मॉर्टेन्सन, डेल टी. (Mortensen, Dale T.) : (२ फेब्रुवारी १९३९ – ९ जानेवारी २०१४). अमेरिकन अर्थशास्त्रज्ञ व अर्थशास्त्रातील नोबेल पुरस्काराचा सहमानकरी. मॉर्टेन्सन यांना विविध बाजारपेठांच्या विश्लेषण संदर्भातील शोधप्रणाली विकसित करण्याबद्दल सर ख्रिस्तोफर ए. पिसाराइडेज  (Sir Christopher A. Pissarides)पिटर ए. डायमंड (Peter A. Diamond) यांच्या बरोबरीने २०१० मध्ये अर्थशास्त्र विषयाचा नोबेल स्मृती पुरस्कार देण्यात आला.

मॉर्टेन्सन यांचा जन्म ऑरेगन राज्यातील एंटरप्राइझ या शहरात झाला. त्यांनी विलामेटे विद्यापीठातून अर्थशास्त्र हा विषय घेऊन १९६१ मध्ये बी. ए. पदवी मिळविली. १९६७ मध्ये कार्नेगी मेलन विद्यापीठातून अर्थशास्त्र विषयातील पीएच. डी. पदवी त्यांनी संपादन केली. १९६५ पासूनच ते नॉर्थवेस्टर्न विद्यापीठात अध्यापन करीत होते. १९८० पासून तेथील केलॉग स्कूल ऑफ मॅनेजमेंट या संस्थेत व्यवस्थापकीय अर्थशास्त्र व निर्णयशास्त्र या विषयांचे प्राध्यापक म्हणून त्यांनी काम केले. २००६ – २०१० या काळात आऱ्हूस विद्यापीठातील स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स ॲण्ड मॅनेजमेंट या संस्थेत नील भोर अभ्यागत प्राध्यापक म्हणूनही त्यांनी अध्यापन केले.

मॉर्टेन्सन यांचे संशोधन श्रमिक अर्थशास्त्र, स्थूल अर्थशास्त्र व आर्थिक सिद्धांत या विषयांवर केंद्रित झाल्याचे दिसून येते. विशेषत: घर्षणयुक्त (Frictional) बेरोजगारी निगडित शोध व सुजोड प्रणाली या संशोधनाबद्दल तो नावाजला जातो. कर्मचारी उलाढाल, फेरवाटणी, संशोधन, विकास व व्यक्तिगत पातळीवरचे संबंध या विषयांसंबंधी नवीन दृष्टिकोन त्यांनी मांडला. रोजगार व वेतन गतिक या संबंधीची प्रणाली अधिक समृद्ध करण्यासाठी त्यांनी आपल्या कार्यशोध सिद्धांतांचा उपयोग केला. बाजारपेठातील किंमतीत समतोल प्रस्थापित होण्याच्या दृष्टीने एक वेगळी दृष्टी त्यामुळे मिळू शकली. बाजारपेठात जेव्हा आगंतुकपणे (Randomly) व्यापारी उतरतात, तेव्हा घर्षण निर्माण होऊन श्रमिक तसेच गृहपुरवठा बाजारपेठात किंमतीच्या पातळी अस्थिर होतात. खरेदीदार व विक्रेत्यांना सुजोड भागीदार मिळण्यात अडचणी निर्माण होतात. त्यासाठी व्यवहारापूर्वीच त्यांचा शोध घेणे फायद्याचे ठरते. या संदर्भात शोधांची तीव्रता व निर्णयक्षमता हे घटक किती महत्त्वाचे असतात, हे आपल्या प्रदीर्घ संशोधनाने मॉर्टेन्सन यांनी दाखवून दिले. उपलब्ध संसाधनांची वाटणी कार्यक्षम व्हावी व त्यात समतोल साधता यावा यासाठी पोषक वातावरण कसे असावे, याचा तपशीलही त्यांनी सांगितला. श्रम व स्थूल अर्थशास्त्राच्या क्षेत्रातील त्यांच्या प्रणाली सर्वत्र मोठ्या प्रमाणावर वापरल्या जातात. श्रमबाजाराच्या ताठर स्वरूपामुळे बेरोजगारीत भर पडते; कारण रोजगारक्षम लोक चांगले वेतन व चांगले काम या गोष्टींना प्राधान्य देतात. कामगार व उपलब्ध नोकऱ्या यांत विषमता असल्याने सुजोड नोकऱ्या मिळण्यामध्ये अडचणी निर्माण होतात. काहींना बराच काळ नोकरी उपलब्ध होत नाही; तथापि त्याच वेळी अनेक पेढ्यांत काही जागा रिक्त असतात. श्रमबाजारात मागणी व पुरवठा यांचा मेळ घालण्यासाठी मॉर्टेन्सन यांनी प्रदीर्घ संशोधन केले. वेतनातील तफावत घर्षणयुक्त बेरोजगारी, वेतन धोरण व उत्पादकता या तीन प्रमुख कारणांमुळे संभवत असल्याचे त्यांनी दाखवून दिले. ज्या पेढ्या वेतनात समतोल राखतात, त्यांना चांगले कर्मचारी उपलब्ध होतात; परंतु अशा ठिकाणी कामगारहिताला (कल्याणाला) प्राधान्य दिले जातेच असे नाही. शासनकर्त्यांना कर्मचाऱ्यांसंबंधीची धोरणे ठरविताना तसेच रोजगारीची समस्या सोडविण्यासाठी मॉर्टेन्सन यांच्या शोध व सुजोड प्रणाली उपयुक्त असल्याने त्यांना नोबेल पुरस्कार दिल्याचे Swedish Academy या संस्थेनी आपल्या घोषणापत्रात म्हटले होते.

मॉर्टेन्सन यांचे स्वतंत्रपणे तसेच सहलेखक म्हणून प्रकाशित साहित्य पुढीलप्रमाणे : ए थिअरी ऑफ वेज ॲण्ड एम्प्लॉयमेंट डायनॅमिक्स (१९७२), दि मॅचिंग प्रोसेस ॲज ए नॉन-कोऑपरेटिव्ह-बार्गेनिंग गेम (१९८२), प्रॉपर्टी राइट्स ॲण्ड इफिशियन्सी ऑफ मेटिंग, रेसिंग ॲण्ड रिलेटेड गेम्स (१९८२), जॉब सर्च ॲण्ड लेबर मार्केट ॲनालिसिस (१९८६), जॉब क्रिएशन ॲण्ड जॉब डिस्ट्रक्शन इन दि थिअरी ऑफ अनएम्प्लॉयमेंट (१९९४ – सहलेखक), टेक्नॉलॉजिकल प्रोग्रेस, जॉब क्रिएशन ॲण्ड जॉब डिस्ट्रक्शन (१९९५ – सहलेखक), वेज डिफरन्शियल्स, एम्प्लॉयर साइज ॲण्ड अनएम्लायमेंट (१९९८ – सहलेखक), जॉब रिलोकेशन, एम्प्लॉयमेंट फ्लक्चूएशन्स ॲण्ड अनएम्प्लॉयमेंट (१९९९ – सहलेखक), टॅक्सेस, सब्सिडिज ॲण्ड इक्विलिब्रिअम लेबर मार्केट आऊटकम्स (२००१ – सहलेखक), वेज डिर्स्पशन व्हाय आर सिमिलर वर्कर्स पेड डिफरन्ट्ली? (२००३), मोअर ऑन अनएम्लायमेंट ॲण्ड व्हेकन्सी फ्लक्चूएशन्स (२००७ – सहलेखक), जॉब मॅचिंग वेज डिस्पर्शन, ॲण्ड अनएम्प्लॉयमेंट (२०११ – सहलेखक).

मॉर्टेन्सन यांना नोबेल पुरस्काराबरोबरच त्यांच्या अर्थशास्त्रविषयक संशोधनकार्याबद्दल पुढील सन्मान मिळाले : अलेक्झांडर हेंडर्सन अवॉर्ड (१९६५), इकॉनॉमेट्रिक सोसायटी छात्रवृत्ती (१९७९), अमेरिकन अकॅडेमी ऑफ आर्ट्स ॲण्ड सायन्सेस छात्रवृत्ती (२०००), आय.झेड.ए. प्राइझ इन लेबर इकॉनॉमिक्स (२००५).

मॉर्टेन्सन यांचे इलिनॉयमधील विलामेटे येथे निधन झाले.

समीक्षक – संतोष दास्ताने

प्रतिक्रिया व्यक्त करा