ईहामृग : एक रूपकप्रकार. ईहा म्हणजे कृती किंवा वर्तन. ज्यात नायक मृगाप्रमाणे अलभ्य नायिकेची इच्छा करतो ते ईहामृग. याचे उदाहरण संस्कृत वाङ्मयात आढळत नाही. समवकाराप्रमाणेच यातही नायक आणि नायिका दिव्य असतात; परंतु यात स्त्रियांच्या बाबतीत पुरुषांमध्ये संघर्ष उत्पन्न होतो आणि परिणामतः अपहरण, विद्रव, युद्ध इ. प्रसंग दाखविलेले असतात. नाट्यशास्त्रानुसार ईहामृगाचे विवेचन असे –

दिव्यपुरुषाश्रयकृतो दिव्यस्त्रीकारणोपगतयुद्धः| सुविहितवस्तुनिबद्धो विप्रत्ययकारकश्चैव|| (१८.७०)

उद्धतपुरुषप्रायः स्त्रिरोषग्रथितकाव्यबन्धश्च| संक्षोभविद्रवकृतः संफेटकृतस्तथा चैव|| (१८.७१)

स्त्रीभेदनापहरणावमर्दनप्राप्तवस्तुशृङ्गारः| ईहामृगस्तु कार्यः सुसमाहितकाव्यबन्धश्च|| (१८.७२)

दिव्य पुरुषांच्या आधाराने रचलेला, दिव्य स्त्रीच्या निमित्ताने युद्धाचे प्रसंग असलेला, उत्कृष्ट मांडणी असलेल्या कथानकाने युक्त, तसेच विशेष प्रत्ययकारी असलेला, बहुतांशी उद्धत पुरुषपात्रे असलेला, स्त्रीच्या रोषाविषयी काव्यरचना असलेला, क्षोभ, विद्रव, त्याचप्रमाणे संफेट म्हणजे रोषयुक्त वाक्य यांनी युक्त असलेला, स्त्रीच्या निमित्ताने भेदन, अपहरण व अवमर्दन यांद्वारा कथानकात शृंगाराची प्राप्ती दाखवणारा आणि अगदी व्यवस्थित काव्यरचना असलेला ईहामृग निर्माण करावा.

ईहामृगात दिव्य स्त्रीची योजना असावी. तसेच पौराणिक व काल्पनिक घटनांचे मिश्रण असावे. नायक धीरोदात्त व प्रख्यात असावा. मात्र रंगभूमीवर युद्ध दाखवले तरी कोणाचा वध दाखवू नये. साहित्यदर्पणात विश्वनाथाने म्हटले आहे की, ईहामृगात मिश्रवृत्त असून चार अंक असतात. मुख, प्रतिमुख आणि निर्वहण हे तीन संधी असतात. साहित्यदर्पणात कुसुमशेखर विजय नावाच्या ईहामृगाचा उल्लेख केलेला आहे.

दशरूपकात धनंजयाने म्हटले आहे की, ईहामृगात नायक व प्रतिनायक असतात. ते इतिहासातील प्रसिद्ध व्यक्ती असतात व ते धीरोदात्त असतात. त्यापैकी प्रतिनायक अज्ञानामुळे अयोग्य कार्य करणारा असावा. तो अशा दिव्य स्त्रीचे अपहरण करू इच्छितो, जिचे त्याच्यावर प्रेम नाही. मग नायक आणि प्रतिनायक यांच्यात संघर्ष निर्माण होतो. त्यात नायकाचा विजय होतो. ईहामृगाचे एकही प्रत्यक्ष उदाहरण उपलब्ध नाही.

संदर्भ : कंगले,र.पं.,दशरूपक-विधान,महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळ,१९७४.

समीक्षक : मंजुश्री गोखले