क्वेंटीन टॅरेंटीनो : ( २७ मार्च १९६३ ).
विख्यात अमेरिकन चित्रपटलेखक, दिग्दर्शक, निर्माता व अभिनेता. त्याचा जन्म नॉक्सव्हिल-टेनेसी (अमेरिका) येथे झाला. लहानपणापासूनच त्याला चित्रपटाची आवड होती. मोठे होऊन चित्रपटांमध्ये अभिनेता होण्याची त्याची इच्छा होती. वयाच्या १५-१६व्या वर्षी टॅरेंटीनोने एका कामुकपट प्रदर्शित करणाऱ्या चित्रपटगृहात पहिली नोकरी केली. त्यानंतर तो एका दृश्यफीत (व्हिडिओ) ग्रंथालयात नोकरी करू लागला. तेथे मिळणाऱ्या पगारावर त्याने माय बेस्ट फ्रेंड्स बर्थडे हा आपला पहिला चित्रपट बनवण्याचा प्रयत्न केला. मात्र हा चित्रपट प्रदर्शित करणे त्याला जमले नाही. मग तो अभिनेता म्हणून दूरचित्रवाणीवर छोटीमोठी कामे करू लागला.
कारकिर्दीचे प्रमुख टप्पे :
टॅरेंटीनोला पहिली महत्त्वाची संधी फ्रॉम डस्क टिल डॉन या चित्रपटातून मिळाली. या चित्रपटाची पटकथा त्याने लिहिली; मात्र त्याचा पहिला प्रदर्शित झालेला चित्रपट ठरला रेजरव्हॉर डॉग्ज (१९९२). गुन्हेगारी विश्वाच्या पार्श्वभूमीवर हा चित्रपट बेतलेला होता. या चित्रपटाचे लेखन-दिग्दर्शन टॅरेंटीनोने केले असून त्यात त्याने अभिनयही केला. फ्रान्सच्या प्रतिष्ठित कान चित्रपट महोत्सवात हा चित्रपट प्रदर्शित झाला. एम्पायर या चित्रपटसंबंधित साप्ताहिकाने रेजरव्हॉर डॉग्ज या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट ‘इन्डिपेन्डन्टʼ चित्रपट म्हणून गौरविले. पुढे पल्प फिक्शन (१९९४) या चित्रपटामुळे टॅरेंटीनोला दिग्दर्शक म्हणून जागतिक कीर्ती लाभली.
१९९७ साली दिग्दर्शक म्हणून टॅरेंटीनोचा जॅकी ब्राउन हा तिसरा चित्रपट प्रदर्शित झाला. रम पंच या कादंबरीवर आधारित ह्या चित्रपटात कृष्णवर्णीयांचे शोषण हा विषय होता. १९७०च्या दशकात अशा प्रकारचे अनेक चित्रपट अमेरिकेत बनले होते. जॅकी ब्राउन या चित्रपटासाठी टॅरेंटीनोला तत्कालीन चित्रपटांतूनच प्रेरणा मिळाली. यात प्रथमच त्याने रॉबर्ट डी निरो या प्रसिद्ध अभिनेत्याबरोबर काम केले व पल्प फिक्शननंतर सॅम्यूएल एल. जॅक्सन या कृष्णवर्णीय अभिनेत्यासोबत दुसऱ्यांदा काम केले. टॅरेंटीनोच्या एकूण ८ चित्रपटांपैकी ६ चित्रपटांमध्ये सॅम्यूएल एल. जॅक्सन याने अभिनय केला आहे.
टॅरेंटीनोवर जगभरातल्या ‘कुंग फुʼ चित्रपटांचा कायम प्रभाव होता. त्याच्या किल बिल : व्हॉल्यूम वन (२००३) आणि किल बिल : व्हॉल्यूम टू (२००४) या चित्रपटांमध्ये तो प्रभाव स्पष्ट दिसून येतो. नंतर २००७ साली डेथ प्रूफ हा चित्रपट टॅरेंटीनोने त्याचा मित्र, दिग्दर्शक रॉबर्ट रॉड्रीगेस याच्या प्लॅनेट टेररसोबत ग्राइंडहाउस या शीर्षकाने प्रदर्शित केला. हे दोन्ही चित्रपट कनिष्ठ दर्जाच्या मानल्या जात असलेल्या एक्स्प्लॉयटेशन चित्रपटाने प्रेरित होते. त्याचे काही चित्रपट इतिहासासंदर्भात होते, मात्र त्यांना ऐतिहासिक पट म्हणता येणार नाही. इतिहासाची पार्श्वभूमी वापरून त्याने आपल्या चित्रपटांतून समांतर काल्पनिक इतिहास मांडला. इनग्लोरिअस बास्टर्ड्स (२००९), जँगो अनचेन्ड (२०१२) आणि दी हेटफूल एट (२०१५) या चित्रपटांना समीक्षकांची व प्रेक्षकांची फार पसंती मिळाली. तसेच अनेक पुरस्कारही लाभले.
दिग्दर्शन शैली :
टॅरेंटीनो कायम चर्चेत राहिला ते त्याच्या चित्रपटात दाखविण्यात येणाऱ्या हिंसेमुळे. अनेक समीक्षकांच्या मते, एकविसाव्या शतकातील सर्वांत प्रभावी दिग्दर्शकांपैकी तो एक आहे. त्याचे चित्रपट अनेक गोष्टींसाठी लक्ष्यवेधी ठरले. विषयबाह्य संवाद, यथाक्रम नसलेले संकलन, कृष्णवर्णीयांचे शोषण व गुन्हेगारी विश्वाची पार्श्वभूमी इत्यादी विषयांचा त्यांमध्ये समावेश आहे. यांत यथाक्रम नसलेल्या संकलनामुळे चित्रपटाचे घटनाक्रम बदलले जातात, हे त्याच्या शैलीचे ठळक वैशिष्ट्य. टॅरेंटीनो चित्रपट बनविण्यासाठी नेहमी डिजिटलऐवजी चित्रपट रीळच्या तंत्रज्ञानाला विशेष प्राधान्य देतो.
महत्त्वाचे चित्रपट :
अनेक समीक्षकांच्या मते पल्प फिक्शन हा जगातील सर्वोत्तम चित्रपटांपैकी एक आहे. २०व्या शतकाच्या सुरुवातीला अमेरिकेत स्वस्त कागदांवर छापलेल्या कथा-कादंबऱ्या फार प्रसिद्ध होत होत्या. त्यांतील आशय बराचसा अश्लील व हिंसात्मक असे. त्या कथा-कादंबऱ्यांना पल्प फिक्शन असे म्हणत. यावरूनच टॅरेंटीनोने हा चित्रपट बनवला होता. किल बिल : व्हॉल्यूम वन आणि किल बिल : व्हॉल्यूम टू हे त्याचे दोन चित्रपट वेगवेगळे प्रदर्शित झाले असले, तरी टॅरेंटीनो या चित्रपटांना एकच चित्रपट मानतो. गुन्हेगारी विश्वात कार्यरत असलेली एक स्त्री, ती आई होणार आहे हे कळल्यावर त्या विश्वापासून लांब जाऊ पाहते; मात्र तिचा त्या विश्वातला सर्वेसर्वा ‘बिलʼ या इसमाला हे कबूल नसते. तो तिला अनेक वेळा संपवण्याचा प्रयत्न करत असतो; मात्र ती स्त्री त्यातून वाचत असते. या दोन्ही चित्रपटांत तिचा हा संघर्ष व तिने घेतलेला सूड असे कथानक आहे. इनग्लोरिअस बास्टर्ड्स या चित्रपटातून टॅरेंटीनोने काल्पनिक समांतर इतिहास मांडला आहे. या चित्रपटात जर्मनीचा हुकूमशहा हिटलर याच्या खुनाचा कट रचला जातो व त्याला मारण्यात येते.
पुरस्कार :
चित्रपट | वर्ष | पुरस्कार |
पल्प फिक्शन | सर्वोत्कृष्ट स्वतंत्र पटकथा-१९९४ | ऑस्कर पुरस्कार |
कान चित्रपटमहोत्सव-१९९४ | पाम डी’ओर | |
सर्वोत्कृष्ट स्वतंत्र पटकथा-१९९४ | बाफ्टा पुरस्कार | |
सर्वोत्कृष्ट पटकथा-१९९४ | गोल्डन ग्लोब पुरस्कार | |
जँगो अनचेन्ड | सर्वोत्कृष्ट स्वतंत्र पटकथा-२०१२ | ऑस्कर पुरस्कार |
सर्वोत्कृष्ट स्वतंत्र पटकथा-२०१२ | बाफ्टा पुरस्कार | |
सर्वोत्कृष्ट पटकथा-२०१२ | गोल्डन ग्लोब पुरस्कार |
चित्रपटांची सूची :
१ | रेजरव्हॉर डॉग्ज | दिग्दर्शक, पटकथालेखक, अभिनेता | १९९२ |
२ | ट्रू रोमांस | पटकथालेखक | १९९३ |
३ | पल्प फिक्शन | दिग्दर्शक, पटकथालेखक, अभिनेता | १९९४ |
४ | नॅचरल बॉर्न किलर्स | कथालेखक | १९९४ |
५ | फ्रॉम डस्क टिल डॉन | पटकथालेखक, निर्माता, अभिनेता | १९९६ |
६ | जॅकी ब्राउन | दिग्दर्शक, पटकथालेखक, निर्माता, अभिनेता | १९९७ |
७ | किल बिल : व्हॉल्यूम वन | दिग्दर्शक, पटकथालेखक, अभिनेता | २००३ |
८ | किल बिल : व्हॉल्यूम टू | दिग्दर्शक, पटकथालेखक | २००४ |
९ | डेथ प्रूफ | दिग्दर्शक, पटकथालेखक, निर्माता, अभिनेता | २००७ |
१० | इनग्लोरिअस बास्टर्ड्स | दिग्दर्शक, पटकथालेखक, अभिनेता | २००९ |
११ | जँगो अनचेन्ड | दिग्दर्शक, पटकथालेखक, अभिनेता | २०१२ |
१२ | दि हेटफूल एट | दिग्दर्शक, पटकथालेखक | २०१५ |
समीक्षक : गणेश मतकरी