गोस्वामी, इंदिरा : ( १४ नोव्हेंबर १९४२ – २९ नोव्हेंबर २०११ ). कथा, कादंबरी, आत्मचरित्र, कविता अशा अनेक साहित्यप्रकारात लेखन करणाऱ्या लोकप्रिय असमिया लेखिका. आसाममध्ये त्या मामोनी रायसोम गोस्वामी म्हणून परिचित आहेत. रामायणाच्या त्या सखोल अभ्यासक मानल्या जातात. आसाममधील गुवाहाटी येथे त्यांचा जन्म झाला. पण त्यांचं बालपण पलाशवाडी सत्रा या कामरूप जिल्ह्यातील धार्मिक जाणिवांचा पगडा असलेल्या, आपल्या आजोबांच्या घरी गेले. त्यांच्या जडणघडणीवर या वास्तव्याचा खूप प्रभाव आहे. त्यांचे वडील उमाकांत गोस्वामी हे अतिशय बुद्धिमान एम.ए.च्या परीक्षेत सुवर्णपदकाचे मानकरी होते. शिक्षणक्षेत्रात ते मोठे अधिकारी होते.

इंदिराजींची वडिलांवर खूप श्रद्धा होती. त्यांची आई अंबिकादेवी या अनेक नियतकालिकातून कवितालेखन करीत असत. रवींद्रनाथ टागोरांच्या अनेक कवितांचे आसामी भाषेत अनुवाद त्यांनी केले असून, लोकगीतांचा संग्रह जतन करण्याचे फार मोठे कार्य त्यांनी केले आहे. आई अतिशय धार्मिक तर इंदिराजींचा मात्र परंपरागत रीतिरिवाजांवर अजिबात श्रद्धा नव्हती. गुवाहाटी येथे शालेय आणि महाविद्यालयीन शिक्षण एम.ए. पूर्ण केल्यावर १९६८ मध्ये आसाममधील ग्वालपाडा सैनिकीशाळेत सुरुवातीला काम केल्यानंतर १९७१ मध्ये त्या दिल्ली विश्वविद्यालयाच्या आधुनिक भारतीय भाषा विभागात अध्यापन करू लागल्या. १९७३ मध्ये ‘तुलसीदास विरचित रामायण आणि आसामी भाषेतील माधव कंदली यांचे रामायण यांचा तौलनिक अभ्यास’ या विषयावर पीच्.डी.चे  संशोधन कार्य त्यांनी पूर्ण केले. यानंतर त्यांनी गंगा आणि ब्रह्मपुत्रेच्या खोऱ्यातील रामायण  हा ग्रंथही लिहिला. सुरुवातीला त्यांनी आसामी साहित्याचं इंग्रजीत आणि इंग्रजीचे आसामी भाषेत अनुवाद केले. सुप्रसिद्ध हिंदी लेखक प्रेमचंद यांच्या कथांचे अनुवादही त्यांनी केले आहेत. तसेच त्यांच्या साहित्याचे मराठी, गुजराती, इंग्रजीत अनुवाद झाले आहेत. आधालेखा दस्तावेज या त्यांच्या आत्मकथेचा अर्धीमुर्धी कहाणी हा मराठी अनुवाद अर्चना मिरजकर यांनी केला आहे. दया पवार, नामदेव ढसाळ आणि हंसा वाडकर यांची अनुवादित आत्मकथने वाचून त्या प्रभावित होत्या. १९६५ मध्ये दाक्षिणात्य अभियंता माधवन रायसोम अय्यंगार यांच्याशी त्यांचा प्रेमविवाह झाला. पण लग्नानंतर दोन वर्षाच्या आतच त्यांच्या पतीचे एका गंभीर अपघातात निधन झाले. या परिस्थितीत लेखणीच त्यांच्यासाठी उद्धारक बनली. वृंदावनात राहून त्यांनी रामायणाचा अभ्यास केला. त्यावर लेखनही केले.

इंदिरा गोस्वामी यांचे साहित्य : कथासंग्रहचिनाकी मरम (१९६२), कडूना (१९६६), चिनाबार स्त्रोत (१९७२), हृदय एक नदीनम (१९९०), ईश्वर जखानी यात्री व अन्यान्य (१९९१), मामोनी रायसोम गोस्वामीर प्रिय गल्प (१९९८), संस्कार, उदंग बाकाश, द्वारका आणि बंदूक, जत्रा, निर्वाचित गल्प, लाल नदी (२००४) ; कादंबरी : नीलकण्ही ब्रज (१९७६), मामरे धरा तरोवाल (गंजलेली तलवार,१९८०), अहिरन (१९८८), उने खोवा हावरा (१९८८), तेज अरू धुलिधूस पृष्ठ, छिन्नमस्ता (२००७) इत्यादी.

चिनाकी मरम  हा त्यांचा पहिला कथासंग्रह. त्यांची कथा ही सामान्य माणसांनाही मानसन्मान असतात हे जाणवून देणारी कथा आहे. ‘अनीता आक इकरार बेर’, ‘आभा गार्डनरर चकुपानी’ या कथांत वेश्येची व्यथा आहे. ‘बैरागी भोमोरा’ ही वृंदावनातील एका बालविधवेची हृदयस्पर्शी कथा आहे. ‘संस्कार’ ही मामोनी यांची अतिशय परिणामकारक कथा आहे. उदरनिर्वाहासाठी कोणताच मार्ग न मिळाल्याने, आजारी पती व मुलाचं संगोपन करण्यासाठी नाईलाजाने शरीरविक्रय करावा लागलेल्या स्त्रीची व्यथा, उच्चवर्णीय घरातील, लहानवयातच वैधव्य आलेला आणि कष्टप्रद आयुष्य वाट्याला आलेल्या तरुण स्त्रीची कथा आणि व्यथा, मजुरांची होणारी पिळवणूक हे सारं वास्तव त्यांच्या कथांमध्ये व्यक्त झालं आहे. नेटके व्यक्तिचित्रण, घटना, प्रसंगातील सूचकता, विसंगती हे सारं बारकाईने टिपत, रसाळ भाषेत केलेली मांडणी ही इंदिरा गोस्वामी यांच्या कथालेखनाची वैशिष्ट्ये आहेत.

असमिया कादंबरी लेखनाच्या क्षेत्रात एक अतिशय प्रभावी समर्थ आणि लोकप्रिय लेखिका म्हणून इंदिरा गोस्वामींच नाव घेतलं जातं. नीलकण्ही ब्रज ही वृंदावनमधील अभागी विधवांच्या जीवनावरील वास्तववादी कादंबरी आहे. या अभागी विधवा म्हणजे राधेश्यामजींच्या अगतिकेच चित्रण त्यांच्या आधालेखा दस्तावेज  या आत्मकहाणीत आहे. मामरेधारा तारोवाल ही साहित्य अकादमी पुरस्कारप्राप्त कादंबरी आहे. उत्तरप्रदेशातील सुईना नदीवरील पुलाच्या बांधकामावरील मजुरांचे दैनंदिन जीवन व त्यांनी केलेला संघर्ष – आंदोलन हा या कादंबरीचा विषय आहे. अहिरन या कादंबरीत मध्यप्रदेशातील अहिरण नदीवरील पुलाचे बांधकाम करणाऱ्या मजुरांच्या दयनीय स्थितीचे शोषणाचे चित्रण आहे. दंताल हातिर उने खोवा हावरा ही भारतीय साहित्यातील एक धाडसी, उल्लेखनीय, सर्वोत्कृष्ट कादंबरी आहे. दक्षिण कामरूपमधील आमरडा सत्रातील मठातील रूढीप्रिय वातावरण, कर्मठपणा, मठातील ब्राह्मण विधवांचं दयनीय आयुष्य आणि शिक्षणाचा, आधुनिकतेचा प्रसार झाल्याने निर्माण होणाऱ्या संघर्षाचे चित्रण यात केलेले आहे. एका सरंजामशाही सत्राच्या (मठाच्या) विनाशाची ही कहाणी आहे. हौद्याला त्यांनी मठरूपी हत्तीच्या ऱ्हासाचे प्रतीक बनविले आहे. या कादंबरीलेखनामुळे सुरुवातीला खूपच खळबळ माजली. तरीही या कादंबरीला आसाम साहित्यसभेचा सन्माननीय बसंतीदेवी स्मृती पुरस्कार प्राप्त झाला आहे. या व्यतिरिक्त तेज अरू धुलिधूस पृष्ठ  ही कादंबरी आहे. याचाही मराठी अनुवाद अर्चना मिरजकर यांनी केला आहे. छिन्नमस्ता  ही त्यांची अलीकडील काळात अतिशय लोकप्रिय ठरलेली कादंबरी होय. १९२०-१९३० या दशकातील आसाममधील कामाख्या मंदिराच्या पार्श्वभूमीवर या कादंबरीचे लेखन झाले आहे. अज्ञान,निरक्षरता, अहिंसा,गरिबी ही विचारसूत्रे या कादंबरीत वास्तवाच्या आधारे मांडण्यात आले आहेत.

अर्धीमुर्धी कहाणी  या आत्मकहाणीत लेखिकेचे बालपण सत्रातील अनुभव, वृंदावनमधील अनुभव, ग्वालपाडाच्या शाळेतील अनुभव, हितचिंतक, असामी लेखक इ. विषयी लिहिलं आहे. रामायणाचा सखोल अभ्यास करण्यासाठी, रामचरितमानस  वाचण्याइतकी हिंदी भाषाही त्या शिकल्या. भरपूर संशोधन, लेखनही केले. या लोकप्रिय लेखिकेने उल्फा अतिरेकी आणि सरकार यांच्यातील शांतीदूत दुवा म्हणून, विद्यार्थ्याविषयीच्या आपुलकीने यशस्वी चर्चा घडवून आणल्या. जनमानसात आदराचे स्थान असलेल्या या लोकप्रिय लेखिकेला अनेक सन्मान पुरस्कार प्राप्त झाले आहेत. भारत निर्माण पुरस्कार, सौहार्दीय कथा पुरस्कार, कमलकुमारी  प्रतिष्ठान पुरस्कार कादंबरीवरील आधारित चित्रपटासाठी आंतरराष्ट्रीय ज्युरी पुरस्कार, तुलसी पुरस्कार, ज्ञानपीठ हा सर्वोच्च साहित्यिक पुरस्कार इत्यादी पुरस्कार त्यांना प्राप्त झाले आहेत. त्यांच्या साहित्यावर आधारित चित्रपट आणि दूरदर्शन मालिकाही प्रसारित झाल्या आहेत. पद्मश्री (२००२) हा भारत सरकारचा पुरस्कार त्यांनी नाकारला आहे.

गुवाहाटी येथे अल्पशा आजाराने त्यांचे निधन झाले.

संदर्भ :

  • Datta, Amresh,(Edi), Encyclopaedia of Indian Literature, New Dehli, 1988.