मेक्सिकोमधील सर्वांत मोठे गोड्या पाण्याचे सरोवर. देशाच्या पश्चिम-मध्य भागातील पठारी प्रदेशात, स. स.पासून १,८०० मी. उंचीवर हे सरोवर आहे. त्याचा विस्तार हालीस्को आणि मीचवाकान या राज्यांत झालेला आहे. सरोवराचा पूर्व-पश्चिम विस्तार ८० किमी. आणि उत्तर-दक्षिण विस्तार २४ किमी. असून क्षेत्रफळ १,६८० चौ. किमी. आहे. हे सरोवर बरेच उथळ असून त्यातील पाण्याची कमाल व किमान खोली अनुक्रमे १०.५ मी. व ७ मी. असते. प्राचीनकाळी या भागात झालेल्या भूकंपीय क्रियांदरम्यान भूकवचात अधोगामी हालचाली होऊन काही द्रोणीप्रदेश निर्माण झाले. त्यांपैकी हालीस्को द्रोणीत या सरोवराची निर्मिती झाली. लेर्मा ही सरोवराला पाणीपुरवठा करणारी प्रमुख नदी आहे. ती सरोवराच्या आग्नेय टोकाशी सरोवरात प्रवेश करते आणि ईशान्य कोपऱ्यातून रिओ ग्रांदे दे सांत्यागो नावाने बाहेर पडते. त्यानंतर ही नदी पॅसिफिक महासागराला मिळते. या नदीच्या प्रवाहमार्गात सुंदर जलप्रपात आणि कॅन्यन आहेत. सरोवराच्या पूर्व टोकाशी दोन उपसागर आहेत. ईस्ला दे लॉस आलक्रानेस, ईस्ला मेसकाला, ला ईस्ला मेनॉर ही सरोवरातील बेटे आहेत. निसर्गसुंदर परिसर, आल्हाददायक व आरोग्यवर्धक हवामान, हौशी मासेमारीसाठी सुविधा, किनाऱ्यावर ठिकठिकाणी वसलेली चित्ररमणीय खेडी इत्यादींमुळे पर्यटनाच्या दृष्टीने सरोवराचा परिसर विशेष प्रसिद्ध आहे. १९५०च्या दशकापासून किनारी भागात सेवानिवृत्तांच्या वसाहती निर्माण झाल्या असून त्यांत प्रामुख्याने अमेरिकन आणि कॅनडियन लोक पुष्कळ आहेत. येथे सुमारे ३०,००० परदेशी लोकांचे वास्तव्य आहे (२०१८). सरोवराच्या काठावर चापाला, अजिजिक, सॅन अँटोनीओ, ट्ल्याकॅपान, होकोटेपेक, सॅन ह्वान कोसाला, मेसकाला दे ला आसूंस्योन, टीसापान एल् आल्टो, ला पाल्मा, मीचवाकान व ओकट्लान ही शहरे व नगरे वसली आहेत. सरोवराच्या उत्तर, आग्नेय आणि पश्चिम किनाऱ्यावर मोठ्या संख्येने ग्रामीण लोक राहत असून ते निर्वाह शेतीमधून मका व इतरही उत्पादने घेतात. येथे स्थानिक मासेमारीही चालते. सरोवराच्या पश्चिमेकडील भागाच्या उत्तरेस ४२ किमी. वर ग्वादालाहारा ही हालीस्को राज्याची राजधानी आहे. महामार्ग, लोहमार्ग किंवा हवाई मार्गाने या सरोवर परिसरात सहज जाता येते.

सरोवराच्या किनाऱ्यावर वसलेल्या नगरांसाठी चापाला सरोवर हाच पाण्याचा प्रमुख स्रोत आहे. नागरी वस्तीकडून होणारा पाण्याचा वाढता वापर आणि पर्जन्यमानातील घट यांमुळे सरोवरातील पाण्याची पातळी घटत गेली आहे. सरोवर परिसरातील आणि लेर्मा नदीच्या खोऱ्यातील अतिरिक्त वृक्षतोडीमुळे वाढलेली धूप यांमुळे सरोवरात गाळ साचून पाण्याची खोली कमी होऊ लागली आहे. कमी खोलीमुळे पाण्याचे सरासरी तापमान वाढून बाष्पीभवन वाढले आहे. त्याच वेळी लेर्मा नदीमार्गाने वाहत येणाऱ्या नागरी, औद्योगिक व कृषी अपशिष्टांमुळे सरोवरातील पाण्याचे प्रदूषण होत आहे. प्रदूषणाद्वारे सरोवराच्या पाण्यात वाढणारी पोषकद्रव्ये  आणि उबदार पाणी यांमुळे सरोवरात वॉटर हायासिंथनामक वेलींची प्रचंड वाढ होत असल्याचे दिसून येत आहे. पाण्याच्या प्रदूषणाचा सरोवरातील परिसंस्थांवर विपरित परिणाम होत असून येथील मत्स्यपैदासही घटली आहे. लेर्ना नदीकाठावर उभारलेल्या जलशुद्धीकरण प्रकल्पांमुळे पाण्याची पातळी आणि गुणवत्ता सुधारली असली, तरी अद्याप ते पाणी सार्वजनिक आरोग्यास धोक्याचेच आहे. सरोवराच्या काठी आणि परिसरात मोठ्या प्रमाणावर स्थलांतरित तसेच स्थानिक पक्षी व प्राणी आढळतात.

समीक्षक : रेखा निगडे