नॅश, जॉन फोर्ब्स (Nash, John Forbes) : (१३ जून १९२८ – २३ मे २०१५). अमेरिकन गणिती, अर्थतज्ज्ञ व अर्थशास्त्रातील नोबेल पुरस्कारचा सहमानकरी. नॅश यांना गेम थिअरी (Game Theory) या नावीन्यपूर्ण संशोधनाबद्दल १९९४ मध्ये प्रसिद्ध जर्मन अर्थतज्ज्ञ राइनहार्ट सेल्टन (Reinhard Salten)व जॉन चार्ल्स हॅर्रसॅन्यी (John Charles Harsanyi) यांच्या समवेत अर्थशास्त्रातील नोबेल स्मृती पुरस्कार विभागून देण्यात आला. नॅश यांच्या चरित्रावर आधारित ब्यूटिफूल माइंड या हॉलीवूड चित्रपटाला २००१ मध्ये ऑस्कर (Academy Award) पुरस्कार मिळाला. सर्वोत्तम चित्रपटाचा बहुमान मिळालेल्या या चित्रपटात नॅश यांचे गणितविषयाचे अस्सल ज्ञान व त्यांना असलेल्या ‘स्किझोफ्रेनियाʼ नावाच्या मानसिक अशा गंभीर आजाराचे चित्रण करण्यात आलेले आहे.

नॅश यांचा जन्म वेस्ट व्हर्जिनियामधील ब्ल्यूफिल्ड येथे झाला. त्यांनी सुरुवातीचे शिक्षण तेथेच घेतले. त्यानंतर त्यांनी लोकल कम्युनिटी कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. नॅश यांनी अतिप्रगत गणित (Advance Mathematical) या विषयात प्रावीण्य मिळवावे, अशी त्यांच्या पालकांची इच्छा होती. पुढे त्यांना पूर्ण शिष्यवृत्ती मिळाल्याने ते कार्नेगी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (सध्याचे कार्नेगी मेलॉन विद्यापीठ) या शिक्षणसंस्थेत प्रवेश घेतला. सुरुवातीला त्यांनी केमिकल इंजिनियरिंग हा विषय निवडला; परंतु नंतर ते गणितविषयाकडे वळले. त्याच विद्यापीठातून त्यांनी गणितातील बी. एस. व १९४८ मध्ये एम. एस. या पदव्या प्राप्त केल्या. १९५० मध्ये प्रिन्स्टन विद्यापीठातून नॉन-को-ऑपरेटिव्ह गेम्स हा गणित विषयामधील प्रबंध लिहून त्यांनी पीएच. डी. पदवी मिळविली. तत्पूर्वी १९४९ मध्ये त्यांनी कार्नेगी विद्यापीठात अर्थशास्त्रविषयाचा अभ्यास केला होता. आजारपणानंतर १९९९ मध्ये कार्नेगी मेलॉन विद्यापीठातर्फे डॉक्टर ऑफ सायन्स ॲण्ड टेक्नॉलॉजी ही पदवी नॅश यांना देण्यात आली. २००७ मध्ये अँटपर्व विद्यापीठातर्फे अर्थशास्राची मानद डॉक्टरेट पदवी आणि २०११ मध्ये हाँगकाँगच्या सिटी विद्यापीठाकडून त्यांना वैद्यकीय पदवी प्राप्त झाली. नॅश यांची २०१२ मध्ये अमेरिकन मॅथेमॅटिकल सोसायटीच्या सदस्यपदी निवड झाली होती.

नॅश हे १९५१ मध्ये मॅसॅचूसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (M. I. T.) या संस्थेत गणितविभागात प्राध्यापक म्हणून रुजू झाले; परंतु स्किझोफ्रेनियानामक गंभीर मानसिक आजारामुळे त्यांना १९५९ मध्ये राजीनामा द्यावा लागला. आजारपणामुळे त्यांचे विचित्र वर्तन पाहून त्यांच्या पत्नीने त्यांना त्वरित मॅकलिन हॉस्पिटलमध्ये दाखल केले. तेथे त्यांना स्किझोफ्रेनिया हा गंभीर आजार झाल्याचे निदान झाले. १९६१ मध्ये पुढील औषधोपचारांसाठी त्यांना न्यू जर्सी स्टेन हॉस्पिटल, ट्रेन्टन येथे दाखल केले गेले. नंतरची जवळपास नऊ वर्षे त्यांना दवाखान्यातच काढावी लागली. त्यानंतर त्यांच्या प्रकृतीत बऱ्यापैकी सुधारणा होऊन ते पुन्हा संशोधनासाठी प्रिन्स्टन विद्यापीठात सहभागी झाले. १९५० मध्ये पीएच. डी. प्रबंधासाठी गणित विषयामधील गेम थिअरी विकसित केल्याबद्दल जवळपास चव्वेचाळीस वर्षांनंतर त्यांना नोबेल पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. त्यांनी सदर प्रबंधामध्ये सहकारी व बिगरसहकारी क्रीडासिद्धांतांची (Co-Operative and Non-Co-Operative Game Theory) मांडणी करून त्यातील तफावत विशद केली. सहकारी क्रीडाप्रकारामध्ये (सांघिक खेळामध्ये) परस्परांची कामगिरी चांगली व्हावी, असा अलिखित ठराव असतो; तथापि बिगरसहकारी खेळामध्ये असा ठराव नसतो. जर सहकार्य केले गेलेच, तर ते स्वेच्छेने केले जाते. म्हणजे सहकार्याची भावना निर्माण व्हावयाची असेल, तर अशा सांघिक खेळात प्रत्येकाला स्वारस्य असले पाहिजे. नॅश यांनी कित्येक वर्षांपूर्वी विकसित केलेल्या क्रीडासिद्धांताचा उपयोग सध्या अर्थशास्त्र व व्यवसायविषयक समस्यांचे निराकरण करण्यासाठी केला जातो. व्यवस्थापनाला निर्णय घेण्यासाठी क्रीडासिद्धांत हे महत्त्वाचे साधन मानले जाते.

नॅश यांचे दुसरे महत्त्वाचे योगदान म्हणजे बिगरसहकारी क्रीडाप्रकारातील समतोलाची संकल्पना. त्यालाच पुढे ‘नॅश इक्विलिब्रियमʼ असे संबोधले गेले. सदर संकल्पनेनुसार इतर खेळाडूंच्या व्यूहरचना ठरलेल्या असल्या, तरी एखादा खेळाडू पर्यायी व्यूहरचना निवडून आपली कामगिरी उंचावू शकतो. जेव्हा अनेक क्रीडाप्रकार असतात, खेळाडूंची संख्या कमी-जास्त असते व संमिश्र व्यूहरचनांना मान्यता असते, तेव्हा किमान एकदातरी त्यांच्या व्यूहरचनेत समतोल आढळतो. संमिश्र व्यूहरचना याचा अर्थ खेळाडू निश्चित अशी कोणतीही एक कृती करीत नाहीत, तर आपली कामगिरी उंचाविण्यासाठी अनेक पर्यायी कृतींचा अवलंब करतो. व्यक्ती जेव्हा एखाद्या समस्येबाबत वाटाघाटी करतात, तेव्हा त्यापाठीमागे विशिष्ट तर्कशास्त्र असते. त्याबाबतचे त्यांचे योगदानही महत्त्वाचे मानले जाते. पूर्वीच्या अर्थतज्ज्ञांनी सदरच्या वाटाघाटीमध्ये व्यक्तींना मिळणारा हिस्सा अगर लाभ अनिश्चित असतो, असे म्हटले होते. नॅश यांनी त्यापुढे जाऊन प्रत्यक्ष हिस्सा अगर लाभ निश्चित न करता प्रत्येकात मिळणाऱ्या लाभांची विभागणी कोणत्या अटीवर करण्यात येते, हे लक्षात घेणे महत्त्वाचे असल्याचे नमूद केले.

नॅश यांनी पुढील ग्रंथ लिहिले : दि इसेन्शिअल जॉन नॅश (२००२) आणि ओपन प्रॉब्लेम्स इन मॅथेमॅटिक्स (२०१६–सहलेखन).

नॅश यांना नोबेल स्मृती पुरस्काराबरोबर पुढील पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले. जॉन व्हॉन न्यूमन थिअरी प्राइझ (१९७८), लिरॉय पी. स्टील पुरस्कार (१९९९), डबल होलिक्स पदक (२०१०), ॲबल पुरस्कार (२०१५) इत्यादी.

समीक्षक – संतोष दास्ताने

प्रतिक्रिया व्यक्त करा