कश्यप, अनुराग : ( १० सप्टेंबर १९७२ ). प्रसिद्ध भारतीय चित्रपट दिग्दर्शक, निर्माते, लेखक आणि अभिनेते. त्यांचा जन्म गोरखपूर (उत्तर प्रदेश) येथे झाला. अनुराग यांची गणना सध्याचे आघाडीचे प्रयोगशील चित्रपट दिग्दर्शक म्हणून होते. त्यांच्या वडिलांचे नाव श्रीप्रकाश सिंह. अनुराग यांचे प्राथमिक शिक्षण ग्रीन स्कूल, डेहराडून व ग्वाल्हेर येथील सिंदिया स्कूलमधून झाले. सुरुवातीच्या काळात शास्त्रज्ञ बनण्याची इच्छा असल्यामुळे त्यांनी दिल्लीच्या हंसराज कॉलेजमधून दिल्ली विद्यापीठाची प्राणिविज्ञान विषयात पदवी संपादन केली (१९९३). त्यांनी अभिनयाच्या आवडीने अनेक पथनाट्यांमध्ये भाग घेतला होता. आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात पाहिलेल्या बायसिकल थीव्ह्ज  या चित्रपटाने ते प्रभावित झाले. त्यांनी चित्रपट दिग्दर्शक व्हायचे ठरविल्यानंतर ते मुंबईला आले.

अनुराग यांनी दूरदर्शनसाठी काही मालिका (कभी कभी -१९९७) लिहिल्यानंतर त्यांना अभिनेते मनोज वाजपेयी यांच्या ओळखीने प्रसिद्ध दिग्दर्शक राम गोपाल वर्मा यांच्या सत्या (१९९८) या चित्रपटाचा सहलेखक म्हणून काम करण्याची संधी मिळाली. हा चित्रपट मुंबईतील गुन्हेगारी विश्वावर आधारित होता. याला खूप प्रसिद्धी मिळाली. सत्या  हा सर्वोत्तम भारतीय गुन्हेगारी पटांमधील एक मानला जातो. यानंतर कौन  या चित्रपटाचे लेखन आणि शूल  या चित्रपटाचे संवादलेखन (१९९९) यांसाठी त्यांनी राम गोपाल वर्मांना साहाय्य केले.

पुण्यातील गाजलेल्या जोशी-अभ्यंकर हत्याकांडावर आधारीत असणारा पाँच  हा चित्रपट दिग्दर्शक म्हणून अनुराग यांनी बनवलेला पहिला चित्रपट होय (२००३). पण केंद्रीय अभ्यवेक्षण समितीने (सेन्सॉर बोर्ड) बंदी आणल्यामुळे हा प्रदर्शित होऊ शकला नाही. प्रसिद्ध दिग्दर्शक मणिरत्नम् यांच्या २००४ साली आलेल्या युवा या चित्रपटासाठी त्यांनी संवाद लेखन केले. दीपा मेहता दिग्दर्शित वॉटर  या वादग्रस्त चित्रपटाचे संवादही अनुराग यांचेच (२००५).

गुन्हेगारी विश्वाचे वार्तांकन करणारे प्रसिद्ध पत्रकार एस. हुसेन झैदी यांनी मुंबईतील १९९३ च्या बॉम्बस्फोट मालिकेवर आधारित ब्लॅक फ्रायडे (२००२) हे पुस्तक लिहिले. यावर आधारित त्याच नावाचा चित्रपट अनुराग यांनी काढला (२००४). या चित्रपटावर केंद्रीय अभ्यवेक्षण मंडळाने मुंबई बॉम्बस्फोट खटल्याचा निकाल लागेपर्यंत तीन वर्षांकरिता बंदी घातली. २००७ मध्ये प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने प्रेक्षक आणि समीक्षकांची वाहवा मिळवली. याच वर्षी आलेल्या नो स्मोकिंग  या चित्रपटाला मात्र प्रेक्षक आणि समीक्षकांनी नाकारले. अमेरिकन रहस्य कथालेखक स्टीफन किंग यांच्या लघुकथेपासून प्रेरणा घेऊन हा चित्रपट बनवण्यात आला होता. २००९ मध्ये त्यांनी पटकथालेखन, दिग्दर्शन व अभिनय केलेल्या देव डी  या ‘देवदास’ च्या आधुनिक अवताराला प्रेक्षक आणि समीक्षकांनी पसंती दर्शवली. या चित्रपटाचे लेखनही त्यांनीच केले होते. गुलाल  या त्याच वर्षी प्रदर्शित झालेल्या चित्रपटाला मात्र समीक्षकांची पसंती मिळूनही, प्रेक्षकांनी त्याकडे पाठ फिरवली.

दॅट गर्ल इन यलो बूट्स (२०११) हा केवळ अकरा दिवसांत पूर्ण चित्रित केलेला चित्रपट समीक्षकांच्या पसंतीस उतरला. गँग्स ऑफ वासेपूर (२०१२) हा दोन भागांत प्रदर्शित करण्यात आलेला चित्रपट धनबाद येथील कोळसा माफिया आणि त्यांच्या गुन्हेगारी जगतावर प्रकाश टाकणारा होता. हे चित्रपट टोराँटो, व्हेनिस, लॉस अँजेल्स आणि लंडन येथे विविध आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात दाखवण्यात आले. यानंतर बॉम्बे टॉकीज (२०१३), अग्ली (२०१४), बॉम्बे वेलव्हेट (२०१५), रमन राघव २.० (२०१६) असे विविध विषयांवरचे चित्रपट अनुराग यांनी दिग्दर्शित केले.

अनुराग यांनी विशेषत: ‘फिल्म – न्वॉर’ प्रकारात चित्रपट निर्मिती केली. त्यांचे चित्रपट बरेचदा वास्तव घटनांवरून प्रेरित होऊन बनविले जातात. चित्रपटाच्या यशापयशाची आणि अभ्यवेक्षणाची चिंता न करता त्यांनी विविध विषय हाताळले. चित्रीकरणस्थळांवर ‘गरीला फिल्ममेकिंग तंत्र’ याचा वापर, लपवलेल्या आणि हातात पकडण्यास सुलभ अशा कॅमेऱ्यांचा वापर, संवादांमध्ये ऐनवेळी सुधारणा ही त्यांच्या चित्रपटशैलीची खास वैशिष्ट्ये होत. अंगावर येणारी हिंसाचाराची दृश्ये, चित्र-विचित्र स्वरूपाची अनैतिक कृत्ये करणारी पात्रे, अशा पात्रांच्या मनोभूमिकेचे केलेले प्रभावी विश्लेषण, बहुतांश चित्रपटांमध्ये न-दिसणारे जग खोलात शिरून दाखवणे, वास्तववादी भासणारे चित्रण, संगीताचा वैशिष्ट्यपूर्ण वापर या त्यांच्या चित्रपटांमध्ये आढळून येणाऱ्या ठळक गोष्टी आहेत.

अनुराग यांनी ‘अनुराग कश्यप फिल्म्स’ आणि ‘फँटम फिल्म्स’ या दोन चित्रपटनिर्मिती संस्थांची स्थापना केली आहे. दिग्दर्शक विक्रमादित्य मोटवाणे, दिग्दर्शक विकास बहेल आणि निर्माता मधू मँटेना हे ‘फँटम फिल्म्स’ संस्थेचे भागीदार व संचालक आहेत. उडान, शैतान, चितगाँव, अय्या, लव शव ते चिकन खुराना, लंचबॉक्स अशा चित्रपटांची ‘अनुराग कश्यप फिल्म्स’ने निर्मिती केली आहे. तर ‘फँटम फिल्म्स’ने लुटेरा, हसी तो फसी, क्वीन, मसान, एन एच १०, हंटर, शानदार, उडता पंजाब या वैविध्यपूर्ण विषयांवरील चित्रपटांची निर्मिती केली.

दिग्दर्शन, पटकथालेखन आणि चित्रपटनिर्मिती याव्यतिरिक्त अनुराग यांनी ब्लॅक फ्रायडे, नो स्मोकिंग, लक बाय चान्स, तृष्णा, भूतनाथ रिटर्न्स, आय ॲम, शागीर्द, अकिरा इत्यादी चित्रपटांमधून भूमिकाही केल्या आहेत. ते मुंबईच्या ‘आंगन’ या गरीब आणि अनाथ मुलांसाठी कार्य करणाऱ्या संस्थेचे मानद सभासद आहेत.

अनुराग यांनी प्रसिद्ध चित्रपट संपादिका आरती बजाज यांच्याशी आणि त्यांपासून विभक्त झाल्यानंतर (२००९) अभिनेत्री कल्की कोचलीनशी विवाह केला (२०१३). पण हे ही विवाहबंधन टिकले नाही. दिग्दर्शक अभिनव कश्यप हे अनुराग यांचे सख्खे भाऊ. त्यांची बहीण अनुभूती कश्यपने सुरुवातीच्या काळात त्यांच्या काही चित्रपटांसाठी साहाय्यक म्हणून काम पाहिले.

अनुराग यांना फ्रान्स सरकारतर्फे कान फिल्म फेस्टिवलमध्ये नाईट ऑफ द ऑर्डर ऑफ आर्ट्स अँड लेटर  (Ordre Des Arts et des Letters) हा पुरस्कार प्रदान करण्यात आला (२०१३). उत्तर प्रदेश सरकारतर्फे यश भारती पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आले (२०१६). सत्या  या चित्रपटाच्या सहलेखनासाठी स्क्रीन पुरस्कार (१९९९). लास्ट ट्रेन टू महाकाली  या लघुपटाला स्क्रीन पुरस्कार (२०००). तिसऱ्या वार्षिक लॉस अँजेल्स इंडियन फिल्म फेस्टिव्हलमध्ये ब्लॅक फ्रायडे या चित्रपटास ग्रँड ज्यूरी पुरस्कार. उडान  या चित्रपटाच्या कथालेखनासाठी फिल्मफेअर पुरस्कार (२०११). गँग्ज ऑफ वासेपूरच्या संवाद लेखनासाठी फिल्मफेअर पुरस्कार (२०१२) इत्यादी पुरस्कार त्यांना मिळाले आहेत. विविध आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात ज्यूरी म्हणून त्यांनी काम पाहिले आहे.

समीक्षक : मनीषा पोळ