बॅफिन, विल्यम (Baffin, William) : (१५८४ – २३ जानेवारी १६६२). ब्रिटिश मार्गनिर्देशक आणि समन्वेषक. बॅफिन यांच्या बालपणाविषयी विशेष माहिती उपलब्ध नाही. त्यांचा जन्म लंडन येथे झाला असावा असा अंदाज आहे. कॅप्टन जेम्स हॉल यांनी नॉर्थ-वेस्ट पॅसेजच्या (वायव्य मार्गाच्या) शोधार्थ इ. स. १६१२ मध्ये काढलेल्या सफरीत बॅफिन एक सदस्य म्हणून सहभागी झाले होते. हाच त्यांच्याविषयीचा पहिला अधिकृत उल्लेख होय. या सफरीत ग्रीनलंडच्या पश्चिम किनाऱ्यावर तेथील इनुइट लोकांकडून कॅप्टन हॉल यांना मारले गेले. बॅफिन मात्र इंग्लंडला सुखरूप पोहोचले. त्यानंतर दोन वर्षे त्यांनी मस्कोव्ही या व्यापार कंपनीत सेवा केली.

बॅफिन हे इ. स. १६१५ मध्ये कंपनी ऑफ मर्चंट्स ऑफ लंडन, डिस्कव्हर्स ऑफ नॉर्थ-वेस्ट पॅसेज (स्था. १६१२) या कंपनीत रुजू झाले. इ. स. १६१५ मध्ये कॅप्टन रॉबर्ट बायलॉट यांच्या सफरीत डिस्कव्हरी गलबताबरोबर ते एक पायलट म्हणून सहभागी झाले. या सफरीत बॅफिन यांनी कॅनडाची मुख्य भूमी आणि बॅफिन बेट यांना वेगळे करणाऱ्या हडसन सामुद्रधुनीचे समन्वेषण केले. इ. स. १६१६ मध्ये नॉर्थ-वेस्ट पॅसेजच्या शोधार्थ गेलेल्या सफरीतही बॅफिन पुन्हा डिस्कव्हरी गलबताचे पायलट म्हणून सहभागी झाले. या सफरीत ते ग्रीनलंडच्या पश्चिमेकडून डेव्हिस सामुद्रधुनीमार्गे एका मोठ्या उपसागरात आतपर्यंत गेले. त्यांनी शोध लावलेला हा मोठा उपसागर म्हणजेच बॅफिन यांचेच नाव दिलेला बॅफिन उपसागर होय. बॅफिन उपसागरामुळे ग्रीनलंड बेट कॅनडाच्या बॅफिन बेटापासून वेगळे झाले आहे. ब्रिटिश दर्यावर्दी व समन्वेषक जॉन डेव्हिस यांनी इ. स. १५८७ मध्ये बॅफिन उपसागरातील जेवढे अंतर पार केले होते, त्यापेक्षा ४८० किमी. अधिक आतपर्यंत बॅफिन गेले होते. त्यांच्या सफरीचे पुरस्कर्ते असलेल्या व्यक्तिंच्या सन्मानार्थ त्यांनी बॅफिन उपसागराच्या उत्तर टोकाजवळून बाहेर पडणाऱ्या सामुद्रधुन्यांना लँकेस्टर, स्मिथ आणि जॉन्स ही नावे दिली. तेथे त्यांच्या लक्षात आले की, या प्रदेशातून भारताकडे जाणारा नॉर्थ-वेस्ट पॅसेज मार्ग सापडण्याची शक्यता नाही. नॉर्थ-वेस्ट पॅसेजच्या शोधासाठी जाऊन तेथील प्रदेशाचे समन्वेषण केल्यामुळे त्यांच्या सन्मानार्थ तेथील एका बेटाला बॅफिन बेट असे नाव देण्यात आले आहे. सांप्रत हे बेट उत्तर कॅनडातील नूनावत या विस्तृत प्रदेशाचा भाग आहे. तारे आणि चंद्राच्या स्थितींच्या निरीक्षणावरून तेथील रेखावृत्ताचा अंदाज करण्याची बॅफिन यांनी मांडलेली कल्पना ही जगातील पहिलीच कल्पना असल्याचे मानले जाते.

नॉर्थ-वेस्ट पॅसेजचा शोध घेण्याच्या उद्देशाने त्यांनी पुढे ईस्ट इंडिया कंपनीतील नोकरी पत्करली. या कंपनीच्या माध्यमातून इ. स. १६१७, १६१९ आणि १६२० मध्ये काढलेल्या सफरींत त्यांनी आफ्रिकेच्या नैर्ऋत्य किनाऱ्यावरील सॅल्दॅन्य उपसागर, भारताच्या पश्चिम किनाऱ्यावरील सुरत, येमेनमधील मोक, तांबडा समुद्र, पर्शियन आखात इत्यादी भागांना भेटी दिल्या. इ. स. १६२२ मधील पर्शियन आखाताकडील सफरीत असताना पर्शियन आखातातील केशम बेटावर (सांप्रत इराणचा भाग) अँग्लो-पर्शियन हल्लेखोरांनी त्यांना ठार मारले. हीच त्यांची अखेरची सफर ठरली.

समीक्षक : माधव चौंडे