चित्रपट-इतिहास सोप्या टप्प्यांमध्ये समजून घेण्यासाठी त्यात वेळोवेळी उदयास आलेल्या चळवळींचा अभ्यास करणे आवश्यक ठरते. चित्रपटाचे तंत्र आणि तंत्रज्ञान, माध्यमांसंदर्भात झालेले  वैचारिक बदल, यांबरोबरच त्यात्या काळाशी असलेले तत्कालीन चित्रपटांचे नाते यांच्याशी या चळवळी निगडित आहेत.

प्रत्येक चित्रपट आणि त्यामागचा कलाविचार हा वेगवेगळा असतो. तरीही विशिष्ट शैली, तंत्र, रचना यांत साधर्म्य असणाऱ्या चित्रपटांच्या एकत्रितपणे होत गेलेल्या निर्मितीकडे आपण चळवळ म्हणून पाहू शकतो. एखाददुसरा चित्रपट हा कितीही नवा विचार मांडणारा असला, तरी त्यातून  चळवळ उभी राहू शकत नाही; पण अनेक समविचारी दिग्दर्शकांनी एकाच गोष्टीने प्रेरित होऊन केलेले काम, हे चळवळीच्या स्वरूपात आपल्यापुढे येते.

चित्रपटमाध्यम नवीन असताना बहुधा या चळवळी विशिष्ट देश, प्रांत यांच्याशी जोडलेल्या असत. उदा., रशियन मोन्ताज या चळवळीतले संकलनासंबंधातील संशोधनात्मक विचार मांडणारे काम हे रशियाबाहेर गेले नाही. त्यातला विचार जगभरात पोहोचला; पण ती शैली इतरत्र चित्रपटांसाठी वापरली गेली नाही. जर्मन अभिव्यक्तिवादामध्ये (Expressionism)  कलाक्षेत्रातील शाखेला चित्रपटात आणण्याचा प्रयत्न झाला आणि त्यातून एका क्रांतिकारी दृश्य शैलीचा प्रारंभ झाला. या चळवळीतला चित्रपट हा महायुद्धाआधी विस्थापित झालेल्या जर्मन दिग्दर्शकांकडून काही प्रमाणात पसरला; पण अमेरिकेत त्याचे स्वरूप बदलले आणि  ‘फिल्म न्वॉरʼ या वेगळ्या चळवळीत, शैलीत त्याचे रूपांतर झाले.

सामान्यत: असे प्रत्ययास येते की, चित्रपट-चळवळी या फार वर्षे टिकत नाहीत. एकदा का एक नवी शैली मांडून झाली आणि त्यात सातत्याने काही वर्षे काम झाले की, दिग्दर्शकांचे वेगळ्या प्रकारच्या कामाकडे लक्ष जाते. जो विचार या चळवळीचा आधार असतो, त्याचे महत्त्व तरी घटत जाते किंवा चळवळीचे काही घटक बदलल्याने तिचे स्वरूप बदलून जाते. निओ न्वॉरसारख्या वर्षानुवर्षे टिकणाऱ्या काही जागतिक स्वरूपाच्या चळवळी सोडता, बहुतेकांचे आयुष्य हे मर्यादित, पण इतर जागतिक चित्रपटांना दिशादर्शक आणि दूरगामी परिणाम मागे सोडणारे असते.

प्रमुख चित्रपटचळवळी :

जागतिक चित्रपटांमध्ये खालील चित्रपटचळवळींचे स्थान महत्त्वाचे आणि एकूण चित्रपटउद्योगावर आमूलाग्र प्रभाव पाडणारे आहे :

१. जर्मन अभिव्यक्तिवाद
२. रशियन मोन्ताज
३. फिल्म न्वॉर
४. इटालियन नववास्तववाद
५. फ्रेंच न्यू वेव्ह
६. अमेरिकन अंडरग्राउंड
७. अमेरिकन इन्डीपेन्डेन्ट सिनेमा
८. डोग्मे
९. सिनेमा नोव्हो

समीक्षक – अभिजित देशपांडे

प्रतिक्रिया व्यक्त करा