भारत-चीन १९६२च्या युद्धातील एक लढाई.

तवांग विभागानंतर दुसऱ्याच दिवशी चिनी सैनिकांनी नेफाच्या सर्वांत पूर्वेतील लोहित विभागवरही २१ ऑक्टोबरला आक्रमण केले.

लोहित विभाग : तिबेटमधील रीमा ते ब्रह्मपुत्रा नदीवरील तेजू यांना जोडणाऱ्या पायवाटेमार्गे तिबेट आणि भारत यांदरम्यानचा व्यापार पूर्वीपासून चालत आला आहे. रीमापासून भारतीय प्रदेशातील किबिथू-वलाँग-सत्तीमार्गे जाणारा हा व्यापारी मार्ग अत्यंत खडतर आणि निर्जन डोंगरांमधून जातो. मॅकमहोन रेषेच्या परिसरातील चौदा हजार फूट उंचीचा प्रदेश किबिथूच्या दक्षिणेस चार हजार पाचशे फुटांपर्यंत उतरतो. नंतर तो सत्तीच्या परिसरात अकरा ते बारा हजार फुटांपर्यंत चढत जातो आणि पुनश्च उतरून तेजूच्या सखल भागात पोचतो. रिमापासूनची एकमेव पायवाट लोहित नदीच्या काठाकाठाने जाते. १९५० मध्ये आलेल्या भूकंपामुळे रीमा-वलाँग रस्ता अधिकच मोडकळीला आला होता. तेजूपासून वलाँगपर्यंत पायी जाण्यासाठी दोन आठवड्याचा अवधी लागत असे. वलाँग येथे एक तकलुपी विमानपट्टी उपलब्ध होती; परंतु ती इतकी छोटेखानी होती, की भारतीय विमान दलातील ‘कॅनडियन ऑटर’ ही केवळ सहा सैनिक वाहू शकणारी विमानेच तिच्यावर उतरू शकत असत. वलाँगच्या पुढे किबिथू या सीमेवरील गावापर्यंत जाण्यास दोन दिवस लागत असत.

वलाँगमधील मोर्चेबंदी : ऑक्टोबर १९६२च्या आधी वलाँगमध्ये ६ कुमाऊ ही पायदळाची एकच पलटण तैनात होती. तिची एक कंपनी किबिथूमध्ये आणि उरलेली पलटण वलाँगमध्ये होती. किबिथूच्या पुढे कहाव येथे आसाम रायफल्सची शिबंदी होती. त्याच्या उत्तरेकडील मॅकमहोन रिज हे नाव दिलेल्या सीमेलगतच्या डोंगरसरीवर एका रायफल कंपनीचे मोर्चे खोदून ठेवण्यात आले होते आणि वेळ पडेल तेव्हा तिथे एक कंपनी पाठवून शत्रूच्या तुकड्यांचा काही वेळासाठीतरी विलंब करण्याची योजना होती. मॅकमहोन रिजवरून चिन्यांचा प्रदेश दिसू शकत होता. त्याच्याजवळ सामा आणि पुढे रीमा ही गावे होती. दोन्हींमध्ये लामांची वस्ती होती.

१८ ऑक्टोबरला कुमाऊ गस्ती पथकाने किबिथूजवळील ‘हंड्रेड हिल’ वर चिनी सैन्य मोर्चे खोदत असल्याची बातमी आणली. ताबडतोब मॅकमहोन रिजवर एक कुमाऊ कंपनी हलवण्यात आली. २० ऑक्टोबरच्या रात्री तातू नाल्यात बरेच टॉर्च दिसले, तर २१ ऑक्टोबरला मॅकमहोन रिजच्या उत्तरेला चिनी सैन्य गोळा होत असल्याची माहिती गस्त पथकाने दिली. अखेर २२ ऑक्टोबरच्या मध्यरात्री चिन्यांनी मोठ्या संख्येत कुमाऊंवर हल्ला चढवला. त्याला कुमाऊंनी प्रतिसाद दिला; परंतु चिनी सैन्याची संख्या जास्त असल्यामुळे मॅकमहोन रिज आणि किबिथूमधील दोन्ही कुमाऊ कंपन्यांना माघारीचे आदेश दिले गेले. किबिथूच्या जरा पुढे पायवाट लोहित नदीच्या पूर्वेकडून पश्चिमेच्या बाजूस जात असे. नदी पार करण्यासाठी तिथे दोन जाडजूड लोखंडी दोरांचा एक पूल होता. २२ तारखेच्या दुपारपर्यंत तो दोरांचा पूल कुमाऊंनी ओलांडला आणि तो स्फोटकांनी उडवून लावण्यात आला. त्या रात्री किबिथूमधून माघार सुरू झाली आणि २३ ऑक्टोबरच्या सकाळपर्यंत दोन्ही कंपन्या वलाँगमध्ये येऊन पोचल्या. जरी मॅकमहोन रिजच्या चकमकीत थोडीफार वाताहत झाली होती, तरी कुमाऊंची माघार शिस्तबद्ध आणि रणनीतीनुसार होती. शत्रूच्या आक्रमणाची दिशा आणि संख्याबळाबाबतीत पुरेशी माहिती गोळा करणे, त्याच्या मार्गात अडथळे आणून त्याच्यावर विलंब लादणे व त्याकरवी वलाँगची संरक्षणफळी मजबूत करण्यासाठी अधिक अवधी मिळवून देणे आणि पुढील लढाईसाठी शक्य होईल तितके सहीसलामत परतणे  ही तिन्ही उद्दिष्टे कुमाऊ पलटणीच्या या आघाडी तुकडीने (अड्वान्स गार्ड) साध्य केली होती.

वलाँगवरील धोका पाहून २२ ऑक्टोबरनंतर तिथे आणखी दोन इन्फन्ट्री बटालियन हलवण्यात आल्या. त्यासाठी छोट्या विमानाचा (ऑटर्स) वापर झालाच, पण त्याशिवाय काही शिबंदी पायी पोचली. या घाईगर्दीत संपूर्ण रसद, दारूगोळा आणि इतर सामान पोचणे शक्यच नव्हते. शीख बटालियनने विमानपट्टीच्या उत्तरेस महाप्लॅटो आणि लॅडर्स या जागी ठाणे उभारले. त्यांच्या पूर्वेला डकोटा हिलवर गोरखा रायफल्स (जी. आर.)च्या बटालियनने मोर्चाबंदी केली. वलाँग गावाभोवती संरक्षणफळी उभी करण्याचे काम ६ कुमाऊ पलटणीवर सोपवण्यात आले.

सुरुवातीला वलाँग क्षेत्र ४ इन्फन्ट्री डिव्हिजनच्या ५ इन्फन्ट्री ब्रिगेडखाली होते; परंतु तवांगचा पाडाव झाल्यानंतर लोहित विभागाच्या संरक्षणासाठी एका नवीन डिव्हिजनचे मुख्यालय उभारण्याचा निर्णय घेण्यात आला. या नव्या २ इन्फन्ट्री डिव्हिजनचे प्रमुख म्हणून मेजर जनरल एम. एस. पठाणिया यांची नेमणूक झाली. त्यांच्या हाताखाली ११ इन्फन्ट्री ब्रिगेड मुख्यालयी हलवण्यात आले आणि वलाँगमधील ३ इन्फन्ट्री बटालियन या ब्रिगेडच्या हाताखाली देण्यात आल्या. अशाप्रकारे नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्याच्या अखेरपर्यंत घाईगडबडीत ११ इन्फन्ट्री ब्रिगेड वलाँगमध्ये कशीबशी स्थिरस्थावर झाली होती.

भारतीय सैन्याचा चिन्यांवर अविचारी हल्ला : त्या वेळेपावेतो यलो पिंपल आणि ग्रीन पिंपल या दोन टेकड्यांवर चिनी पोचले आणि त्यांनी मोर्चाबंदी सुरू केली. महाप्लॅटो आणि लॅडर्स या ठिकाणी शीखसैन्यांच्या मोर्चावर ते अधूनमधून गोळीबार करू लागले आणि त्याला शीखसैन्य प्रत्युत्तर देऊ लागले. चिनी आणि भारतीय गस्त पथकांत (पॅट्रोल) चकमकी उडू लागल्या होत्या. चार बटालियनचा फौजफाटा वापरून चिन्यांना मॅकमहोन रेषेच्या मागे रेटावे असे पठाणियांनी सुचवले आणि त्याला कोअर कमांडर कौल यांनी दुजोरा दिला. नामकाचू हल्ल्याचे काहीतरी प्रत्युत्तर द्यावे आणि पंतप्रधानांच्या जन्मदिवशी शत्रूवर बाजी मारावी, अशी कौल यांची प्रबळ इच्छा होती. म्हणूनच या हल्ल्यासाठी १४ नोव्हेंबर १९६२ हा दिवस निश्चित करण्यात आला.

हा निर्णय म्हणजे प्राथमिक युद्धतत्त्वांची अक्षम्य पायमल्ली होती; शुद्ध हाराकिरी होती. भारतीय पायदळाची सर्व सामग्री जुनाट होती. त्यांच्याकडे ‘बोल्ट अॅक्शन’च्या ३०३ रायफली होत्या. संपर्कासाठी असणारे वायरलेस सेट कालबाह्य आणि कुचकामी होते. अतिथंड प्रदेशात वापरण्यासाठी योग्य कपडे नव्हते. पायांत चामड्याचे बूट होते. पुरेसा दारूगोळा नव्हता आणि तोफांचा टप्पा तोकडा होता. या कुचकामी साहित्यानिशी कित्येक पटीने सुसज्ज अशा चिनी सैन्यावर हल्ला चढवण्यासाठी या पलटणीला भाग पाडले जात होते. पठाणियांना हल्ल्यासाठी हवी असलेली चौथी बटालियन ऑटरमधून सहा-सहा जणांच्या तुकड्यांत उतरण्यास १३ नोव्हेंबरला सुरुवात झाली. त्यांचे पूर्ण दस्ते पोचण्यास वेळ लागणार होता; परंतु जनरल कौल यांच्या दबावामुळे ११ इन्फन्ट्री ब्रिगेडचे कमांडर ब्रिगेडियर नवीन रोली आता थांबायला तयार नव्हते.

ग्रीन पिंपल आणि यलो पिंपल या टेकड्यांवरील चिनी मोर्चावर हल्ला करून त्यांना हुसकावून लावण्यासाठी ६ कुमाऊ पलटणीस निवडण्यात आले. केवळ दोन आठवड्यांपूर्वीच या बटालियनच्या दोन कंपन्या किबिथूमध्ये चिन्यांशी चकमकीनंतर परतल्या होत्या. १२ नोव्हेंबरला दुपारी चार हजार फूट उंचीच्या वलाँगमधून निघून दीड दिवसांत सर्व सामानाच्या जाम्यानिम्यानिशी चौदा हजार फूट उंचीच्या पिंपल क्षेत्रावर १३ तारखेच्या संध्याकाळपर्यंत पोचणे आणि मध्यरात्री हल्ला चढवणे हे भगीरथी काम होते. कुमाऊ बटालियनचे सी. ओ. कर्नल मदय्यानी आणखी चोवीस तासांचा अवधी मागितला; परंतु तो धुडकावण्यात आला.

६ कुमाऊने १२ नोव्हेंबरला दुपारी आगेकूच केली. २५-२६ तास अविरत चालल्यानंतर १३ नोव्हेंबरच्या मध्यरात्रीला ते लक्ष्याच्या सान्निध्यात पोचले. शत्रूच्या मोर्चाचे पूर्णतया निरीक्षण करून आणि जवानांना विश्रामासाठी काही वेळ देऊन १४ नोव्हेंबरच्या रात्री हल्ला चढवण्यासाठी कर्नल मदय्यानी परवानगी मागितली; परंतु त्यालाही साफ नकार मिळाला. वास्तविक दिवसाढवळ्या शत्रूच्या नजरेखाली हल्ला चढवणे टाळले पाहिजे; परंतु १४ नोव्हेंबर या दिवसाला हा नियम लागू नव्हता! ६ कुमाऊ कराराने लढली, पण व्हायचे तेच झाले. लक्ष्यावर पोचण्यातच त्यांची दमछाक झाली होती. चिन्यांनी प्रतिहल्ला चढवून कुमाऊंना माघार घेण्यास भाग पाडले.

धावती माघार : त्यानंतर चिन्यांनी माघार घेणाऱ्या कुमाऊंचा पाठलाग केला. दोन बटालियनच्या अनुपस्थितीत दुर्बल झालेल्या वलाँगची मोर्चेबंदी वरचढ संख्येतील चिनी प्रहारासमोर टिकाव धरू शकली नाही.

नामकाचूमधील ७ इन्फन्ट्री ब्रिगेडप्रमाणे वलाँगमधील ११ इन्फन्ट्री ब्रिगेडचे उरलेसुरले घटक छोट्याछोट्या तुकड्यांत विखुरले. काही युद्धबंदी झाले आणि उरलेले रानावनांतून रस्ता शोधत कसेबसे सखल भागात पोचले. नामकाचू किंवा तवांगइतकीच वलाँगची धूळधाण दारुण होती.

 

संदर्भ:

  •  Maxwell, Neville, India’s China War, Dehradun, 2013.
  •  Sandhu, J. S.; Dwivedi, G. G. 1962 War – Operations in Walong Sector, The Journal of The United Service Institution of India, vols. 144, April – June 2014.
  •  चव्हाण, श्याम, वलाँग- एका युद्धकैद्याची बखर, पुणे, १९८८.
  •  पित्रे, शशिकान्त, न सांगण्याजोगी गोष्ट : ६२च्या पराभवाची शोकांतिका, पुणे, २०१५ .

समीक्षक – सु. र. देशपांडे

प्रतिक्रिया व्यक्त करा