प्रस्तावना : जैविक युद्धामध्ये जिवंत जीवजंतू आणि त्यांच्यापासून उत्पादित पदार्थांचा वापर केला जातो. परंपरागत जैविक युद्धात सूक्ष्म जीवाणू, सूक्ष्मातिसूक्ष्म रोगजंतू, परजीवी सूक्ष्मजंतू, बुरशी आदी जीवासंघ आणि विषाणू ह्यांचा मानव, पशू व वनस्पती यांना मारण्यासाठी अथवा हानी पोहोचविण्यासाठी वापर केला जातो. विषे/विषाणू हे जैविक तसेच रासायनिक असल्याने त्यांवर १९७२च्या जैविक युद्धाच्या आणि १९९३च्या रासायनिक युद्धाच्या करारांतर्गत बंदी घालण्यात आली.

जैविक अस्त्रे रासायनिक आणि आण्विक अस्त्रांच्यापेक्षा मूलतः खाली दिलेल्या कारणास्तव वेगळी असतात.

 • त्यांचे उत्पादन करणे सुलभ असते.
 • त्यांची किंमत कमी असते.
 • अतिशय हलक्या वाऱ्यामध्येसुद्धा अगदी कमी प्रमाणात सोडलेले सूक्ष्म जीवाणू अथवा विष हे दूर अंतरापर्यंत पसरून अफाट क्षेत्र दूषित करू शकतात.
 • ही अस्त्रे अंतर्भूत करण्याच्या अनेक पद्धती आहेत आणि त्यांचा शोध लावणेही अवघड असते.
 • ती थोड्या विलंबाने आपला परिणाम दाखवतात. जो काही तासांपासून काही दिवसांपर्यंत असतो.
 • जैविक संप्रेरक दोन प्रकारचे असतात. पारेषणक्षम सहायक; जे मानव-मानव (देवी किंवा इबोला रोगांचे) किंवा जनावरांमध्ये (खूर-मुखाचा रोग) पसरणारे असतात. दुसऱ्या प्रकारचे संप्रेरक जे उघड्यावर अथवा मोकळ्या वातावरणातील व्यक्तीवर प्रतिकूल परिणाम घडवून आणू शकतात. परंतु हे परिणाम एका बाधित व्यक्तीतून दुसऱ्या व्यक्तीवर पोहोचत नाहीत (अँथ्रॅक्स, बोटुलिअम विषे).
 • सूक्ष्म जीवाणू, सूक्ष्मातिसूक्ष्म रोगजंतू, परजीवी सूक्ष्मजंतू, बुरशी आदी जीवासंघ आणि त्यांपासून तयार झालेली विषे, हे जैविक युद्धाचे सहायक संप्रेरक आहेत. ते माणसात, जनावरांत आणि वनस्पतींमध्ये सोडल्यावर रोगराई पसरवू शकतात. हे सहायक संप्रेरक मोठ्या प्रमाणावर जीवित हानी, मृत्यू आणि शारीरिक असमर्थता अतिशय थोड्या वेळात घडवून आणू शकतात आणि मानवी आरोग्यावर प्रतिकूल परिणाम घडवितात.
 • जैविक युद्धाचे संप्रेरक हे प्रकट आणि अप्रकट पद्धतीने वापरता येतात आणि ते परंपरागत शास्त्रांपेक्षा त्यांच्या अद्वितीय गुणधर्मांमुळे वेगळे असतात.

सामान्यतः आढळणारे जैविक संप्रेरक : खाली दिलेल्या तक्त्यामध्ये २०व्या शतकात विकसित केलेल्या जैविक सहायक संप्रेरक व त्यापासून होणाऱ्या रोगांबद्दल माहिती दिली आहे.

रोग

   लक्षणे    

प्रत्यक्ष रोगांस आरंभ होण्याचा काळ

                                                                                                             जीवाणू

सांसर्गिक काळपुळी (Anthrax)

 

 • समकालीन स्वरूप : फोड किंवा चट्टे.
 • फुफ्फुसातील स्वरूप : अविशिष्ट छातीतील सर्दीची लक्षणे.
 • आंतड्यातील स्वरूप :  पोटातील तीव्र वेदना, आंतड्यात प्रतिरोध.
 • २ ते ७ दिवस (बहुतेक प्रकरणात ४८ तासांच्या आत)
 • मात्रा परिमाण : ८,००० ते ५०,००० स्पोअर्स
ट्युलेरेमिया (Tularemia)
 • अचानक सर्दी भरून येणे, ताप, डोकेदुखी, शरीरातील द्रव पदार्थ कमी होणे, विषमज्वरासारखी लक्षणे त्वचेवर खोलवर व्रण पडणे.
 • श्वास घेण्यास त्रास होणे किंवा धाप लागणे, तोंडात फोड येणे, डोळे जळजळणे इत्यादी.
 • २ ते १० दिवस
 • संसर्ग मात्रा परिमाण : १० ते ५० जीवाणू
प्लेग (काळा मृत्यू)
 • उच्च ताप, डोकेदुखी, सामान्य वेदना, लसीका सांध्यांची तीव्र वेदना.
 • गाठीचा प्लेग : २ ते ६ दिवस.
 • फुफ्फुसांचा प्लेग : १ ते ६ दिवस.
 • संसर्ग मात्रा परिमाण : १०० ते ५०० जीवाणू
पटकी (कॉलरा)
 • उच्च संसर्गजन्य जठारांतर्गत रोग.
 • काही तास ते ५ दिवस

सूक्ष्मजंतूंचा प्रादुर्भाव (Rickettsia)

घटसर्प
 • सौम्य दुखरा घसा, हलका ताप, श्वसनलिका बंद होण्याची शक्यता.
 • २ ते ५ दिवस किंवा जास्त
क्यू ज्वर
 • डोकेदुखी, सर्दी, अंगदुखी, एकाएकी ताप चढणे.
 • २ ते ३ आठवडे
 • संसर्ग मात्रा परिमाण : १ ते १० जीवित घटक
ठिपक्यांचा ज्वर (Spotted Fever)
 • ताप, थंडी, विशेषत: शरीरावरील लाल व्रण, मज्जासंस्थेच्या विकृती.
 • ३ ते १५ दिवस
टायफस (Typhus Fever)
 • डोकेदुखी, अंगदुखी, उच्च ताप.
 • ६ ते १५ दिवस

विषाणू

मेंदूचा दाह
 • ताप, झटके किंवा आचके.
 • २ ते १५ दिवस
डेंग्यू
 • निरनिराळ्या दर्जाची तीव्रता, रक्तस्त्राविक ताप.
 • ३ ते १२ दिवस
रिफ्ट व्हॅली ज्वर (RVF)
 • मळमळ, उलट्या, ताप, स्नायूदुखी, डोकेदुखी, अंधत्व, यकृतासंबंधीचे आजार, मेंदूचे आजार.
 • ३ ते १२ दिवस
शीत ज्वर
 • श्वासनलिकेचा दाह, ताप, सर्दी, घाम येणे (मलेरियासारखी लक्षणे).
 • प्रकार ‘अ’ : १ ते १२ दिवस
 • प्रकार ‘ब’  : १२ ते १८ तास साथीचा रोग, कधीकधी देशभर पसरलेला

विषे

बोटुलिनम विषे

(Botulinum toxin)

 • अत्यंत प्राणघातक विषबाधा, उलट्या, बद्धकोष्ठ, तहान ह्या लक्षणातून दिसणारा.
 • १२ ते ७२ तास

 

जैविक संप्रेरक पसरविण्याची  साधने : जैविक संप्रेरक द्राव्य फवारणीच्या स्वरूपात पसरवता येतात. संप्रेरके शत्रूच्या बचाव फळीच्या मागील बाजूस हवाई फवारणीने किंवा स्वसहायकांद्वारे पसरवता येतात. तयार खाद्यपदार्थ हेतुपुरस्सर रीत्या विषे किंवा रोगकारक जंतूंनी दूषित करता येतात. मानवी वाहक शारीरिक द्रव, खोकला यांमधून संसर्ग पसरवू शकतात. संप्रेरके टपाली पत्रव्यवहारातून पसरवता येतात, परंतु त्यांची व्याप्ती स्थानिक प्रमाणातच होऊ शकते.

वितरणाची साधने : जैविक संप्रेरक भरलेले डबे विमानातून किंवा तोफांमधून डागले जाऊ शकतात (रासायनिक अस्त्रांप्रमाणे). बहुधा ही कारवाई अप्रकट रीत्या प्रतिपक्षाच्या अखत्यारीतील भूभागांवर तेथे काम करणाऱ्या सहायकांद्वारे केली जाते. जैविक दहशतवाद ही नव्याने उत्पन्न झालेला धोका असून मानवी सहायक जे जैविक संप्रेरके घेऊन जातात, त्यांनाही संसर्ग पोहोचवू शकतात.

जैविक युद्धाच्या संप्रेरकांचा शोध व प्रतिबंध : जैविक संप्रेरकांचा वेगाने शोध घेणे व तपास करणे, हे अतिशय अवघड आहे. एकदा सापडल्यावर त्यावरील उपचार ज्ञात असतात. परंतु प्रतिबंधात्मक उपाय हे संथ गतीने परिणाम करतात. त्या वेळेपर्यंत लढाऊ क्षमतेत लक्षणीय घट झालेली असते. जैविक धोका असणाऱ्या संप्रेरकांचा शोध घेणारी आदर्शप्रणाली फक्त विरळ घनतेच्या संप्रेरकांचाच शोध नव्हे, तर त्याच्या अनेक बदलत्या रूपांचे शोध घेण्याची क्षमता असणारी असली पाहिजे. ह्याशिवाय ही प्रणाली सहज वाहतूक करण्याजोगी असल्याशिवाय वापरकर्त्याला सोयीची आणि एकाधिक धमक्यांचा शोध घेणारी असावी. उपलब्ध असणाऱ्या शोध प्रणालींपैकी कोणतीच सर्व परिमाणे पूर्ण करणारी नाही. त्यामुळे प्रणालीची निवड ही प्रत्येक प्रसंगानुरूप करावी लागते. एका आदर्श शोधप्रणालीमध्ये विविध संप्रेरके शोधून काढण्याची क्षमता असली पाहिजे; कारण संप्रेरकांच्या नमुन्यामध्ये विविध जीवाणू, विषाणू, आणि विषे असण्याची अपेक्षा असू शकते. जनुकांवर (डीएनए, आरएनए) आधारित शोध प्रणालीवर जास्त संशोधन झाले आहे आणि जैविक युद्ध आणि जैविक संप्रेरकांच्या धोक्याचा शॊध घेणाऱ्या प्रणाली विकसित करण्यात आल्या आहेत. एलिझावर आधारित रोगप्रतिकारक प्रतिजन व प्रतिपिंडे विकसित केली जात आहेत व त्यांचे मूल्यांकन केले गेले आहे. ही सध्या अँथ्रॅक्स, प्लेग, बोटुलिझम, ब्रूसोलुसिस, ग्लॅन्डर्स आणि मेलिऑयडॉसिस ह्यांचा शोध घेण्यासाठी वापरली जात आहेत. जैव-रासायनिक, रोगप्रतिकारक आणि मेलिऑयडॉसिस ह्यांचा शोध घेण्यासाठी वापरली जात आहेत. जैव-रासायनिक, रोगप्रतिकारक आणि न्यूकलेइक ऍसिडवर आधारित संवेदक विकसित केले आहेत.

जैविक शस्त्रांच्या प्रभावाविरुद्ध संभाव्य संरक्षण उपाय : जैविक शस्त्रांविरुद्ध संरक्षण हे अतिशय क्लिष्ट आहे; कारण शस्त्रे कोठे, कशी वापरली आहेत किंवा नाहीत त्यांचे आकलन लगेच होऊ शकत नाही. लसीकरणाशिवाय स्वच्छता, वैयक्तिक आरोग्य आणि नियंत्रित अन्न व पाणी यांचे सेवन हे अत्यावश्यक उपाय आहेत. वैद्यकीय प्रतिउपायही उपलब्ध आहेत; परंतु त्यांचा परिणामकारक वापर तरीही अवघड आहे. कदाचित संरक्षणासाठी लसी वापरता येतील; परंतु जैविक संप्रेरकांच्या विविधतेमुळे प्रतिबंधात्मक उपाय म्हणून लसीकरणाचा कार्यक्रम राबविणे अवघड आहे.

जैविक अस्त्रे नियंत्रित करणारे आंतरराष्ट्रीय करार आणि संधी :

 • जिनीव्हा करार १९२५ : हा करार रासायनिक आणि जैविक शस्त्रांसंबंधित पहिला आंतरराष्ट्रीय करार आहे. तो जीवाणूजन्य युद्धाच्या पद्धतीवर प्रतिबंध करतो; परंतु ही शस्त्रे निर्माण करणे बेकायदेशीर ठरवित नाही.
 • बीडब्ल्यूसी १९७२ : १९७२ ची जैविक शस्त्रास्त्र संधी ही सर्व प्रकारच्या अस्त्रांना बेकायदेशीर ठरविणारी आणि देशांना त्यांचे निर्माण, विकसन आणि साठा करण्यावर प्रतिबंध व मनाई करणारी आहे. जैविक शस्त्रास्त्र संधी १० एप्रिल १९७२ रोजी सह्या करण्यासाठी खुली झाली आणि २६ मार्च १९७५ पासून प्रभावी करण्यात आली. १७८ देशांनी ह्या संधीवर सह्या केल्या आहेत. त्या संधीनुसार प्रत्येक सदस्याने सूक्ष्मजैविक आणि जैविक संप्रेरके विकसन, निर्माण आणि साठा न करण्याची हमी दिली आहे.

संदर्भ :

 • Joachim-Topher, Hans, Karcherbook on Nuclear Biological Chemical Defence, 2000.
 • https://www.un.org/disarmament/wmd/bio/
 • https://www.nae.edu/File.aspxid=11309&v=29ad166a
 • https://www.emedicinehealth.com/biological_warfare/article_em.htm#how_are_biological_agents_delivered_and_detected
 • https://www.ncbi.nlm.nih.gov/pmc/articles/PMC1200679/

                                                                                                                                                                                                                     

 समीक्षक : शशिकांत पित्रे

भाषांतरकार : अजय मुधोळकर