विविध प्रतिके आणि त्यांविषयीच्या कल्पना, दंतकथा, कर्मकांड, स्वरूप इत्यादींविषयी त्या त्या समाजाने अथवा संस्कृतीने लावलेला अन्वयार्थ अभ्यासणारे शास्त्र. चिन्ह किंवा प्रतिक म्हणजे एक खूण असते. ज्याचा अर्थ मनाला पटेल अथवा भावेल असा असतो. या चिन्हाला जैविक महत्त्व नसले, तरी त्याला सामाजिक, सांस्कृतिक महत्त्व असते. एखाद्या चिन्हाला एकापेक्षा अधिक संदर्भ असू शकतात. ही चिन्हे लोकांसाठी, सामाजिक देवघेवींसाठी आणि जानिवेसाठी तयार केलेली व वापरात असलेली असतात. तसेच ती विविध खुणा, त्यांचे संदर्भ, त्यांचे अर्थ वेगवेगळ्या सांस्कृतिक जीवनाची ओळख पटवून देतात.

समाजातील लोकांच्या विविध क्रियांना समजून घेण्याच्या अथवा अन्वयार्थ लावण्याच्या पद्धतीचा विचार करणे हा प्रतिकात्मक मानवशास्त्राचा मूळ उद्देश आहे. प्रतिकात्मक मानवशास्त्राला स्पष्टीकरणात्मक मानवशास्त्र असेही म्हणतात येईल. ज्यामध्ये मानवशास्त्रज्ञ एखादे प्रतिक अथवा क्रियात्मक घटना, वस्तू यांचा सांस्कृतिक संदर्भांतून अर्थ लावतात. पारंपारिक रित्या प्रतिकात्मक मानवशास्त्र हे धार्मिक, वैश्विक, कर्मकांडात्मक क्रिया, दर्शनिक क्रिया, पौराणिक कला इत्यादी संदर्भांचे सांस्कृतिक महत्त्व अधोरेखित करते. विविध सांस्कृतिक समूहातील सदस्य भावनात्मक अथवा बुद्धीमतेच्या जोरावर त्यांच्या आजूबाजूच्या जगातील घटकांचे आकलन करून प्रतिसाद देतात. प्रत्येक व्यक्तीच्या जीवनात त्याच्या संस्कृतीमधील विशिष्ट खुणा, प्रतिक, क्रिया, कर्मकांड असतातच.

संदर्भ :

  • Chene, Mary Des, Encyclopedia of Cultural Anthropology, New York, 1996.
  • Spencer, Jonathan, Symbolic Anthropology in Encyclopedia of Social and Cultural Anthropology, New York, 1996.

 

समीक्षक : लता छत्रे