शिक्षण आणि चित्रपट हे चित्रपटांच्या सुरुवातीच्या काळात भिन्न विषय होते. चित्रपट हे करमणुकीचे नवे साधन, तर शिक्षण ही समाजाने भावी पिढीच्या जीवनाची घडी बसविण्यासाठी केलेली व्यवस्था. विद्यार्थ्यांचे अभ्यासावरील लक्ष विचलित करणारी गोष्ट म्हणून पालक, मोठी माणसे यांना मुलांनी चित्रपट पाहू नये, असे वाटत असे. यात कारणपरत्वे सूट मिळणे हा व्यवहार कालांतराने सुरू झाला.

शैक्षणिक विचार जसजसा बालककेंद्री होत गेला, तसतसा रंजन आणि आनंद यांचे शैक्षणिक स्थान बदलत गेले. चित्रपटाच्या विधा (प्रकार) जसजशा विकसित होत गेल्या, तसतसे चित्रपट हेदेखील शिक्षणाचे प्रभावी माध्यम ठरू शकते, हे लक्षात आले. शैक्षणिक प्रक्रिया केवळ शब्दांवर विसंबून चालू नये; त्यात दृक्श्राव्य अनुभवाला स्थान असावे, हा विचार पुढे आला. त्यासाठी शाळेबाहेर पडून अनुभव घेण्याप्रमाणेच शाळेच्या वर्गातच दृक्श्राव्य अनुभव देऊ शकणारी स्थिरचित्रे आणि चित्रफिती यांचा समावेश झाला. परंतु या विचारमंथनाची गती आणि चित्रपटाचा धंदा विस्तारण्याची गती यांत मोठीच तफावत राहिली.

भारत स्वतंत्र झाला तोवर चित्रपट ५० वर्षे उलटून पुढे गेला होता. नवभारताचे सांस्कृतिक धोरण ठरविताना साहित्य, संगीत, ललित कला यांसाठी राष्ट्रीय पातळीवर अकादमी स्थापन झाल्या आणि चित्रपटक्षेत्रासाठी एक चौकशीसमिती नेमली गेली (१९५२). या समितीने शालेय शिक्षणात इयत्ता आठवीपासून चित्रपटविषयक शिक्षण दिले जावे, अशी शिफारस केली होती. विद्यापीठ अनुदान आयोगाने महाविद्यालयीन पातळीवर सूचना आणि प्रशिक्षण यांचेही आयोजन केले होते. त्यातून यथावकाश उच्च शिक्षणात चित्रपटअभ्यासाचा समावेश झाला. परंतु चित्रपटविषयक शिक्षण औपचारिक शिक्षणव्यवस्थेपलीकडे पोहोचविण्याची गरज ओळखून १९७१-७२ पासून ⇨ फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया आणि ⇨ राष्ट्रीय चित्रपट संग्रहालय या संस्थांच्या वतीने वेगवेगळ्या मुदतींचे चित्रपट-रसास्वादवर्ग चालविले जात आहेत. चित्रपटनिर्मितीचे तांत्रिक शिक्षण आणि चित्रपट एक कला म्हणून होणारा समीक्षाव्यवहार हे दोन प्रवाह शिक्षणात निरंतर शिक्षणाबरोबरच चालू आहेत. चित्रपटनिर्मिती सामान्य माणसाच्या आवाक्याबाहेर होती आणि मोठी भांडवली गुंतवणूक केल्याशिवाय ते शक्य नव्हते. त्या वेळी ही कला बहुजनांसाठी फक्त आस्वादाची बाब होती; तेही तिकिटाचे पैसे खिशात असतील तर. आज दृक्श्राव्य प्रतिमानिर्मितीचे तंत्रज्ञान सामान्य व्यक्तीलाही आवाक्यातले वाटू लागले आहे. त्यामुळे कला म्हणून अभ्यास आणि निर्मिती म्हणून अभ्यास यांत गोंधळाची स्थिती आहे. मुळातच चित्रपटाचा अनुभव हा साक्षात अनुभव नाही; तो प्रतिमांचा अनुभव आहे, हेच स्पष्ट नाही.

राष्ट्रीय शैक्षणिक तंत्रज्ञान केंद्राने चित्रपटाला शालेय उपक्रमासाठी सुविधा निर्माण करून दिल्या; परंतु शालेय पातळीवर एक विषय म्हणून चित्रपटाचा समावेश झालेला दिसत नाही. सर्वसाधारणपणे चित्रपटाला एक अभ्यासविषय मानायलाच कोणी तयार नव्हते. तो अभ्यासविषय नव्हे, ही धारणा धोरणविषयक निर्णय घेणाऱ्या वर्गात प्रबळ राहिली. त्यामुळे या प्रचंड उद्योगाचा आणि खोल प्रभाव टाकणाऱ्या माध्यमाचा विस्तार बाजारपेठेच्या नियमांनीच होत गेला. त्यावर परिणामकारक विवेचक शक्ती निर्माण झाली नाही. यासाठी सुनिश्चित पाठ्यक्रम, एक सर्वमान्य अभ्यासशाखा व तिची आवश्यक विचारचौकट आणि तांत्रिक सुविधा यांची गरज आहे.

समीक्षक – अनिल झणकर

प्रतिक्रिया व्यक्त करा