भारत- पाकिस्तान १९६५ च्या युद्धामधील एक लढाई.

पार्श्वभूमी : पंजाबमधील भारत-पाकिस्तान सीमेवरील खेमकरन या गावापासून पाच किमी. दूर असलेले असलउत्तर हे एक खेडेगाव. १९६५ च्या युद्धादरम्यान पाकिस्तानच्या सर्वश्रेष्ठ रणगाड्यांच्या तुकडीचा येथे धुव्वा उडाला आणि त्यांच्या शंभर अद्ययावत रणगाड्यांचा भारतीय सैन्याने कपाळमोक्ष केला. पाकिस्तानी सैन्याच्या १ सशस्त्र विभागाच्या रणगाड्यांच्या तुकडीकरवी भारताच्या पंजाबात आक्रमण करून अचानक खेमकरन ते अमृतसर मुसंडी मारायची, वाटेतील अपुऱ्या भारतीय सैन्याला डावलत पार दिल्लीच्या दिशेने सनसनाटी बाजी मारून मिळेल तेवढा प्रदेश व्यापायचा आणि मग काश्मीरचा सौदा साधायचा, हे पाकिस्तानचे लष्करशहा आयूबखानांचे कारस्थान होते. परंतु सीमेवरच, असलउत्तरच्या रणभूमीवर, भारतीय सैन्याने ते पार धुळीला मिळविले. अमृतसर–दिल्लीची स्वप्ने सोडाच, पण पाकिस्तानी लष्कराला सीमेपासून आठ–दहा किमी.च्या आगेकूचीनंतरच स्वगृही परतावे लागले.

परस्परविरोधी सेनाबल : पाकिस्तानने आपल्या लष्करातील सर्वांत बलिष्ठ १सशस्त्र विभाग रणांगणात उतरविण्याचे ठरविले होते. त्यांच्या या सशस्त्र विभागामध्ये तीन सशस्त्र ब्रिगेड होत्या. त्यात चार पॅटन रणगाड्यांच्या पलटणी आणि एक शाफी रणगाड्याची पलटण (प्रत्येकी ४५ रणगाडे) होती. पॅटन हा अमेरिकी बनावटीचा रणगाडा त्या वेळी जगातील अत्याधुनिक रणगाड्यांमध्ये गणला जाई. शिवाय  पाकिस्तानचा तोफखानाही भारतापेक्षा सरस होता.

पाकिस्तानी सशस्त्र विभागाला थोपविण्यासाठी खेमकरन विभागात भारतीय सैन्याची ४ पायदळ विभाग आणि २ सशस्त्र ब्रिगेड या दोन तुकड्या तैनात करण्यात आल्या होत्या. वास्तविक एका पायदळ विभागामध्ये नऊ पायदळ बटालियन असतात, परंतु त्या वेळी ४ पायदळ विभागामध्ये फक्त साडेतीन बटालियनच होत्या. २ सशस्त्र ब्रिगेडमध्ये ३ कॅव्हलरी, ८ कॅव्हलरी आणि ९ हॉर्स (डेक्कन हॉर्स) या तीन तुकड्या होत्या. ३ कॅव्हलरीकडे (३ कॅव्ह) ४५ सेंच्युरिअन, ९ हॉर्सकडे ४५ शेरमन आणि कॅव्हलरीकडे ४५ ए. एम. एक्स १३ या बनावटीचे रणगाडे होते. हे सर्व दुसऱ्या महायुद्धकालीन जुने रणगाडे पॅटनपेक्षा अनेक पटीने कनिष्ठ होते. ४ पायदळ विभागाचे कमांडर मेजर जनरल गुरबक्षसिंग, सशस्त्र ब्रिगेडचे कमांडर ब्रिगेडियर त्यागराज, डेक्कन हॉर्सचे कमांडिंग ऑफिसर (सी. ओ.) कर्नल अरुण वैद्य आणि ३ कॅव्हचे कमांडिंग ऑफिसर कर्नल सलीम कॅलेब हे सर्व अत्यंत प्रथितयश सेनानी होते.

युद्धयोजना : पाकिस्तानच्या ११ पायदळ विभागाला १ सशस्त्र ब्रिगेडच्या साहाय्याने ८-९ सप्टेंबरच्या मध्यरात्री खेमकरनजवळ आंतरराष्ट्रीय सीमा ओलांडून भारतीय हद्दीत प्रथम एक सुरक्षित क्षेत्र (ब्रिज हेड) स्थापन करण्याचे काम देण्यात आले होते. त्यानंतर १ सशस्त्र विभागाच्या रणगाडा-तुकड्या उत्तरेकडे अमृतसर आणि पूर्वेकडील सतलज नदीवरील हरिके पुलाच्या दिशेने मुसंडी मारून भारतीय सैन्याची कोंडी करणार होत्या.

पाकिस्तानी सशस्त्र विभागाच्या हालचालींची चाहूल लागल्यावर ती खेमकरनमार्गे चढाई करेल, असा अचूक अंदाज जलंदरमधील ११ कोअर मुख्यालयाचे कोअर कमांडर लेफ्टनंट जनरल जे. एस. धिलन यांनी केला. त्यांनी ४ पायदळ विभागाला असलउत्तरजवळ संरक्षण फळी उभारून पाकिस्तानी सैन्याला कोणताही चंचुप्रवेश करण्याला मज्जाव करण्याचे आदेश दिले. पाकिस्तानच्या रणगाड्यांना भारतीय प्रदेशात चढाई करण्यास प्रतिबंध करण्यासाठी आणि रणगाड्यांचा कपाळमोक्ष करण्यासाठी २ सशस्त्र ब्रिगेड असलउत्तर क्षेत्रात पाठविण्यात आली.

ब्रिगेड कमांडर ब्रिगेडियर त्यागराज यांनी भारतीय क्षेत्रात हल्ला करणाऱ्या शत्रूच्या रणगाड्यांना सापळ्यात पकडण्यासाठी एक धूर्त चक्रव्यूह रचला. ४ पायदळ विभागाच्या संरक्षण फळीभोवती हा सापळा उभारला होता. सप्टेंबरच्या महिन्यात पंजाबमध्ये उंच गवत सर्वत्र उगवते, त्याला सरकंडा म्हणतात. असलउत्तरमधील ४ पायदळ विभागाने उभारलेल्या संरक्षण फळीच्या दोन्ही बाजूंनी शत्रूचे रणगाडे वळण घेऊन जाण्याचा प्रयत्न करतील हे स्पष्ट होते. त्यांच्या मार्गाच्या वाटेत ३ कॅव्हलरीचे रणगाडे घोड्याच्या नालाच्या वक्राकार स्वरूपात दोन अर्धवर्तुळात उभे करण्यात आले होते. शत्रूच्या रणगाड्यांना त्या दिशेने रेटण्यासाठी ८ कॅव्हलरीचे रणगाडे जागोजागी असे उभे केले होते की, त्यांना चुकविण्याच्या प्रयत्नात शत्रू नेमका दोन्ही बाजूंनी ३ कॅव्हलरीच्या रणगाड्यांच्या दिशेने जावा. जेव्हा ते चढाई करतील, तेव्हा ९ हॉर्सचे (डेक्कन हॉर्स) रणगाडे एका बाजूने त्यांना टिपू शकतील अशी त्यांची रचना केली होती. त्याचबरोबर या ‘किलिंग झोन’ मध्ये ते आले की, त्यांचा वेग कमी करण्यासाठी जवळचा एक कालवा ऐनवेळी फोडून त्याचे पाणी सर्वत्र पसरावे, चिखलात शत्रूचे रणगाडे रुतून अडकावेत आणि आपल्या रणगाड्यांना एक नामी लक्ष्य मिळावे असा डावपेच आखला होता. उंच सरकंड्यात लपलेले भारतीय रणगाडे शत्रू अगदी जवळ येईपावेतो दिसणार नव्हते. त्यामुळे पॅटनची तोफ जरी २४०० गज लांब गोळाफेक करू शकत असली, तरी त्या लांब टप्प्याचा काहीच उपयोग होणार नव्हता. उलट, शेरमन आणि सेंच्युरिअन रणगाड्यांचा टप्पा जरी ८०० ते १००० मी. असला, तरी शत्रूचे रणगाडे आदी निकट आल्यावरच त्यांच्यावर नेम धरून त्यांना उडविणे शक्य होणार होते. ब्रिगेडियर त्यागराज आणि त्यांच्या हाताखालील तीन तुकड्या कमांडरनी आखलेला हा संरक्षणात्मक प्रतिसादाचा आराखडा अत्यंत कावेबाज, धोरणी आणि बुद्धिमंत होता. प्रबळ शत्रूला नमविणाऱ्या चतुर रणनीतीचे आणि रणगाडा द्वंद्वातील तल्लख डावपेचाचे इतके उत्तम उदाहरण सापडणे कठीणच !

असलउत्तरची लढाई : ८ सप्टेंबर १९६५ रोजी शत्रूचे रणगाडे टेहळणी करू लागले, परंतु २ सशस्त्र ब्रिगेडच्या रणगाड्यांनी कोणताही प्रतिसाद दिला नाही आणि आपला मागमूस लागू दिला नाही. दुपारी शत्रूच्या दोन शाफी रणगाड्यांच्या आणि एका पॅटन रणगाड्यांच्या स्क्वाड्रननी भारतीय तोफखान्याच्या तुकडीवर (गन एरिया) मागून अचानक धाड घातली.  डेक्कन हॉर्सची एक स्क्वाड्रन (१४ रणगाडे) सरकंड्यामागे लपलेली होती. तिने लागलीच या शत्रूच्या प्रबळ टोळीवर हल्ला चढविला. एक भयानक झटापट झाली. त्यात शत्रूचे अकरा रणगाडे बरबाद झाले. त्या झटापटीत डेक्कन हॉर्सचे चार रणगाडे निकामी झाले. तोफखान्याला मात्र कोणतीही इजा पोचली नाही. या अनपेक्षित प्रतिसादाने गडबडून गेलेल्या शत्रूने पळ काढला.

संध्याकाळी भुरा कलान-मस्तगढ क्षेत्रात शत्रूचे जबरदस्त हल्ले चालू झाले. शत्रूच्या सशस्त्र विभागाच्या जंगी चढाईसाठी सुरुवातीला पाय रोवण्याचे (ब्रिज हेड) काम सुरू झाल्याचे दिसत होते. ४ पायदळ विभागाच्या १/९ गोरखा रायफल्सच्या (१/९ जी. आर.) मोर्चावर एका पॅटन रणगाड्यांच्या पलटणीने हल्ला चढविला आणि १/९ जी. आर.ला मागे रेटण्यात ती यशस्वी झाली. त्यानंतर शेजारच्या ४ ग्रिनेडियरच्या मोर्चावर हल्ला झाला. लगोलग मागच्या १८ राजरिफ बटालियनवरही शत्रू चालून आला, परंतु तिन्ही जागी शत्रू फारशी प्रगती करू शकला नाही.

९ सप्टेंबरला सकाळी चारही भारतीय पलटणींच्या मोर्चावर शत्रूच्या विमानांनी तुफान गोळाबारी केली. ४ ग्रिनेडियर बटालियनच्या मोर्चावर शत्रूच्या रणगाड्यांनी पुनश्च हल्ला चढविला. याच झटापटीदरम्यान ४ ग्रिनेडियरचा हवालदार अब्दुल हमीदने रणगाडाविरोधी आरसीएल तोफेच्या साहाय्याने शत्रूच्या तीन रणगाड्यांचा एकहाती विध्वंस केला. त्याचबरोबर १८ राजरिफवरही घमासान हल्ले होत राहिले. रात्री दहापर्यंत हे हल्ले चालू होते. परंतु शत्रू या दोन्ही बटालियनची ठाणी काबीज करण्यात अयशस्वी ठरला. १८ राजरिफच्या क्षेत्रात तर अनेक रणगाडे जायबंद झाले होते. रात्री दहानंतर मात्र शत्रूचे हल्ले थांबले. आता तो संरक्षणफळीच्या दोन्ही बाजूंनी वळसा घालून कोंडी फोडण्याचा प्रयत्न करेल हे स्पष्ट होते आणि त्यासाठी २ सशस्त्र ब्रिगेडच्या सर्व पलटणी सज्ज होत्या. संध्याकाळी पाण्याच्या कालव्याचा बांध फोडून काही पूर्वनिश्चित भाग जलमय करण्यात आला.

अपेक्षेनुसार १० सप्टेंबरला सकाळी शत्रूच्या रणगाड्यांच्या एका जंगी दस्त्याने संरक्षण फळीच्या डाव्या बाजूने काही अंतरावरून आगेकूच करण्याचा प्रयत्न केला. त्यांना सरकंड्यांमध्ये लपलेले गोलाकार रणगाडे दिसले नाहीत. थोड्याच वेळात काही रणगाडे चिखलात रुतू लागले. ते ३ कॅव्हच्या सेंच्युरिअन रणगाड्यांच्या टप्प्यात आल्यावर त्यांच्यावर समोरील रणगाड्यांच्या तोफांचा भडिमार झाला. त्याचबरोबर डाव्या बाजूने डेक्कन हॉर्सच्या शेरमन रणगाड्यांचा अचूक मारा चालू झाला. त्यांची पूर्ण कोंडी झाली होती. अगदी हीच अवस्था उजव्या बाजूने वळसा घालून जाणाऱ्या दुसऱ्या दस्त्याची झाली होती.

त्यानंतर मात्र पाकिस्तानी १ सशस्त्र विभागाने माघार चालू केली आणि ते १२ सप्टेंबरपर्यंत कसूरच्या पिछाडीस परतले.  अमृतसर-हरिकेपर्यंतचा प्रदेश काबीज करण्याची त्यांची स्वप्ने विरून गेली होती. १२ सप्टेंबरच्या सकाळी पाकिस्तानच्या ९७ रणगाड्यांची कलेवर तिथे इतस्तत: पसरली होती. त्या जागेचे ‘पॅटननगर’ असे नामकरण करण्यात आले. असलउत्तरमधील पाकिस्तानी लष्कराच्या दारुण पराभवाची ती निशाणी होती. त्यात हवालदार अब्दुल हमीद यांना परमवीर चक्र, कर्नल अरुण वैद्य यांना महावीर चक्र आणि ब्रिगेडियर त्यागराज यांना वीर चक्र प्रदान करण्यात आले.

असलउत्तरची लढाई दुसरे महायुध्दधरून अद्यापर्यंत लढल्या गेलेल्या रणगाडा लढायात एक अग्रगण्य लढाई म्हणून गणली जाते. पाकिस्तानच्या अवास्तव महत्त्वाकांक्षेला ते खरोखरच “असली उत्तर” होते.

संदर्भ :

  • Krishna Rao, K. V. Prepare or Perish, New Delhi, 1991.
  • Mankekar, D. R. Twentytwo Fateful Days : Pakistan Cut to Size, Bombay, 1966.
  • Singh, Harbaksh, War Despatches : Indo-Pak Conflict 1965, New Delhi, 1991.
  • पित्रे, शशिकांत, ‘असलउत्तरची रणधुमाळी’, लोकमत लेखमालिका, ‘अविस्मरणीय रणसंग्राम’, ११ व १८ ऑगस्ट २०१३.

प्रतिक्रिया व्यक्त करा