बाजारातील इतर परिस्थिती स्थिर व कायम असताना, काही विशिष्ट भागापुरताच समतोल साध्य करणे म्हणजे आंशिक समतोल होय. एखाद्या बाजारपेठेमध्ये एखाद्याच वस्तूची किंमत जेव्हा मागणी पुरवठ्याच्या समतोलातून ठरते, तेव्हा एका अर्थाने तो आंशिक समतोल असतो. संपूर्ण अर्थव्यवस्थेचा विचार करणाऱ्या सर्वसाधारण समतोल विश्लेषणापेक्षा आंशिक समतोलविश्लेषण सोपे असते.

किंमतनिश्चितीची प्रक्रिया ही गतिशील प्रक्रिया आहे. जोपर्यंत मागणी व पुरवठा समान होत नाहीत, तोपर्यंत किंमत स्थिर होत नाही. मागणी व पुरवठा एकमेकांना सांभाळून घेत असतात आणि त्यांच्या कमीजास्त होण्याच्या गतिमानतेवरून किंमत ठरत असते. बाजारातील किमतींवर लघुउद्योग नियंत्रण ठेवू शकत नाहीत. बाजारात मागणी व पुरवठ्याच्या समतोलातून जी किंमत ठरेल, ती त्यांना स्वीकारावीच लागते. अशा लघुउद्योगांच्या समतोलाचे विश्लेषण आंशिक समतोल विश्लेषणामुळे करता येते. त्यामुळे या विश्लेषणाला संकुचित (छोट्या) बाजाराच्या अभ्यासाकरता उपयोगी पडणारे विश्लेषण असेही म्हणतात.

गृहितके :

 • बाजारात वस्तूची किंमत दिलेली असते आणि उपभोक्त्यांकरता स्थिर असते.
 • उपभोक्त्याची चव, आवडनिवड, सवयी, प्राधान्यक्रम, उत्पन्न इत्यादी घटकदेखील स्थिर आहेत.
 • आंशिक समतोलामध्ये इतर वस्तूंच्या किमती स्थिर मानलेल्या असतात आणि बाजारातील मागणी व पुरवठ्यांवर परिणाम करणारे इतर सर्व घटक (उपभोक्त्यांचे उत्पन्न, पर्यायी व पूरक वस्तूंच्या किमती इत्यादी) कायम आहेत.
 • उद्योगसंस्थांची उत्पादनाची पद्धती स्थिर आहे आणि त्यांना ते घटक स्थिर किमतींना उपलब्ध आहेत.
 • कच्च्या मालाच्या किमतीदेखील स्थिर आहेत.
 • व्यवसाय व कामाची जागा यांबाबत उत्पादन घटक गतिमान आहेत. ही सर्व गृहीते पूर्ण स्पर्धात्मक बाजाराकरिता लागू केलेली होती; मात्र आता ती सर्व प्रकारच्या बाजारांकरिता लागू होऊ शकतात.

उपयुक्तता : एखादा उपभोक्ता (व्यक्ती), एखादा उत्पादक (व्यवसायसंस्था) किंवा एखादा उत्पादनाचा घटक जेव्हा समतोलाच्या टप्प्यांवर पोचलेला असतो, तेव्हा आंशिक समतोलाचा विचार होतो. हा आंशिक समतोल पुढील प्रकारचा असतो :

 • उपभोक्त्याचा समतोल : उपभोक्त्याची आवड-निवड, त्याचा प्राधान्यक्रम, त्याचे उत्पन्न, वस्तूंच्या किंमती, वस्तूंचा पुरवठा इत्यादी बाबतींत त्याचे महत्तम समाधान होते, तेव्हा तो समतोलात आहे असे म्हटले जाते.
 • उत्पादकाचा समतोल : दिलेल्या आर्थिक परिस्थितीत उत्पादकाला जेव्हा महत्तम नफा होतो, तेव्हा उत्पादक समतोलात आहे असे म्हटले जाते.
 • व्यवसायसंस्थेचा समतोल : व्यवसायसंस्थेचा समतोल म्हणचे सीमांत महसूल (MR) आणि सीमांत खर्च (MC) हे समान असतात (MR=MC). अशा वेळेस व्यवसायसंस्था उत्पादनबदलाचा विचार करत नाही. दीर्घकालीन समतोल गाठताना दीर्घकालीन सीमांत खर्च (LMC), सीमांत महसूल (MR), सरासरी महसूल (AR) आणि दीर्घकालीन सरासरी खर्च (LAC) यांची बरोबरी विचारात घेतली जाते (LMC=MR=AR=LAC). ही स्थिती सर्वसामान्य नफ्याची असते. त्यामुळे उत्पादक व्यवसायसंस्था बंद करण्याचा किंवा उत्पादनबदलाचा विचार करत नाही. दीर्घकालीन समतोलाची ही किमान अट आहे.

उत्पादन संस्था सर्वसामान्य नफाच मिळवीत असल्याने नव्याने दुसरी व्यवसायसंस्था बाजारपेठेत प्रवेश करण्याची शक्यता कमी असते आणि नफा होत असल्याने अस्तित्वात असलेली व्यवसायसंस्था उत्पादन बदलत नाही किंवा उत्पादन बंद करत नाही. (१) सीमांत महसूल आणि सीमांत खर्च हे समान असेपर्यंत विविध व्यवसायसंस्थांनी पुरवठा केलेली ती वस्तू उपभोक्ते विकत घेतात आणि बाजारात एका वस्तूकरिता एकच किंमत अस्तित्वात असते. बाजाराने निर्धारित केलेली ती किंमत स्वीकारून व्यवसायसंस्था वस्तूंचा पुरवठा करतात. (२) भूमी, श्रम, भांडवल आणि संयोजन या उत्पादनघटकांना जेव्हा त्यांचे उत्पन्न महत्तम होण्यासाठी शक्य तेवढी महत्तम किंमत दिली जाते, तेव्हाच ते समतोलात येतात. त्यामुळे उत्पादनाच्या किमती बरोबर उत्पादनाचा सीमांत महसूल होतो (किंमत=उत्पादनाचा सीमांत महसूल : P=MR). (३) पूर्ण रोजगाराची स्थिती असलेल्या बाजारात श्रम मिळविण्यासाठी श्रमबाजारात फार शोधाशोध करावी लागत नाही. उत्पादनाचे घटक (श्रम) जेवढे उपलब्ध असतात, तेवढेच घटक उत्पादकांकडून भाडेतत्त्वावर (मजुरी किंवा वेतनावर)  घेतले जातात.

मर्यादा :

 • आंशिक समतोल हा अर्थव्यवस्थेच्या एका भागापुरताच मर्यादित असतो.
 • अर्थव्यवस्थेचे विविध भाग किंवा क्षेत्राचा परस्परसंबंध अभ्यासण्याची आंशिक समतोलाची क्षमता नाही.
 • एखाद्या विशिष्ट बाजाराचा अभ्यास उर्वरीत अर्थव्यवस्थेपासून वेगळा होण्याची शक्यता असते, हे गृहीत धरले नाही.
 • आंशिक विश्लेषण हे सूक्ष्मलक्ष्यी असल्याने ते अर्थव्यवस्थेतील मागणी-पुरवठ्यातील बदलांमुळे निर्माण होणाऱ्या मोठ्या लाटांचा अभ्यास करण्यास असमर्थ ठरते.

आंशिक समतोल आणि सर्वसाधारण समतोल यांतील फरक

आंशिक समतोल

सर्वसाधारण समतोल

उद्गाता – अल्फ्रेड मार्शल

उद्गाता – लेऑन व्हॅलरॅ
एकाच चलाशी संबंधित

अनेक चलांशी संबंधित, संपूर्ण अर्थव्यवस्थेचा विचार

प्रमुख दोन गृहीतके :

१. सर्व परिस्थिती कायम.

२. एका क्षेत्राचा दुसऱ्यावर परिणाम होत नाही.

विविध क्षेत्रे एकमेकांशी परस्परसंबंधित असतात, हे मुख्य गृहीत आहे. त्यांचा एकमेकांवर परिणाम होतो.

सर्व परिस्थिती कायम असल्याने किमती स्थिर राहतात.

सर्व वस्तूंच्या किमती एकत्रच परस्परसंबंधाने आणि एकाच वेळी निश्चित होतात. त्यामुळे सर्व उत्पादने आणि उत्पादनाचे घटक एकाच वेळी समतोलात येतात.

 

समीक्षक – राजस परचुरे

प्रतिक्रिया व्यक्त करा