी नदीच्या वरच्या खोऱ्यातील मोहिमेसाठी पेरो यांची दुभाषी म्हणून नेमणूक केली. या मोहिमेच्या अहवालावरून फ्रान्सने जून १६७१ मध्ये मिसिसिपीच्या वरच्या खोऱ्यातील क्षेत्रावर आपला दावा सांगितला. सांप्रत हा प्रदेश विस्कॉन्सिन व मिनेसोटा राज्यांत आहे. त्यानंतर ते न्यू फ्रान्सला परतले. विवाह करून बेकांकर येथे स्थायीक झाले. त्यानंतरची बारा वर्षे त्यांनी आपल्या भूमीवर आणि फर व्यापारात गुंतवून घेतले. त्यासाठी त्यांना इ. स. १६७४ मध्ये फर व्यापाराचा परवानाही मिळाला होता.
इसवी सन १६८३ मध्ये गव्हर्नर लफब्वर दे ला बॅरी यांनी पंचमहासरोवर परिसरातील व्यापार मोहिमेसाठी पेरो यांची अधिकृतपणे नियुक्ती केली. पुढच्याच वर्षी त्यांच्यावर इरोक्वायनविरुद्धच्या मोहिमेमध्ये पश्चिमेकडील जमातीचा पाठींबा मिळविण्याची जबाबदारी टाकण्यात आली. इ. स. १६८५ मध्ये पेरो यांना ग्रीन बे प्रदेशाचा अधिकारी बनविण्यात आले. पेरो यांनी विस्कॉन्सिन आणि मिसिसिपी या नद्यांच्या संगमप्रदेशात प्रवास केला. तेथे त्यांनी सेंट नीकॉला किल्ला बांधला. इ. स. १६८६ मध्ये त्यांनी सू आणि इतर स्थानिक जमातींबरोबरीच्या व्यापार वृद्धीसाठी पिपन सरोवरावराच्या काठी सेंट अँटॉइन किल्ला बांधला. पुढच्याच वर्षी इरोक्वायनविरुद्धच्या दुसऱ्या मोहिमेला सहकार्य करण्याची त्यांना आज्ञा करण्यात आली.
पेरो यांच्या प्रयत्नांमुळे पंचमहासरोवर प्रदेशातून ब्रिटीशांच्या लोकर उद्योगाच्या मोहिमेचे उच्चाटन झाले. त्यामुळे इ. स. १६८९ मध्ये मिसिपिसीच्या वरच्या खोऱ्यातील प्रदेशावरील फ्रान्सच्या दाव्याचे पुन्हा अधिकृत नूतनीकरण झाले. इ. स. १६९६ पर्यंत (सर्व व्यापारी परवाने रद्द होईपर्यंत) पेरो पश्चिमेकडील जमातींबरोबर कार्यरत होते. त्यानंतर ते लोअर कॅनडा प्रांतात परतले. तेथे त्यांनी लष्करामध्ये दुभाष्या म्हणून काम केले. आयुष्याच्या शेवटच्या काही वर्षांमध्ये त्यांनी त्यांच्या आठवणी शब्दबद्ध केल्या. या आठवणी पुढे इ. स. १८६४ मध्ये पुस्तकरूपात प्रकाशित करण्यात आल्या.
पेरो यांचे लोअर कॅनडा येथे निधन झाले.
समीक्षक : वसंत चौधरी