ज्ञानप्राप्तीसाठी आवश्यक मानल्या गेलेल्या प्रत्यक्ष, अनुमान, उपमान आणि शब्द या चार प्रमाणांपैकी दुसरे प्रमाण म्हणजे अनुमानप्रमाण होय. ‘अनुमितिकरणम् अनुमानम्।’ किंवा ‘अनुमीयते येन तदनुमानम्।’ अशी अनुमानाची व्याख्या केली जाते. भारतीय ज्ञानपरंपरेत सांख्य, योग, न्याय, वैशेषिक, पूर्वमीमांसा, उत्तरमीमांसा (वेदांत) तसेच जैन, बौद्ध व चार्वाक अशी एकूण नऊ दर्शने आहेत. त्यांपैकी चार्वाकदर्शन सोडल्यास इतर सर्व दर्शनांनी अनुमानप्रमाणाचा स्वीकार केलेला आहे.
प्रत्यक्ष ज्ञानाच्या पाठोपाठ अनुमान येते म्हणूनच त्याला ‘अनु’मिती असे म्हणतात. अनुमानप्रमाणाला न्यायदर्शनात अतिशय महत्त्वाचे स्थान आहे. प्रत्येकच गोष्ट अनुमानाने सिद्ध करण्याचा नैयायिकांचा प्रयत्न असतो. त्यामुळे अनुमानाच्या प्रत्येक घटकाबद्दल साकल्याने विचार करणारे अनेक ग्रंथ न्यायदर्शनामध्ये निर्माण झाले. इतर शास्त्रांचे अध्ययन करण्यासाठीही अनुमानप्रमाणाचा अभ्यास पोषक ठरतो.
ज्या पदार्थाचे ज्ञान प्रत्यक्ष प्रमाणाने होत नाही, पण त्या पदार्थाशी साहचर्यनियमाने संलग्न असणार्या दुसर्या एका पदार्थाच्या प्रत्यक्षाने होते, त्याला अनुमिती आणि त्या प्रक्रियेला अनुमान असे म्हणतात. उदा., एखाद्या ठिकाणी धूर दिसला, तर त्या ठिकाणी अग्नी असणार असा आपण तर्क करतो; कारण पूर्वी केव्हातरी अग्नी आणि धूर यांचे साहचर्य आपण अनुभवलेले असते. या अनुभवाच्या किंवा स्मरणाच्या आधारे नंतरही जेव्हा धूर पाहिला जातो, तेव्हा त्या ठिकाणी अग्नी असला पाहिजे, असा विचार आपल्या मनात प्रकटतो. या प्रक्रियेला अनुमानप्रक्रिया म्हणतात.
आकाशात काळ्या ढगांची दाटी झाली असता पाऊस पडेल असे ज्ञान होणे, कोकीळकूजन ऐकल्यानंतर वसंतागमनाचे ज्ञान होणे, इंजिनाच्या शिटीचा आवाज ऐकून रेल्वेजवळच असल्याचे ज्ञान होणे या आणि अशा प्रकारची होणारी ज्ञाननिश्चिती म्हणजेच अनुमिती किंवा अनुमान होय. अशा प्रकारच्या ज्ञानप्रक्रियेत उपस्थित गोष्टीच्या आधारे अनुपस्थिताचे ज्ञान होते; कारण उपस्थित गोष्ट ही अनुपस्थित गोष्टीकरिता खुणेचे किंवा गमकाचे कार्य करते. यालाच न्यायशास्त्राच्या परिभाषेत ‘लिंग’ असे म्हणतात.
या अनुमानाची प्रक्रिया नेमकी कशी घडते, हे पाहणे रंजक ठरेल. अनुमानाचे एकूण सहा घटक मानले गेले आहेत. साध्य, पक्ष, लिंग/हेतू, पक्षधर्मता, व्याप्ती आणि परामर्श या घटकांचे कार्य कसे चालते, हे खालीलप्रमाणे दिलेल्या उदाहरणांच्या आधारे पाहू.
साध्य : अनुमानाने जे सिद्ध करायचे आहे, त्याला साध्य म्हणतात. एखाद्या पर्वतावर धूर पाहिल्यानंतर त्या ठिकाणी अग्नीचे अस्तित्व असणार, असे आपण अनुमान करतो. या ठिकाणी पर्वतावर अग्नीचे अस्तित्व आहे; म्हणजेच पर्वताचे वन्हिमत्त्व हे झाले साध्य.
पक्ष : ज्याच्या संबंधाने हे साध्य सिद्ध करावयाचे, तो झाला पक्ष. या ठिकाणी पर्वतावर अग्नी आहे, हे सिद्ध करावयाचे असल्याने पर्वत हा पक्ष झाला. ‘संदिग्धसाध्यवान् पक्ष:’ अशी पक्षाची व्याख्या केली जाते. म्हणजेच जेथे साध्य आहे किंवा नाही याबद्दल शंका असते व म्हणून जेथे साध्य आहे हे सिद्ध करावे लागते, तो पक्ष होय.
पक्ष हा सपक्ष व विपक्ष असा दोन प्रकारचा असतो. ज्या ठिकाणी साध्यधर्म आहे हे निश्चितपणे ठाऊक असते, तो सपक्ष. उदा., वन्हिमत्त्व सिद्ध करीत असताना जेथे जेथे म्हणजे स्वयंपाकघर वगैरेंसारख्या ठिकाणी अग्नी व धूर यांचे साहचर्य आपण पूर्वी पाहिलेले असते, त्या सगळ्या स्थळांचा विचार सपक्ष म्हणून केला जातो, आणि ज्या ठिकाणी साध्यधर्म म्हणजेच वन्हिमत्त्व निश्चितपणे नाही असे ज्ञान असते, तो विपक्ष होय. उदा., जलाशयासारखी ठिकाणे. यासारख्या ठिकाणी अग्नीचे अस्तित्व निश्चितपणे आढळणारे नसते, म्हणून तो विपक्ष होय.
लिंग/हेतू : पक्षावर साध्य राहते, हे सिद्ध करण्याचे साधन म्हणजे हेतू होय. प्रस्तुत उदाहरणामध्ये धूमतत्त्व हा हेतू ठरतो.
पक्षधर्मता : हेतू हा पक्षाचा धर्म आहे, म्हणजेच हेतू पक्षावर राहतो याचे ज्ञान म्हणजेच पक्षधर्मता होय. या उदाहरणात पर्वत हा वन्हियुक्त आहे हे धुरामुळे कळत असल्याने धुराचे असणे ही पक्षधर्मता झाली.
व्याप्ती : व्याप्ती म्हणजेच हेतू व साध्य यांचे नियतसाहचर्य किंवा नित्य संबंध होय. धूर व अग्नी हे कायम एकत्र असतात. हेतू व साध्य यांचे नियतसाहचर्य ज्ञात असल्याशिवाय अनुमानाने एखादी गोष्ट सिद्ध करता येत नाही. म्हणूनच स्वयंपाकघर वगैरे ठिकाणी अग्नी व धूर यांचे नित्यसाहचर्य जाणून घेतल्यानंतरच पर्वतावर धूर पाहिल्यानंतर तेथे अग्नी असला पाहिजे, असे अनुमान करता येते. यावरूनच अनुमानप्रमाण हे प्रत्यक्षप्रमाणावर अवलंबून असते, हे कळते. ही व्याप्ती खालील दोन प्रकारची मानली जाते :
- अन्वयव्याप्ती : ही सकारात्मक विधानात असते.
- व्यतिरेकव्याप्ती : ही नित्य नकारात्मक विधानात असते.
परामर्श : साध्याबरोबर ज्याची व्याप्ती आहे असा हेतू पक्षावर राहतो याचे ज्ञान होणे म्हणजे परामर्श होय. या उदाहरणात अग्नीसोबत ज्याची व्याप्ती असते असा धूर पर्वतावर आहे, हे ज्ञान म्हणजे परामर्श.
वर उल्लेखिलेले सगळे घटक सिद्ध झाल्यानंतर अनुमिती होते.
हे अनुमानप्रमाण समजून घेण्याकरिता साध्य, पक्ष आणि हेतू या तीन घटकांचे सुयोग्य ज्ञान असणे अत्यंत आवश्यक ठरते.
अनुमानाचे स्वार्थानुमान आणि परार्थानुमान असे दोन प्रकार पडतात.
१) स्वार्थानुमान : स्वत:ला अनुमितिज्ञान करून घेण्यासाठी जे कारणीभूत ठरते, ते स्वार्थानुमान होय. एखाद्याने स्वयंपाकघर वगैरे ठिकाणी अनेकदा अग्नी व धूर यांचे साहचर्य पाहिलेले असते. त्यामुळे त्याला जेव्हा पर्वतावर धूर दिसतो, तेव्हा त्याला ती व्याप्ती आठवते. त्या व्याप्तीच्या आधारे पर्वतावर अग्नी असला पाहिजे, असे त्याच्यापुरते अनुमान तो करतो. हेच स्वार्थानुमान. ही मनात घडणारी प्रक्रिया असल्याने वेगळी मांडून दाखवावी लागत नाही. पण स्वार्थानुमान झाल्याखेरीज मनुष्य दुसर्याला अनुमिती करवून देऊ शकत नाही.
२) परार्थानुमान : हे स्वार्थानुमानावर अवलंबून असते. अनुमानाच्या आधारे एखादी गोष्ट दुसर्याला समजावून सांगताना परार्थानुमानाचा उपयोग होतो. हे परार्थानुमान भाषेच्या मदतीने ठरावीक पद्धतीने मांडावे लागते. या पद्धतीत पाच वाक्यांचा समावेश होत असल्याने याला ‘पंचावयवी वाक्य’ असेही म्हणतात. याच पाच वाक्यांना ‘न्याय’ अशीदेखील संज्ञा आहे. पंचावयवी वाक्याचे पाच घटक खालीलप्रमाणे :
- प्रतिज्ञा : साध्याने युक्त अशा पक्षाचे ज्ञान करून देणारे वाक्य.
- हेतू : साध्य सिद्ध करण्यासाठी तृतीया किंवा पंचमी विभक्ती वापरून कारण सांगणारे वाक्य.
- उदाहरण : हेतूमध्ये साध्याचे साहचर्य दृष्टांत देऊन जेथे सांगितलेले असते, ते उदाहरण.
- उपनय : हेतू व्याप्तीने युक्त आहे, असे सांगणारे वचन.
- निगमन : पक्ष हा हेतू साध्याने युक्त आहे, हे सांगणारे वाक्य.
ज्ञानप्रक्रियेत अनुमानाचा वापर पुरातन कालापासून केलेला दिसून येतो. अनेक उपनिषदांमध्ये आत्म्याचे स्वरूप अनुमित मानले गेले आहे.
संदर्भ :
- चाफेकर, नलिनी, अनु. अन्नंभट्टाचा तर्कसंग्रह, ठाणे, १९९४.
- जोशी, महादेवशास्त्री, संपा. भारतीय संस्कृतिकोश, खंड १, पुणे, २०१०.
- दीक्षित, श्रीनिवास, भारतीय तत्त्वज्ञान, कोल्हापूर, २००२.
समीक्षक : ललिता नामजोशी