सुवर्ण म्हणजे सोने. प्राशन करणे म्हणजे पिणे अथवा पाजणे. सुवर्ण प्राशनाचा अंतर्भाव लेहन या प्रकारात होतो. लेहन म्हणजे चाटवणे. काश्यपसंहितेनुसार लेह बनविण्यासाठी पूर्व दिशेला तोंड करावे आणि धुतलेल्या दगडावर थोड्या पाण्याच्या साहाय्याने सोन्याला उगाळावे. तयार झालेल्या चाटणात मध आणि गाईचे तूप मिसळून ते बालकाला चाटवावे. यात मध आणि गाईचे तूप यांचे प्रमाण एकसारखे असू नये याची काळजी घेण्यास सांगितले आहे. साधारणत: दर महिन्यात येणाऱ्या पुष्य नक्षत्राच्या दिवशी सुवर्णप्राशन केले जाते. जन्मापासून १२ वर्षांपर्यंत बालकास सुवर्णप्राशन करवावे अशी प्रथा आहे.

सुवर्णप्राशन केल्याने बालकाची बुद्धी वाढते, त्याला चांगली भुक लागते, त्याची शारीरिक शक्ती वाढते, शरीराची कांती वाढते आणि लहान मुलांमध्ये रोगप्रतिकारक्षमता वाढून त्यांचे अनेक रोगांपासून संरक्षण होते, असे महर्षी काश्यप म्हणतात. हे सुवर्णप्राशन बालकांसाठी मंगलकारक आणि पुण्यकारक आहे. सुवर्णप्राशन नियमितपणे १ महिना केल्यास बालक बुद्धीमान आणि निरोगी होते. तसेच ६ महिने नियमितपणे केल्यास त्याची स्मरणशक्ती अत्यंत तीव्र होते असेही ते म्हणतात.

सुश्रुतसंहितेत मात्र सुवर्णप्राशन जातकर्मानंतर लगेच करावयास सांगितले आहे. जन्मानंतर नाळ कापणे, बालकाचा कंठ स्वच्छ करणे इत्यादी क्रियांना जातकर्म म्हणतात. त्यानंतर मध, तूप आणि थोडे सुवर्णभस्म एकत्र करून करंगळी शेजारच्या बोटाने बालकास चाटवावे, असे सांगितले आहे. तसेच या ग्रंथात सोने, वेखंड आणि बेल यांचे चूर्ण तुपासोबत चाटल्याने बुद्धी आणि आयुष्य वाढते व आरोग्याचा लाभ होतो, असे देखील सांगितले आहे. सध्या जो सुवर्णप्राशन संस्कार केला जातो त्यातही सुवर्णभस्मच वापरले जाते.

सुश्रुताचार्यांप्रमाणे वाग्भटाचार्यांनीही आपल्या अष्टांगहृदय  या ग्रंथात जातकर्मानंतर बालकास सुवर्णप्राशन करावयास सांगितले आहे. बालकाला सोने आणि आवळकठी यांचे चूर्ण किंवा सोने, वेखंड, ब्राह्मी, सुवर्णमाक्षिक आणि हिरडा यांचे चूर्ण मध आणि तूप यांसह चाटवावयास सांगितले आहे.

संदर्भ :

  • काश्यप संहिता – सुत्रस्थान, लेहाध्याय.
  • सुश्रुत संहिता – शारीरस्थान, अध्याय १०, श्लोक १५.
  • अष्टांगहृदय – उत्तरस्थान, अध्याय १, श्लोक ९.
  • सुश्रुत संहिता – चिकित्सास्थान, अध्याय २८ श्लोक १.

समीक्षक : जयंत देवपुजारी