प्रस्तावना : रासायनिक युद्धपद्धतीमध्ये रसायनांचा, त्यांच्या वैषिक गुणधर्माला अनुसरून, शस्त्रास्त्र म्हणून वापर केला जातो. रासायनिक शस्त्रास्त्रे अत्यंत सहज रीतीने वायू, तरल पदार्थ, आणि घन या माध्यमांतून पसरवली जाऊ शकतात आणि त्यामुळे प्रायोजित लक्ष्याशिवाय ती इतरत्रही इजा पोहोचवू शकतात. रासायनिक अस्त्र हे विशिष्ट रसायनांच्या मिश्रणातून विकसित केलेले असून ते मानवांवर प्राणघातक इजा/तात्पुरते अपंगत्व पोहोचविण्यासाठी तयार केलेले असते. रासायनिक शस्त्र ही संज्ञा कोणत्याही विषारी रसायनास किंवा त्याच्या घटकांस, जे शारीरिक इजा, तात्पुरते अपंगत्व, मृत्यू किंवा मज्जासंस्थेचा दाह घडवून आणू शकतात अशा वैषिक रसायनांना लागू होते. ज्या युद्धोपयोगी साहित्य किंवा इतर वितरक संसाधनातून, भरलेली अथवा रिकामी, रासायनिक अस्त्र पोहोचविले जाते, त्यांनाही अस्त्रच समजले जाते.

रासायनिक युद्धाच्या संप्रेरकांचे वर्गीकरण : रासायनिक युद्धाच्या संप्रेरकांची वेगवेगळी वैशिष्ट्ये असतात आणि त्यानुसार त्यांचे वर्गीकरण वेगवेगळ्या पद्धतीने केले जाते. त्यांच्या अस्थिरतेच्या गुणधर्माप्रमाणे दीर्घकाळ परिणामकारक अथवा अपरिणामकारक असे वर्गीकरण केले जाते. संप्रेरक जितका लवकर बाष्पीभवन होणारा आणि पसरणारा असतो, तितका दीर्घ परिणामकारक असतो. सामान्यतः मानवांवर शारीरिक परिणाम करण्याच्या गुणधर्माप्रमाणे रासायनिक शस्त्रांचे वर्गीकरण केले जाते, ते खालीलप्रमाणे :

 • मज्जासंस्थेवरचे संप्रेरक : ह्या संप्रेरकांना ते मज्जासंस्थेच्या कार्यपद्धतीवर करत असलेल्या परिणामांमुळे हे नाव पडले [मज्जासंस्थेवरचे संप्रेरक ओपि (OP) संयुगांच्या वर्गात मोडतात]. हे संप्रेरक इतर रासायनिक शस्त्रांपेक्षा अधिक विषारी असतात व बाधा झाल्यापासून काही तासांतच मृत्यू घडवून आणतात. उदा., अ. ताबून (Tabun), ब. जी (G) संप्रेरक, सारीन जीबी (Sarin GB) आणि सोमन जीडी (Soman GD), क. व्ही (V) संप्रेरके [ही जी (G) संप्रेरकांपेक्षा जास्त स्थिर असतात]. जशी–व्हीएक्स (VX), [ओपी(OP) असलेले गंधक]. अट्रोपिन, प्रालिडॉक्सिम आणि डाइझेपाम ही तीन औषधे मज्जासंस्थेवरच्या संप्रेरकांची बाधा झाल्यास वापरली जातात.
 • त्वचेवर फोड आणणारे संप्रेरक : ही विषारी रसायने त्वचेवर भाजल्याप्रमाणे इजा निर्माण करतात. ते त्वचा, डोळे आणि श्वासनलिकेवर आघात करून व्रण निर्माण करतात आणि श्वसनेंद्रियांना सूज आणतात. ह्या वर्गातील मुख्य संप्रेरक पुढीलप्रमाणे : अ. नायट्रोजन मस्टर्ड आणि लेवीसाइट्स, ब. गंधकयुक्त मस्टर्ड–ह्यास लसुणासारखा वास असतो व हे अत्यंत अस्थिर रसायन आहे.
 • रक्तावर परिणामकारक संप्रेरक : ही सायनाईड वर्गातील रसायने असून शरीरातील मांसपेशींचा प्राणवायू रोखून शारीरिक चलनवलनावावर जलदपणे  परिणाम करतात. जसे‒पीडादायक श्वासोच्छ्वास, हालचालीवर नियंत्रण नसणे, हृदयाची अनियमितता, प्राणवायूच्या कमतरतेमुळे येणारे झटके, बेशुद्धावस्था आणि श्वासोच्छ्वास बंद पडल्याने अखेरीस मृत्यू. ह्या वर्गातील मुख्य संप्रेरक पुढीलप्रमाणे : अ. हायड्रोजन सायनाईड (HCN), ब. सायनोजेनक्लोराईड (CNCI). ह्या संप्रेरकांची रसायने अत्यंत अस्थिर असल्यामुळे त्यांचा उपयोग कमी असतो; पण त्यांचा वापर बंदिस्त जागेत केल्यास अधिक परिणामकारकता मिळू शकते.
 • श्वसनेंद्रियांवर परिणामकारक संप्रेरक/गुदमरविणारे संप्रेरक : गुदमरून टाकणारे संप्रेरक व्यक्तीच्या श्वसनेंद्रियांना म्हणजे नाक, घसा आणि विशेषतः फुफ्फुसांना इजा पोहोचवतात. अत्यंत पराकोटीच्या प्रकरणात आंतर्त्वचेला सूज येऊन फुप्फुसात द्रव/पाणी साचते. परिणामत: प्राणवायू न मिळाल्याने मृत्यू ओढवतो. ह्यातील काही संप्रेरके पुढीलप्रमाणे : अ. क्लोरीन, ब. फॉस्जिन, क. डायफॉस्जिन, ड. नायट्रिक ऑक्साईड, इ. परफ्लुओरो आयसोब्युटिलीन.
 • दंगलनियंत्रक संप्रेरक (अश्रूधूर) : ही रासायनिक संयुगे डोळ्यांचा दाह किंवा जळजळ (अश्रू किंवा डोळ्यांच्या स्नायूंचे आकुंचन) आणि त्यामुळे डोळे बंद होणे, श्वसनेंद्रियांचा दाह हे परिणाम घडवून अल्पकालीन शारीरिक असमर्थता निर्माण करतात. ही रसायने क्षोभकारक अथवा दाहकारक, त्रासदायक व अस्वच्छताकारक म्हणून ओळखली जातात.
 • भावनापरावर्तक संप्रेरक : रासायनिक संप्रेरक सातत्याने मानवी विचार, समज आणि मनःस्थिती ह्यांवर परिणाम घडवून आणतात त्यांना भावनापरावर्तक संप्रेरक म्हणतात. हे अत्यंत कमी मात्रेतही मानसिक अस्वस्थता निर्माण करतात. उदा., नैसर्गिक-ॲसिड-दाई-एथिल-अमाईड (LSD).
 • विषे : त्यांचे दोन गट आहेत. प्रथिन-विषे आणि अ-प्रथिन विषे. वैषिक संप्रेरकांचा युद्धातील वापर हा स्थानिक दहशतवादी हल्ल्यापुरता मर्यादित असतो. दोन सर्वांत महत्त्वाची संप्रेरके म्हणजे बोटुलिनम विष (त्याच्या विषारीपणामुळे) आणि स्टॅफायलोकोकसएंटेरो टॉक्सिन-बी (त्यातील शारीरिक असमर्थता निर्माण करणारे विष).

रासायनिक अस्त्रांच्या प्रक्षेपणाच्या पद्धती : विषारी रसायनांच्या प्रक्षेपणाच्या संभाव्य पद्धती खालीलप्रमाणे :

 • इमारतीची वातानुकूलीक (AC) प्रणाली.
 • द्राव्य पदार्थांची धुक्यासारखी फवारणी आणि तुषारणी.
 • निष्क्रिय किंवा अप्रत्यक्ष वितरण (जसे रसायनांचे उघडे डबे).
 • कुलपी गोळे, भू-सुरुंग किंवा इतर विस्फोटक ज्यामध्ये स्फोट करणाऱ्या रसायनांव्यतिरिक्त इतर रसायने भरलेली असतात.
 • सुधारित रसायने जी सामान्यतः मिळणारी रसायने धोकादायक रसायनात बदलू शकतात.
 • रसायने साठविणाऱ्या कारखान्यात किंवा वाहनांमध्ये घातपात घडविणे.

रासायनिक युद्धपद्धतीच्या संप्रेरकांपासून संरक्षण :  

 • रासायनिक संप्रेरकांचा शोध : रासायनिक संप्रेरकांची जाणीव त्यांना बळी पडलेल्यांवरचे परिणाम दिसेपर्यंत होऊ शकत नाही. त्वरेने शोध झाल्यास उपाय लवकर होऊ शकतात. विविध प्रकारची, हातात धरण्याजोगी, शोध घेणारी संयंत्रे मिळू शकतात. रासायनिक संप्रेरकांची लागण झालेल्या व्यक्तीची वैद्यकीय लक्षणे आणि शारीरिक चिन्हे, ही सर्वांत उपयुक्त निर्दिशके आहेत.
 • रासायनिक संप्रेरकांपासून सुरक्षा : १. व्यक्तिगत सुरक्षा : व्यक्तिगत सुरक्षेच्या काही पद्धती खालीलप्रमाणे : अ. व्यक्ती आणि विषारी संप्रेरकांमध्ये एक कृत्रिम प्रतिबंध निर्माण करणे आणि श्वसनास योग्य अशा हवेचा पुरवठा करणे. ब. संपूर्ण चेहऱ्यावर घातलेले आवरण श्वसनेंद्रिये आणि डोळ्यांना संरक्षण देते. क. शरीराच्या सुरक्षेसाठी संरक्षक संसाधन (कपड्यांचा संच) वापरू शकतात.

२. सामूहिक सुरक्षा : वाहनातील अथवा निवाऱ्यातील लोकांचा समूह किंवा गटाला दूषित हवा मोठ्या सीव्हमधून (गाळणीतून) शुद्ध करून पुरवठा केल्याने सुरक्षा मिळू शकते. त्यामुळे अशा सुरक्षित क्षेत्रातल्या लोकांना सुरक्षा आवरणांची आवश्यकता पडत नाही.

निरस्तीकरण (अ-दूषितीकरण) : निरस्तीकरण म्हणजे विषारी रसायनांचा नाश करून किंवा निर्विषीकरण करून निरुपद्रवी उत्पादकांत रूपांतर करणे. रासायनिक संप्रेरकांना कमी करणे किंवा काढून टाकणे अशीही निरस्तीकरणाची व्याख्या होऊ शकते. हे काम संप्रेरके जात्याच काढून टाकून अथवा रासायनिक प्रक्रियेने निरास करून साध्य होऊ शकते.

रासायनिक युद्धपद्धतीसंबंधित आंतरराष्ट्रीय करार व संधी : जिनीव्हा करारान्वये आंतरराष्ट्रीय सशस्त्र युद्धात रासायनिक व जैविक अस्त्रांच्या वापराला मनाई करण्यात आली आहे. ह्या करारावर १७ जून १९२५ रोजी स्वाक्षऱ्या करण्ययात आल्या व ८ फेब्रुवारी १९२८ पासून हा करार अमलात आणण्यात आला.

रासायनिक शस्त्रास्त्रे संधी (१९९३) : २९ एप्रिल १९९७ रोजी जगातील पहिला बहुपक्षीय नि:शस्त्रीकरण करार अमलात आणला गेला. ह्या कराराचा मूळ उद्देश रासायनिक शस्त्रास्त्रांचे निर्माण, विकास, संपादन, राखून ठेवणे, साठा करणे आणि हस्तांतरण ह्यांना मनाई करणे हा आहे. ह्या कराराने द हेग (नेदरलँड) येथील ‘रासायनिक शस्त्रास्त्रबंदी संघटन’ यांना रासायनिक शस्त्रास्त्रे नष्ट करण्याचे अधिकार दिले आहेत. ह्या कराराच्या प्रत्येक सदस्यराष्ट्राला असणारा रासायनिक शस्त्रास्त्रांचा साठा व निर्माण करण्याचे कारखाने नष्ट करणे आवश्यक आहे. आजमितीस १९८ राष्ट्रांनी ह्या करारावर स्वाक्षऱ्या केल्या आहेत. ८५ टक्क्यांहून जास्त घोषित रासायनिक शस्त्रास्त्रांचा साठा ‘रासायनिक शस्त्रास्त्रबंदी संघटन’ ह्यांच्या देखरेख आणि पडताळणीखाली नष्ट केली गेली आहेत.

संदर्भ :

 • Bhatia, R. K. Chemical Warfare, New Dehi, 2015.
 • Joachim-Topher, Hans, Karcherbook on Nuclear Biological Chemical Defence, 2000.
 • https://www.opcw.org/

                                                                                                                                                                                                    समीक्षक ‒ शशिकांत पित्रे                                                                                                                                                                                                                                          भाषांतरकार ‒ अजय मुधोळकर