लांग, फ्रिट्झ : (५ डिसेंबर १८९० – २ ऑगस्ट १९७६). प्रसिद्ध जर्मन-अमेरिकन चित्रपट दिग्दर्शक. त्याचे पूर्ण नाव फ्रिड्रिख क्रिस्तीआन आंतोन फ्रिट्झ लांग (Friedrich Christian Anton Fritz Lang) होय. त्याचा जन्म व्हिएन्ना, ऑस्ट्रिया येथे झाला. त्याने स्थापत्यशास्त्राचे आणि चित्रकलेचे प्रशिक्षण घेतलेले होते. १९१८ साली तो बर्लिनमध्ये आला आणि पटकथालेखन करू लागला. त्यानंतर तो दिग्दर्शनाच्या क्षेत्रात उतरला. दोन महायुद्धांदरम्यानच्या काळात आपल्या चित्रपटांच्या कलात्मक वैशिष्ट्यांद्वारे चित्रपटांमध्ये नावीन्य आणणाऱ्या युरोपीय दिग्दर्शकांमध्ये फ्रिट्झचे नाव महत्त्वाचे आहे.
गुन्हेगारी मानसिकता आणि सर्वसामान्य माणसाची मानसिकता यांत साधर्म्य असते आणि गुन्हेगारी कथांद्वारे समाजाविषयी भाष्य करता येते, अशी कल्पना फ्रिट्झच्या अनेक चित्रपटांमागे आहे. उदा. डॉ. माब्यूज द गॅम्बलर (१९२२) या त्याच्या चित्रपटात एक प्रतिभावान पण माथेफिरू माणूस जगावर ताबा मिळवू पाहतो. मिथककथा असलेल्या निबेलुंगेन भाग १ व २ (१९२४, १९२६) आणि काल्पनिक विज्ञानकथा असलेल्या मेट्रोपलिस (१९२७) या भव्य चित्रपटांनी लांगला आंतरराष्ट्रीय ख्याती मिळवून दिली. लांगने या चित्रपटांत उभी केलेली कृत्रिम प्रतिसृष्टी, त्यांतील नाट्यमय स्थापत्य, समूहदृश्ये आणि अभूतपूर्व दृश्यसंकल्पना प्रेक्षकांना थक्क करून गेली. भौमितिक आकृतिबंधांचा या चित्रपटांतला वापर कथेतल्या भावभावना दृग्गोचर करतो. ही शैली जर्मन एक्स्प्रेशनिझम म्हणून ओळखली जाते. मेट्रोपलिसमधील स्थापत्य पुढे अनेक चित्रपटांमधील भविष्यवेधी शहर स्थापत्यासाठी प्रेरणादायी ठरले.
M (१९३१) ह्या लांगच्या पहिल्या बोलपटात त्याने प्रकाशयोजना आणि ध्वनी यांचा उत्कट आणि नाट्यमय वापर केला आहे. लहान मुलींचे निर्घृण खून करणारा पण प्रेक्षकांची सहानुभूती मिळवणारा करुण नायक यात लांगने दाखविला आहे. खुनांच्या या मालिकेमुळे शहरात जी खळबळ उडते, त्याचे एक परिणामस्वरूप म्हणून पोलीस आणि संघटित गुन्हेगार खुन्याला पकडण्यासाठी एकत्र येतात. लांग या दोघांमधली साम्यस्थळे दाखवितो. जोवर शहरात शांतता प्रस्थापित होत नाही, तोवर उद्योगधंदे सुरळीत होऊ शकणार नाहीत आणि ते सुरळीत होण्यात दोन्ही संघटनांचे हितसंबंध गुंतलेले असतात. खुन्याला पकडून त्याची गैरकृत्ये थांबवण्यापेक्षा हे अधिक महत्त्वाचे आहे, हे ठसवून लांगने त्यात आधुनिक भांडवलशाही समाजव्यवस्थेविषयी नैतिक भाष्य केले आहे. त्यात अतिरेकी राष्ट्रवादावर टीका आहे असेही मानले गेले. त्यामुळे पुढे नाझी सत्तेवर आल्यानंतर या चित्रपटावर बंदी घालण्यात आली.
द टेस्टामेंट ऑफ डॉ. माब्यूज (१९३२) हा लांगचा पुढील चित्रपट नाझींवरील टीकेमुळे आणि हिंसेमुळे अभ्यवेक्षणामध्ये (सेन्सॉरशिप) अडकला. मात्र, जर्मनीतील नाझीसरकार-नियंत्रित चित्रपट व्यवसायात लांगने महत्त्वाची जबाबदारी स्वीकारावी अशी हिटलरची इच्छा होती. हिटलरची तत्त्वप्रणाली अमान्य असल्यामुळे लांगने अशी जबाबदारी स्वीकारली नाही. त्याऐवजी जर्मनी सोडून तो आधी फ्रान्सला गेला (१९३३) आणि अखेर अमेरिकेत स्थायिक झाला (१९३४). त्याने आपली पुढची कारकीर्द हॉलिवूडमध्ये घडवली. १९३९मध्ये त्याने अमेरिकेचे नागरिकत्व घेतले.
हॉलिवूडच्या मागणीनुसार लांगने गुन्हेगारी पार्श्वभूमीचे अनेक व्यावसायिक चित्रपट केले. जर्मन एक्स्प्रेशनिझम शैलीमध्ये लांगने पूर्वी रूढ केलेल्या दृश्यरचना आणि प्रकाशयोजनेचे संकेत त्याने या गुन्हेपटांत परिणामकारकरीत्या वापरून अमेरिकन चित्रपटांना वेगळे आयाम दिले. फिल्म न्वार या अमेरिकन शैलीचा उद्गम आणि विकास यांमागे लांगने त्याच्या चित्रपटांत केलेले अधोविश्वाचे शैलीदार गडद चित्रण हा एक कळीचा घटक आहे. उदा. स्कार्लेट स्ट्रीट (१९४५), द बिग हीट (१९५३) हे चित्रपट. त्याच्या अनेक गुन्हेपटांत निरपराधी सामान्य माणसावर खोटा आळ आणला जातो आणि तो आपल्यावरच्या अन्यायाचा सूड घेतो असे कथासूत्र आढळते. मात्र, सूड घेताना सामान्य माणूस आपले माणूसपण हरवण्याचा धोका पत्करत असतो, अशी रूढ गुन्हेपटांहून वेगळी मांडणीही लांग करतो. उदा. फ्यूरी (१९३६) हा चित्रपट. याशिवाय त्याने काही नाझीविरोधी चित्रपटही केले. नाझीविरोधी चित्रपटांपैकी एक हँगमेन ऑल्सो डाय (१९४३) याची पटकथा प्रख्यात नाटककार व विचारवंत बर्टोल्ट ब्रेख्त याने लिहिली होती. बातमीसाठी नैतिकतेचा बळी देण्याच्या अमेरिकन प्रसारमाध्यमांच्या प्रवृत्तीवर त्याच्या चित्रपटांमध्ये काही वेळा टीका आढळते. उदा. बियाँड अ रीझनेबल डाऊट (१९५६) या चित्रपटात परिस्थितीजन्य पुराव्यांवर फाशीची शिक्षा देणे किती धोक्याचे आहे, हे न्यायव्यवस्थेला दाखवून देण्यासाठी एका वर्तमानपत्राचा मालक एका निरपराध माणसावर खुनाचा खोटा आळ आणतो.
आपल्या कारकीर्दीच्या अखेरीला लांग जर्मनीत परतला आणि त्याने दोन जर्मन चित्रपट भारतात चित्रित केले – टायगर ऑफ एश्नापूर आणि इंडियन टूम्ब (दोन्ही १९५९). तसेच, डॉ. माब्यूजवर आधारित थाऊजंड आईज ऑफ डॉ. माब्यूज (१९६०) हा चित्रपट दिग्दर्शित केला.
लांगचे जर्मन चित्रपट त्यांच्या प्रयोगशीलतेमुळे चित्रपटांच्या इतिहासात महत्त्वाचे मानले जातात. त्यांनी या माध्यमाच्या नव्या शक्यता दाखवून त्याच्या कक्षा विस्तारल्या. समाजात सामान्य माणसाचे स्थान काय असावे याविषयीच्या त्याच्या नैतिक भूमिकेमुळे त्याचे अमेरिकन चित्रपट नावाजले जातात. सूड, सत्तापिपासा, समूहाची मानसिकता नियंत्रित करू पाहणारे माथेफिरू, असे काही विषय त्याच्या चित्रपटांत सातत्याने दिसतात. अपघाताने किंवा योगायोगाने एखादी व्यक्ती असामान्य परिस्थितीत अडकते आणि बघताबघता तिच्या आयुष्याला भलतीच कलाटणी मिळून ते नियंत्रणाबाहेर जाते, हे सूत्र लांगच्या चित्रपटांत सातत्याने आढळते. केवळ विवेकवादी दृष्टिकोन बाळगून जगणे पुरेसे नसते; तसेच, समाज सुरळीत चालावा म्हणून माणसाने उभ्या केलेल्या व्यवस्था व आखलेल्या चौकटी जगण्यासाठी पुरेशा पडत नाहीत, असा प्रत्यय त्याच्या चित्रपटांतील व्यक्तिरेखा देत असतात. माणसे मूलतः सुष्ट किंवा दुष्ट नसतात; व्यवस्था मात्र भ्रष्ट असते, सत्ताधारीही भ्रष्ट आणि अनैतिक असतात; सामान्य व्यक्ती जेव्हा अशा परिस्थितीशी झगडू पाहतात, तेव्हा त्यांच्या नैतिकतेची कसोटी लागते, असे सूत्रही त्याच्या अनेक चित्रपटांत आहे. लांगने मोठ्या स्टुडिओसाठी भव्य सेट उभे केलेले चित्रपट केले तसेच छोट्या स्तराचे व्यक्तिगत नाट्य उभे करणारे चित्रपटही केले. व्यावसायिक जगताच्या मागणीनुसार लोकप्रिय चित्रपट करतानाही त्याने दाखवलेले कलात्मक भान आणि जपलेली व्यक्तिगत शैली यांमुळे लांगचे स्थान या चित्रपटविश्वात अनन्यसाधारण आहे.
जर्मन सिनेमातील योगदानासाठी १९६३ साली लांगला जर्मन फिल्म अकॅडमीने विशेष पुरस्काराने सन्मानित केले. अमेरिकन अकॅडमी फिल्म आर्काइव्हमध्ये लांगच्या काही चित्रपटांचे राष्ट्रीय ठेवा म्हणून जतन केलेले आहे, तर मेट्रोपलिस हा चित्रपट युनेस्कोच्या ’मेमरी ऑफ द वर्ल्ड’ या प्रकल्पांतर्गत जतन केला आहे.
संदर्भ :
- Barry Keith Grant, Schirmer Encyclopedia of Film, Schirmer Reference, Detroit, USA, 2007.
- Greenwood Press, Ed. Geoff Mayer and Brian McDonnell, Encyclopedia of Film Noir, Westport, CT USA, 2006.
- Oxford University Press, Ed. Geoffrey Nowell-Smith, Oxford History of World Cinema, Oxford, UK, 1996.
समीक्षक : अभिजित देशपांडे