क्लार्क, जॉन बेट्स : (२६ जानेवारी १८४७ – २१ मार्च १९३८). प्रसिद्ध अमेरिकन नव-सनातनवादी अर्थशास्त्रज्ञ. त्यांचा जन्म ऱ्होड बेटावरील प्रोव्हिडन्स (U.S.) येथे झाला. त्यांचे वडील घाऊक व्यापारी होते. त्यानंतर ते ‘कॉर्लेस एंजिन वर्क्सʼ या कंपनीमध्ये विश्वसनीय सल्लागार होते. क्लार्क यांचे सुरुवातीचे शिक्षण जन्मगावीच झाले. त्यानंतर पदवीचे शिक्षण ॲमहर्स्ट कॉलेज, मॅसॅचूसेट्स येथे त्यांनी वयाच्या पंचविसाव्या वर्षी पूर्ण केले. त्यांनी पुढील शिक्षण १८७२–१८७५ या काळात झूरिक विद्यापीठ आणि हायडल्बर्ग विद्यापीठ येथे जर्मन हिस्टोरिकल स्कूलचा प्रमुख क्लार्क नीज यांच्या हाताखाली घेतले. प्रसिद्ध अमेरिकन अर्थशास्त्रज्ञ जॉन मॉरिस क्लार्क (John Maurice Clark) हा त्यांचा मुलगा.

क्लार्क यांनी अमेरिकेत परत आल्यानंतर अमेरिकन आर्थिक प्रणालीमध्ये सुधारणा करण्याच्या कार्यांत सक्रियपणे भाग घेतला. ते अमेरिकेमधील सीमांतवादी विचारसरणीच्या अग्रणी अर्थशास्त्रज्ञांपैकी एक होते. सनातनवादी व संस्थात्मक अर्थशास्त्रीय विचारप्रवाहाचे ते खंदे विरोधक होते. १८८५ मध्ये त्यांनी रिचर्ड टी. एली याच्या सहकार्याने ‘अमेरिकन इकॉनामिक्स असोसिएशनʼ या संस्थेची स्थापना केली. तिचे ते तिसरे अध्यक्ष होते. या संस्थेद्वारा त्यांनी आर्थिक संशोधन, प्रकाशन, अर्थशास्त्रातील विविध विषयांवर चर्चा घडवून आणणे इत्यादी व्यापक कार्य केले. त्यांनी १८९५–१९११ या काळात पॉलिटिकल सायन्स क्वार्टरली या तिमाही नियतकालिकाचे संपादक म्हणूनही काम पाहिले. त्यांनी १८९५–१९२३ या काळात कार्लटन, स्मिथ, ॲमहर्स्ट, जॉन हॉपकिन्स या महाविद्यालयांत आणि कोलंबिया विद्यापीठात अध्यापन केले. पारंपरिक निर्हस्तक्षेपी सिद्धांताला छेद देत अर्थशास्त्रात नवीन कल्पना आणण्याचे कार्य त्यांनी रिचर्ड एली व हेन्री कार्टर ॲडम्स यांच्या सहकार्याने केले. त्यांच्या सुरुवातीच्या काळातील लिखाणाला जर्मनीतील साम्यवादी विचारप्रवाहाची पार्श्वभूमी दिसून येते. भांडवलशाहीवर त्यांनी कडाडून टीका केली; मात्र कोलंबियातील कार्यकाळात त्यांचे मतपरिवर्तन होऊन ते भांडवलशाहीचे अग्रणी समर्थक बनले. १९११ नंतर त्यांनी स्वत:ला शांततावादी कामाकरिता वाहून घेतले. १९११–१९२३ या काळात ‘कार्नेगी एंडॉमेंट फॉर इंटरनॅशनल पीसʼ या ठिकाणी अर्थशास्त्र व इतिहास या दोन्ही विभागांचे पहिले संचालक म्हणून त्यांनी पदभार सांभाळला. १९२३ मधे कोलंबिया विद्यापीठातून एक नामांकित प्राध्यापक म्हणून ते निवृत्त झाले.

क्लार्क यांनी १८८६ मध्ये लिहिलेल्या आपल्या दि फिलॉसॉफी ऑफ वेल्थ या ग्रंथात अमेरिकेतील वेगवान औद्योगिकीकरणामुळे झालेल्या संपत्तीच्या असंगत वितरणाची चर्चा केली. सनातनवादी अर्थशास्त्राच्या गृहीतकांवर त्यांनी टीका केली. सनातनवाद्यांच्या मते, आर्थिक सिद्धांतामागे वैयक्तिक हेतू हा प्रेरक घटक असतो; परंतु क्लार्क यांनी वैयक्तिक हेतूसोबतच व्यक्ती सामाजिक हेतूनेही प्रेरित होतात, असे म्हटले. त्याचप्रमाणे त्यांनी या ग्रंथात सीमांत उत्पादकता सिद्धांताचे मूळ प्रारूप विशद केले आहे. ते म्हणतात की, शुद्ध आर्थिक स्पर्धा हा एक परिणामकारक घटक आहे. ज्याद्वारे वस्तूंचे वितरण समानतेने होऊ शकते. उत्पन्न वितरणाच्या सीमांत उत्पादकता सिद्धांताद्वारे संपत्तीचे न्यायपूर्ण वितरण होऊ शकते. सर्व वस्तूंमध्ये ‘गठ्ठा उपयोगिता’ असते, जीमधे विविध गुणात्मक किंवा गुणदर्शक उपयोगितेची श्रेणी असते. हीच उपयोगिता वस्तूंचे मूल्य निर्धारित करीत असते.

क्लार्क यांनी अर्थशास्त्राचे विश्लेषण स्थिर आणि गतिमान अर्थशास्त्र अशा दोन संचांमध्ये केले. स्थिर अर्थशास्त्रातील नियम हे स्थिर (न बदलणाऱ्या) समाजाला लागू होतात, तर गतिमान अर्थशास्त्रातील नियम बदलत्या व्यवस्थेस लागू होतात. सामाजिक बदलाला नवे सिद्धांत आवश्यक असतात. क्लार्क यांनी सर्वप्रथम गतिमान सिद्धांताची प्राथमिक चर्चा १९०७ मध्ये आपल्या दि एसेन्शल ऑफ इकॉनॉमिक थिअरी या ग्रंथात केली. त्यानंतरच्या अर्थशास्त्रज्ञानी हे सिद्धांत विकसित केले. त्यांनी सामाजिक भांडवलाचे अस्तित्व हे कायमस्वरूपी असते, असे म्हटले आहे.

क्लार्क यांनी मक्तेदारीविरोधी धोरण हे जनहिताच्या विरोधी नसून, संस्था जेव्हा मक्तेदाराप्रमाणे वागते तेव्हा ती कृती जनहिताच्या विरोधी असते, असे सांगितले. त्यांच्या मते, स्पर्धेचा अभाव आणि संभाव्य विक्रेत्यांच्या बाजारात प्रवेश करण्याच्या शक्यतेचा अभाव ही दोन मक्तेदारीतील किंमतवाढीची महत्त्वाची कारणे आहेत. बाजारात संभाव्य प्रवेशाची शक्यता असेल, तर मक्तेदारीत भाव कमी होतील आणि बाजारकायदे पुन्हा लागू होतील. क्लार्क हे शिकागो संप्रदायातील मक्तेदारीविरोधी सिद्धांताचे प्रणेते होते.

क्लार्क यांनी नंतरच्या काळात युद्ध हा मानवतेला सर्वांत मोठा धोका आहे, अशी भूमिका घेत युद्धखोर नितीवर कडाडून टीका केली. १९३५ मध्ये युद्धाच्या खर्चाचे मूल्यांकन करण्याकरिता कार्नेगी फाउंडेशनतर्फे स्थापन केलेल्या अर्थतज्ज्ञाच्या गटाचे क्लार्क यांनी नेतृत्व केले. १९३५ मधे लिहिलेल्या आपल्या अ टेंडर ऑफ पीस या ग्रंथात त्यांनी जागतिक शांतता प्रस्थापित करण्यासाठी लीगची स्थापना करावी, असे म्हटले आहे.

क्लार्क हे आंतरराष्ट्रीय पातळीवर मान्यता प्राप्त करणारे पहिले अमेरिकन अर्थशास्त्रज्ञ होत. क्लार्क यांच्या नावाने ‘अमेरिकन इकॉनॉमिक असोसिएशनʼ या संस्थेकडून जे. बी. क्लार्क मेडल हा अर्थशास्त्रातील प्रतिष्ठित द्वैवार्षिक पुरस्कार अमेरिकेतील ४० वर्षांखालील अर्थतज्ज्ञाला दिला जातो.

क्लार्क यांनी पुढील महत्त्वपूर्ण ग्रंथांचे लेखन केले आहे : दि फिलॉसॉफी ऑफ व्हेल्थ (१८८६), कॅपिटल ॲण्ड इअरनिंग्ज (१८८८), दि डिस्ट्रिब्यूशन ऑफ व्हेल्थ : ए थिअरी ऑफ वेजेस, इंटरेस्ट ॲण्ड प्रॉफिट्स (१८९९), दि एसेन्शल ऑफ इकॉनॉमिक थिअरी  (१९०७), दि कंट्रोल ऑफ ट्रस्ट : ॲन आर्ग्युमेंट इन फेव्हर ऑफ कर्बिंग दि पॉवर ऑफ मोनोपोली बाय ए नॅचरल मेथड (१९१२ – सहलेखक), सोशल जस्टिस विदाउट सोशालिझम (१९१४), दि प्रॉब्लेम ऑफ मोनोपोली : ए स्टडी ऑफ ए ग्रेव्ह डेंजर ॲण्ड ऑफ दि नॅचरल मोड ऑफ ॲव्हरटिंग इट (१९२३), अ टेंडर ऑफ पीस (१९३५) इत्यादी. तसेच अर्थशास्त्रातील त्यांचे अनेक शोधनिबंध प्रसिद्ध झाले आहेत.

क्लार्क यांचे न्यूयॉर्क सिटी येथे निधन झाले.

चलचित्र :  https://www.econjobrumors.com/topic/john-bates-clark-medal-song

संदर्भ :

  • इनसायक्लोपिडिया ब्रिटानिका.
  • नाईट, एफ. एच., रिस्क, अनसर्टनिटि ॲण्ड प्रॉफिट, बोस्टन, १९२१.
  • न्यू वर्ल्ड एनसायक्लोपीडिया.
  • बोएम बाव्हेर्क, कॅपिटल ॲण्ड इंटरेस्ट वन्स मोअर, १९०६.
  • सॅम्युअलसन पी., पॅराबल ॲण्ड रिॲलिझम इन कॅपिटल थिअरी : दि सरोगेट प्रॉडक्शन फंक्शन, १९६२.
  • स्टिगलर, जी., प्रॉडक्शन ॲण्ड डिस्ट्रिब्युशन थिअरीज : दि फॉरमॅटिव्ह पिरिअड, न्यूयॉर्क, १९४१.

समीक्षक – राजस परचुरे

प्रतिक्रिया व्यक्त करा