वेगळी लैंगिकता किंवा लिंगभाव असणाऱ्या समलिंगी, उभयलिंगी, परलिंगी समुदायाच्या प्रश्नांवर, त्यांच्या आयुष्यावर, प्रेमभावनांवर भाष्य करणाऱ्या चित्रपटांसाठी ‘एलजीबीटी चित्रपट’ अशी संज्ञा वापरली जाते. स्त्री समलिंगी (लेस्बियन), पुरुष समलिंगी (गे), उभयलिंगी (बायसेक्शुअल), परलैंगिक (ट्रान्सजेंडर) यांना एकत्रितपणे ‘एलजीबीटी’ ही संज्ञा वापरली जाते.

द डिक्सन एक्सपेरिमेंटल साऊंड फिल्म या चित्रपटातील एक दृश्य

समलैंगिकतेची झलक सर्वप्रथम दिसली ती विल्यम केनेडी दिग्दर्शित द डिक्सन एक्सपेरिमेंटल साऊंड फिल्म या १८९५ साली प्रदर्शित झालेल्या चित्रपटात. ज्यात दोन पुरुष एकत्र नृत्य करताना दाखवले होते. मात्र त्याकडे ‘वेगळं’ अशा दृष्टीने पाहिले गेले नाही. एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धात आणि साधारण १९२०–३० च्या कालखंडात मात्र चित्रपटांतून होणारे समलैंगिकांचे चित्रण हे लिंगाधारित समजुती आणि रूढींवर बेतलेले होते. समलैंगिक पुरुष हे बायकी आणि विनोदी म्हणून दाखवले गेले. सहसा स्त्रियांची म्हणून समजली जाणारी कामे करणारे पुरुष म्हणजे समलैंगिक असा समज निर्माण करणारे चित्रण केले गेलेले दिसते.

एलजीबीटी चित्रपट आणि जग : एलजीबीटी विषयावर जगभरात अनेक दिग्दर्शकांनी अनेक चित्रपट दिग्दर्शित केले आहेत. त्यातल्या सगळ्याच चित्रपटांची दखल घेणे शक्य नसले, तरी काही मोजक्या आणि महत्त्वाच्या चित्रपटांचा उल्लेख पुढे केला आहे. अमेरिकेत ऐंशीच्या दशकात आलेल्या एड्सच्या साथीवर भाष्य करणारे चित्रपटही महत्त्वाचे आहेत. आर्थर जे. ब्रेसाँ ज्युनिअर (Arthur J. Bressan Jr.) लिखित-दिग्दर्शित बडीज (१९८५) हा चित्रपट एड्समुळे मृत्युशय्येवर पडलेल्या एका समलिंगी पुरुषाच्या – रॉबर्ट विलोच्या – आणि त्याची काळजी घेण्यासाठी स्वयंसेवक म्हणून आलेल्या एका समलिंगी तरुणाच्या – डेव्हिडच्या – नातेसंबंधांवर भाष्य करतो. अमेरिकेत सुरुवातीच्या काळात एड्सची समलैंगिक पुरुषांचा रोग म्हणून पसरलेली ओळख, त्यामुळे रुग्णांना मिळणारी सापत्न वागणूक, समलैंगिकतेबद्दल असलेल्या तिरस्कारामुळे एड्सवरच्या उपचारांच्या संशोधनासाठी सरकारकडून आर्थिक साहाय्यासाठी नकार, रुग्णांना सोसाव्या लागणाऱ्या असह्य वेदना अशा अनेक विषयांना हा चित्रपट स्पर्श करतोच; पण त्यासोबतच दोन पुरुषांच्या समलैंगिकतेबद्दलच्या भिन्न दृष्टिकोनांचाही विचार करतो. त्यासोबत रुग्ण आणि वैद्यकक्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तींच्या नातेसंबंधांबद्दल, त्यातल्या हळुवार गुंतवणुकीबद्दलही बोलतो.

२००५ साली प्रदर्शित झालेला अँग ली दिग्दर्शित ब्रोकबॅक माउंटन हा चित्रपट एलजीबीटी विषयावरच्या चित्रपटांमधील मैलाचा दगड समजला जातो. ७८व्या ऑस्कर अवॉर्ड्समध्ये सर्वाधिक म्हणजे आठ नामांकने मिळवत या चित्रपटाने सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक, सर्वोत्कृष्ट रूपांतरित पटकथा आणि सर्वोत्कृष्ट अभिनव संगीताचा पुरस्कार पटकावला. एनिस डेल मार आणि जॅक ट्विस्ट या मेंढपाळांच्या अतिशय हळव्या गुंतागुंतीच्या नात्याची कथा सांगताना हा चित्रपट प्रेमाबद्दल पुन्हा नव्याने काही बोलतो. गस व्हॅन सांत दिग्दर्शित मिल्क (२००८) हा चित्रपट कॅलिफोर्नियाच्या सार्वजनिक कार्यालयामध्ये निवडून आलेल्या व समलिंगी चळवळीमध्ये सक्रिय असलेल्या नेत्याच्या – हार्वे मिल्कच्या – आयुष्यावर आधारित चरित्रपट होता. हार्वे मिल्कची हत्या केली गेली, तो स्वतःची खुलेपणाने समलैंगिक म्हणून ओळख सांगणारा अमेरिकेच्या राजनेत्यांतील पहिली व्यक्ती. या चित्रपटाने सर्वोत्कृष्ट नायक आणि सर्वोत्कृष्ट मूळ पटकथा असे दोन ऑस्कर पटकावले. बॅरी जेकिन्स लिखित आणि दिग्दर्शित मूनलाईट (२०१६) हा सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा ऑस्कर मिळवणारा एलजीबीटी चित्रपट आहे. चिरॉनच्या आयुष्यातील बालपण, तारुण्य आणि प्रौढत्व अशा तीन वेगवेगळ्या टप्प्यांचा वेध घेताना हा चित्रपट चिरॉनच्या समलैंगिकतेचा, समलैंगिक असल्यामुळे सोसाव्या लागणाऱ्या दडपशाहीचा, त्याच्या केविनबरोबरच्या संबंधांचा आणि प्रेमाचा, आईसोबतच्या नात्याचा धांडोळा घेतो. सर्व कृष्णवर्णीय कलाकार असणारा हा चित्रपट एकविसाव्या शतकातील सर्वोत्कृष्ट चित्रपटांपैकी एक मानला जातो. २०१७ साली प्रदर्शित झालेला कॉल मी बाय युअर नेम हा इटालियन चित्रपट म्हणजे एलिओ आणि ऑलिव्हर या दोन तरुणांची हळुवार प्रेमकहाणी आहे. या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट रूपांतरित पटकथेचा ऑस्कर पुरस्कार मिळाला आहे. टॉम हूपर दिग्दर्शित द डॅनिश गर्ल (२०१५) हा लिंगबदल शस्त्रक्रियेवर भाष्य करणारा अतिशय महत्त्वाचा चित्रपट आहे.

ब्लू इज द वॉर्मेस्ट कलर या चित्रपटातील एक दृश्यचित्र

ब्लू इज द वॉर्मेस्ट कलर (२०१३), करोल (२०१५), पोर्ट्रेट ऑफ अ लेडी ऑन फायर (२०१९) हे स्त्री समलिंगी संबंधावर भाष्य करणारे काही महत्त्वाचे जागतिक चित्रपट आहेत. यासोबतचमाय ओन प्रायव्हेट इदाहो (१९९१), फिलाडेल्फिया (१९९३), हॅप्पी टूगेदर (१९९७ – हाँगकाँग चित्रपटसृष्टी), बॉईज डोन्ट क्राय (१९९९), प्रेयर्स फॉर बॉबी (२००९), वीकेण्ड (२०११), प्राईड (२०१४), गॉड्स ओन कंट्री (२०१७), लव्ह, सायमन, बॉय इरेज्ड (२०१८) हे एलजीबीटी विषयांवरील चित्रपटही उल्लेखनीय आहेत.

पेद्रो अल्मोदोवर या स्पॅनिश लेखक, दिग्दर्शक, निर्माता आणि अभिनेत्याचे एलजीबीटी चित्रपटांतील योगदान महत्त्वपूर्ण आहे. ऑल अबाउट माय मदर (१९९१) या चित्रपटात एस्तेबानच्या आईचा शोध तिच्या पळून गेलेल्या ट्रान्सजेंडर नवऱ्यापाशी येऊन थांबतो. बॅड एज्युकेशन (२००४) या चित्रपटात पेद्रोने लैंगिक अत्याचार आणि मिश्र लैंगिक जाणिवांवर भाष्य केले आहे. त्याच्या पेन अँड ग्लोरी (२०१९) या चित्रपटात एका समलैंगिक दिग्दर्शकाच्या अंतःप्रेरणांचा शोध घेताना नायकाचे दुखणे, त्याचे आईशी नाते, बालपणीच्या समलैंगिक जाणिवा अशा अनेक गोष्टींवर त्याने प्रकाश टाकला आहे.

एलजीबीटी चित्रपट आणि भारत : ६ सप्टेंबर २०१८ रोजी भारताच्या सर्वोच्च न्यायालयाने कलम ३७७ या अन्यायकारक कायद्यातून एलजीबीटी समूहाला वगळत यापुढे परस्पर संमतीने झालेले समलैंगिक संबंध गुन्हा म्हणून गणले जाणार नाहीत, असा ऐतिहासिक निर्णय दिला. यामधल्या काळात आणि अजूनही विविध कलाकृतींतून, विविध माध्यमांतून एलजीबीटी समुदायाचे चित्रण करण्याचे बरेच प्रयत्न झाले, होत आहेत. चित्रपटांचे विषयही या कालखंडात केवळ समाजाकडून होणारा विरोध अशा वरवर उघडपणे दिसणाऱ्या समस्यांपासून व्यक्तिरेखांच्या स्वतःच्या स्वीकाराच्या आणि अंतर्विरोधाच्या प्रवासावर भाष्य करण्यापर्यंत बदलत गेले आहेत.

हिंदी कादंबरीकार कमलेश्वर प्रसाद सक्सेना यांच्या एक सडक सत्तावन गलियाँ या कादंबरीवर आधारित प्रेम कपूर यांनी दिग्दर्शित केलेला बदनाम बस्ती (१९७१) हा कृष्णधवल चित्रपट म्हणजे समलिंगी संबंधांबाबत भाष्य असलेला पहिला भारतीय चित्रपट म्हणता येईल. त्यातील सरनाम सिंगचे बांसुरीवर असलेले प्रेम, तिच्याशी झालेली ताटातूट आणि शिवराजबरोबर त्याचे राहणे आणि दोघांमध्ये एक बंध तयार होणे, पुढे शिवराजने लग्न करणे अशा वळणाने ही कथा जाते. या चित्रपटाची प्रत हरवल्याचे आणि भारतात उपलब्ध नसल्याचे मानले जात होते. ती अलीकडेच २०२० मध्ये बर्लिन येथील एका संस्थेतल्या दस्तऐवजीकरण विभागात सापडली आणि तिचे डिजिटलायझेशन केले गेले. हा चित्रपट अलीकडेच कशिश चित्रपट महोत्सवात प्रदर्शित करण्यात आला.

उंबरठा (१९८२) या मराठी चित्रपटामधल्या ‘चांद मातला मातला’ या गाण्याला स्त्री समलिंगी नातेसंबंधांचा सूचक स्पर्श आहे. दीपा मेहतांच्या फायर (१९९६) चित्रपटातल्या समलिंगी संबंधांच्या संदर्भांवरून त्याकाळी बराच गदारोळ माजला होता. याच वर्षी आलेल्या अमोल पालेकर दिग्दर्शित दायरा या चित्रपटात एक क्रॉसड्रेसर नर्तक आणि पुरुषांच्या वेषात वावरणारी एक बलात्कारित स्त्री यांच्या नाजूक नातेसंबंधांची कथा होती. यात रूढार्थाने एलजीबीटी समुदायाविषयी भाष्य नसले तरी प्रस्थापित लिंगभावाच्या चौकटी मोडण्याचा प्रयत्न या चित्रपटाने नक्कीच केला होता. विशेष उल्लेखनीय बाब म्हणजे २०११ साली भारतात प्रदर्शित झालेल्या बोल या पाकिस्तानी चित्रपटाने तृतीयपंथीयांना भोगाव्या लागणाऱ्या दुःखावर नेमके आणि जळजळीत भाष्य केले होते. ही एका सात मुलींच्या बापाची कथा आहे. ज्याला सात मुलींनंतर मुलगा होतो; पण तो ‘इंटरसेक्स’ (स्त्री आणि पुरुष या दोन्हींची बाह्य लक्षणे दाखवणारा) म्हणून जन्माला आलेला असतो. त्याची लाज वाटून तो बाप त्या मुलाची तो झोपला असतानाच त्याचा श्वास कोंडून ज्या थंडपणे हत्या करतो, त्यातून तृतीयपंथीयांचे अस्तित्वच कसे नाकारले जाते, ते भेदकपणे मांडले आहे.

अभिषेक चौबे दिग्दर्शित डेढ़ इश्किया (२०१४) या चित्रपटात लेस्बियन नातेसंबंध हे एक अंतःसूत्र होते. बेगम पारा आणि मुनिया या दोघी शेवटी एकत्र राहू लागतात. या दृश्यातून सूचकपणे आणि अतिशय शांतपणे दोन स्त्रियांचे नाते अधोरेखित करण्यात आले आहे. अपंग व्यक्तींच्या लैंगिकतेचा, लैंगिक भावनांचा एक अत्यंत नाजूक प्रश्न कसलेही उपदेशाचे डोस न पाजता मार्गारिटा विथ अ स्ट्रॉ  (२०१४) या चित्रपटातून मांडण्यात आला. लेस्बियन संबंधातले दुःख, उत्कटता आणि त्या अनुषंगाने येणारे प्रश्न हे सगळे या चित्रपटात अतिशय संयतपणे आणि कलात्मकरीत्या दाखवले. अँग्री इंडियन गॉडेसेस (२०१५) या चित्रपटातही एक लेस्बियन जोडपे दाखवण्यात आले आहे. बायोस्कोप (२०१५) या मराठी चित्रपटातील रवी जाधव दिग्दर्शित ‘मित्रा’ या कथेत तर लेस्बियन नातेसंबंधांचा अतिशय वास्तववादी धांडोळा घेण्यात आला होता.

अलीगढ़ या चित्रपटातील एक दृश्यचित्र

हंसल मेहता दिग्दर्शित अलीगढ़ (२०१६) या चित्रपटामध्ये मनोज वाजपेयीने साकारलेला प्राध्यापक सिराज ही त्याच्या कारकीर्दीतल्या सर्वोत्तम भूमिकांपैकी एक आहे. एका सत्यघटनेवर आधारित असा हा चित्रपट एलजीबीटी विषयांवरच्या भारतीय चित्रपटांमधील एक अतिशय महत्त्वाचा आणि संयत चित्रपट आहे. बॉम्बे टॉकीज (२०१३) या चित्रपटातील करण जोहरच्या ‘अजीब दास्ताँ है ये’ या कथेत समलिंगी संबंधांची गुंफण होती. लोकेश कुमार दिग्दर्शित माय सन इज गे या चित्रपटात एका आईचा आपल्या मुलाचे समलैंगिकत्व स्वीकारण्याचा प्रवास फार प्रभावीपणे मांडण्यात आला आहे. हनिमून ट्रॅव्हल्स प्रा. लि. (२००७), मेमरीज इन मार्च (२०१०), टाईम आऊट, LOEV (२०१५) या चित्रपटांतूनही समलिंगी पुरुषांच्या प्रश्नांचा सखोलपणे विचार करण्यात आला आहे.

शेली चोप्रा-धर दिग्दर्शित एक लड़की को देखा तो ऐसा लगा  (२०१९) हा चित्रपट लेस्बियन संबंधावर भाष्य करणारा मुख्य प्रवाहातील एक महत्त्वाचा चित्रपट मानावा लागेल. वडिलांनी आपल्या लेस्बियन मुलीच्या वेगळ्या लैंगिकतेचा स्वीकार करणे असे मध्यवर्ती कथासूत्र असलेल्या या चित्रपटाची पटकथा गझल धालीवालने लिहिली होती. त्यागराजन कुमारराजा यांनी दिग्दर्शित सुपर डीलक्स (२०१९) या गाजलेल्या तमीळ चित्रपटात अनेक उपकथानके होती. त्यातल्या एका कथेत शिल्पा या ट्रान्सजेंडर स्त्रीच्या आणि तिच्या लहान मुलाच्या – रासुकुट्टीच्या – भावविश्वाची सुंदर गुंफण होती दर्शविलेली आहे. हितेश कैवल्य दिग्दर्शित शुभ मंगल ज्यादा सावधान (२०२०) या चित्रपटात अमन आणि कार्तिकच्या प्रेमाची आणि त्याला अमनच्या कुटुंबाने स्वीकारल्याची कथा होती. हाही एक मुख्य प्रवाहातील चित्रपट होता.

काळ बदलला त्याप्रमाणे पौरुषाच्या, स्त्रीत्वाच्या आणि एकूणच लैंगिकतेच्या संकल्पनाही बदलत गेल्या आणि व्यक्तिरेखांचे अधिकाधिक संयमित आणि वास्तववादी चित्रण करण्याकडे दिग्दर्शक लक्ष देऊ लागले. बॉम्बे टॉकीजसारख्या एखाद्या चित्रपटात झोया अख्तरसारखी धाडसी दिग्दर्शिका मुलींसारखे कपडे घालून नाचण्याची आवड असलेल्या एका लहान मुलाची कथा सांगून चाकोरीबद्ध समजुती मोडू पाहते. शकुन बात्रा दिग्दर्शित कपूर अँड सन्समधल्या समलिंगी व्यक्तिरेखेने बरेच चाकोरीबद्ध समज यशस्वीपणे मोडले. फवाद खानने या चित्रपटात समलिंगी तरुणाची भूमिका साकारली होती. समलिंगी व्यक्तींचे वेगळेपण अधोरेखित करण्यासाठी या व्यक्तिरेखेने बायकी हावभाव आणि भडक मेकअपचे साहाय्य घेतलेले नाही.

एलजीबीटी चित्रपट दिग्दर्शित करणाऱ्या उल्लेखनीय भारतीय दिग्दर्शकांमध्ये कौशिक गांगुली, ओनीर, श्रीधर रंगायन ही नावे आहेत. कौशिक गांगुली यांनी त्यांच्या चित्रपटांतून एलजीबीटी समुदायाच्या प्रश्नांचा धांडोळा घेण्याचा प्रयत्न केला. उष्णतर जन्ये (२००३) या चित्रपटातून लेस्बियन नातेसंबंधांवर आणि अरेक्ती प्रेमेर गोलपो (२०१०), नागरकीर्तन (२०१७) या चित्रपटांतून त्यांनी तृतीयपंथींच्या आयुष्यावर भाष्य केले. माय ब्रदर निखिल (२००५) या चित्रपटातून ओनीर या संवेदनशील दिग्दर्शकाने एका एचआयव्हीग्रस्त समलैंगिक जलतरणपटूची कथा सांगितली होती. त्यानंतर त्यांनी I Am (२०११) चित्रपटातील एका कथेतून पुरुष समलिंगी विश्वाची काळी बाजू अतिशय प्रभावीपणे मांडली. श्रीधर रंगायन यांच्या युअर्स इमोशनली (भारतात प्रदर्शित २००७) आणि 68 पेजेस (२००७) या चित्रपटांतूनही एलजीबीटी समुदायाच्या नेमक्या समस्यांवर भाष्य केले गेले आहे.

समलिंगी चळवळींमुळे आणि बदलणाऱ्या कायद्यांमुळे चित्रपटांमधील एलजीबीटी समुदायाचे चित्रण अलीकडे अधिकाधिक वास्तववादी होत चालले आहे.

समीक्षक : संतोष पाठारे