भूभागाचे वैशिष्ट्य : डावपेच (Tactics) आणि पुरवठाव्यवस्था (Logistics) या दोन्हींवर भूमितलाच्या स्वरूपाचा गहन परिणाम होतो. त्यामुळे वेगवेगळ्या प्रदेशांतील युद्धपद्धती तेथील भूमितलाच्या स्वरूपानुसार (टरेन) बदलते. मरुभूमीत सर्वत्र वाळू आणि जागोजागी वाळूचे डोंगर असतात. त्यातून वाहनांची ये-जा करणे अवघड होते आणि वाहतूक केवळ उपलब्ध असलेल्या मोजक्या रस्त्यांमार्गेच मर्यादित राहते. फक्त रणगाडे आणि तत्सम वाहनेच आडमार्गाने (Crosscountry) मार्गक्रमण करू शकतात. काही तुरळक झुडपे सोडल्यास तेथे झाडांचा पूर्ण अभाव असतो. पाण्याचे स्रोत अभावानेच उपलब्ध असल्यामुळे पाण्याची कमालीची ददात (उणीव) भासते. दिवसा ४५ ते ४९ अंशाचे उच्च तपमान, तर रात्री कडाक्याची थंडी असते. वारंवार तुफान वादळे होतात आणि त्या वेळी वाळूने आसमंत भरून जातो. या साऱ्याचा सैनिकांच्या आरोग्यावर आणि शस्त्रास्त्रे व वाहनांच्या सक्षमतेवर विपरीत परिणाम होतो. यामुळे वाळवंटी प्रदेशातील युद्ध आव्हानात्मक ठरते.

वाळवंटी प्रदेशातील युद्धभूमी : एक प्रतिकात्मक चित्र.

सैनिकी  कारवायांसमोरील  आव्हाने : वाहनांच्या चलनवलनासाठी हंगामी रस्त्यांची गरज भासते आणि ते बनवण्यासाठी अभियांत्रिकी गटाच्या (Engineer Core) तुकड्या आणि साहित्य मोठ्या प्रमाणात उपलब्ध करून द्यावे लागते. सैनिकी कारवाया प्रामुख्याने आडमार्गाने प्रवास करू शकणारे रणगाडे आणि तत्सम वाहनांवर आधारित ठेवाव्या लागतात. वाळूच्या उंच डोंगरांना पार करून जाणे अवघड असल्यामुळे हालचाल मुख्यतः डोंगरांमधील जागेमध्येच मर्यादित राहते. झाडाझुडपांचा आडोसा उपलब्ध नसल्यामुळे सैनिक आणि वाहनांना शत्रूच्या नजरेपासून छपून राहणे (Camouflage and Consealment) कठीण होते. त्यामुळे सैनिकी कारवाया विशेषेकरून रात्रीच्या अंधारातच कराव्या लागतात. वाळवंटातील कारवायांसाठी सैनिकांची संख्या इतर भागांतील कारवायांच्या तुलनेने अधिक प्रमाणात असावी लागते. आक्रमक शत्रूच्या चलनवलनाला (Movement) कोणतेही नैसर्गिक अडथळे (Natural Obstacle) नसल्यामुळे भूसुरुंग आणि काटेरी तारेचे अडथळे मोठ्या प्रमाणात उभे करण्याची गरज पडते व त्यासाठी अमाप संसाधने लागतात. वाळवंटात दिशादर्शन (Navigation) अत्यंत अवघड होऊन जाते व त्यामुळे बऱ्याच प्रमाणात ‘जीपीएस’वर अवलंबून राहावे लागते. शत्रूच्या विमानांपासून संरक्षण करणे कठीण असते. जरी भुसभुशीत वाळूमध्ये खणणे सोपे असले, तरी वाळूला बळकटी देण्यासाठी वापरावयास लागणाऱ्या विविध साधनांमुळे मोर्चेबांधणीचे काम क्लिष्ट आणि संथ होऊन जाते. मऊ वाळूवर आदळणाऱ्या तोफगोळ्यांच्या अंतिम परिणामात क्षती होत असल्यामुळे त्यांचा वापर अधिक मात्रेत करावा लागतो. या सर्वांमुळे वाळवंटातील युद्ध आणि युद्धपुरवठा (Operational Logistics) हे कष्टप्रद आणि क्लिष्ट होते. त्याला आयोजकाचे एक दु:स्वप्न म्हणावे लागेल.

भारताच्या सीमेवरील वाळवंटे : भारत-पाकिस्तान पश्चिम सीमेवरील थर वाळवंटातील वाळूचे डोंगर ईशान्य ते नैऋत्य दिशेत वसलेले आहेत आणि त्यांचे टोक ईशान्येकडे असते. थर वाळवंटाचे दोन विभाग करता येतील. पहिला, अधिक विकसित, तुलनेने जास्त वनश्रीमय आणि वाहनांसाठी अधिक सुकर असा जैसलमेरच्या उत्तरेचा भाग. त्याला ‘अर्ध-मरुमय’ (Semi-Desert) असे संबोधले जाते. दुसरा, जैसलमेरच्या दक्षिणेचा वाहतुकीसाठी कठीण, तुरळक रस्त्यांचा आणि वैराण असा, पार कच्छचे रण आरंभ होण्यापूर्वीचा प्रदेश. वाळवंटातील डोंगरांची उंची आणि आकार दक्षिणेकडे वाढत जातात. अर्थातच दक्षिणेकडील विभागात सैनिकी कारवाया उत्तरेकडील विभागापेक्षा अधिक कठीण असतात.

थर वाळवंटाचा प्रदेश पाकिस्तानातही पसरलेला आहे. त्यातील बहावलपूर ते फोर्ट अब्बासपर्यंतचा प्रदेश अर्ध-मरुमय आहे आणि त्याच्या दक्षिणेला बादिनपर्यंत पूर्ण वाळवंटी प्रदेश आहे.

संरक्षणात्मक कारवाया (Defensive Operations) : मरुमय प्रदेशात उभारलेली संरक्षणफळी ही प्रामुख्याने शहरे किंवा गावांसारखी जनकेंद्रे आणि वाहतूकमार्गांवर आधारित असते. शत्रूला आडमार्गाने हालचाल करण्यास भाग पाडणे हे त्यामागचे उद्दिष्ट असते. महत्त्वाच्या शहरांभोवती उभ्या केलेल्या मोर्चेबंदीला ‘नोडल पॉइंट’ म्हणतात. इतर गावांभोवती उभारलेल्या मोर्चेबंदीला ‘स्ट्राँग पॉइंट’ अशी संज्ञा आहे. असे विविध नोडल आणि स्ट्राँग पॉइंट्स मिळून वाळवंटी प्रदेशातील मोर्चेबंदी तयार होते. त्यांच्यामधील मोकळी जागा सांधण्यासाठी भूसुरुंगक्षेत्रे (Mine Fields) पेरली जातात. त्यांच्यावर संरक्षणासाठी ‘फिरती पथके’ (Mobile Troops) तैनात केली जातात. शत्रूच्या हालचालींवर पाळत ठेवून त्याची त्वरित माहिती देण्यासाठी सक्षम अन्वेषणप्रणालीची (Surveillance) नितांत आवश्यकता असते. पुरेशी माहिती मिळाल्यावर शत्रूला प्रबंध घालण्यासाठी सुयोग्य ठिकाणी ठेवलेले विविध पातळीवरील राखीव दस्ते (Operational and Strategic Reserve) वापरले जातात.

वाळवंटातील मोर्चेबांधणीसाठी डोझर्स, पाणीपुरवठा अवजारे, भूसुरुंग, रस्तेबांधणीसाठी यंत्रे वगैरे अभियंतासाधने (Engineer Equipments) मोठ्या प्रमाणात पुरवावी लागतात. त्याचबरोबर अभियांत्रिकी गटाच्या (Engineer Units) तुकड्यांचे प्रमाण इतर प्रदेशांतील युद्धकारवायांच्या तुलनेने अधिक लागते. त्याचबरोबर वाळवंटी युद्धासाठी तोफखाना दलाच्या तुकड्या आणि तोफगोळे अधिक प्रमाणात लागतात. वायुसेनेची लढाऊ विमाने आणि अन्वेषणासाठी हेलिकॉप्टर वाळवंटी प्रदेशातील संरक्षणफळीसाठी महत्त्वाचे साहाय्य देतात. त्याचबरोबर कवचित दलाचे रणगाडे आणि कवचित पायदळ (Armour and Mechanized Infantry) यांच्यावर वाळवंटातील फिरत्या कारवायांकरवी (Mobile Operations) शत्रूचा हल्ला परतवण्याची जबाबदारी असते.

आक्रमणात्मक कारवाया (Offensive Operations) : आक्रमणात्मक कारवाईची दोन स्वरूपे असतात; पहिले, चढाईसाठी आगेकूच (Advance to Contact) आणि दुसरे, हल्ला (Attack). वाळवंटी प्रदेशातील आक्रमक आगेकूच ही प्रामुख्याने कवचित दलांच्या दस्त्यांकरवी (Mechanized Forces) केली जाते. त्यांच्या साहाय्यासाठी, विशेषेकरून हंगामी रस्ते बनवणे (Track Laying), शत्रूची भूसुरुंगक्षेत्रे (Mine Fields) निकामी करणे आणि पिण्यासाठी पाण्याच्या जलनलिका जोडणे या कामांसाठी मोठ्या प्रमाणात अभियांत्रिकी गटाच्या तुकड्यांची आवश्यकता असते.

योग्य वेळी, संधिप्राप्त जागी, योग्य प्रमाणात कवचित दलांच्या तुकड्या एकत्रित करून शत्रूवर बलाधिक्य निर्माण करणे आणि नैतिक दबाव आणणे हा फिरत्या कारवायांचा आत्मा आहे. त्या दरम्यान संपर्कक्षमता (Communications), कारवाईची गती आणि शत्रूच्या भूसुरुंगक्षेत्रांना वेगाने भेदण्याची कला या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. शत्रूने प्रतिसादासाठी आपले दस्ते एकत्रित करण्याच्या आधी हे सर्व झाले पाहिजे. यशस्वी एल्गारासाठी प्रहारी वृत्ती (Offensive Spirit) आणि आघाताची तीव्रता राखण्याची क्षमता (Maintenance of Momentum) आवश्यक आहेत. शत्रूची संरक्षणफळी भेदून त्यात चंचुप्रवेश साधणे (Establishment of Bridgehead), त्यात अधिकाधिक तुकड्या आणणे, मग त्यातून बाहेर पडून शत्रूच्या त्यामागच्या नोडल आणि स्ट्राँग पॉइंट्सवर एकामागून एक हल्ले चढवणे (Break Out) आणि हे सर्व इतक्या वेगाने साधणे की, शत्रूला प्रतिहल्ल्यासाठी वेळच मिळू नये; हा वाळवंटातील यशस्वी आक्रमणाचा अनुक्रम असतो.

वाळवंटातील युद्धपुरवठातंत्र (Logistics) : युद्धपुरवठातंत्र हा वाळवंटातील युद्धाचा सर्वांत महत्त्वाचा घटक आहे. सैन्याची आक्रमक क्षमता किती का असेना, जोपर्यंत त्याला सक्षम युद्धपुरवठा व्यवस्थेचे पाठबळ मिळत नाही, तोपर्यंत त्याच्या आक्रमणात्मक किंवा संरक्षणात्मक कारवायांना यश प्राप्त होऊ शकत नाही. वाळवंटात दीर्घ काळासाठी तग धरून राहणे हे अत्यंत कष्टसाध्य काम आहे. त्यासाठी अन्नधान्य, पिण्याचे पाणी, दारुगोळा आणि वाहतुकीची साधने यांचा मोठ्या प्रमाणात साठा युद्धाला तोंड लागण्याआधी करणे अत्यावश्यक ठरते. पाण्याचे दुर्भिक्ष हा एक अत्यंत महत्त्वाचा व्यवस्थापकीय घटक बनतो.

विस्मय आणि शाठ्य (Surprise and Deception) : विस्मय आणि शाठ्य हे युद्धतत्त्वांपैकी (Principles of War) एक तत्त्व आहे. शत्रूला आपल्या योजना, संख्या, शस्त्रास्त्रे आणि हालचालींची कोणतीही माहिती मिळू नये; उलट, त्याला अचानक धक्का देऊन आणि त्याची दिशाभूल व फसवणूक करून त्याचा मानसिक समतोल बिघडवण्याचा त्यामागील हेतू असतो. वाळवंटातील विशाल परंतु उघडाबोडका परिसर हा या तत्त्वाला पूर्णतया मारक असतो. त्यामुळे प्रतिकूल परिस्थितीतही चतुर आणि धूर्त क्लृप्त्यांमार्गे विस्मय आणि शाठ्याची प्राप्ती करून प्रतिस्पर्ध्यावर जी बाजू मात करू शकेल, तीच वरिष्ठ ठरू शकते.

वाळवंटातील काही संस्मरणीय लढाया : दुसऱ्या महायुद्धात उत्तर आफ्रिकेतील वाळवंटात अनेक अटीतटीच्या लढाया घडल्या. ‘डेझर्ट फॉक्स’ नावाने ओळखले जाणारे जर्मन सेनाप्रमुख फिल्डमार्शल रोमेल आणि युती सेनेचे प्रमुख फिल्डमार्शल माँटगोमेरी यांच्यात टोकाची टक्कर झाली. १९४२ मधील ऑपरेशन गझाला आणि एल-अमीन लढाया प्रसिद्ध आहेत. १९७३ मधील योम किप्पुर युद्धादरम्यान सिनाई वाळवंटात रणगाड्यांच्यात घनघोर संघर्ष घडले. १९७१मध्ये लाँगेवाला क्षेत्रात चालून आलेल्या पाकिस्तानी आर्मर्ड ब्रिगेडचा मेजर चांदपुरींच्या इन्फन्ट्री कंपनी आणि भारतीय वायुसेनेच्या विमानांनी धुव्वा उडवला होता. वाळवंट हे सदैव एक संघर्षमय रणांगण म्हणून गणले जात राहील.

संदर्भ :

  • Mayor, S. L. Ed. War of the 20th Century, London, 1975.
  • Rabinovich, Abraham, The Yom Kippur War, New York, 2005.
  • Singh, Sukhwant, Indias War Since Independence, New Delhi, 2009.

समीक्षक – शशिकांत पित्रे

प्रतिक्रिया व्यक्त करा