बेंटिक, लॉर्ड विल्यम हेन्री कॅव्हेंडिश : (१४ सप्टेंबर १७७४ — १७ जून १८३९). ब्रिटिशांकित हिंदुस्थानचा पहिला गव्हर्नर जनरल (१८२७ — ३५). पोर्टलॅंडच्या सधन उमराव घराण्यात लंडन येथे जन्म झाला. त्याचे वडील विल्यम हेन्री व आई लेडी डॉरोथी हे राजकीय परंपरा असलेल्या घराण्यातील होते. प्राथमिक शिक्षण घेऊन तो भूदलात ‘कोल्डस्ट्रिम गार्ड्‌स’ मध्ये अधिकारी झाला (१७९१) आणि पुढे लवकरच लेफ्टनंट कर्नल झाला.

काही वर्षे ‘ड्यूक ऑफ यॉर्क’ चा परिसहायक म्हणून त्याने काम केले आणि बाविसाव्या वर्षी तो ब्रिटिश संसदेवर निवडून आला. १७९९ मध्ये रशियन व ऑस्ट्रियन सैन्याच्या प्रमुख कॅंपवर त्यास जावे लागले. त्या वेळी फ्रेंचांबरोबर अनेक लढायांत तो हजर होता. त्याने गॉसफॉर्डच्या सरदार घराण्यातील लेडी मारी ॲचसन हिच्याशी लग्न केले (१८०३). त्याची मद्रासचा गव्हर्नर म्हणून नेमणूक झाली (१८०३). त्या वेळी ब्रिटिशांची सत्ता टिपूनंतर मद्रास इलाख्यात स्थिर होत होती. बेंटिकच्या सहकार्‍यांनी ‘रयतवारी पद्धत’ चालू करावी, अशी सूचना केली; तथापि वेल्लोरच्या हिंदू शिपायांनी टिपूच्या मुलांच्या प्रेरणेने बंड केले (१८०६). यात बरेच ब्रिटिश अधिकारी ठार झाले. तेव्हा ईस्ट इंडिया कंपनीच्या संचालकांनी बेंटिंकवर त्याचा ठपका ठेवून त्यास परत बोलाविले (१८०७). बेंटिंकने या कृत्याचा तीव्र शब्दांत निषेध केला. अप्रत्यक्षपणे तोच या घटनेस जबाबदार आहे, असा आरोप त्याच्यावर लादण्यात आला. इंग्लंडला गेल्यावर मेजर जनरल हा हुद्दा देऊन त्यास पोर्तुगालला पाठविण्यात आले. त्यानंतर त्याने सर जॉन मुर, आर्थर वेलस्ली वगैरे मातब्बर सेनानींच्या हाताखाली काम केले. पुढे १८११ मध्ये नेपल्स येथे राजदूत म्हणून त्यास पाठविण्यात आले. तेथे त्याला जवळजवळ गव्हर्नर म्हणूनच काम करावे लागले. जेनोआ येथे तो १८१४ मध्ये काही काळ होता. त्या वेळी त्याने १७९७ च्या जुन्या प्रजासत्ताक संविधानाचे पुनरुज्जीवन केले. त्यामुळे टोरी शासनाचा त्याच्यावरील विश्वास पूर्णतः नष्ट झाला व परिणामतः त्याला पुढील १२ वर्षे बेकारीत काढावी लागली. यातील काही वर्षे त्याने इटलीत काढली. जॉर्ज कॅनिंग इंग्लंडचा पंतप्रधान झाला (१८२७). त्या वेळी त्याने बेंटिंकची पूर्वसेवा लक्षात घेऊन बंगालचा गव्हर्नर जनरल म्हणून त्याची नेमणूक केली (१८२७).

बेंटिकने आपल्या दहा वर्षांच्या कारकिर्दीत हिंदुस्थानात अनेक मौलिक सुधारणा केल्या : प्रथम त्याने शासकीय खर्चात काटकसर केली; लष्करातील नोकरांचा भत्ता कमी केला आणि वायव्य सरहद्द प्रांतात जमीन महसुलाची पद्धत चालू केली; लागवडीस आणलेल्या जमिनीवर कर बसविला; त्याच्या कारकिर्दीत प्रथमच हिंदी लोकांच्या सहायक दंडाधिकारी व दुय्यम न्यायाधीश या पदांवर नेमणुका करण्यात आल्या आणि जिल्हा दंडाधिकारी व जिल्हाधिकारी यांची कामे एकत्र करण्यात आली; आयुक्तांची नवी पदे निर्माण करण्यात आली; भारतीय समाजात काही परंपरागत सनातनी चाली होत्या; त्यांपैकी सती जाण्यास त्याने बंदी करून हळूहळू ती चाल कायद्याने बंद केली. त्याचप्रमाणे ठगीची पद्धत होती; तीत यात्रेकरूंचा छळ करून त्यांना मारण्यात येई. काही वेळा त्यांना कालिमातेला नरबळी म्हणून देत; बेंटिंकने कायदे करून ही चाल बंद केली आणि ठग लोकांचा पुरा बंदोबस्त केला. १८३१—३७ या सात वर्षांत तीन हजार ठग पकडण्यात आले, त्यांना शिक्षा करण्यात आल्या. ज्यांनी अपराध कबूल केले, त्यांना क्षमा करून शेती-भाती देऊन उद्योगास लावले. येथील लोकांना पाश्चात्त्य पद्धतीचे शिक्षण देण्यासाठी त्याने लॉर्ड टॉमस मेकॉलेच्या सल्ल्याप्रमाणे इंग्रजी भाषा माध्यम म्हणून ठरवून फार्सी व संस्कृत या भाषांचा शासनातील वापर कमी केला. ब्रिटिश सरकार शिक्षणासाठी जो पैसा देईल, त्याचा विनियोग हिंदी लोकांना इंग्रजी भाषा व पाश्चिमात्यांची शास्त्रे शिकविण्यासाठीच करावा, असे ठरले. कलकत्त्यास मानवी वैद्यकाचे शिक्षण देणारी एक संस्था स्थापन केली.

हिंदी संस्थानिकांचे बाबतीत बेंटिंकचे धोरण सबुरीचे व अलिप्तपणाचे होते. ग्वाल्हेर, भोपाळ, जयपूर व बडोदे ह्या संस्थानिकांच्या वागणुकीत विरोधी सूर असूनही त्यांच्याकडे त्याने कानाडोळा केला; मात्र काचार, कुर्ग व जैंतिया ही संस्थाने त्याने खालसा केली आणि ब्रिटिश राज्यात समाविष्ट केली. म्हैसूर संस्थानात गोंधळ होता, म्हणून तेथील राज्यकारभार ब्रिटिशांनी ताब्यात घेतला. पुढे १८८९ मध्ये तो कायदेशीर वारसास देण्यात आला. रणजितसिंगाबरोबर त्याने मैत्रीचा तह केला. अशा प्रकारे त्याने एतद्देशीयांशी सलोख्याचे संबंध प्रस्थापिले. त्याच्या कारकिर्दीत ईस्ट इंडिया कंपनीचा चीनबरोबरील व्यापाराचा मक्ता संपुष्टात आला. कंपनीचे व्यापारी स्वरूप जाऊन ती एक राज्यकारभार करणारी संस्था राहिली. नवीन सनदेनुसार ‘गव्हर्नर जनरल ऑफ बेंगॉल’ हा हुद्दा जाऊन त्याबद्दल ‘गव्हर्नर जनरल ऑफ इंडिया’ हा हुद्दा प्रथमच चालू झाला. तसेच गव्हर्नर जनरल जे कायदे करील ते मद्रास, मुंबई येथील शासनांसही लागू करण्यात आले. गव्हर्नर जनरलच्या मंडळात एक विधिज्ञाचे पद निर्माण करण्यात आले. तसेच विधी आयोग नेमण्यात येऊन त्याने भारतीय दंडसंहिता तयार करविली. नवीन चार्टर ॲक्टप्रमाणे इंग्लंडच्या अखत्यारीत असलेल्या प्रजेपैकी कोणालाही वंश, धर्म, वर्ण किंवा जन्मस्थान ह्या नावाखाली नोकरी नाकारली जाणार नाही, या धोरणाची बेंटिंकनेच प्रथम अंमलबजावणी केली. स्त्रीशिक्षणावर बेंटिंकने भर दिला व खाजगी संस्थांना मदत केली.

प्रकृती अस्वास्थ्यानिमित्त १८३५ मध्ये तो इंग्लंडला परत गेला. त्याला सरदारकी (पिअरेज) देऊ केले; पण त्याने संतती नसल्यामुळे व हाऊस ऑफ कॉमन्सवर निवडून जाण्यासाठी ते नाकारले. तो हाउस ऑफ कॉमन्सवर निवडून आला; पण काही वर्षांतच तो पॅरिस येथे मरण पावला. आधुनिक ब्रिटिश भारताचा शिल्पकार म्हणून बेंटिंकचे स्थान महत्त्वाचे आहे.

संदर्भ :

  • Kaye, J. W. The Administration of the East India Company, Allahabad, 1966.
  • Keay, John, India Discovered, Windward, 1982.
  • Kulkarni. V. B. British Statesmen in India, Poona, 1961.
  • Rosselli, John, Lord William Cavendish Bentinck, London, 1974.

Discover more from मराठी विश्वकोश

Subscribe to get the latest posts sent to your email.