दैनंदिन व्यवहारामध्ये आपण व्रत-वैकल्ये, पूजा-अर्चा, प्रार्थना असे विविध धार्मिक विधी करीत असतो. तसेच भजन, कीर्तन धार्मिक विषयांवरील व्याख्याने यांसारखे विविध उपक्रमही राबवीत असतो. यासंदर्भात तसेच धर्मशास्त्र व धार्मिक ग्रंथांमध्ये ज्याप्रकारच्या भाषेचा वापर केला जातो, त्या भाषेला सामान्यतः ‘धार्मिक भाषा’ असे म्हणतात.

भाषेतील पदे, शब्द व संकल्पना तसेच धार्मिक वाक्यांचे, विधानांचे स्वरूप काय? त्यांचे नेमके अर्थ काय होतात? त्यांचा अन्वयार्थ नेमका कशा पद्धतीने लावावा? ही अधि-धर्मशास्त्रातील अत्यंत महत्त्वपूर्ण अशी समस्या होय. या समस्येच्या संदर्भात मध्ययुगातील सेंट टॉमस अक्वायनस तसेच पॉल टिलिख, जे. एच. रॅन्डॉल, बेसिल मिशेल, आय. एम. क्रोम्बी, जॉन हिक, ए. जे. एअर, आर. एम्. हेअर, अँन्टोनी फ्लू, आर. बी. ब्रेथवेट, थॉमस मॅकफर्सन, लुटव्हिख व्हिट्गेन्श्टाइन, डी. झेड्. फिलिप्स, नॉर्मन मालकम, पीटर विंच या विसाव्या शतकातील तत्त्ववेत्त्यांचे योगदान अतिशय महत्त्वपूर्ण असे आहे. यासंदर्भात त्यांनी पुढील तीन प्रश्नांची चर्चा केलेली दिसते :

(१) धार्मिक भाषेतील विधाने अलौकिक वा अतींद्रिय अंतिम सत्ता/वस्तू/तत्त्व यांबद्दल विशेष प्रकारचे ज्ञान देणारी ज्ञानात्मक व वर्णनात्मक विधाने असतात का?

(२) धार्मिक भाषेतील विधाने भावनांची अभिव्यक्ती करणारी, भावनिक अर्थ असणारी विधाने असतात का? की

(३) अशाप्रकारची विधाने ज्ञानात्मक किंवा न-ज्ञानात्मक अशा दोन्ही प्रकारच्या विधानांहून भिन्न अशी अद्वितीय, असाधारण स्वरूपाची विधाने असतात?

वरील प्रश्नांच्या उत्तरादाखल विसाव्या शतकातील पाश्चात्त्य तत्त्वचिंतकांनी तीन विभिन्न प्रकारच्या सिद्धांतांचे प्रतिपादन केलेले दिसते :

  • ज्ञानात्मक (बोधनिक) सिद्धांत (Cognitive Theory)
  • न-ज्ञानात्मक सिद्धांत (Non-CognitiveTheory)
  • उपयोगिता सिद्धांत (Utility Theory)

ज्ञानात्मक (बोधनिक) सिद्धांत : धार्मिक भाषेच्या स्वरूपाच्या संदर्भात ज्ञानात्मक सिद्धांतानुसार धार्मिक विधाने ही ईश्वर, आत्मा यांसारख्या अंतिम सत्तेचे वर्णन करणारी वर्णनात्मक स्वरूपाची विधाने असतात. त्यांना भाषेतील इतर विधानांप्रमाणेच बोधात्मक अर्थ (Cognitive Meaning) असतो. धार्मिक भाषा वा विधानांद्वारा आपणास धार्मिक सत्याचे, अलौकिक/अतींद्रिय/पारलौकिक अशा अंतिम सत्तेचे विशेष प्रकारचे ज्ञान होत असते. हे अलौकिक/अतींद्रिय असे तथ्य ईश्वर असेल वा कोणतेही अंतिम तत्त्व, सत्ता वा शक्ती असेल. या अंतिम सत्तेचे वर्णन वा सूचनात्मक ज्ञान आपणास धर्मशास्त्रीय/धार्मिक विधानांद्वारे होत असते. त्यामुळे ही विधाने निरर्थक, न-ज्ञानात्मक नसून त्यांना बोधात्मक अर्थ असतो, अशी या सिद्धांताचा पुरस्कार करणाऱ्यांची धारणा आहे.

या सिद्धांताचा पुरस्कार बेसिल मिशेल, आय. एम. क्रोम्बी, जॉन हिक या विचारवंतांनी केलेला आहे. जॉन हिक यांच्या मते, विभिन्न प्रकारच्या विधानांची सत्यासत्यता आपणास सरसकट एकाच पद्धतीने ठरविता येणार नाही. याच युक्तिवादाच्या आधारे त्यांनी तार्किक-प्रत्यक्षार्थवाद्यांच्या विधानांच्या अर्थपूर्णतेच्या संदर्भातील प्रचितीक्षमतेच्या निकष/कसोटीचेही खंडन केलेले आहे. त्यांच्या मते ‘खोलीमध्ये मेज आहे’ या विधानाची सत्यासत्यता आपणास अणूच्या संदर्भातील एखाद्या विधानाप्रमाणे ठरविता येणार नाही. अर्थात विभिन्न प्रकारच्या विधानांची सत्यासत्यता ठरविण्यासाठी आपणास विभिन्न प्रयोग करावे लागतील.

१९६० साली थिऑलॉजी टुडे या पत्रिकेत प्रकाशित झालेल्या आपल्या ‘थिऑलॉजी अँड व्हेरिफिकेशन’ या विस्तृत लेखामध्ये तसेच फेथ अँड नॉलेज (१९६६) या ग्रंथामध्ये हिक यांनी धार्मिक भाषेतील विधाने, वर्णनात्मक व ज्ञानात्मक असतात, हे सिद्ध करण्यासाठी एका नवीन सिद्धांताचे प्रतिपादन केले आहे. या सिद्धांताला त्यांनी ‘मरणोत्तर सत्यापन सिद्धांत’ असे म्हटले आहे. या सिद्धांतानुसार ईश्वरविषयक विधानांची सत्यासत्यता आपल्याला इंद्रिय-संवेदनांच्या आधारे ठरविता येणार नाही. ‘ईश्वर अस्तित्वात आहे’ या विधानाची सत्यता आपणास सामान्य दैनंदिन जीवनातील लौकिक अनुभवाद्वारा न होता मरणोत्तर अनुभवाद्वारेच ठरविता येते.

या सिद्धांतानुसार धार्मिक वाक्ये अलौकिक/अतींद्रिय सत्ता/तत्त्व यांविषयी असल्याने लौकिक भाषेतील सामान्य विधानांप्रमाणे त्यांची सत्यासत्यता पडताळून पाहता येणार नाही. मात्र ‘ईश्वर दयाळू आहे’, ‘ईश्वर सर्वशक्तिमान आहे’ अशाप्रकारच्या धार्मिक विधानांची आपणास किमान तत्त्वतः सत्यासत्यता ठरविता येते व त्यांना सत्य वा असत्य असे म्हणता येते.

न-ज्ञानात्मक सिद्धांत : धार्मिक भाषेचे स्वरूप आणि अर्थाच्या संदर्भात न-ज्ञानात्मक सिद्धांताचा पुरस्कार आणि समर्थन करणाऱ्या विसाव्या शतकातील काही पाश्चात्त्य दार्शनिकांच्या मते अलौकिक/अतिप्राकृतिक अशा ईश्वर वा तत्सम अन्य प्रकारच्या अंतिम सत्तेच्या संदर्भातील धार्मिक वाक्ये, विधाने ज्ञानात्मक सिद्धांताचा पुरस्कार करणारे दार्शनिक म्हणतात त्याप्रमाणे ज्ञानात्मक वा वर्णनात्मक नसतात. कारण धार्मिक वाक्ये, विधाने आपणास कोणतेही लौकिक-अलौकिक, प्राकृतिक-अप्राकृतिक, इंद्रिय-अतींद्रिय स्वरूपाच्या वास्तवाचे ज्ञान प्रदान करीत नाहीत.  तसेच कोणतीही धार्मिक व्यक्ती धार्मिक विधानांचा वापर करते तेव्हा ती कोणत्याही लौकिक वा अलौकिक वस्तू/सत्तेविषयी कोणत्याही प्रकारची सूचनाही देत नसते. तेव्हा या सिद्धांतानुसार धार्मिक विधाने मूलतः न-ज्ञानवादी वा वर्णनात्मक नसतात.

विसाव्या शतकामध्ये न-ज्ञानात्मक सिद्धांताचा पुरस्कार व हिरिरीने समर्थन करणाऱ्या दार्शनिकांमध्ये ए. जे. एअर, अँटोनी फ्लू, आर. एम. हेअर, आर. बी. ब्रेथवेट, थॉमस मॅकफर्सन यांचे कार्य विशेष उल्लेखनीय आहे.

या दार्शनिकांच्या मते धार्मिक विधाने न-ज्ञानात्मक असल्याने ती बोधात्मक(cognitive) नसली तरी ती निरर्थक आहेत, असे म्हणता येणार नाही. मानवी जीवनामध्ये व जीवनासाठी त्यांचे काहीही महत्त्व नाही, असेही म्हणता येणार नाही. वास्तविक कोणत्याही धार्मिक व धर्मपरायण व्यक्तीसाठी ही विधाने अतिशय भावपूर्ण, अर्थपूर्ण व महत्त्वाची असतात. या विधानांद्वारा त्यांच्या विशेष प्रकारच्या धार्मिक भावनांची अभिव्यक्ती होत असते. एवढेच नव्हे, तर अन्य व्यक्तींच्या मनात तशा प्रकारच्या भावना उद्दीपित वा जागृत करण्याचे कार्य ही विधाने करीत असतात. धार्मिक भावना या सांसारिक विषयांशी संबंधित नसतात, तर प्रामुख्याने अलौकिक अथवा दैवी सत्तेशी संबंधित असतात, ही त्यांची विशेषता होय. धार्मिक व्यक्ती ज्या अलौकिक/दैवी सत्ता/शक्तीची आराधना/उपासना करीत असते तिच्याप्रती आपला विचार, आचार व भाषेतून पूर्ण समर्पणभाव व्यक्त करीत असते. अर्थात तो समर्पणभाव धर्मपरायण व्यक्तीची वक्तव्ये, कथने, धार्मिक विधी वा कर्मकांडातून प्रतीत होत असतो. व्यक्तीच्या या भावनेसच ‘धार्मिक भावना’ असे म्हणतात. धार्मिक व्यक्तीची ही ‘धार्मिक-भावनाच’ धार्मिक/धर्मशास्त्रीय विधानांना अन्य सर्व प्रकारच्या विधानांपासून पृथक/वेगळे करते. जी विधाने धार्मिक भावनांची अभिव्यक्ती करतात त्यांनाच ‘धार्मिक-विधान’ असे म्हणतात. अशाप्रकारे न-ज्ञानात्मक सिद्धांताचा पुरस्कार करणाऱ्या तत्त्ववेत्त्यांच्या मते धार्मिक भाषा ज्ञानात्मक नसूनही धर्मपरायण व्यक्तीसाठी निश्चितपणे अत्यंत महत्त्वपूर्ण, अर्थपूर्ण असते.

या सिद्धांतानुसार धार्मिक विधाने वर्णनात्मक नसल्याने त्यांना बोधात्मक अर्थ (cognitive meaning) नसतो; मात्र त्यांच्याद्वारे धार्मिक भावनांची अभिव्यक्ती होत असल्याने त्यांना भावनिक अर्थ असतो.

धार्मिक विधानांना प्रामुख्याने भावनिक अर्थ असल्याने त्यांच्या संदर्भात सत्यासत्यतेचा प्रश्न निर्माण होत नाही. त्यामुळे त्यांना सत्य वा असत्य असे म्हणता येत नाही. फारतर ती अधिक चांगली वा अधिक योग्य एवढेच म्हणता येईल.

अधि-धर्मशास्त्राच्या परंपरेमध्ये धार्मिक भाषेतील विधानांच्या न-ज्ञानात्मकतेचा अर्थ विभिन्न प्रकारे लावलेला दिसतो. काहींच्या मते या विधानांना भावनिक अर्थ असतो. ते भावनिकतावादाचा पुरस्कार करतात. तर काहींच्या मते ही विधाने आदेशपूरक असतात. ते आदेशवादाचा पुरस्कार करतात.

ए. जे. एअर यांच्या मते सौंदर्यात्मक, नैतिक आणि काही अति-भौतिकशास्त्रीय विधानांप्रमाणेच धार्मिक विधानांना भावनिक अर्थ असतो. या विधानांद्वारे धार्मिक भावनांची अभिव्यक्ती होतेच; परंतु अन्य व्यक्तींच्या मनात तशाच प्रकारच्या भावना जागृत होत असल्याने मानवी जीवनात त्यांना अत्यंत महत्त्वपूर्ण असे स्थान आहे. इंद्रियानुभवाद्वारा त्यांच्या सत्यासत्यतेचा पडताळा घेता येत नसल्याने वास्तविक दृष्टीने ते अर्थशून्य किंवा निरर्थक असले तरी भावनात्मकदृष्ट्या अर्थपूर्ण असतात. त्यांना सत्य वा असत्य असे म्हणता येत नाही. आपल्या  लँग्वेज, ट्रूथ अँड लॉजिक (म.शी. भाषा, सत्य आणि तर्क) या १९३६ मध्ये प्रकाशित झालेल्या ग्रंथामध्ये एअर यांनी याविषयी विस्तृत चर्चा केलेली आहे. अशाप्रकारच्या विधानांना ते ‘व्याज-विधाने’ (Pseudo Propostions) असे म्हणतात.

उपयोगिता सिद्धांत : भाषेतील विधानांचा अर्थ, स्वरूप आणि कार्य यांच्या संदर्भात उपयोगिता सिद्धांताची सखोल, सूक्ष्म, विस्तृत आणि स्पष्ट मांडणी लूटव्हिख व्हिट्गेन्श्टाइन यांनी आपल्या १९५३ साली प्रकाशित झालेल्या फिलॉसॉफिकल इन्व्हेस्टिगेशन्स या ग्रंथात केली आहे. पाश्चात्त्य तत्त्वज्ञानाच्या विश्लेषणात्मक परंपरेमध्ये त्यांच्या या ग्रंथाला आणि त्यात प्रतिपादिलेल्या ‘उपयोगिता सिद्धांता’ला अनन्यसाधारण महत्त्व आहे. या सिद्धांताचा पुरस्कार आणि समर्थन डी. झेड. फिलिप्स, नॉर्मन मालकॉम, पीटर विंच या तत्त्वचिंतकांनी कलेले असून त्यांचे यासंदर्भातील कार्य विशेष उल्लेखनीय आहे.

व्हिट्गेन्श्टाइन यांच्या संदर्भात विशेष महत्त्वपूर्ण अशी बाब म्हणजे भाषेचा अर्थ, स्वरूप आणि कार्य यांच्या संदर्भात आपल्या दोन वेगवेगळ्या ग्रंथांमध्ये त्यांनी स्वीकारलेल्या दोन विभिन्न प्रकारच्या भूमिका होत. धार्मिक भाषेपुरते बोलायचे झाल्यास १९२१ साली प्रकाशित झालेल्या आपल्या ट्रॅक्टेटस लॉजिको फिलॉसॉफिकस या ग्रंथामध्ये त्यांनी धर्माला एक गूढ वा रहस्यमय विषय मानले आहे. भारतीय दार्शनिक परंपरेतील शंकराचार्य ज्याप्रमाणे ‘ब्रह्मन्’ अनिर्वचनीय/अवर्णनीय मानतात, त्याप्रमाणे धर्माच्या संदर्भात आपण कोणतेही वर्णन करू शकत नाही, असे प्रतिपादन करताना व्हिट्गेन्श्टाइन खरेतर आपल्या भाषेच्या मर्यादा स्पष्ट करतात. परंतु कालांतराने त्यांनी आपल्या या भूमिकेचा त्याग केला. साधारणतः १७ वर्षांनंतर १९३८ मध्ये त्यांनी सौंदर्यशास्त्र, मानसशास्त्र आणि धार्मिक विश्वास या विषयांवर अनेक व्याख्याने दिली. त्यांचे एकत्रित संकलन ऑक्सफर्ड विश्वविद्यालयाने १९६६ साली प्रकाशित केलेल्या लेक्चर्स अँड कॉन्व्हर्सेशन ऑन अस्थेटिक्स, सायकॉलॉजी अँड रिलिजन बिलीफ (म.शी. सौंदर्यशास्त्र, मानसशास्त्र आणि धार्मिक विश्वास यांवरील व्याख्याने आणि संवाद) या ग्रंथामध्ये आहे. या ग्रंथामध्ये धार्मिक विश्वासाचे/श्रद्धेचे त्यांनी विशद केलेले स्वरूप मूलतः उपयोगिता सिद्धांतावर आधारित आहे.

व्हिट्गेन्श्टाइन यांच्या मते धार्मिक श्रद्धेचे यथार्थ स्वरूप जाणून घेण्यासाठी धार्मिक विधानांचा अर्थ चांगल्या पद्धतीने समजावून घेण्याची आवश्यकता आहे. त्यांच्या मते धार्मिक विधानांना भाषेतील इतर विधानांप्रमाणे वास्तविक मानणे अनुचित आणि व्यर्थ आहे. कारण एकतर वास्तविक (Factual) विधानांच्या संदर्भात जे प्रश्न निर्माण होतात, ते प्रश्न धार्मिक विधानांच्या संदर्भात निर्माणच होत नाहीत आणि दुसरे महत्त्वाचे म्हणजे त्यांचा योग्य/उचित अन्वयार्थ अनुभवाश्रित अशा वास्तविक विधानांप्रमाणे कदापिही लावता येणार नाही. त्यांचा उचित अन्वयार्थ आपणास एका विशेष प्रकारच्या ‘धार्मिक-जीवन-पद्धतीच्या’ चौकटीतच समजावून घेणे आवश्यक आहे. ‘धार्मिक-जीवन-पद्धतीच्या’ चौकटीतच धार्मिक विधाने अर्थपूर्ण वा महत्त्वपूर्ण ठरतात.

धार्मिक विधानांच्या स्वरूपाच्या संदर्भातील आपली भूमिका स्पष्ट करण्यासाठी व्हिट्गेन्श्टाइन यांनी पुढील उदाहरण दिले आहे. ते म्हणतात, “ईश्वर सर्वकाही पाहू शकतो”. या विधानाच्या संदर्भात ईश्वर वर्तमानातील घटनांप्रमाणेच भविष्यातील घटनाही पाहू शकतो का? हा प्रश्न आपण उपस्थित करू शकतो; मात्र ईश्वराच्या डोळ्यांच्या भुवया कशा आहेत, असा प्रश्न विचारणे अयोग्य ठरेल. कारण ईश्वराच्या अंगोपांगांच्या संदर्भात अशा प्रकारचा प्रश्न उपस्थित करायला धर्मामध्ये ईश्वर हा मनुष्यप्राण्याप्रमाणे कोणी असा प्राणी मानलेला नाही. त्याचप्रमाणे ‘ईश्वर आपणा सर्वांचा पिता आहे’ या विधानाचा अर्थ ईश्वराने जैविक-पित्याप्रमाणेच आपणास जन्म दिलेला आहे, असा नसून आपल्या पित्याप्रमाणे तो आपणा सर्वांची देखभाल करतो एवढाच केवळ अर्थ होतो. वरील विधानांचा वास्तविक विधानांप्रमाणे अन्वयार्थ लावणे म्हणजे धार्मिक भाषेचा यथार्थ उपयोग समजावून न घेणे होय. थोडक्यात, धार्मिक भाषेच्या स्वरूपातील उपयोगिता सिद्धांतानुसार धार्मिक विधाने वास्तविक अनुभवाश्रित विधाने नसून त्यांची अर्थपूर्णता वैशिष्ट्यपूर्ण अशा ‘धार्मिक-जीवन-पद्धतीच्या’ चौकटीतच समजावून घेता येते. त्यांच्या अर्थपूर्णतेची कसोटी/निकष ‘धार्मिक-जीवन-पद्धतीच्या’ चौकटीतच उपलब्ध होतो. त्यामुळे धार्मिक विधानांची अर्थपूर्णता व प्रामाण्य अन्यप्रकारे ठरविण्याचा प्रयत्न करणे अनुचित किंवा अयोग्य आहे. त्यामुळे अर्थनिष्पत्ती होण्याऐवजी त्यांच्या विशेष प्रकारच्या धार्मिक अर्थाची हानी होते.

वरील अधि-धर्मशास्त्रीय सिद्धांतांचे वर्गीकरण पुढीलप्रमाणे कोष्टकाच्या आधारे थोडक्यात स्पष्ट करता येते :

अ. क्र. ज्ञानात्मक सिद्धांत न-ज्ञानात्मक सिद्धांत उपयोगिता सिद्धांत
१. स्वरूप धार्मिक भाषा वास्तविक  किंवा वर्णनात्मक असते. धार्मिक भाषा वास्तविक किंवा वर्णनात्मक नाही. धार्मिक-विश्वास अनुभवाश्रित वास्तविक विधानांहून भिन्न, कोणत्याही लौकिक, अलौकिक सत्तेचे वर्णन करीत नाही.
२. स्वरूप विशेषप्रकारचे सूचनात्मक ज्ञान प्रदान करतात. विशेष प्रकारच्या अर्थात धार्मिक भावनांची अभिव्यक्ती असते. धार्मिक विधानांचा अन्वयार्थ धार्मिक जीवन-पद्धती वा परंपरेच्या संदर्भातच.
३. अर्थ धार्मिक भाषा/विधानांना बोधात्मक अर्थ असतो. धार्मिक भाषा/विधानांना भावनिक अर्थ असतो. धार्मिक अर्थ भिन्न असतो.
४. सत्यासत्यतेचा प्रश्न सत्यासत्यतेचा प्रश्न निर्माण होतो. सत्यासत्यतेचा प्रश्न निर्माण होत नाही. धार्मिक विश्वासाची सत्यासत्यता वस्तुपूरक प्रमाणांनी सिद्ध करता येत नाही.
५. सत्यतामूल्य सत्य किंवा असत्य असे मूल्य देता येते. सत्य किंवा असत्य असे मूल्य देता येत नाही. फारतर अधिक चांगले वा अधिक योग्य असे म्हणता येईल. सत्य किंवा असत्य असे मूल्य देता येत नाही.
६. पुरस्कर्ते व समर्थक पुरस्कर्ते व समर्थक : जॉन हिक, बेसिल मिशेल, आय. एम. क्रोम्बी ए. जे. एअर, आर. एम. हेअर, अँटोनी फ्लू, आर. बी. ब्रेथवेट, थॉमस मॅकफरसन लूटव्हिख व्हिट्गेन्श्टाइन, डी. झेड. फिलिप्स, पीटर विंच, नॉर्मन मालकम

संदर्भ :

  • Ayer, A. J. Language Truth and Logic, New York, 2001.
  • Hick, John, Ed. Classical and Contemporary Readings in the Philosophy and Religion, New Jersey, 1964.
  • Hick, John, Philosophy of Religion, New Jersey, 1963.
  • Wittgenstein, Ludwig, Trans. Anscombe, G.E.M. Philosophical Investigations, Oxford, 1953.
  • Wittgenstein, Ludwig, Trans. Pears, D. F.; Mc Guinness, R.K.P. Tractatus Logico Philosophicus, London, 1961.
  • जोशी, ज. वा. धर्माचे तत्त्वज्ञान, पुणे, १९७५.
  • वर्मा, वेदप्रकाश, धर्मदर्शन की मूल समस्याएं, दिल्ली विश्वविद्यालय, २०१२.

                                                                                                                                                                            समीक्षक : वत्सला पै