द फोर हंड्रेड ब्लोज चित्रपटातील एक दृश्य

द फोर हंड्रेड ब्लोज हा १९५९ साली प्रदर्शित झालेला एक फ्रेंच चित्रपट. या चित्रपटाचे मूळ फ्रेंच नाव Les Quatre Cents Coups हे आहे. फ्राँस्वा त्रूफो (Francois Truffaut) यांनी दिग्दर्शित केलेला हा पहिला पूर्ण लांबीचा चित्रपट. फ्रेंच न्यू वेव्ह या नावाने पुढे गाजलेल्या चित्रपट चळवळीच्या सुरुवातीच्या टप्प्यातील एक पथदर्शी चित्रपट म्हणून या चित्रपटास ऐतिहासिक महत्त्व आहे.

आँत्वान द्वानेल या बंडखोर वृत्तीच्या आणि संवेदनशील मनाच्या बारावर्षीय मुलाचे भावविश्व यात दिसते. जाँ-पिएर लेओ (Jean-Pierre Leaud) या अभिनेत्याने ही भूमिका केली आहे. याच अभिनेत्याला घेऊन आँत्वान द्वानेल या व्यक्तिरेखेच्या वयाच्या विविध टप्प्यांतले त्याचे आयुष्य दाखवणारे एकूण पाच चित्रपट त्रूफो यांनी दिग्दर्शित केले. या चित्रपटातील प्रमुख पात्र आंत्वान याच्या व्यक्तिमत्त्वाची आईवडिलांच्या दुर्लक्षित वागण्यामुळे आणि शिक्षकांच्या अतिरेकी वागणुकीमुळे एक बंडखोर आणि विद्रोही वृत्तीतली घडण यात दिग्दर्शकाने चित्रित केली आहे.

चित्रपटाच्या कथानकाचे त्रूफो यांच्या आयुष्याशी काही प्रमाणात साम्य आढळते. त्यामुळे चित्रपट आत्मचरित्रात्मक आहे असे म्हणतात; मात्र, स्वत: त्रूफो यांच्या मते या दाव्यात तथ्य नाही. चित्रपटाच्या अनोख्या शैलीत ‘फ्रेंच न्यू वेव्ह’ची अनेक वैशिष्ट्ये दिसतात. इटलीतील नव-वास्तववादी चळवळीतील चित्रपटांशी या चित्रपटाचे काही प्रमाणात साम्य आढळते. उदा. स्टुडिओमध्ये (कलागृहामध्ये) उभारलेल्या सेटवर (मंचावर) कृत्रिम प्रकाशात केलेल्या चित्रणाची तत्कालीन रूढ पद्धत वापरण्याऐवजी यातील बाह्यचित्रण प्रत्यक्ष स्थळी आणि नैसर्गिक प्रकाशात केले आहे. आयफेल टॉवर, सेक्रेड हार्ट चर्च, मोंमार्त्र यांसारख्या पॅरिसमधील अनेक सुपरिचित आणि पर्यटकप्रिय ठिकाणांचे दर्शन त्यात घडते. इमारतींच्या अंतर्भागात घडणाऱ्या प्रसंगांसाठीदेखील, उदा. घर, शाळा, कार्यालय, सिनेमागृह इत्यादींसाठी, सेट न उभारता प्रत्यक्ष स्थळांवर जाऊन चित्रीकरण केलेले आहे. या चित्रपटातील प्रमुख व्यक्तिरेखा साकारण्यासाठी व्यावसायिक किंवा प्रशिक्षित अभिनेते घेतले नाहीत. या कारणांमुळे चित्रपटनिर्मितीचा खर्च लक्षणीयरीत्या कमी झाला. तरुण उत्साही दिग्दर्शकांना मोठ्या निर्मितीगृहांच्या पाठबळाशिवाय चित्रपटनिर्मिती करणे शक्य होऊ लागले. अनेक नव्या दिग्दर्शकांनी त्यापासून प्रेरणा घेतली.

नाट्यमय घटनांद्वारे पूर्वार्धात एखाद्या समस्येची मांडणी आणि स्पष्ट सुखान्त अथवा शोकान्त हे पारंपरिक कथनशैलीचे स्वरूप त्रूफो यांनी या चित्रपटात नाकारले. नाट्यमय शैली टाळून संवादांत आणि प्रसंगांत अधिक सहजपणा आणण्याचा दिग्दर्शकाचा हेतू दिसतो. व्यक्तिरेखांच्या दैनंदिन आयुष्यातलेच वाटावेत असे प्रसंग चित्रपटात आहेत. यामुळे चित्रपट अधिक वास्तवदर्शी होतो. मात्र, नव-वास्तववादी शैलीहून वेगळे घटकही त्यात दिसतात. जसे, दैनंदिन जीवनातील समस्यांचे किंवा सामाजिक बदलांचे प्रातिनिधिक चित्रण करण्याचा उद्देश त्यात नाही. कुमारवयातून प्रौढत्वाकडे प्रवास करताना नायकाच्या मनोवस्थेतील गोंधळाचे तरल चित्रण त्यात आहे. वरवर पाहता साध्या वाटणाऱ्या तपशीलांतून नायकाची मनोवस्था साकारण्याची त्रूफो यांची शैली वेधक आहे. कुटुंबव्यवस्था किंवा शिक्षणव्यवस्था ह्यांसारख्या बाह्य घटकांचा जगण्यासाठीचे आदर्श म्हणून उपयोग होणार नाही हे नायकाला कळून चुकते. त्यामुळे त्याचा झालेला अपेक्षाभंग आणि त्याच्या मन:स्थितीत घडत गेलेले बदल यांचे मनोज्ञ दर्शन चित्रपटात घडते. परिस्थितीच्या रेट्यामुळे किंवा खलप्रवृत्तीच्या व्यक्तींमुळे हतबल झालेला शोकात्म नायक दाखवण्याची परंपरा दिग्दर्शकाने नाकारली. त्याऐवजी आईवडील, मित्र, शिक्षक अशा, म्हणजे नायकाच्या परिसरातील आणि त्याच्या नित्यपरिचयाच्या व्यक्तींसोबतच्या दैनंदिन प्रसंगांमधून आशय साकारण्याचा प्रयत्न इथे दिसतो. एका विशिष्ट व्यक्तीची गोष्ट सांगताना कुमारवयातील मुलांचे प्रातिनिधिक चित्रण करण्यात दिग्दर्शक यशस्वी झाला आहे. चित्रपटाच्या अखेरची गोठवलेली चित्रचौकट (फ्रीझ फ्रेम) किंवा आँत्वानच्या मानसशास्त्रीय विश्लेषणाच्या प्रसंगात वापरलेले ‘जंप कट’चे तंत्र एक नवी सिनेमाची भाषा घडवणारे प्रयोग म्हणून जागतिक चित्रपटाच्या इतिहासात महत्त्वाचे मानले जातात.

नैतिकतेच्या आणि सौंदर्याच्या पारंपरिक संकल्पना त्रूफो यांनी नाकारल्या आहेत, असे मत समीक्षक-दिग्दर्शक जाँ-ल्यूक‌ गोदार‌ यांनी मांडले. नवा फ्रेंच सिनेमा कसा असावा याविषयी स्वत: त्रूफो यांनी आपल्या समीक्षेतून यापूर्वी विचार मांडले होते. त्यानुसार दिग्दर्शकाच्या व्यक्तिगत जीवनदृष्टीचे दर्शन नव्या सिनेमामध्ये घडणे त्यांना अपेक्षित होते. या विचारांचे प्रतिबिंब चित्रपटात पडलेले दिसते.

या चित्रपटास प्रतिष्ठेच्या कान आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात सर्वोत्कृष्ट दिग्दर्शनाचा पुरस्कार मिळाला (१९५९). चित्रपटाला फ्रान्समध्ये चांगले व्यावसायिक यश मिळाले (सुमारे साडेचार लाख प्रेक्षक). त्यामुळे पारंपरिक चाकोरी मोडून वेगळे विषय मांडणाऱ्या आणि वेगळी शैली अंगिकारणाऱ्या प्रायोगिक चित्रपटांना प्रोत्साहन मिळू लागले. अशा चित्रपटांना आर्थिक पाठबळ पुरवण्याचा धोका पत्करण्यास तत्कालीन फ्रेंच चित्रपटउद्योगातील व्यावसायिक तयार झाले. त्याचा फायदा पुढे अनेक फ्रेंच दिग्दर्शकांना झाला. नव्या वाटा चोखाळणाऱ्या विविध शैलींतील चित्रपटांचा ‘फ्रेंच न्यू वेव्ह’ हा नवा प्रवाह सुरू होण्यास आणि रुळण्यास हातभार लावणाऱ्या काही महत्त्वाच्या चित्रपटांमध्ये द फोर हंड्रेड ब्लोजचा समावेश होतो.

संदर्भ :

  • कझिन्स, मार्क, द स्टोरी ऑफ फिल्म, पॅव्हिलिऑन प्रकाशन, २००४.
  • त्रूफो, फ्राँस्वा, ‘अ सर्टन टेंडन्सी ऑफ द फ्रेंच सिनेमा’ – काइये द्यु सिनेमा, जानेवारी, १९५४.
  • गोदार‌,जाँ-ल्यूक‌, ‘फोटो ऑफ द मंथ’ – काइये द्यु सिनेमा, फेब्रुवारी १९५९.
  • होवेदा, फेरेदुं , ‘द फर्स्ट पर्सन प्लुरल’ – काइये द्यु सिनेमा, जुलै १९५९.

समीक्षक : संतोष पाठारे