पिल्लई, पुथूसरी रामचंद्रन : (२३ सप्टें. १९२८) मल्याळम भाषेतील एक सुप्रसिद्ध भारतीय कवी आणि भारतीय द्राविडी भाषाशास्त्रज्ञ. त्यांनी तीन दशकाहून अधिक काळ शैक्षणिक क्षेत्रात प्राध्यापक म्हणून संशोधन आणि अध्यापनाचे कार्य केले आहे. त्यांचा जन्म केरळ मधील अल्लापुझा जिल्ह्यातील कायमकुल्म जवळील वल्लीकुनम येथे झाला. त्यांचे शिक्षण पोपपायस इलेवन इंग्लिश हायस्कूलमध्ये झाले. महाविद्यालयीन शिक्षण श्री.नारायण कॉलेज कोल्लम येथे झाले.त्यांनी युनिव्हर्सिटी कॉलेज तिरूअनंतपूरम येथे मल्याळम भाषेतील साहित्य या विषयात बी.ए. ही पदवी प्रथम श्रेणीसह उत्तीर्ण केली. याच विद्यापीठातून त्यांनी भाषाशास्त्र विषयात आचार्य पदवी प्राप्त केली.

पुथूसरी रामचंद्रन यांच्या पालकांचे नाव पक्कटू दामोदरन पिल्लई, तर आईचे नाव पुथूसरी जानकी असे होते. वयाच्या सोळाव्या वर्षी त्यांच्या पालकांचे निधन झाले. विधवा झालेल्या आईने संसाराची धुरा आपल्या हातात घेतली आणि पुथूसरी रामचंद्रन यांना जीवन संघर्षाचे धडे दिले. ते विद्यार्थ्यांच्या केंद्रीय त्रावणकोर  समितीचे अध्यक्ष म्हणून विद्यार्थी चळवळीत सक्रीय सहभागी होते. स्वातंत्र्य चळवळीतील त्यांच्या सहभागामुळे त्यांचे शाळेतून नाव काढून टाकण्यात आले होते. जीवनातील समस्यांना विवेकाने तोंड देणाऱ्या पुथूसरी रामचंद्रन यांची जीवन जाणीव त्यांच्या कौटुंबिक स्थितीमुळे समृद्ध बनली.

पुथूसरी रामचंद्रन हे मल्याळम भाषेचे प्राध्यापक होते. त्यांनी केरळ विद्यापीठात प्राच्यविद्या शाखेचे अधिष्ठाता, तसेच केरळ विद्यापीठात आंतरराष्ट्रीय अभ्यास केंद्राचे संचालक, प्लेस नेम सोसायटीचे अध्यक्ष अशी पदे भूषविली आहेत. ते आशियाई आफ्रिकन आणि लटिन अमेरिकन स्टडीजचे संचालक म्हणून कार्यरत होते.

रामचंद्रन पुथूसरी यांचे कौटुंबिक जीवन, त्यांचे सुरुवातीचे कार्य आणि सभोवतालचे सामाजिक जीवन याच्या परिणामातून त्याचा संघर्षमय स्वभाव सिद्ध झाला. त्यांच्या जीवन जगण्या आणि भोगण्याच्या अनुभवातून त्यांची जीवनदृष्टी तयार झाली आणि त्यांनी  वयाच्या सोळाव्या वर्षी पहिला काव्यसंग्रह ओन्नाथ्यकुक्कूटम प्रकाशित केला (१९४४). ग्रामीण गायकन (गाव गायक,१९४८), आवुनाथरा उच्छ्तथिल (शक्य तितक्या जोरात,१९५४), पुथिय कोलानम पुथीयोरलयम (१९६),शक्तीपूजा (१९६५), अकलमथोरम (१९७०), अग्राया स्वाहा (१९८८), उत्सवबाली (१९९८), एन्ते स्वातंत्र्य समरा कविताथल (स्वातंत्र्याच्या कविता, १९९८) हे काव्यसंग्रह तसेच थेरजदेथ प्रभूबंधगल (निवडक निबंध, २०१२), मिडिया (ग्रीक ट्रजेडी बाय युरोपाईडस, १९६५), आफ्रिकन कविताथल  (१३ आफ्रिकन देशातील ३३ कविता, १९८९),चरमगेथाम  (रशियन कविता ,१९८९), कुलशेखर अलावर्दे पेरुमल तीरुमोझी (अर्ली तमिळ कविता,२००१), रशियन आफ्रिकन कविताथल (२०१२) असे अनुवाद देखील केले आहेत.कणसा (१९६७ -१९७१), प्रेसिना मल्याळम (शिलालेख संकलन), भाषा भागवत गीता (२००२) अशी काही गंभीर संपादनेही त्यांनी केली आहेत. केरळ इतिहासाची मुलभूत साधने हा त्यांचा एक महत्वाचा संशोधन ग्रंथ आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर चरित्र आणि साधने या मूळ इंग्रजी प्रकल्पाचे मल्याळम भाषांतर त्यांच्या नेतृत्वात झाले आहे.

पुथूसरी रामचंद्रन यांच्या लेखन कार्याचा आवाका व्यापक आहे. त्यांच्या काव्याच्या व ग्रंथाच्या शीर्षकावरून स्वातंत्र्य लढ्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी कविता लिहिल्या आहेत. त्यांचा राजकारणातील क्रांतीकारक सहभाग त्यांच्या कवितेला प्रेरित करीत गेला आहे. १९४५ ते १९५५ हे दशक मल्याळम कवितेचे गुलाबी दशक म्हणून ओळखले जात होते. याच काळात क्रांतिकारक मार्क्सवादी विचारधारेने प्रेरित झालेले अनेक तरूण होते. या विचारधारेच्या अग्रभागी पुथूसरी हे सक्रीय होते. त्यांनी सर्वसामान्य, शोषित, वंचित माणसाचे दु:ख आपल्या साहित्यात प्राणपणाने मांडले. भारतीय तत्त्वज्ञानातील अध्यात्मिक परंपरेतून प्रेरणा घेऊन आपले काव्य त्यांनी विकसित केले आहे.

पुथूसरी रामचंद्रन यांचे योगदान लक्षात घेता त्यांना साहित्य अकादमीचा भाषा सन्मान, महाकवी वल्लथोल पुरस्कार, आसन स्मारक कविता पुरस्कार, येसेन पुरस्कार रशिया, एझुठाचन पुरस्कार केरळ, थोपिल भाषी पुरस्कार, केरळ साहित्य अकादमी पुरस्कार इत्यादी पुरस्कार प्राप्त झाले आहेत.

संदर्भ :

•  http://164.100.228.241.8080/sahitya-akademi/library/meettheauthor_h.jsp