आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्रामध्ये विदेशी चलन-विनिमय दरातील बदलानुसार व्यवहारतोलातील चालू खात्यावर होणारे बदल इंग्रजी वर्णमालेतील सातवे अक्षर J या  आकाराच्या वक्राने दर्शविले जात असल्याने, त्यास जे वक्र असे म्हणतात. व्यवहारतोलातील चालू खात्यावर वस्तू व सेवा निर्यातीतून मिळणारे एकूण महसूली उत्पन्न आणि वस्तू व सेवा आयातीवरील खर्चाची नोंद केली जाते. देशाची आयातीपेक्षा निर्यात जास्त असेल, तर देशाच्या व्यवहारतोलाच्या चालू खात्यावर आधिक्य प्राप्त होते. याउलट, आयात जास्त असेल तर, व्यवहारतोलाच्या चालू खात्यावर तूट निर्माण होते. चलन-विनिमय दरातील बदलामुळे आंतरराष्ट्रीय व्यवहारतोलातील चालू खात्यावरील बदल समजण्यासाठी जे वक्र परिणाम आणि मार्शल लर्नर अटीचे आकलन होणे आवश्यक आहे.

जे वक्राच्या साह्याने चलन अवमूल्यन किंवा चलन (Currency) विमूल्यनाचे व्यापार संतुलनावर होणारे अल्पकालीन व दिर्घकालीन परिणाम दाखविता येतात. मार्शल लर्नर अटीनुसार चलन विनिमय दरातील बदलामुळे व्यवहार तोलाच्या चालू खात्यावर होणारे बदल समजतात. या अटीनुसार निर्यात आणि आयात मागणी किंमत लवचिकतेची बेरीज एकापेक्षा अधीक असेल तर, देशातील चलनाच्या अवमूल्यन किंवा विमूल्यनानंतर निर्यातीत वाढ होऊन आयातीत घट होते आणि चालू खात्यातील तूट कमी होऊन चालू खात्यात आधिक्य निर्माण होते; परंतु निर्यात आणि आयात मागणी किंमत लवचिकतेची बेरीज एकापेक्षा कमी असेल तर, देशातील चलनाच्या अवमूल्यन किंवा विमूल्यनानंतर निर्यातीत अपेक्षेप्रमाणे वाढ होत नाही तसेच आयातीतही तात्काळ घट होत नाही. त्यामुळे चालू खात्यावर सुरुवातीला तूट निर्णाण होते. चलन अवमुल्यनानंतर किंवा विमूल्यनानंतर निर्यात वस्तू स्वस्त झाल्या, तरी ग्राहक निर्यात मागणीस लगेच प्रतिसाद देतीलच, असे नाही.

अल्पकाळामध्ये ग्राहकांची वस्तू अथवा सेवा किंमत वाढूनही ग्राहक सवयीप्रमाणे आयात वस्तू व सेवांचा उपभोग घेतात; कारण अल्पकाळात त्यांची आयात मागणी तुलनेने अलवचिक असते. परिणामी आयातीवरील खर्च वाढून व्यवहारतोलाच्या चालू खात्यावरील तूट काही काळ वाढत जाते. तसेच सापक्षतेने निर्यात वस्तू स्वस्त होऊनही विदेशी ग्राहकांची निर्यात मागणी अलवचिक असल्याने निर्यातीतही काही काळ वाढ होत नसल्याने चालू खात्यातील तुटीत भर पडते.

दीर्घ काळात मात्र विदेशी ग्राहकांमध्ये आपल्या निर्यात वस्तू व सेवांची किंमत कमी झाल्याची जाणीव झाल्याने तुलनेने स्वस्त निर्यात वस्तू व सेवा घेण्याकडे विदेशी ग्राहकांचा कल वाढतो. आपल्या देशातील ग्राहकांना सापेक्षेतेने महाग झालेल्या आयात वस्तू व सेवा किमतींची जाणीव होते आणि ते आयात वस्तू व सेवांची मागणी कमी करतात; कारण दीर्घ काळात मार्शल लर्नर अटीनुसार निर्यात आणि आयात मागणी किंमत लवचिकता बेरीज एकापेक्षा जास्त होऊन निर्यातीपासून महसूली उत्पन्न वाढते, तर आयातीवरील खर्च कमी होतो. परिणामी आपल्या देशाच्या व्यवहारतोलातील चालू खात्यावर आधिक्य निर्माण होते. काही काळ ते अधीक वाढताना दिसते.

थोडक्यात, देशातील चलनाचे अवमूल्यन किंवा विमूल्यनानंतर अल्पकाळात सुरुवातीला आंतरराष्ट्रीय व्यवहारतोलातील चालू खात्यावरील तुटीमध्ये घसरण होत जाते. कालौघात, देशाच्या चलनाच्या अवमूल्यन किंवा विमूल्यनानंतर आयात किंमती निर्यात किंमतीपेक्षा वेगाने वाढण्याची प्रवृत्ती निर्माण होते. त्या काळात आयात-निर्यात मागणीत फार मोठा बदल होत नाही. कालांतराने निर्यात वस्तुंची मागणी वाढते आणि आयात वस्तू-मागणी कमी होते. परिणामी निर्यात-किंमत आयात-किंमतीसमान होते आणि चालू खात्यावरील तुटीची घसरण थांबून उलट गतीने चालू खात्यावरील आधिक्यात वाढ होते. खालील आकृतीमध्ये १९९० पासून २०१७ पर्यंतच्या व्यवहारतोलाच्या चालू खात्यावरील घसरण, त्यानंतरची पठारावस्था आणि सुधारणा दर्शविली आहे.

जे वक्र

आकृतीमध्ये क्ष अक्षाच्या वरच्या बाजुला अक्षावर चालू खात्यावरील आधिक्य बेरजेच्या (+) चिन्हाने दर्शविले आहे, तर क्ष अक्षाच्या खालच्या बजुला अक्षावर चालू खात्यावरील तूट वजा () चिन्हाने दर्शविली आहे. क्ष अक्षावर काळ दाखविण्यासाठी प्रत्येक वर्षी आंतरराष्ट्रीय व्यवहारतोलाच्या चालू खात्यावरील बदल स्पष्ट केले आहेत. १९९० पूर्वीपर्यंत भारताला आंतरराष्ट्रीय व्यवहारतोलामध्ये कोणतीही समस्या नव्हती. व्यवहारतोलातील निर्यातीपासूनचे महसुली उत्पन्न आणि आयातीवरील खर्च समान होता; परंतु १९९० मध्ये भारताच्या व्यवहारतोलावर संकट आल्याने चालू खात्यावर रू. २०० कोटींची तूट निर्माण झाल्यामुळे भारत सरकारने रुपयाचे अवमुल्यन केले. रुपयाच्या अवमुल्यनानंतर निर्यातीत वाढ होऊन निर्यातीपासूनचे उत्पन्न वाढेल आणि आयात कमी होऊन आयातीवरील खर्च कमी होईल, अशी अपेक्षा होती; परंतु अल्प काळात तसे घडले नाही.

सुरुवतीला १९९५ पर्यंत चालू खात्यातील तूट वाढत जाऊन ती ४३० कोटीपर्यंत झाली; कारण अल्प काळात निर्यात व आयात वस्तू-मागणी सापेक्षेतेने अलवचिक असल्याने ग्राहकांनी किंमत बदलास प्रतिसाद दिला नाही. त्यानंतरच्या काळात मात्र आयात-किंमती निर्यात-किंमतीपेक्षा वेगाने वाढण्याची प्रवृत्ती निर्माण झाली. त्या काळात निर्यात आणि आयात मागणीत फार मोठा बदल झाला नाही; मात्र त्यानंतर निर्यात वस्तू व सेवांची मागणी कमी होऊन आयात-निर्यात किंमतीही समान झाल्या. तसेच २००७ पर्यंत आणि त्यानंतरही चालू खात्यावरील घसरण थांबून उलट गतीने निर्यात उत्पन्नात वाढ व आयात खर्चात घट होऊन चालू खात्यावरील आधिक्य २०१७ पर्यंत वाढत आहे. दीर्घ काळात निर्यात मागणी किंमत आणि आयात मागणी किंमत लवचिकतेची बेरीज एकापेक्षा जास्त होते. म्हणजेच, निर्यात आणि आयात मागणी लवचिक होते. त्यामुळे निर्यातीस मागणी वाढते, तर आयातीची मागणी कमी होते आणि चालू खात्यावरील आधिक्य वाढत जाते. ही चालू खात्यावरील घसरण, पठारावस्था आणि सुधारणा (मार्शल लर्नर अट पूर्ण झाल्यास) इंग्रजीतील J वर्णाच्या आकाराने दर्शविता येथे. म्हणून त्यास जे वक्र परिणाम असे म्हणतात.

समीक्षक – राजस परचुरे

प्रतिक्रिया व्यक्त करा