एल्जिन, लॉर्ड  जेम्स : (२० जुलै १८११ — २० नोव्हेंबर १८६३). ब्रिटिशांकित हिंदुस्थानचा १८६२–६३ च्या दरम्यानचा गव्हर्नर जनरल व व्हाइसरॉय. सातव्या अर्ल ऑफ एल्जिनचा मुलगा. त्याचा जन्म लंडन येथे झाला. त्याचे शिक्षण ईटन येथे व ऑक्सफर्ड विद्यापीठात झाले. १८४२ मध्ये त्याची जमेकाचा गव्हर्नर म्हणून नेमणूक झाली.गुलामगिरी नष्ट झाल्यामुळे उपस्थित झालेले प्रश्र त्याने संयमाने हाताळले व निग्रोंची परिस्थिती सुधारण्याचा प्रयत्‍न केला. तेथील कार्यक्षम प्रशासनामुळे १८४६ मध्ये त्याची कॅनडाचा गव्हर्नर जनरल म्हणून नेमणूक करून त्यास तेथे जबाबदार सरकार प्रस्थापित करण्याचे अवघड काम दिले. या कामगिरीबद्दल त्यास बॅरन हा बहुमान मिळाला. पुढे १८५७ च्या सुमारास ‘ॲरो’ घटनेमुळे त्याची चीनच्या आयोगात नियुक्ती झाली. तेथून तो १८५७ च्या उठावामुळे कलकत्त्यास आला आणि पुढे १८५८ मध्ये जपानला गेला. इंग्‍लंडमध्ये परतताच तो तेथील पोस्ट मास्टर जनरल झाला. हिंदुस्थानमध्ये १८६२ मध्ये व्हाईसरॉय व गव्हर्नर जनरल म्हणून आल्यानंतर कामाच्या ताणामुळे अवघ्या एक वर्षाच्या कारकिर्दीनंतर तो मरण पावला. हिंदुकुश पर्वतातील वहाबी टोळ्यांच्या हिंसक कारवायांचा बंदोबस्त, हे त्याचे हिंदुस्थानातील प्रमुख कार्य होय. वसाहतींचे प्रश्र समजुतीने हाताळणारा एक कार्यक्षम प्रशासक अशी त्याची ख्याती होती.

 

Close Menu
Skip to content