शंकरन कुट्टी पोट्टेक्काट : (१४ मार्च १९१३ – ६ ऑगस्ट १९८२). श्री. शंकरनकुट्टी कुन्हीरमन पोट्टेक्काट. प्रसिद्ध मल्याळम् साहित्यिक.भारतातील साहित्यातील सर्वोच्च अशा ज्ञानपीठ पुरस्काराचे मानकरी. कथा,कादंबरी,कविता,प्रवासवर्णन इत्यादी साहित्य प्रकारात त्यांनी मल्याळम् भाषेतून विपुल लेखन केले आहे. त्यांचा जन्म कालिकत येथे एका प्रतिष्ठित,मध्यमवर्गीय परिवारात झाला. आताचे कालिकत म्हणजे पूर्वीचे ‘अतिराणीप्पाट’ हे होय. इथेच त्यांचे बालपण, शालेय शिक्षण झाले.त्यांचे वडील शाळेत शिक्षक होते. इंटरची परीक्षा झाल्यावर शंकरन कुट्टी यांनी काही दिवस, एका गुजराती शाळेत शिक्षक म्हणून काम केले.१९३९ मध्ये ही नोकरी सोडून ते मुंबईला आले. याच सुमारास त्रिपुरा काँग्रेसच्या अधिवेशनात ते सहभागी झाले. मुंबईला काही दिवस अनेक नोकऱ्या केल्या, पण १९४५ मध्ये परत कालिकतला आले.
शंकरन कुट्टी यांचे २४ कथासंग्रह, १० कादंबऱ्या, १८ प्रवासवर्णनपर संग्रह, ४ नाटके, ३ कवितासंग्रह, २ निबंधलेखसंग्रह प्रकाशित झाले असून एकूण त्यांची ६० पुस्तके प्रकाशित झाली आहेत. १९२८ मध्ये त्यांची पहिली कथा ‘राजनीथी’ ही त्यांच्या कॉलेजच्या मासिकात छापून आली आणि ‘हिंदू –मुस्लिम मैत्री’ ही कथा दीपम् या नियतकालिकात प्रकाशित झाली. ‘विद्युत् शक्ती’ ही कथा १९३४ मध्ये मातृभूमी इलेस्ट्रेटेड विकलीमध्ये प्रसिद्ध झाली.अशाप्रकारे विविध मासिकातून त्यांच्या कथा प्रसिद्ध होत होत्या. पण १९४० पासून आघाडीचे लेखक म्हणून त्यांचे नाव झाले.
शंकरन कुट्टी यांचे मणिमालिका (१९४४),चंद्रकांतम् ,राजमाली, निशागंधी, पुलिमन, मेघमाला (१९४५),ब्रानथन नाया (१९७१) हे कथासंग्रह प्रकाशित झाले आहेत. त्यांच्या स्वच्छंदतावादी कथा त्याकाळच्या वाचकांसाठी सर्वस्वी नव्या होत्या. मल्याळम् साहित्याला, स्वच्छंदवादी कथेची नवी शैली त्यांनी प्रदान केली आहे. १९७१ मध्ये इटालियन भाषेत, जगातील सर्वश्रेष्ठ कथांचा संग्रह प्रकाशित करण्यात आला. त्यात पोट्टेक्काट यांच्या ‘ब्रानथन नाया’ (Mad Dog) या कथेचा समावेश आहे. त्यांच्या १३ कथांच्या एका संग्रहाचा रशियन भाषेमध्ये अनुवाद झाला असून, या रूपांतरित कथासंग्रहाने अवघ्या दोन आठवड्याच्या काळात दोन लाख प्रतींच्या विक्रीचा विक्रमही केला आहे. त्यांचे प्रभात कान्ति (१९३६), संचरियुते गीतागंल (१९४७) आणि प्रेमशिल्पी (१९४८) हे तीन काव्यसंग्रह प्रकाशित आहेत. संचरियुते गीतागंल (१९४७) या काव्यसंग्रहातील कवितेत त्यांनी जगभर केलेल्या प्रवासाचे प्रतिबंब दिसते.आचन (१९४२) या नाट्यलेखनासह, त्यांनी रेडिओसाठीही काही नाट्यकृती लिहिल्या आहेत. तसेच डायरी, आठवणीवजा असे इतर लेखनही केले आहे.त्यांनी वेळोवेळी काश्मीर, आफ्रिका, यूरोप (१९४६-४७) मध्ये केलेल्या प्रवासानंतर युरोप टुडे हे प्रवासवर्णन लिहिले. १९५२ मध्ये सिलोन, मलेशिया, इंडोनेशिया, १९५७ मध्ये फिनलंड, रशिया, झेकोस्लोव्हाकिया इ. देशात प्रवास केला. काश्मिर (१९४७), इंडोनेशियन डायरी, सोव्हिएट डायरी, नेपाळयात्रा इ. प्रवासवर्णनपर पुस्तके लिहून पोट्टेक्काट यांनी मलयाळम् भाषेतील प्रवासवर्णनात्मक साहित्य समृद्ध केले आहे. ही प्रवासवर्णनपर पुस्तके ज्ञानवर्धक तसेच मनोरंजकही आहेत.एण्टे वार्षयम्पलंगत हा शंकरन कुट्टी यांचा निबंधसंग्रह मलयाळम् साहित्यातील एक अद्वितीय आणि अभिनव असा प्रयोग आहे. यात त्यांनी कालिकत येथील सुरुवातीच्या आयुष्यात भेटलेल्या कवी, क्रांतिकारक आणि राजकारणी लोकांची मार्मिक शब्दचित्रे रेखाटली आहेत.
नादम् प्रेमय (१९४१) ही शंकरन कुट्टी यांची पहिली कादंबरी, ह्या कादंबरीत एका भोळ्या, सुंदर, खेडूत स्त्रीची ही कथा आहे. यासह प्रेमशिक्षा (१९४५),विषकन्यका (१९४८), ओरू तेरूविन्ते कथा (१९६०) ओरू देशत्रिन्ते कथा (१९७१) कवीना (१९७९) इ.एकूण त्यांच्या दहा कादंबऱ्या प्रसिद्ध झाल्या आहेत. विषकन्यका या कादंबरीत त्यांनी उत्तरी मलबारच्या किनाऱ्यावर येऊन राहिलेल्या प्रवाशांच्या कथा सांगितल्या आहेत.या भागातील प्रतिकूल हवामान, हिंसक वन्यपशूंशी कराव्या लागलेल्या संघर्षाची गाथा वर्णन केली आहे. ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त त्यांची प्रसिद्ध कादंबरी ओरू देशत्रिन्ते कथा (१९७१) ही ज्या गावात पोट्टेक्काट यांचे बालपण गेले,त्या गावाचीच कथा आहे. साध्यासुध्या ग्रामीण लोकांच्या जीवनातील सुखदु:ख, समज-गैरसमज, भले-बुरे प्रसंग असे सारे काही जे त्यांनी गावात भोगले, तेच शब्दांकित केले आहे. अतिराणिप्पाट या नावाची ही वस्ती, गावाच्या सीमेपार आहे. या वस्तीचे पुढे विकसित झालेले रूप म्हणजे आजचे कालिकत शहर. पिठाच्या गिरण्या, गडबड-गोंगाटाने गजबजलेले रस्ते, रेस्टॉरेंटस अशा विविध रूपांनी अतिराणिप्पाट हे गाव विकासाच्या नावाखाली दडपले गेले आहे. त्याचा चेहराच बदलून गेला आहे. आपल्या या गावच्या दिवंगत पूर्वजांच्या ओढीने आणि आपल्याही पूर्व जीवनवृत्तांताला अभिव्यक्ती मिळावी म्हणून लेखकाने ही एका गावाची कहाणी या कादंबरीत चित्रित केली आहे.कितीतरी कथा, आठवणींच्या ओघामध्ये लेखक सांगतो. या आठवणीतील कथांप्रमाणेच निसर्ग हाही या कादंबरीतील एक पात्र आहे. विविध स्तरांवरील, विविध प्रवृत्तीच्या व्यक्तिरेखा इथे आपल्याला भेटतात.
तीव्र, सूक्ष्म निरीक्षणशक्ती, स्मरणशक्ती, साहित्याची उपजत आवड, निसर्गसहवासाची आवड यातूनच शंकरन कुट्टी यांच्या साहित्य जीवनाची सुरुवात झाली. सामाजिक बांधिलिकी मानणारे ते एक तत्त्वनिष्ठ लेखक होते. “साहित्य जर तुम्हाला आजूबाजूच्या वस्तुस्थितीचे ज्ञान देत नसेल, तर त्याचा उद्देशच नष्ट होतो. साहित्याने जीवनाचा आरसा व्हायला हवे. साहित्य केवळ वाचनासाठी नसून, काहीतरी समजून घेण्यासाठी आहे” ही त्यांची साहित्यविषयक भूमिका प्रसिद्ध आहे.
शंकरन कुट्टी यांना अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. विषकन्यका या कादंबरीला मद्रास सरकार पुरस्कार (१९४९), ओरू तेरूविन्ते कथा या कादंबरीसाठी केरळ साहित्य अकादमी पुरस्कार (१९६१), ओरू देशत्रिन्ते कथा या आत्मपर कादंबरीसाठी केरळ साहित्य अकादमी पुरस्कार (१९७२), केंद्रीय साहित्य अकादमी पुरस्कार (१९७७), ज्ञानपीठ हा सर्वोच्च साहित्यिक पुरस्कार (१९८०) इत्यादी पुरस्कारांचा त्यात समावेश होतो. कालिकत विद्यापीठातर्फे त्यांना डी.लीट या पदवीने ने सन्मानित करण्यात आले आहे (१९८२).
कालिकत येथे त्यांचे अल्पशा आजाराने निधन झाले.
संदर्भ : http://www.keralaculture.org/sk-pottekkatt/601