स्मिथ, जेददाय स्ट्राँग (Smith, Jedediah Strong) : (६ जानेवारी १७९९ – २७ मे १८३१). अमेरिकन समन्वेषक आणि फरचा व्यापारी. त्यांचा जन्म अमेरिकेच्या न्यूयॉर्क राज्यातील बेनब्रिज येथे झाला. स्मिथ बारा वर्षांचे असताना त्यांचे कुटुंब प्रथम पेनसिल्व्हेनिया राज्यातील ईअरी परगण्यात, त्यानंतर ओहायओ राज्याच्या उत्तर भागातील वेस्टर्न रिझर्व्ह येथे स्थलांतरित झाले. उत्तर अमेरिकेत पहिल्यांदा खुश्कीच्या मार्गाने अमेरिकेच्या पूर्व भागापासून ते पश्चिमेकडे कॅलिफोर्नियापर्यंत जाऊन येणारे ते पहिले समन्वेषक होते. तसेच ग्रेट सॉल्ट लेक वाळवंट व सिएरा नेव्हाडा पर्वत ओलांडणारे आणि वॉसॅच व सिएरा नेव्हाडा पर्वतांच्या दरम्यानचा ग्रेट बेसिन प्रदेश उत्तरेपासून दक्षिणेपर्यंत तसेच पूर्वेपासून पश्चिमेपर्यंत फिरणारे समन्वेषक म्हणूनही त्याची ख्याती आहे. याशिवाय कॅलिफोर्नियापासून उत्तरेस ऑरेगन पर्यंतच्या पश्चिम (पॅसिफिक) किनाऱ्याने प्रवास करणारे आणि साउथ पास या खिंडीच्या उपयुक्ततेची माहिती करून देणारे पहिले अमेरिकन समन्वेषक म्हणूनही ते प्रसिद्ध आहे. त्यांच्या समन्वेषणातून उत्तर अमेरिकेच्या पश्चिम भागाची बरीच माहिती लोकांसमोर आली.
स्मिथ यांचा पश्चिम अमेरिकेतील समन्वेषणाचा कालावधी १८२२ ते १८३१ असा होता. हा काळ रॉकी पर्वत पार करून फर व्यापाराची भरभराट आणि त्यासाठी मोठ्या प्रमाणावर फरयुक्त प्राण्यांची पारध करण्याचा होता. त्या दृष्टीने त्यांच्या समन्वेषणाला विशेष महत्त्व प्राप्त झाले. १८२१ मध्ये स्मिथ इलिनॉय राज्यात आले. त्या वर्षीचा हिवाळा त्यांनी मिसिसिपी नदीच्या काठावर घालविला. त्या वेळी अमेरिकन फर व्यापारी व समन्वेषक जनरल विल्यम हेन्री ॲश्ली यांच्या रॉकी पर्वताकडील नियोजित सफरीबाबतची बातमी स्मिथ यांना समजली. त्यासाठी ते मिसूरी राज्यातील सेंट लूइस या मिसिसिपी नदीकाठावरील ठिकाणी आले. मे १८२२ मध्ये ॲश्ली यांचे एंटरप्राइज हे गलबत सेंट लूइसवरून निघाले. या सफरीत स्मिथ एक शिकारी म्हणून सहभागी झाले होते. ऑक्टोबरमध्ये त्यांचे पथक माँटॅना राज्यातील यलोस्टोन नदीच्या मुखाजवळ येऊन पोहोचले. तेथे त्यांनी फोर्ट हेन्री हे ठाणे स्थापन केले. सप्टेंबर १८२३ मध्ये मिसूरी नदीपासून पश्चिमेस पर्वतीय प्रदेशाकडे जाताना एका अस्वलाने त्यांना गंभीर जखमी केले. त्यातून बरे झाल्यानंतर १८२४ मध्ये वायोमिंगमधून वायव्येस जाण्यासाठी त्यांनी रॉकी पर्वतातील अत्यंत महत्त्वाची एकमेव साउथ पास ही खिंड पार केली. या मार्गाचा शोध लावणारे स्मिथ हे पहिले नसले, तरी त्या आधीच्या शोधाची माहिती उपलब्ध नसल्यामुळे स्मिथ यांच्या शोधाला विशेष महत्त्व मिळाले.
स्मिथ यांनी १८२६ मध्ये इतर दोघांसह भागीदारीत विल्यम ॲश्ली यांचा व्यापार ताब्यात घेतला. त्याच वर्षी कॅलिफोर्निया आणि वायव्येकडे जाण्यासाठी व्यापारी मार्ग शोधण्याचा त्यांनी निश्चय केला. त्या दृष्टीने स्मिथ आणि त्यांच्या व्यापारी पथकाने ग्रेट सॉल्ट लेक सरोवरापासून प्रस्थान केले. ते यूट आणि पायूट इंडियनांचा प्रदेश, कॅलिफोर्नियातील मोहावी वाळवंट आणि सिएरा नेव्हाडा पर्वतश्रेणी पार करून दक्षिण कॅलिफोर्नियातील सॅन गेब्रीअल येथे पोहोचले. त्यानंतर ते उत्तरेस जाण्यासाठी सिएरा नेव्हाडा पर्वतश्रेणीतून खिंडमार्ग शोधण्यासाठी निघाले. १८२७ मध्ये काही सहकाऱ्यांसह ते सॅक्रामेंटोजवळील अमेरिकन नदीपर्यंत जाऊन पोहोचले. त्यानंतर पर्वतीय व वाळवंटी प्रदेश ओलांडून पुन्हा ग्रेट सॉल्ट लेकजवळ आले. कॅलिफोर्नियावरून खुश्कीच्या मार्गाने परतणारे स्मिथ हेच पहिले अमेरिकन ठरले.
स्मिथ १८२७ च्या अखेरीस ग्रेट सॉल्ट लेकवरून परत दक्षिण कॅलिफोर्नियातील सॅन गेब्रीअलकडे निघाले; परंतु या वेळी मोहावी इंडियनांनी त्यांच्या पथकावर हल्ला करून पथकातील १८ सदस्यांपैकी १० जणांना ठार मारले. उर्वरित सहकाऱ्यांसह ते कॅलिफोर्नियाकडे आले. त्यानंतर १८२८ मध्ये वॉशिंग्टन राज्यातील फोर्ट व्हँकूव्हरकडे जाण्याचा मार्ग शोधण्यासाठी त्यांनी सफर काढली. काही सहकाऱ्यांसह ते उत्तरेस ऑरेगन किनाऱ्यापर्यंत पोहोचले; परंतु मे १८२८ मध्ये स्मिथ छावणीमध्ये हजर नसताना अम्पक्व इंडियनांनी त्यांच्या सहकाऱ्यांना ठार मारले. तरीही स्मिथ यांनी ऑरेगन परगण्याचा प्रवास पूर्ण केला. १८३० मध्ये स्मिथ व त्यांच्या भागीदारांनी रॉकी माउन्टन फर व्यापारी कंपनीतील आपले अधिकार काढून घेतले. कॅलिफोर्नियापासून कोलंबिया नदीकाठावरील फोर्ट व्हँकूव्हरपर्यंतचा किनारी मार्ग शोधण्यात त्यांना यश आले. १८३१ मध्ये ते पुन्हा सँता फे येथील व्यापाराकडे वळले. सँता फे ट्रेल या व्यापारी मार्गावरून जात असताना कोमॅन्ची इंडियनांनी त्यांना सिमरोन नदीजवळ ठार केले.
समीक्षक : माधव चौंडे