करमरकर, विनायक पांडुरंग : (२ ऑक्टोबर १८९१ – १३ जून १९६७). वास्तववादी शैलीत दर्जेदार स्मारकशिल्पे घडविणारे आधुनिक काळातील एक ख्यातकीर्त महाराष्ट्रीय शिल्पकार. नानासाहेब या नावाने अधिक परिचित. त्यांचा जन्म अलिबागजवळील सासवणे (तत्कालीन जि. कुलाबा, सांप्रत जि. रायगड) येथे झाला. गणपतीच्या मूर्ती घडविणे हा त्यांच्या कुटुंबाचा परंपरागत व्यवसाय होता.

साहजिकच बालवयातच त्यांना कलेची आवड निर्माण झाली. तसेच चित्रकलेतदेखील त्यांना गती होती. ते देवळातील भिंतींवर चित्रे काढत असत. ही चित्रे तत्कालीन कुलाबा जिल्ह्याचे जिल्हाधिकारी ओटो रॉथफिल्ड यांच्या दृष्टीस पडली. त्यांनी करमरकरांना सर. जे. जे. स्कूल ऑफ आर्ट, मुंबई येथे कलेचे शिक्षण घेण्यास आर्थिक मदत देऊन प्रवृत्त केले (१९१०). त्यांनी जी. डी. आर्ट ही पदविका घेतली (१९१३). जे. जे. मध्ये त्यांना उत्तम शिल्पकृतीबद्दल लॉर्ड मेयो पदक मिळाले. याच काळात त्यांची ओळख सर्जन डॉ. भाजेकर आणि रवींद्रनाथ टागोरांचे नातू सुरेंद्रनाथ यांच्याशी झाली व त्यांच्या आग्रहाखातर ते कोलकात्याला गेले. तेथे त्यांनी झांवबझार येथे स्वत:चे कलामंदिर  (स्टुडिओ) उभारले. याच सुमारास त्यांनी पूर्वाश्रमीच्या येसू परांजपे या युवतीशी लग्न केले (१९१८).

करमरकरांनी बेलूर मठातील रामकृष्ण परमहंसांचा पुतळा बनविला (१९१६-२०). त्यामुळे त्यांना बरीच कामे मिळू लागली. त्यांनी शास्त्रज्ञ पी. सी. रे, देशबंधू चित्तरंजनदास यांची व्यक्तिशिल्पे केली. महात्मा गांधीजींना समोर बसवून त्यांचे शिल्प केले. व्यावसायिक दृष्ट्या ते कोलकात्यात स्थिरावले असतानाच उच्च शिक्षणासाठी ते लंडनला गेले (१९२०). यासाठी वाडिया व टाटा ट्रस्ट यांच्याकडून कर्जाऊ शिष्यवृत्ती तसेच भाजेकर, राव, शिल्पकार म्हात्रे यांचे आर्थिक साहाय्य घेतले. लंडन येथील रॉयल ॲकॅडमी ऑफ आर्टमधून उच्च शिल्पशिक्षण, विशेषत: ब्राँझ कास्टिंगचे तंत्र, त्यांनी आत्मसात केले. प्रसिद्ध चित्र-शिल्पकारांच्या भेटी व त्यांच्या कलाकृती पाहण्यासाठी त्यांनी फ्रान्स, इटली व स्वित्झर्लंडचे दौरे केले आणि नंतर ते भारतात परतले (१९२२). करमरकर यांनी साकारलेल्या शंखध्वनी करणाऱ्या युवतीच्या शिल्पास फाइन आर्ट सोसायटीचा  (कोलकाता) प्रथम पुरस्कार मिळाला. नंतर त्यांनी गोंडल (सौराष्ट्र), बडोदे व अखेरीस मुंबई येथे शिल्पव्यवसाय सुरू केला (१९२५).

अखिल भारतीय शिवस्मारक समितीचे अध्यक्ष कोल्हापूरचे छत्रपती राजाराम महाराज यांनी करमरकरांना पुणे येथील अश्वारूढ शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे काम दिले. करमरकरांनी एकसंध ओतकामाचे धाडस करून तो पुतळा तयार केला. शिल्पकला क्षेत्रातील हा विक्रमच त्यांनी प्रस्थापित केला. हा पुतळा करण्यापूर्वी त्यांनी शिवचरित्राचा अभ्यास केला होता. छत्रपतींची सतेज करारी नजर, मुठीत आवळून धरलेली तलवार, इतकेच काय तर त्यांच्या घोड्याचा रुबाबदेखील त्यांनी अभ्यासला होता. या पुतळ्यामुळे त्यांना दिगंत कीर्ती लाभली (१९२८). माकेंझी अँड मॅजेनॉन या कंपनीच्या फौंड्रीत हे ब्राँन्झमधील शिल्प त्यांनी घडवले. या शिल्पाचे वजन आठ टन व उंची सु. चार मीटर आहे. पुतळ्याच्या चौथऱ्यावर शिवचरित्रातील प्रसंगांवर आधारित उत्थित शिल्पे त्यांनी केली. याबरोबरच त्यांनी नांदेड, इचलकरंजी, बीड येथील शिवाजी महाराजांचे अश्वारूढ पुतळे केले.

छत्रपती शिवाजी महाराजांचे अश्वारूढ ब्राँझशिल्प , पुणे, १९२८.

बडोद्याचे खंडेराव महाराज, मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायाधीश मुल्ला, गिरगाव चौपाटीवरील विठ्ठलभाई पटेल ह्या त्यांच्या सर्व पूर्णाकृती मार्बल आणि ब्राँझमधील असून शिल्पकलेच्या साक्षी होत. तसेच महात्मा गांधी, आचार्य कृपलानी, लोकमान्य टिळक, रवींद्रनाथ टागोर ही त्यांची व्यक्तिशिल्पे प्रसिद्ध आहेत.

जस्टीस मुल्ला, संगमरवर, १९४०.

करमरकरांनी आपल्या आप्तेष्टांची, नोकरमंडळींची शिल्पे स्वत:च्या आनंदासाठी घडवली. ती त्यांच्या जन्मगावी सासवणे येथील संग्रहालयात ठेवली आहेत. पाळीव प्राणी तसेच समाजातील कष्टाळू लोकांच्या जीवनावरील त्यांची सर्वच शिल्पे भावपूर्ण व वास्तववादी आहेत. उदा., मोरू गडी, सुशीला. नोकरमंडळींच्या मुलांची समूहशिल्पे त्यांच्या कलेवरील निष्ठेची साक्ष पटवून देतात. या शिल्पांसोबतच डमरू, टोपली, कळशी, कपड्यांचे बोचके, विटांची भिंत हे सारेच त्या व्यक्तींचे सामाजिक स्थान दर्शविण्यात यशस्वी होतात. या सर्व शिल्पांमधील समूहशिल्प हा प्रकार विलक्षण व विलोभनीय आहे. नोकरांची मुले या समूहशिल्पात पोरवयाची एक ताई आपल्या छोट्या भावाला कडेवर घेऊन उभी आहे, तर लहान बहीण मागून डोकावते आहे आणि मोठा भाऊ अभ्यास करताकरता या बाळाकडे पाहतो आहे. छोटे बाळ आपल्याला पाठमोरे असले, तरी ते या शिल्पाचा केंद्रबिंदू आहे. शिल्पांचा रचनाबंध, कौशल्यपूर्ण मांडणी, चेहऱ्यांवरील निरागस भाव, एकाच कुटुंबातील भावंडांचा मायेचा धागा आदी गुणविशेष यांत अप्रतिम रीत्या उतरले आहेत. पाच चेहऱ्यांचा एकत्रित परिणाम साधलेली ही त्यांची एक सुंदर अभिजात कलाकृती आहे.

कलादेवता, सिमेंट माध्यम, १९४०.

करमरकरांना पाळीव प्राण्यांविषयी विशेष जिव्हाळा होता. माणूस आणि प्राणी यांच्यातील स्नेहसंबंध त्यांच्या कुत्रे, मांजर, माकड, त्यांची पिल्ले, म्हैस आदी शिल्पांतून दृष्टोत्पत्तीस येतो. कुत्र्याचे पिल्लू जवळ घेऊन बसलेली, डोक्यावर पदर घेतलेली ग्रामीण स्त्री किंवा अल्सेशिअन कुत्र्याच्या गळ्याभोवती हात ठेवून बसलेली शहरी स्त्री या दोघींच्याही चेहऱ्यांवरील वात्सल्यभाव या शिल्पांत उतरले आहेत.

करमरकरांच्या व्यक्तिशिल्पांतील प्रयोगशीलतेची प्रचिती त्यांच्या कलाकृतींतून प्रकट होते. त्याच्या शिल्पांत विषयाशी निगडित अर्थपूर्ण आशय, लयपूर्ण रचना, पेहरावाची वास्तव सौंदर्यदर्शी योजना आणि सजीवपणा इत्यादी गुणवैशिष्ट्ये दिसतात. त्यांनी तंत्राचा सुवर्णमध्य साधून नावीन्यपूर्ण वास्तववादी व मानवतावादी शिल्पे घडविली. प्रसंगोपात्त भौमितिक आकृतिबंधांचा आधारही त्यांनी काही व्यक्तिशिल्पांत घेतला आहे. शिल्पकलेसाठी त्यांनी मुख्यत्वे मार्बल, ब्राँझ आणि प्लॅस्टर ऑफ पॅरिस ही माध्यमे वापरलीच; पण सिमेंटमिश्रणाचाही उपयोग केला आहे. व्हिस्कॉन्सीन विद्यापीठाच्या (अमेरिका) निमंत्रणावरून ते अमेरिकेला गेले (१९४९). तेथे त्यांनी व्याख्याने दिली. शिवाय विद्यापीठाचे अधिष्ठाता डलांड यांचे व्यक्तिशिल्प सर्वांसमक्ष घडविले. अमेरिकेतून परतल्यानंतर त्यांनी तेथील शिल्पकला व स्मारकशिल्पे यांवर मौज, सत्यकथा आदी नियतकालिकांतून लेख लिहिले. याशिवाय ते विविध वृत्तपत्रे-मासिके यांतून कलेसंबंधी स्फुटलेखन करीत असत. ‘एका पुतळ्याची जन्मकथा’ हा प्रदीर्घ लेख त्यांनी किर्लोस्कर मासिकासाठी लिहिला (१९८०). तसेचमुखवटे हे कलाविषयक नाटक लिहिले.

करमरकरांना अनेक मानसन्मान लाभले. त्यांच्या मत्स्यकन्या या शिल्पाकृतीला बॉम्बे आर्ट सोसायटीचे सुवर्णपदक मिळाले (१९३०), तसेच भारत सरकारचा पद्मश्री पुरस्कार (१९६२), ललित कला अकादमीची छात्रवृत्ती (१९६४) इत्यादी सन्मान-पुरस्कार त्यांना लाभले. अखिल भारतीय शिल्पकार संघाचे संस्थापक व पहिले अध्यक्ष, आर्ट सोसायटी ऑफ इंडियाचे अध्यक्ष, बॉम्बे आर्ट सोसायटीचे उपाध्यक्ष, लोकसभेतील सजावटीसाठी नियुक्त केलेल्या तज्ज्ञ समितीचे सदस्य आदी विविध पदे त्यांनी भूषविली.

इचलकरंजी (जि. कोल्हापूर) येथे शिवाजी महाराजांचे शिल्प साकारतानाच्या काळात त्यांचे निधन झाले. त्यांच्या सुनबाई सुनंदा या सासवणे येथील ‘शिल्पकार करमरकर शिल्पालयʼ या त्यांच्या संग्रहालयाची देखभाल करतात.

 

संदर्भ :

  • Nehru Centre, Comp. Vinayak Pandurang Karmarkar : A master Sculptor, New Delhi, 1996.
  • घारे, दीपक, प्रतिभावंत शिल्पकार, मुंबई, २०१७.
  • बहुळकर, सुहास; घारे, दीपक, संपा. शिल्पकार चरित्रकोश : दृश्यकला, मुंबई, २०१३.
  • बहुळकर, सुहास आयुष्याची मौल्यवान माती : शिल्पकार करमरकर, पुणे, २०१५.

 

प्रतिक्रिया व्यक्त करा