बायसिकल थिव्ह्ज या चित्रपटातील एक छायाचित्र

इटलीतील नववास्तववादी प्रवाहातील एक महत्त्वाचा चित्रपट. जागतिक चित्रपटांच्या इतिहासात काही चित्रपटांनी महत्त्वाचे स्थान मिळविले आहे. इटलीचे प्रख्यात दिग्दर्शक व्हित्तोरिओ डी’सिका (Vittorio De Sica) यांचा बायसिकल थिव्ह्ज (इटालियन शीर्षक :  Ladri di Biciclette,  अमेरिकेत हा चित्रपट द बायसिकल थिफ म्हणून ओळखला जातो. पण मूळ इटालियन शीर्षकात ‘चोर’ हा शब्द अनेकवचनी आहे.) हा चित्रपट जगातल्या सर्वोत्तम चित्रपटांपैकी एक गणला जातो. हा १९४८ मध्ये प्रदर्शित झाला. तेव्हापासून तो जगभरातील चित्रकर्मींना प्रेरणा देत आला आहे. या सिनेमाची कथा इटलीमध्ये दुसऱ्या महायुद्धाच्या काळात घडते. कथानक अगदी साधे आहे. मात्र, माणसातल्या आदिम जीवनप्रेरणेचे आणि मूल्यांचे उत्तुंग दर्शन हा सिनेमा घडवीत असल्याने त्याची अभिजात कलाकृतींमध्ये नोंद होते. प्रख्यात इटालियन दिग्दर्शक रॉबर्टो रोसेलिनी यांच्या रोम ओपन सिटी या १९४५ मधील चित्रपटाद्वारे जगभरात नववास्तववादी चित्रपटांचा प्रवाह सुरू झाला, असे मानले जाते. बायसिकल थिव्ह्ज हा या प्रवाहातील महत्त्वाचा सिनेमा आहे.

लुईगी बार्तोलिनी (Luigi Bartolini) यांच्या बायसिकल थिव्ह्ज याच नावाच्या कादंबरीवरून सीझर जेवात्तिनी (Cesare Zavattini) यांनी या चित्रपटाची पटकथा लिहिली आहे. इटलीची राजधानी असलेल्या रोम शहराजवळच्या वस्तीत याची गोष्ट आकारास येते. दुसऱ्या महायुद्धाचे भीषण परिणाम संपूर्ण यूरोपावर झाले. अशा या अस्थिर, अस्वस्थ परिस्थितीवर हा सिनेमा बेतलेला आहे. या चित्रपटाचा नायक अंतानिओ (लँबार्तो मॅग्गिओरानी – Lamberto Maggiorani) हा एक गरीब आणि बेरोजगार गृहस्थ आहे. पत्नी मारिया (लिआनेला कॅरेल – Lianella Carell), सात वर्षांचा मुलगा ब्रुनो (एंझो स्टैओला – Enzo Staiola) आणि आणखी एक छोटे बाळ असे त्यांचे कुटुंब आहे. कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी नायक काम शोधत असतो. अखेर अंतानिओला तेथील सरकारी रोजगार केंद्रात भिंतींवर पोस्टर चिकटविण्याचे काम मिळते. या कामासाठी सायकलची गरज असते. ही गोष्ट अंतानिओ आपल्या पत्नीच्या कानावर घालतो. अंतानिओची सायकल गहाण ठेवलेली असते. त्याची पत्नी घरातल्या चादरी विकून पतीची सायकल सोडवून आणते. अंतानिओ पत्नी व मुलासह ही सायकल घेऊन आनंदात घरी येतो. दुसऱ्या दिवशी आपल्या मुलाला घेऊन तो कामावर निघतो. मात्र, एका शिडीवर चढून पोस्टर चिकटवत असताना एक चोर त्याची सायकल घेऊन पळून जातो. अंतानिओ जीव खाऊन त्याचा पाठलाग करतो, पण चोर सापडत नाही. त्यानंतर सुरू होते एक शोधयात्रा… अंतानिओ आणि ब्रुनो दोघेही सायकलच्या शोधात सगळे शहर पालथे घालतात. वेगवेगळ्या ठिकाणी जातात. तिथे त्यांना भेटणारी माणसे, इटलीमधले तेव्हाचे सामाजिक वातावरण, गरिबी, आर्थिक विषमता यांचे एक विषण्ण करणारे दर्शन या चित्रपटातून आपल्याला होते. या चित्रपटाचा शेवटही खूप चटका लावणारा आहे.

या चित्रपटास जवळपास ७० वर्षें होतील. मात्र, आजही हा चित्रपट सर्वसामान्य प्रेक्षकांना भावतो. याचे कारण कुटुंबसंस्था, नातेसंबंध, प्रेम आणि त्यासंबंधीचे माणसाचे विचार बहुतांशी तसेच आहेत. यातला गरीब नायक आपल्या कुटुंबासाठी कष्ट करून त्यांना आनंद देण्याचा प्रयत्न करतो. त्या मार्गात त्याला येणारे अडथळे आणि अपेक्षाभंग प्रेक्षकांना भावनिक करतात. सर्वसामान्य माणसाच्या आयुष्यातही असे प्रसंग येत असतात. ती समानुभूती प्रेक्षक येथे साधतात. साध्या गोष्टीतून मांडलेला वैश्विक विचार ही मध्यवर्ती संकल्पना असलेला हा चित्रपट रसिकमनास भावतो. दिग्दर्शक डी’सिका यांनी या नववास्तवादी शैलीतील चित्रपटात कुटुंबाचा कमालीचा साधेपणा आणि सच्चेपणा साधायचा प्रयत्न केला आहे. त्यांची ही हाताळणी यशस्वी ठरली. नववास्तवादी शैलीतील मध्यवर्ती व्यक्तिरेखा साध्या अणि निरागस असतात. परिस्थितीमुळे त्यांच्या आयुष्यात आलेल्या समस्यांशी दोन हात करताना त्यांची होणारी फरपट पाहून त्या कथेत प्रेक्षक भावनिकदृष्ट्या गुंतत जातात. त्यामुळे मध्यवर्ती व्यक्तिरेखेस सहानुभूती मिळते.

दिग्दर्शक डी’सिका यांनी प्रमुख कलाकारांच्या भूमिकेत तेव्हाचे कुठलेही नावाजलेले अभिनेते, अभिनेत्री घेतले नाहीत. प्रमुख भूमिका करणारे लँबार्तो मॅग्गिओरानी या सिनेमात काम करण्यापूर्वी एका कारखान्यात कामगार होते. (या सिनेमात काम केल्यामुळे त्यांच्या मालकाने त्यांना पुन्हा कामावर घेतले नाही. परिणामी त्यांना अभिनयाचे क्षेत्रच निवडावे लागले.) मारियाचे काम करणारी लिआनेला कॅरेल हीदेखील एक सामान्य स्त्री होती. तिने यापूर्वी कधीही कॅमेऱ्यासमोर काम केलेले नव्हते. लहानग्या ब्रुनोचे काम करणारा एंझो यानेही या चित्रपटापूर्वी अभिनय केलेला नव्हता. या चित्रपटातील त्याच्या डोळ्यांतले भाव (आणि विशेषत: चित्रपटातील शेवटचे दृश्य) प्रेक्षकांच्या काळजात घर करून जातात. या चित्रपटाची निर्मिती एर्कोल ग्राझियादेई (Ercole Graziadei), सर्जिओ बर्नार्डी (Sergio Bernardi), काउंट सिकोग्ना (Count Cicogna) यांनी केली. हा चित्रपट २४ नोव्हेंबर १९४८ साली इटलीमध्ये आणि १२ डिसेंबर १९४९ मध्ये अमेरिकेत प्रदर्शित झाला.

हा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर इटलीत त्यावर टीका झाली. इटलीतील जीवनाचे नकारात्मक चित्र त्यात रंगविले आहे, असे तेथील लोकांना वाटले. मात्र, जगभरात या चित्रपटाचे खूप चांगले स्वागत झाले आणि आजही तो चित्रपट इतिहासातील महत्त्वाचा चित्रपट मानला जातो, यातच त्याचे यश आहे. यानंतर या पठडीचे अनेक चित्रपट जगभरातील विविध भाषांमध्ये तयार झाले.

या चित्रपटाला विविध पुरस्कारांनी गौरविण्यात आले. त्यात लोकार्नो इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलचा पुरस्कार (१९४९), न्यूयॉर्क फिल्म क्रिटिक्स ॲवॉर्ड (१९४९), ब्रिटिश ॲकॅडेमी ऑफ फिल्म अँड टेलिव्हिजन आर्ट्स, गोल्डन ग्लोब ॲवॉर्ड (१९५०) इत्यादींचा समावेश होतो.

समीक्षक : अभिजित देशपांडे