ज्यांच्याकडे (सरकार, उद्योजक, व्यापारी, संस्था, व्यक्ती इत्यादी) अधिक पैसा आहे आणि जे गुंतवणूक व बचत करू इच्छितात अशांकडून ठेवीच्या रूपाने बचती जमा करण्याचे तसेच ज्यांना (सरकार, उद्योजक, व्यापारी, संस्था, व्यक्ती इत्यादी) पैशाची आवश्यकता आहे व जे कर्ज घेऊ इच्छितात अशांना तोच पैसा कर्ज म्हणून पुरविण्याचे काम करणाऱ्या मध्यस्थांना वित्तीय मध्यस्थ म्हणतात. वित्तीय मध्यस्थ हे या वित्तीय व्यवस्थेतील महत्त्वपूर्ण घटक आणि व्यावसायिक संस्था आहे. यांमध्ये बँका, बॅंकेतर वित्तीय संस्था, खाजगी समन्याय, साहस भांडवल निधी, भाडेपट्टी कंपन्या, विमा कंपन्या, निवृत्तिवेतन विश्वस्त, सूक्ष्म पतपुरवठादार, परस्परनिधी संस्था, सामुहिक गुंतवणूक योजना, वित्तीय सल्लागार, सहकारी पतसंस्था, रोखे बाजार इत्यादींचा समावेश होतो.

वित्तीय मध्यस्थ हे सुरक्षितता, रोखता, अनुमापी अनुकूलता, गुंतवणूक व जीवन व्यवस्थापन, तंत्रज्ञानाधिष्ठित माहिती इत्यादी वित्तीय सेवा उपलब्ध करून देतात. धनको आणि ऋणको यांच्या वित्तविषयक मागणी व पुरवठ्यातील तफावत कमी करून त्यांच्या गरजा आणि उद्दिष्टांमध्ये सातत्यपूर्ण असणाऱ्या असमानतेत संतुलन साधण्याचा प्रयत्नही वित्तीय मध्यस्थ करीत असतात. ते विशेष प्रकारचे हस्तक असून वित्तीय बाबींबद्दल विशेष माहिती जमा करतात आणि तीचे मूल्यमापन करून वित्तीय हक्कांची साधने पुरवितात.

अर्थव्यवस्थेतील बँका, बॅंकेतर वित्तीय संस्था, संघटित व असंघटित वित्तीय बाजारपेठा, वित्तीय संसाधने व वित्तीय सेवा यांनी मिळून वित्तीय व्यवस्था अस्तित्वात येते. वित्तीय व्यवस्था या संज्ञेत वित्तीय व्यवहारात परस्परांशी संबधित असणाऱ्या अशा विविध शासकीय व खाजगी वित्तीय संस्था, अभिकर्ते, दलाल, संघटित बाजारव्यवहार, प्रथा, हक्क आणि देणी यांचा समावेश होतो.

वित्तीय प्रक्रियेत दोन मुख्य अडथळे असतात. पहिला, व्यक्तिश: धनको आणि ऋणको यांचे विविध वित्तीय गरजांमध्ये समतोल साधणे. दुसरा, धनको आणि ऋणको यांच्या उद्दिष्टांमधील भिन्नता. धनकोचे लक्ष सुरक्षितता आणि रोखतेकडे असते, तर ऋणको यांबाबत नेहमी हमी देऊ शकत नाही. वित्तीय संसाधनांची कार्यक्षम वाटणी करण्याची जबाबदारी बाजार यंत्रणेची असते. अशा बाजारयंत्रणेत वित्तीय मध्यस्थ महत्त्वाची भूमिका बजावतात. ते धनकोंना सुरक्षितता व रोखता पुरवून या निधीचा उपयोग निरनिराळ्या जोखीम आणि रोखता असणाऱ्या कर्ज व गुंतवणुकीसाठी करतात. ते धनको व ऋणको यांच्या गरजांमध्ये समतोल साधण्याचा प्रयत्न करतात, तसेच ते अल्पकालीन दायित्वाचे रूपांतरण दीर्घकालीन आयुष्यासाठी करतात. वित्तीय मध्यस्थ बहुसंख्य ऋणकोंना कर्जवितरण करून जोखिमी गुंतवणुकीचे सापेक्षतेने जोखीममुक्त गुंतवणुकीत रूपांतरण करतात. लहान ठेवींचे मोठ्या कर्जाशी आणि मोठ्या ठेवींचे लहान कर्जांशी जुळवणी करतात. जेणेकरून एखाद्या गुंतवणुकीपासून नुकसान झाल्यास त्याची भरपाई दुसऱ्या गुंतवणुकीपासून मिळणाऱ्या नफ्याने होऊ शकते.

वित्तीय मध्यस्थ रोखे विकून निधी उभारतात आणि त्याच वेळी दुसऱ्या बाजारपेठेत रोखे खरेदी करतात. विक्रीला पुरवठा करणे आणि खरेदी करण्याला मागणी करणे असे म्हणतात. वित्तीय मध्यस्थ ठेवी, कर्जे आणि इतर रोखे पुरवितात. त्यानंतर ते कर्जाची आणि इतर गुंतवणुकीची मागणी करतात. यापासून त्यांना व्याजरूपी उत्त्पन्न मिळते. व्याजाच्या उत्पन्नातून वित्तीय मध्यस्थ त्यांच्या कर्जावरील व्याज आणि इतर सोयी पुरविण्याचा खर्च भागवितात. हा खर्च भागविल्यानंतर मध्यस्थाला नफा होतो किंवा वेळप्रसंगी तोटाही होतो. मध्यस्थांना भांडवल पुरविणारे मालक त्यांच्या मध्यस्थांमधील गुंतवणुकीमुळे नफा कमवितात किंवा वेळप्रसंगी तोटाही सहन करतात. अर्थात वित्तीय मध्यस्थ असे व्यवहार करताना वित्तीय बाजारविषयक आणि एकूण आर्थिक परिस्थितीबद्दल सातत्यपूर्ण अभ्यास व विश्लेषण करीत असतात आणि नफा मिळविण्यासाठी कायम प्रयत्नशील असतात. वित्तीय मध्यस्थीच्या आधुनिक सिद्धांतानुसार बाजारातील दोष व माहितीच्या अभावामुळे बचतदार आणि गुंतवणूकदार यांना इष्टतम पद्धतीने रोख्यांची थेट खरेदी-विक्री करण्यास अडथळे येतात. त्यामुळे वित्तीय मध्यस्थ क्रियाशील असतात.

बचतदार आणि गुंतवणूकदार यांच्यातील अंतर वित्तीय मध्यस्थांमुळे कमी होते; कारण त्यांचा बाजारपेठेविषयीचा तुलनात्मक अभ्यास असतो. वित्तीय मध्यस्थांमुळे प्रामुख्याने व्यय-लाभ, अनुमापी अनुकूलता, सोयीनुसार गुंतवणूक, गुंतवणुकीची दर्जेदार निवड, फसवणुकीपासून संरक्षण, किमान जोखीम, जास्त रोखता यांसारखे लाभ प्राप्त होतात; तर पारदर्शकतेचा अभाव, सामाजिक व पर्यावरणीय विषयांकडे कमी लक्ष, वित्तीय बाजारहानीमुळे विकासावर होणारा दुष्परिणाम हे वित्तीय मध्यस्थांचे काही तोटे आहेत; मात्र असे असले, तरी अर्थव्यवस्थेत वित्तीय प्रवाह सातत्यपूर्ण ठेवण्यात वित्तीय मध्यस्थांची भूमिका महत्त्वपूर्ण आहे. वित्तीय मध्यस्थांचे व्यवहार आणि वित्तीय सेवाउद्योगाची वृद्धी यांतून अर्थव्यवस्थेतील एकूण आर्थिक स्थिरता निर्धारित होते.

वित्तीय मध्यस्थ प्रामुख्याने ‘प्राथमिक बाजारपेठ’ आणि ‘संस्थात्मक बचत बाजारपेठ’ या दोन प्रकारच्या बाजारपेठांमध्ये कार्य करतात. मागणीच्या बाजूने हे मध्यस्थ संस्थात्मक बचत बाजारपेठ आणि पुरवठ्याच्या बाजूने प्राथमिक बाजारपेठांमध्ये कार्य करतात. वित्तीय मध्यस्थ निधी मिळविण्याकरिता जो दर देतात आणि कर्ज देताना जो दर आकारतात, या दरांमधील फरक म्हणजे वित्तीय मध्यस्थांचा खर्च असतो.

भारतीय अर्थव्यवस्थेत भारतीय रिझर्व्ह बँक, भारतीय रोखे व विनिमय मंडळ, विमा विनियमन आणि विकास अधिसत्ता, राज्य सरकारे, भारतीय लघुउद्योग विकास बँक आणि भारतीय कृषी व ग्रामीण विकास बँक इत्यादी संस्था वित्तीय मध्यस्थांवर नियामकाची भूमिका बजावितात. भारतीय रिझर्व्ह बँकेचे व्यापारी बँका, अखिल भारतीय वित्तीय संस्था, बॅंकेतर वित्तीय संस्था, बॅंकेतर वित्तीय कंपन्या, भारतीय रोखे बाजार व नाणेबाजार, विदेशी विनिमय बाजार यांवर नियंत्रण असते. भारतीय रोखे व विनिमय मंडळ कायदा १९९२ अनुसार स्थापन झालेल्या भारतीय रोखे व विनिमय मंडळाच्या माध्यमातून भांडवल बाजार, भांडवल बाजार मध्यस्थी, परस्परनिधी, साहस भांडवल निधी यांचे विनियमन केले जाते.

विमा विनियमन आणि विकास कायदा १९९९ अनुसार विमा विनियमन आणि विकास अधिसत्ता अस्तित्वात आली. यांद्वारे सार्वजनिक आणि खाजगी आयुर्विमा आणि बिगरआयुर्विमा कंपन्यांचे विनियमन केले जाते. राज्य सरकार आणि भारतीय लघुउद्योग विकास बँक यांच्या माध्यमातून राज्य वित्तीय महामंडळे आणि राज्य औद्योगिक विकास महामंडळांचे विनियमन केले जाते. भारतीय कृषी व ग्रामीण विकास बँकेद्वारा ग्रामीण सहकारी बँका व प्रादेशिक ग्रामीण बँकांचे विनियमन केले जाते. या संस्थांच्या विनियमनामागील मुख्य उद्देश म्हणजे ग्राहकांच्या हितसंबधांचे रक्षण करणे, ग्राहक आणि वित्तीय मध्यस्थांना मार्गदर्शन व सहकार्य करणे आणि त्यांच्या समस्यांची सोडवणूक करून अर्थव्यवस्थेची प्रगती आणि वृद्धी साध्य करणे, हे आहे.

संदर्भ :

  • देशपांडे, श्रीधर; देशपांडे, विनायक, वित्तीय संस्था आणि वित्तीय बाजार, २००४.
  • David S. Sills, International Encyclopedia of the Social Sciences, Vol. 5, 1968.
  • Pathak, Bharati, The Indian Financial System Markets, Institutions and Services, 2011.

समीक्षक : निर्मल भालेराव