हलक्या, निकृष्ट आणि कनिष्ठ दर्जाच्या वस्तू म्हणजे गिफेन वस्तू. गिफेन वस्तूंबाबतची संकल्पना ब्रिटिश संख्याशास्त्रज्ञ सर रॉबर्ट गिफेन यांनी प्रथम मांडली. गिफेन वस्तू या संकल्पनेत एखाद्या वस्तूची किंमत घटल्यास उपभोक्ता त्या वस्तूच्या मागणीत वाढ करण्याऐवजी घट करतो; याउलट, त्या वस्तूची किंमत वाढल्यास मागणीत घट करण्याऐवजी वाढ करतो, यालाच गिफेनचा विरोधाभास असे म्हणतात. उदा., केकच्या तुलनेत ब्रेड; गव्हाच्या तुलनेत ज्वारी व बाजरी; शुद्ध तुपाच्या तुलनेत वनस्पती तूप; नामांकित (Branded) कपड्यांच्या तुलनेत जाडेभरडे कपडे; नामांकित चप्पल, बूट यांच्या तुलनेत साध्या चप्पल, बूट; शुद्ध सोन्याच्या दागिन्यांच्या तुलनेत बेन्टेक्सचे दागिने इत्यादी. गिफेन वस्तू ही संकल्पना वस्तूच्या भौतिक गुणवत्तेपेक्षा उत्पन्नाशी निगडीत आहे. उदा., बाजारात पाव स्वस्त झाल्यावर गरीब लोक त्याची मागणी वाढवण्याऐवजी कमी करून वाचणारा पैसा दुसऱ्या पर्यायी वस्तूंवर (उदा., केक इत्यादी) खर्च करतात.

गिफेन वस्तू या संकल्पनेमुळे मागणीच्या सिद्धांताची बाजू भक्कम झाल्याचे दिसते. निकृष्ट दर्जाच्या वस्तू किंवा गुणवत्ताधारक वस्तू या बाबी उपभोक्ताच्या उत्पन्नानुसार ठरतात. या वस्तूंच्या किमतींचे त्यांच्या मागणीवर धनात्मक व ऋणात्मक हे दोन्ही परिणाम दिसून येतात. गिफेन वस्तूंचा उपभोक्ता वर्ग त्या त्या देशातील दारिद्र्य, गरिबी यांची वास्तव स्थिती दर्शवितो. शासनाला विकसननीती तसेच कल्याणकारी नीती बनविताना अथवा राबविताना या संकल्पनेचा मार्गदर्शक म्हणून उपयोग होतो.

गिफेन वस्तूंच्या बाबतीत उपभोक्त्याच्या उत्पन्नाचा उपभोगावरील परिणाम आकृतीच्या साह्याने स्पष्ट करता येतो. यासाठी उपभोक्त्याची उत्पन्नरेषा अथवा अंदाजपत्रकीय रेषा, समवृत्ती-वक्र आणि उपभोक्त्याचा उपभोग-वक्र या सैद्धांतिक साधनांचा उपयोग करता येतो.

उभ्या अय अक्षावर चांगल्या वस्तू व आडव्या अक्ष अक्षावर निकृष्ट वस्तू दर्शविल्या आहेत. उपभोक्त्याच्या उत्पन्नात जसजशी वाढ होत जाते, तसतशी अंदाजपत्रकीय रेषा उजवीकडे वरच्या बाजूला स्थानांतरित होते. पप१ ही अंदाजपत्रकीय रेषा समवृत्ती वक्र सव१ ला बिंदूत स्पर्श करते. या समतोल अवस्थेत उपभोक्ता अन एवढ्या निकृष्ट वस्तू व अच एवढ्या चांगल्या वस्तूंची मागणी करतो. उपभोक्त्याच्या उत्पन्नात वाढ झाल्यास अंदाजपत्रकीय रेषा पप२ ही सव२ ला क१ बिंदूत स्पर्श करते व तेव्हा उपभोक्ता निकृष्ट वस्तूची मागणी अनवरून अन१ पर्यंत कमी करतो व चांगल्या वस्तूची मागणी अचवरून अच१ पर्यंत वाढवितो. अशा प्रकारे उपभोक्त्याच्या उत्पन्नात पप३, पप४ ही अंदाजपत्रकीय रेषा जसजशी उजव्या बाजूला सरकून उत्पन्नात वाढ दर्शविते, तसतसा उपभोक्ता चांगल्या वस्तूची खरेदी वाढवितो व निकृष्ट वस्तूची खरेदी कमीकमी करतो. हे क१, क२, क३ या समतोल बिंदूंवरून दिसून येते. , क१, क२, क३ आणि क४ या समतोल किंवा मागणी बिंदूंना जोडणारा उउ हा उपभोक्त्याचा उत्पन्न उपभोग वक्र आहे. जर वस्तू निकृष्ट दर्जाची असेल, तर उत्पन्न उपभोग वक्राची सुरुवात डावीकडून उजवीकडे होते आणि पुन्हा हा वक्र उजवीकडून डावीकडे मागे झुकत जाणारा (Backward Sloping) गुणात्मक आकार धारण करतो. उपभोग वक्र उभ्या अय अक्षाकडे झुकणारा आहे.

याउलट, उभ्या अय अक्षावर निकृष्ट दर्जाच्या वस्तू व आडव्या अक्ष अक्षावर चांगल्या दर्जाच्या वस्तू दर्शविल्यास उपभोग वक्र सुरुवातीला डावीकडून उजवीकडे वर चढत जाणारा आणि नंतर उत्पन्नवाढीबरोबर वरून खाली उतरत येणारा गुणात्मक उताराचा असेल. ही संकल्पना वस्तूच्या गुणवत्तेची व उपभोक्त्यांच्या उपभोगपातळीची वास्तवता आणि समाजव्यवस्थेतील उत्पन्नातील विषमता यांची तीव्रता दर्शविते. त्यामुळे सरकारी धोरण तयार करताना ही संकल्पना मार्गदर्शक ठरू शकते.

संदर्भ :

  • चव्हाण, एन. एल., प्रगत सूक्ष्मलक्ष्यी अर्थशास्त्र, जळगाव, २०१५.
  • देसाई, स. श्री. मु.; जोशी, शं. श.; भालेराव, निर्मल, आर्थिक विश्लेषण भाग-१, पुणे, १९९०.
  • बरला, सी. एस., अर्थशास्त्र शब्दकोश, जयपूर, २००४.
  • Nagpal, C. S., Dictionary of Economics, New Delhi, 2004.
  • Singh, Joginder, Dictionary of Economics, New Delhi, 2006.

समीक्षक : अनील पडोशी