पार्श्वभूमी : वेगवेगळ्या भूभागांवर अवलंबिली जाणारी युद्धपद्धती त्या भूभागाच्या ठेवणीनुसार बदलते. उदाहरणार्थ, डोंगराळ प्रदेश, बर्फाळ प्रदेश, वाळवंटी प्रदेश किंवा सखल प्रदेश यांच्यावरील कारवायांच्या दरम्यानचे डावपेच त्या त्या प्रदेशाच्या सामरिक आवश्यकतांनुसार बदलत जातात. जंगलमय प्रदेशातील लष्करी कारवाया घनदाट झाडीच्या परिसराची वैशिष्ट्ये लक्षात घेऊनच पार पाडाव्या लागतात.

दुसऱ्या महायुद्धातील आशिया खंडामधील महत्त्वाचे प्रदीर्घ पर्व ब्रिटिश सैन्य आणि जपानी सैन्यादरम्यान ब्रह्मदेशाच्या घनदाट अरण्यांमध्ये घडले. जंगलमय प्रदेशात शत्रुसैन्याशी लढत देण्याचे प्रावीण्य प्राप्त करणे हे सर्वच देशांच्या सैन्यांसाठी आवश्यक असते. भारतीय सीमांवर नागालँड, मिझोराम, अरुणाचल प्रदेश, सिक्कीम आणि अंदमान-निकोबार बेटे यांचा प्रदेश अरण्याने व्यापलेला आहे. त्याचबरोबर छत्तीसगढ, मध्य प्रदेश, महाराष्ट्र आणि आंध्र प्रदेश यांच्या अविकसित भागांतील वनमय टापूत माओवादी हिंसक चळवळीला तोंड देण्यासाठी अर्धसैनिक दलांना सुरक्षाकारवाई हाती घ्यावी लागते. या सर्व प्रदेशांत कोणतीही आक्रमणप्रधान किंवा संरक्षणप्रधान कारवाई पार पाडण्यासाठी भारतीय सुरक्षा दलांना या युद्धप्रकारात कौशल्य प्राप्त करणे अनिवार्य आहे.

एक प्रातिनिधिक चित्र

जंगलमय प्रदेशाची वैशिष्ट्ये : सखल प्रदेशात दिवसा आणि रात्रीदरम्यान हालचालींमध्ये कमालीचे अंतर असते. परंतु जंगलमय प्रदेशातील घनदाट झाडीमुळे कोणतीही सैनिकी कारवाई, दिवस असो वा रात्र असो, तेवढीच कष्टप्रद होते. जंगलमय प्रदेशात झाडीमुळे दूरपर्यंत नजर जात नाही आणि शत्रुसैन्य लवकर नजरेच्या टप्प्यात येत नाही. तसेच, शस्त्रांचा मारा करण्यात झाडीमुळे व्यत्यय येतो. हवाई ताकद, तोफखाना आणि रणगाडे यांच्या वापरावर मर्यादा येतात.  जंगलात पुरवठाव्यवस्थापन दुष्कर असते. जंगलात शत्रू केव्हाही आणि कोणत्याही दिशेने नकळत हल्ला करू शकत असल्याने तिथे तैनात असलेल्या लष्कराला सदैव जागरूक राहून तत्पर प्रतिसाद देण्याची गरज पडते. पायी आणि वाहनाकरवी ही दोन्हीही वाहतूक दुष्कर असते. तिचे नियोजन अंतरापेक्षा लागणाऱ्या वेळेच्या आधारावरच करावे लागते. जंगलातील सदैव भिजट आणि दमट वातावरणामुळे सैनिकांच्या हातापायांना ‘फंगस’ची बाधा होते आणि इतर अनेक वनजन्य रोगांचा प्रादुर्भाव होण्याबरोबरच त्यांची मन:स्थिती व मनोधैर्य खालावण्याची शक्यता असते. दमट हवेचा हत्यारे आणि इतर साहित्यांवरही विपरीत परिणाम होतो. रेडिओ आणि इतर संपर्कसाधनांच्या कार्यक्षमतेत क्षती होण्यामुळे संदेशवहन आणि दूरसंचारव्यवस्थेत बाधा येते. वैयक्तिक आरोग्याची प्रमाणाबाहेर काळजी घेणे अनिवार्य होते.

संरक्षणप्रधान कारवाया (Defensive Operations) : सखल प्रदेशात किंवा डोंगराळ प्रदेशात शत्रू कोणत्या दिशेने हल्ला चढवेल, याचा साधारण अंदाज बांधणे शक्य असते. त्यामुळे प्रामुख्याने त्याच बाजूला सामोरे जाणारे मोर्चे बांधले जातात. परंतु जंगलात  शत्रू संरक्षणफळीवर कोणत्याही दिशेने हल्ला करू शकत असल्याने मोर्चेबंदी सर्व दिशांनी संरक्षणपूर्ण (All Round Defence) असणे आवश्यक होते. त्यामुळे अधिक मनुष्यबळाची आवश्यकता पडते. आजूबाजूचा परिसर सदैव नजरेखाली ठेवण्याच्या आवश्यकतेमुळे गस्तकारवाई (Patrolling) आणि सापळे लावण्याचे (Ambush) डावपेच अत्यंत महत्त्व धारण करतात. जंगलात तोफगोळ्यांची क्षमता सखल प्रदेशाच्या तुलनेने कमी होते. तसाच विपरीत परिणाम इतर शस्त्रांच्या क्षमतेवरही होतो. हल्ला चढवून एकादे ठाणे काबीज करण्यात शत्रूला यश मिळाले आणि त्याच्यावर तत्परतेने आणि वेळ न दवडता हाताशी असलेल्या तुकड्यांसह प्रतिहल्ला (Caunter Attack) चढवला गेला, तर त्याला यश मिळून शत्रूला परतवणे शक्य असते. सखल प्रदेशाच्या तुलनेत जंगलातील संरक्षणफळीतून फारसे नुकसान न होऊ देता नियोजित माघार (Planned Withdrawal) घेणे अधिक सुकर असते.

आक्रमणप्रधान कारवाया (Offensive Operations) : घनदाट जंगलातील शत्रूच्या मोर्च्यांच्या अगदी निकट वेगवेगळ्या दिशांनी त्याच्या नकळत पोचून त्याला स्तिमित करणे आणि त्याच्यावर करारी हल्ला चढवणे शक्य असते. असा हल्ला दिवसा किंवा रात्री त्याच सुकरतेने होऊ शकतो. त्यासाठी सखल प्रदेशाच्या तुलनेत कमी मनुष्यबळ असले, तरी चालू शकते. अर्थातच त्यासाठी तडाखेबंद आक्रमक वृत्तीची आवश्यकता असते. हल्ल्यासाठी लागणारी हत्यारे, त्यांचा दारूगोळा, इतर साहित्य आणि खाद्यपदार्थ व पाणी हल्ला करणाऱ्या पायदळाच्या जवानांना पाठीवर वाहून न्यावे लागते. त्यामुळे असे हल्ले अत्यंत परिश्रमपूर्ण ठरतात. रणगाडे, मोठ्या तोफा आणि इतर यंत्रचालित शस्त्रांस्त्राचा वापर तुरळकपणेच करू शकत असल्याने जंगलातील हल्ले प्रामुख्याने पायदळप्रधानच असतात. जंगलात शत्रूचा पाठलाग करण्यासाठी आगेकूच करताना (Advance) वाटचाल बहुतांशी रस्त्यांमार्गेच मर्यादित राहते. काही तुरळक छोट्या तुकड्या सोडल्या, तर मोठ्या प्रमाणात ‘क्रॉस कंट्री’ हालचाल करणे अवघड असते. रस्त्यावर शत्रू भूसुरुंग पेरू शकतो किंवा मोक्याच्या जागांवर सापळे लावू शकतो. त्यासाठी रस्त्यांमार्गे वाहनातून जाणाऱ्या दस्त्यांना काळजीपूर्वक, दक्षतेने आणि डोळ्यात तेल घालून मार्गक्रमण करणे आवश्यक होऊन बसते. त्यासाठी प्रमुख रस्त्यांवर कोणतीही वाहतूक सुरू होण्याआधी दररोज किंवा आवश्यक वेळी ‘रोड ओपनिंग’ कारवाई केली जाते. याच कारणास्तव छत्तीसगढ किंवा इतर माओग्रस्त प्रदेशात अर्धसैनिक बलांच्या तुकड्यांची बंडखोरांच्या सापळ्यांमध्ये सापडून नाहक प्राणहानी होते.

विशेष प्रशिक्षण : जंगलमय प्रदेशात परिणामकारकपणे वावरून लष्करी कारवाया (Military Operations) हाती घेण्यासाठी विशेष आणि सर्वांगपूर्ण प्रशिक्षणाची आवश्यकता असते. त्यात जंगलात स्वनिर्भरतेने  वावरण्याची क्षमता, दिशादर्शन (Navigation), जंगलामध्ये तग धरून राहण्याची विविध तंत्रे आणि वैयक्तिक आरोग्याची काळजी या विषयाचा समावेश असतो. आक्रमकता, पुढाकारवृत्ती, जोम, सहनशक्ती, प्रहारक्षमता, सदैव आवेशपूर्ण व प्रसन्न व्यक्तिमत्त्वाचे गुण अधिकाऱ्यांच्या आणि सैनिकांच्या अंगी बाणवणे, हे या प्रशिक्षणामागील प्रमुख उद्दिष्ट असते.

संदर्भ :

  • Steere, Edward, The Wilderness Campaign, Maryland, 1994.

                                                                                                                                               भाषांतरकार व समीक्षक – शशिकांत पित्रे

प्रतिक्रिया व्यक्त करा