दुसऱ्या महायुद्धानंतरच्या काळात इटलीमध्ये तयार झालेल्या वास्तववादी चित्रपटांच्या चळवळीला ‘इटलीतील नववास्तववादʼ असे संबोधले जाते. इटालियन चित्रपटांचा सुवर्णकाळ या नावानेही ही चळवळ ओळखली जाते. ही प्रामुख्याने  १९४४ ते १९५२ या काळात इटलीमध्ये फोफावली. इटलीच्या तत्कालीन परिस्थितीचे चित्रपटांमधून दर्शन घडवणे, तसेच जुजबी कथानक आणि त्या सूत्राच्या आधारे माहितीपटात शोभेल असे वास्तवाचे चित्रण करणे, हा इटालियन चित्रपटनिर्मिती मागचा प्रमुख हेतू होता. तत्कालीन समाजातील समस्या मांडताना येणाऱ्या अडचणींवर जमेल त्या पद्धतीने मार्ग काढणाऱ्या दिग्दर्शकांच्या कामांमधून इटालियन चित्रपटांना निश्चित आकार येत गेला.

रोम ओपन सिटी (१९४५)

नववास्तववाद ही संकल्पना प्रथम उम्बेर्तो बार्बरो या समीक्षकाने लुकीनो व्हिस्कोन्ती या दिग्दर्शकाच्या ओसेसिओने आणि इतर काही चित्रपटांबद्दलचा उल्लेख करताना वापरली. तत्कालीन इटलीत परिचित असलेल्या व पारंपरिक स्वरूपाचे व्यावसायिक चित्रपट बनविणाऱ्या उद्योगाला या चित्रपटाने एक नवा पर्याय दिला, म्हणून या वास्तववादाला जोडून ‘नवʼ हा शब्द वापरण्यात आला.

नववास्तववाद या चळवळीतील दिग्दर्शक तरुण होते; परंतु चित्रपटव्यवसायात आधीपासूनच ते काम करीत होते. आधीच्या चित्रपटशैलीला ते कंटाळलेले होते. युद्धानंतरची इटली ही सामाजिक आणि आर्थिक संकटांतून जात होती. चिनेचिटा हे नेहमी चित्रीकरणासाठी वापरले जात असलेले चित्रपटनिर्मितिगृह  (स्टुडिओ) वापरायला मिळण्याची शक्यता नव्हती. चित्रीकरणाची सामग्री व पुरेसे कलावंतही हाताशी नव्हते.  याला पर्याय शोधणाऱ्या नववास्तववादातील दिग्दर्शकांनी नेपथ्य वगळून प्रत्यक्ष राहत्या इमारती, रस्ते अशा ठिकाणी चित्रण करायला सुरुवात केली. कृत्रिम प्रकाशयोजना टाळून ते सूर्यप्रकाशाचा अधिक उपयोग करू लागले. नट नसताना भूमिकेच्या गरजेप्रमाणे सामान्य माणसांनाच नटसंचात वापरू लागले. या निर्णयांमधूनच चित्रपटाच्या दृश्य परिमाणाची सूत्रे ठरत गेली.

व्हिस्कोन्तीचा ओसेसिओने (१९४२) आणि रॉबर्टो रोसेलिनीचा रोम ओपन सिटी (१९४५) या चित्रपटांपैकी नेमक्या कोणत्या चित्रपटाने नववास्तववाद सुरू झाला, याबद्दल मतभेद आहेत; पण हे दोन्ही चित्रपट महत्त्वाचे मानले जातात. व्हिस्कोन्ती, रोसेलिनी यांच्याबरोबरच व्हित्तोरिओ डी’सिका हेदेखील नववास्तववादातील महत्त्वाचे नाव आहे.

नववास्तववादी चित्रपट हे कायमच कथापट आणि माहितीपट यांच्या मध्ये राहिलेले आपल्याला दिसतात. त्यांचा विशेष हा की, त्यांनी पारंपरिक चित्रपटाला असलेली उसन्या कथानकाची, नाट्याची गरज काढून टाकली आणि प्रत्यक्ष जीवनानुभवातूनच नाट्य शोधणारा चित्रपट पुढे आणला. तत्कालीन सामाजिक आणि राजकीय वास्तव ही या चित्रपटांमागची प्रेरणा होती. त्यामुळेच त्यांनी मांडलेल्या कथादेखील समाजातल्या नाडलेल्या, परिस्थितीने त्रासलेल्या, कनिष्ठ वर्गातल्या लोकांच्या कहाण्या होत्या. युद्धपश्चात सामान्य माणसाचे केवळ जगणेदेखील किती संघर्षमय होऊन गेले आहे, हे यांतील अनेक चित्रपटांनी मांडले. बऱ्याच नववास्तववादी चित्रपटांमध्ये लहान मुलांच्या भूमिकांना खास महत्त्व असल्याचे आपल्याला दिसते. देशाच्या तत्कालीन परिस्थितीला स्वत: कोणत्याही मार्गाने जबाबदार नसलेले निरीक्षक आणि त्याबरोबरच भविष्य घडवण्याची क्षमता असणारी भावी पिढी, अशी दुहेरी भूमिका या व्यक्तिरेखांकडे सोपवलेली दिसते. व्हित्तोरिओ डी’सिकाचे शूशाइन (१९४६), बायसिकल थिव्ह्ज (१९४८) यांसारखे चित्रपट उदाहरणादाखल पाहता येतील. १९५२ मध्ये डी’सिकाने दिग्दर्शित केलेला उम्बेर्तो डी हा अखेरचा नववास्तववादी चित्रपट असल्याचे मानले जाते. या प्रवाहाचा प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष प्रभाव यानंतरच्या काही चित्रपटांवरही दिसून येतो.

नववास्तववाद हा चित्रपटप्रकार केवळ इटलीपुरता मर्यादित न राहता त्याचा प्रभाव जागतिक चित्रपटांवरदेखील पडलेला दिसतो. फ्रेंच न्यू वेव्हमधील चित्रपटांच्या दृश्य शैलीवर हा परिणाम जाणवण्यासारखा आहे. भारतीय चित्रपटांमध्येही हा प्रभाव दिसून येतो. प्रकाश अरोरादिग्दर्शित बूटपॉलिश (१९५३) किंवा बिमल रॉयदिग्दर्शित दो बिघा जमीन (१९५३) यांसारखे चित्रपट नववास्तववादाच्या प्रभावाखाली बनलेले आहेत. आपल्या समांतर चित्रपटांसाठी आदर्श ठरलेला सत्यजित रे यांचा पथेर पांचाली हा चित्रपट डी’सिकाच्या बायसिकल थिव्ह्ज या चित्रपटाने प्रेरित झालेला होता.

नववास्तववादी प्रवाहातील महत्त्वाचे चित्रपट :

ओसेसिओने ( दिग्दर्शक लुकीनो व्हिस्कोन्ती, १९४२)

रोम ओपन सिटी (दिग्दर्शक रोबेर्तो रोसेलिनी, १९४५)

शूशाइन (दिग्दर्शक व्हीतॉरिओ डी सिका, १९४६)

पैजान (दिग्दर्शक रोबेर्तो रोसेलिनी, १९४६)

जर्मनी इयर झीरो (दिग्दर्शक रोबेर्तो रोसेलिनी, १९४८)

बायसिकल थिव्ह्ज (दिग्दर्शक व्हित्तोरिओ डी’सिका, १९४८)

ला टेरा त्रेमा (दिग्दर्शक लुकीनो व्हिस्कोन्ती, १९४८)

बिटर राइस (दिग्दर्शक जुझेप्पे दी सॉंटेस, १९४९)

रोम 11:00 (दिग्दर्शक जुझेप्पे दी सॉंटेस, १९५२)

उम्बेर्तो डी  (दिग्दर्शक व्हीतॉरिओ डी सिका, १९५२)

समीक्षण : अभिजीत देशपांडे